चालू घडामोडी - १० ऑगस्ट २०१८

Updated On : Aug 10, 2018 | Category : Current Affairsएनडीएचा अखेर विजय, हरिवंश सिंह राज्यसभेचे उपसभापती :
 • नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपल्या उमेदवाराच्या विजयासह पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लावला. यूपीएचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांना पराभूत करत एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह 25 मतांनी विजयी झाले आहेत.

 • हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली तर बीके हरिप्रसाद यांना 105 मतं मिळवता आली. 245 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या 244 खासदार आहेत, तर एक जागा रिक्त आहे. पण 230 खासदारांनीच मतदानात सहभाग घेतला. एनडीएच्या या विजयात सर्वात मोठं योगदान बीजू जनता दलाचं आहे. अनेत मतभेदानंतरही बीजेडी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मतदान केलं.

 • राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हरिवंश सिंह यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांना शुभेच्छा देत मिळून जनतेच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचं आवाहन केलं.

एनआरसीप्रकरणी हस्तक्षेप करण्याची राष्ट्रपतींना विनंती :
 • नवी दिल्ली : आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांना गुरुवारी केली.

 • काँग्रेसचे नेते आनंद शर्मा, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, माकपचे मोहम्मद सलीम, जनता दल (सेक्यूलर)चे एच. डी. देवेगौडा, तेलुगू देसम पार्टीचे वाय. एस. चौधरी, आपचे संजय सिंग आदी नेत्यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. देशातील लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्ये केंद्र सरकार पायदळी तुडवत आहे. एनआरसीमधून ४० लाख भारतीय नागरिकांची नावे त्यामुळेच वगळण्यात आली, असा आरोप या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केला. त्यात पुढे म्हटले आहे की, एनआरसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल केंद्र सरकार दिशाभूल करणारी विधाने करीत आहे.

 • चंडी यांचा आरोप एनआरसीच्या मुद्द्यावरून भाजपा राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ओमन चंडी यांनी केला. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, एनआरसीबद्दल विरोधकांनी नोंदविलेल्या आक्षेपांकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.

 • एनआरसीमधून वगळण्यात आलेले जे लोक देश सोडून जाणार नाहीत त्यांना गोळ्या घालून ठार मारा, असे आक्षेपार्ह वक्तव्य तेलंगणातील भाजपा आमदार टी. राजा सिंग यांनी ३१ जुलै रोजी केले होते. त्यांच्यावरही त्या पक्षाने अद्याप कारवाई केले नाही, असेही चंडी यांनी पुढे म्हटले आहे.

७० वर्षांवरील वृद्ध आणि मंत्री बीसीसीआयचे पदाधिकारी नसणार :
 • नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात 'बीसीसीआय'मध्ये यापुढे 70 वर्षांवरील वृद्ध पदाधिकाऱ्यांचा भरणा नसेल. त्याचप्रमाणे मंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तींनाही 'बीसीसीआय'मध्ये पदाधिकारी होता येणार नाही. लोढा समितीच्या शिफारसीनुसार 30 दिवसात नवीन संविधान तयार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने 'बीसीसीआय'ला दिले आहेत.

 • 'एक राज्य, एक मत' या नियमला कोर्टाने सूट दिली आहे. लोढा समितीने प्रत्येक राज्यातील एकाच क्रिकेट संघाला पूर्ण सदस्यत्व देण्याची शिफारस केली आहे. दीर्घ काळापासून तीन-तीन क्रिकेट संघ सक्रिय असलेल्या महाराष्ट्र, गुजरात सारख्या संघांवर याचा परिणाम झाला. राज्यानुसार सदस्यत्व मिळणार असल्याने रेल्वे, सैन्य आणि विश्वविद्यापीठांच्या क्रिकेट संघांचं सदस्यत्व संपुष्टात येण्याची भीती होती.

 • कोर्टाने महाराष्ट्रातील तिन्ही क्रिकेट संघ- मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ यांना पूर्ण सदस्यत्व दिलं. त्याचप्रमाणे गुजरातमधीलही गुजरात, सौराष्ट्र आणि बडोदा या तिन्ही क्रिकेट संघांना पूर्ण सदस्यत्व मिळवण्यात यश आलं. रेल्वे, सैन्य आणि विश्वविद्यापीठांच्या क्रिकेट संघांनाही सदस्यत्वाचा दर्जा मिळाला.

