चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० एप्रिल २०१९

Date : 10 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नरेंद्र मोदी सत्तेत आले तरच होऊ शकते शांततेवर चर्चा - इम्रान खान :
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. गुरुवारपासून भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

  • इम्रान खान यांनी आपल्याला दोन नरेंद्र मोदी पहायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआऱपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावंर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप पुन्हा एकदा भारताने केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत भारताचं लढाऊ विमान पाडलं होतं. यावेळी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेऊन नंतर सुटका केली होती.

  • या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं आहे. काँग्रेस विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने आमच्यासोबत चर्चा करण्यास घाबरेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

  • काही ठराविक प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी सांगितलं की, ‘भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही’.

पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त पणजी विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर :
  • गोवा : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 19 मे रोजी जाहीर झाली आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासोबत ही पोटनिवडणुक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल लोकसभा निवडणुकीबरोबरच 23 मे रोजी जाहीर होणार आहे.

  • 22 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. 30 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. 2 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.19 मे रोजी निवडणूक होणार असून 23 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

  • पणजी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक कोण लढवणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पर्रिकर यांचा मुलगा उत्पल यांचं नावाची चर्चा आहे. तर मनोहर पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांनी पक्षाचं काम करावं, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे.

  • मनोहर पर्रिकर यांचं 17 मार्च रोजी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या पार्थिवावर 18 मार्च रोजी मिरामार बीचवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला कुठूनही तक्रार करु शकते - सुप्रीम कोर्ट :
  • नवी दिल्ली : विवाहितेचा हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला ज्या ठिकाणी राहत असेल तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करु शकते, असा फैसला सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. याप्रकरणी गेल्या सात वर्षांपासून सुप्रीम कोर्टात खटला सुरु होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या बेंचने आज (मंगळवार, 09 एप्रिल) याप्रकरणी निकाल दिला आहे.

  • कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरनुसार ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे, तो परिसर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता येतो. गुन्हा जर एकापेक्षा अधिक ठिकाणी घडला असेल, तर गुन्हा घडलेल्या ठिकाणांपैकी कोणत्याही एका ठिकाणी गुन्हा दाखल करता येतो. हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी सासरचे घर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, तिथेच जाऊन तक्रार करावी लागत होती. परंतु आता त्याची गरज भासणार नाही.

  • याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले आहे की, पीडित महिला कुठेही राहत असेल, माहेरी, कोणत्याही नातेवाईकाकडे अथवा स्वतंत्र राहत असेल तर ती राहत्या ठिकाणी जवळ जे पोलीस ठाणे असेल, तिथे जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदवू शकते.

विदर्भातील सात जागांसाठी उद्या मतदान :
  • लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांतील प्रचाराची मंगळवारी सांगता झाली. राज्यातील विदर्भातील सात जागांसह या ९१ जागांसाठी गुरुवारी ११ एप्रिलला मतदान होणार आहे.

  • निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह नाना पटोले, भावना गवळी आदी उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. 

  • या टप्प्यात देशातील लोकसभेच्या ९१ जागांबरोबरच आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओदिशा या राज्यांत विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणमधील लोकसभेच्या सर्व १७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 

  • उत्तराखंडमधील पाच, बिहारमधील चार, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, मेघालय, अरूणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन आणि मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालॅन्ड, सिक्कीम, अंदमान-निकोबार येथील प्रत्येकी एका जागेसाठी गुरुवारी मतदान होणार आहे.

भारतीय संघ थायलंडमध्ये खेळणार :
  • थायलंडमध्ये जून महिन्यात होणाऱ्या निमंत्रितांच्या किंग चषक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघदेखील सहभागी होणार आहे. हे सर्व सामने बुरीरॅमच्या ३६ हजार क्षमतेच्या चॅँग स्टेडियमवर होणार आहेत.

  • या स्पर्धेत भारत आणि थायलंडशिवाय व्हिएतनाम आणि कुराकाओ येथील संघ सहभागी होणार आहेत. फिफाच्या जागतिक क्रमवारीनुसार कुरकाओ सध्या ८२ व्या, व्हिएतनाम ९८ व्या, भारत १०१ व्या, तर थायलंड हा ११४ व्या स्थानावर आहे. किंग चषक ही फिफाच्या ‘अ’ श्रेणीतील स्पर्धा असून थायलंडकडून या स्पर्धेचे आयोजन १९६८ सालापासून केले जाते.

  • भारतीय संघ या स्पर्धेत यापूर्वी १९७७ साली सहभागी झाला होता. दरम्यान यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक संघ हा दोन सामने खेळणार आहे. भारतीय संघ तब्बल १८ वर्षांनंतर फिफाच्या मान्यताप्राप्त श्रेणी स्पर्धेत खेळणार आहे. यापूर्वी २००१ साली भारत क्वालालंपूर येथील मेरडेका स्पर्धेत खेळला होता. २०१८ साली झालेला किंग चषक स्लोव्हाकिया संघाने थायलंडला ३-२ असे पराभूत करून जिंकला होता.

  • भारतीय फुटबॉल संघटनेचे सरचिटणीस कौशल दास यांनी व्यक्त केला. ‘‘येत्या सप्टेंबरपासून २०२२ च्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यांना प्रारंभ होणार असल्याने सरावासाठी हे सामने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत,’’ असेही दास यांनी सांगितले.

आनंदची ग्रिशूकशी बरोबरी :
  • भारताच्या विश्वनाथन आनंदने रशियाच्या अलेक्झांडर ग्रिशूकविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. शामकीर बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने नेदरलँड्सच्या अनिश गिरीचे आव्हान परतवून लावत सातव्या फेरीअखेर अग्रस्थान पटकावले आहे.

  • गेल्या फेरीत रशियाच्या सर्जी कार्याकिनकडून पराभूत व्हावे लागलेल्या आनंदने ही लढत बरोबरीत सोडवत कार्लसनला गाठण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद आणि कार्लसनमध्ये फक्त १.५ गुणांचा फरक आहे. कार्लसन ५ गुणांसह चौथे जेतेपद पटकावण्याच्या तयारीत आहे. आनंद, ग्रिशूक, टोपालोव्ह, रादजाबोव्ह, नवारा आणि डिंग लिरेन हे प्रत्येकी ३.५ गुणांसह कार्लसनपाठोपाठ आहेत.

  • व्हेसेलिन टोपालोव्हने तैमूर रादजाबोव्हविरुद्ध बरोबरी पत्करली. शाखरीयार मामेद्यारॉव्हने चीनच्या डिंग लिरेनला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.

  • १९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

  • १९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.

जन्म 

  • १७५५: होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १८४३)

  • १८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०१)

  • १८४७: हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९११)

  • १८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९४१)

  • १८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९८३)

  • १८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)

  • १९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७१)

  • १९०७: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)

  • १९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे २०१३)

  • १९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)

  • १९३१: शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म.

  • १९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.

  • १९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु यांचा जन्म.

  • १९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.

  • १६७८: रामदास स्वामींची लाडकी कन्या वेणाबाई यांचे निधन.

  • १८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १७३६)

  • १९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी१८८३)

  • १९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)

  • १९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)

  • १९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)

  • १९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)

  • २०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.