चालू घडामोडी - ०९ सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 09, 2018 | Category : Current Affairsजपानच्या ओसाकाची कमाल; सेरेनाला नमवून जिंकले पहिले ग्रँडस्लॅम :
 • न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस : जिच्यामुळे टेनिसची आवड लागली. जिच्या यशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून टेनिसमध्ये उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळाली. टेनिसमधली आपली आदर्श कोण, असे विचारताच पहिले नाव जिचे असायचे त्या सेरेना विल्यम्सलाच नमवून जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.

 • वादग्रस्त ठरलेल्या या सामन्यात ओसाकाने ६-२, ६-४ अशा सरळ सेटमध्ये अमेरिकेच्या सेरेनाला पराभूत केले. ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीत जेतेपद जिंकणारी ओसाका ही जपानची पहिलीच खेळाडू ठरली. 

 • १ तास १९ मिनिटांच्या या लढतीत ओसाकाने वर्चस्व गाजवले. कोर्टवरील पंचाशी हुज्जत घातल्याने सेरेनाला पेनल्टी बसली. सामन्यानंतर सेरेनाने आपल्याकडून सामना चोरून घेतल्याचा आरोप केला. वारंवार ताकीद देऊनही सेरेना नियमांचे पालन करत नव्हती. 

 • दरम्यान सामन्यानंतर ओसाका म्हणाली," सेरेनाला मी कधी पराभूत करेन असे वाटलेही नव्हते. ती सामन्यात कमबॅक करेल असे सतत वाटत होते, कारण तिला असे करताना मी अनेकदा पाहिले आहे. पण मी पॉईंट मिळवण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आणि विजय मिळवला." 

हव्या ३० लाख बसगाड्या; उपलब्ध अवघ्या ३ लाख :
 • नवी दिल्ली : भारतात सार्वजनिक बसगाड्यांची उपलब्धता एक दशांशपेक्षाही कमी आहे. देशात ३० लाख बसगाड्यांची गरज असताना उपलब्ध बसगाड्यांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी आहे.

 • उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, सरकारी आकडेवारीनुसार देशात १९ लाख बसगाड्या आहेत. तथापि, त्यातील फक्त २.८ लाख बसगाड्या राज्य परिवहन महामंडळांमार्फत अथवा राज्य वाहन परवान्यांतर्गत चालविल्या जातात.

 • केंद्रीय परिवहन सचिव वाय. एस. मलिक यांनी सांगितले की, सामान्य प्रवाशांची गरज पूर्ण करण्यासाठी आम्हाला ३० लाख बसगाड्यांची गरज आहे. ज्या बस सरकारी संस्थांमार्फत चालविल्या जातात, त्याही पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत, असे दिसून आले आहे. त्यामुळे गरज आणि उपलब्धता यात मोठी तफावत आहे.

 • वाहतूक जाणकारांनी सांगितले की, सार्वजनिक बससेवेची घसरती गुणवत्ता आणि बसगाड्यांची अपुरी संख्या यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना आपली स्वत:ची वाहने खरेदी करणे भाग पडत आहे.

 • गडकरी यावेळी म्हणाले की, ‘ट्रान्स्पोर्ट फॉर लंडन’ (टीएफएल) यासारख्या मॉडेलसाठी खासगी व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. बसगाड्यांची निर्मिती करताना बससेवा देणारी कंपनीही तुम्ही सुरू करा, असे आवाहन मी बस उत्पादकांना केले आहे. टाटा आणि अशोक लेलँडसारखे उत्पादक यात गुंतवणूक करू शकतात.

आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिप नेमबाजीत अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण :
 • चांगवोन : भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.

 • स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. विश्वकपमध्ये अनेक पदके पटकावणाऱ्या या २६ वर्षीय नेमबाजाने १५० पैकी १४० नेम अचूक लगावले. त्यानंतर सुवर्णपदकासाठी शूटआॅफमध्ये त्याची लढत चीनच्या यियांग यांग व स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेजेजसोबत झाली. शूटआॅफमध्ये मित्तलने चीनच्या नेमबाजाचा ४-३ ने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. आंद्रेजेजला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

 • अंकुरने त्यासोबत सांघिक स्पर्धेत मोहम्मद असाब व शार्दुल विहानच्या साथीने कांस्यपदक पटकावले. तिन्ही नेमबाजांनी एकूण ४०९ चा स्कोअर नोंदवला. सुवर्णपदकविजेत्या इटली संघाच्या तुलनेत हा स्कोअर दोनने कमी होता. चीनने ४१० च्या स्कोअरसह रौप्यपदक पटकावले. दिवसातील अन्य स्पर्धांमध्ये दोन भारतीय महिला नेमबाज थोड्या फरकाने आपापल्या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्या.

 • १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदकासह २०२० आॅलिम्पिक कोटा निश्चित करणारी अंजुम मुदगिल महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पात्रता फेरीत ११७० च्या स्कोअरसह नवव्या स्थानी राहिली. अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. अंजुम आणि आठव्या स्थानावरील स्वित्झर्लंडची नीना क्रिस्टेन यांचा स्कोअर समान होता, पण नीनाने इनर १० चे ६६ नेम लगावले होते, तर अंजुमने ५६ ने इनर १० चे लगावले होते.

पेट्रोल-डिझेलचा भडका सुरूच, आज पुन्हा दर वाढले :
 • पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत आज पुन्हा १२ पैशांची तर डिझेलच्या दरात ११ पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, पेट्रोलचा आजचा दर ८७.८९ रू. प्रतिलिटर तर डिझेल ७७.०९ रू. प्रतिलिटर झाला आहे. तर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर ८०.५० रुपये आणि डिझेलचा दर ७२.६१ रु. प्रतिलिटर झाला आहे.

 • काल पेट्रोल ४८ पैशांनी तर डिझेल ५५ पैशांनी महागलं होतं, त्यामध्ये आज पुन्हा भर पडल्याने मोठा फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून येथे तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे.

 •  

 • दुसरीकडे, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली प्रचंड दरवाढ, गगनाला भिडलेली महागाई, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष इत्यादी पक्षांनी महाराष्ट्र बंद करण्याचे जाहीर केले आहे.

 • केंद्रातील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी, कामगार संघटना, टॅक्सी, रिक्षाचालक संघटना, दुकानदार, व्यापारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. बंदमधून दूध पुरवठा, सर्व रुग्णालये, औषधांची दुकाने व  शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये स्वत:हून बंदमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे निरुपम म्हणाले.

दिनविशेष :
 • हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.

महत्वाच्या घटना

 • १७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

 • १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

 • १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

 • १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 • १९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

 • १९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

 • १९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

 • १९९७: ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

 • २००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

 • २०१२:भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.

 • २०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

जन्म

 • १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)

 • १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)

 • १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

 • १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

 • १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

 • १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

 • १९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

 • १९७४: कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.

मृत्यू

 • १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

 • १९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

 • १९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)

 • १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)

 • १९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

 • १९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

 • २०१२: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)

टिप्पणी करा (Comment Below)