 • बीसीसीआय किंवा राज्य क्रिकेट बोर्डाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा कार्यकाळ संपल्यावर तीन वर्षांपर्यंत कूलिंग ऑफ पीरिएडची तरतूद लोढा समितीने केली होती. म्हणजेच पुढील तीन वर्ष ती व्यक्ती पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाही. कोर्टाने कूलिंग ऑफ पीरिएडची तरतूद कायम ठेवली. मात्र दोन सलग कार्यकाळानंतर ही अट लागू होईल.

तिहेरी तलाक विधेयकात सुधारणा :
 • नवी दिल्ली : तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या आणि तो देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असलेल्या विधेयकात केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सुधारणा केली. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, यासाठी ही सुधारणा झाली असून संबंधित पतीला परिस्थितीनुरूप जामीन देण्याचा अधिकार त्यानुसार न्यायालयाला देण्यात आला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्याच्या गैरवापराची भीती मोठय़ा प्रमाणात व्यक्त झाली होती.

 • कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.

 • ‘मुस्लीम महिला विवाहविषयक हक्क संरक्षण’ हे विधेयक गेल्या वर्षी लोकसभेत मंजूर करण्यात आले, मात्र ते राज्यसभेत प्रलंबित आहे. शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून हे सुधारित विधेयक शुक्रवारीच राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत ते मंजूर झाले, तर लोकसभेत परत पाठवले जाऊन त्यातील सुधारणांना मंजुरी मिळवली जाईल, असे सांगण्यात आले. या विधेयकाला आता विरोधकांनी मंजुरी द्यावी, असे प्रसाद म्हणाले.

 • तिहेरी तलाक हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने पोलीस गुन्हेगाराला जामीन देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जावे लागेल, असे प्रसाद यांनी सांगितले. अर्थात पत्नीला भरपाई देण्यास पतीने मान्यता दिली तरच हा जामीन देता येणार आहे. अर्थात या भरपाईची व्याप्ती किती असावी, याचा निर्णयही न्यायालयावरच सोपवण्यात आला आहे.

अमेरिका रशियावरही नव्याने निर्बंध लादणार :
 • वॉशिंग्टन/लंडन : रशियाचा माजी गुप्तहेर आणि त्याच्या कन्येला ठार मारण्यासाठी रशियाने त्यांच्यावर ब्रिटनमध्ये विषारी वायूचा प्रयोग केल्याचे निश्चित झाल्यानंतर आता अमेरिकेने रशियावर नव्याने कडक निर्बंध घालण्याचे ठरविले आहे.

 • सर्जेई स्क्रिपल आणि त्याची कन्या युलिया यांच्यावर मार्च महिन्यात हल्ला करण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. युलिया हिला एप्रिल महिन्यात रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले तर सर्जेई यांना मे महिन्यांत घरी पाठविण्यात आले होते.

 • ब्रिटनचे नागरिक असलेल्या या दोघांची हत्या करण्यासाठी ‘नोव्हीचोक’ या विषारी वायूचा प्रयोग करण्यात आल्याने हे निर्बंध घालण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

 • सॅलिसबरी शहरातील या हत्येच्या प्रयत्नामागे रशिया असल्याचा ब्रिटनने केलेला आरोप रशियाने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून रशियाच्या सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध रासायनिक किंवा जैविक शस्त्रांचा वापर केल्याचे अमेरिकेचे ठाम मत आहे. त्यामुळे जवळपास २२ ऑगस्टपासून हे निर्बंध लादले जातील, अशी शक्यता आहे.

दिनविशेष :
 • आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन

महत्वाच्या घटना

 • १६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.

 • १८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.

 • १८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.

 • १९८८: दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.

 • १९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.

 • १९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.

 • १९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.

जन्म

 • १७५५: ५ वा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)

 • १८१०: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८६१)

 • १८१४: नेस्ले कंपनी चे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १८९०)

 • १८५५: जयपूर – अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४६)

 • १८६०: संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)

 • १८७४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९६४)

 • १८८९: मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९६८)

 • १८९४: भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून१९८०)

 • १९०२: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८३)

 • १९१३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २००३)

 • १९३३: कोसवर्थ कंपनी चे संस्थापक किथ डकवर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००५)

 • १९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट पारू शफकत राणा यांचा जन्म.

 • १९५६: भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्म.

 • १९६०: भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २००१)

 • १९६३: भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २००१)

मृत्यू

 • १९४२: हुतात्मा शिरीषकुमार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

 • १९५०: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०७)

 • १९८०: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)

 • १९८२: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९२७)

 • १९८६: महावीरचक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. (जन्म: २७ जानेवारी१९२६)

 • १९९२: कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)

 • १९९७: कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन.

 • १९९९: भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर१८९९)

 • २०१२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३२)

टिप्पणी करा (Comment Below)