चालू घडामोडी - १० डिसेंबर २०१७

Date : 10 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जेरूसलेमबाबतच्या निर्णयावरुन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका एकाकी :
  • न्यूयॉर्क : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेरुसलेमसंदर्भातील निर्णयावरुन संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिका एकाकी पडल्याचं चित्र आहे. कारण, जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याबाबत सुरक्षा परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. ट्रम्प यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद अरब देशांसह अन्य देशांमध्ये उमटले होते.

  • ट्रम्प यांच्या निर्णयानंतर इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. तर इराणमध्येही हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.

  • त्यामुळे सर्वांचेच लक्ष संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीकडे होतं. त्यानुसार, सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्येही ट्रम्प यांच्या निर्णयावर सदस्य देशांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी चर्चेने या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा, असे मतही परिषदेने यावेळी नोंदवलं.

आता 'ओटीपी'च्या माध्यमातून मोबाईल करा 'आधार'शी लिंक :
  • सध्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 'आधार' लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच मोबाईल क्रमांकही आधारशी लिंक करण्यासाठी फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

  • मात्र, अद्यापही असंख्य मोबाईलधारकांनी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला नाही. त्यामुळे आता नवी योजना राबवण्यात येणार असून, या योजनेनुसार घरबसल्या ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकतो.

  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित केल्याने न्यायालयाने सर्व मोबाईलधारकांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्यास सांगितले होते. त्त्यासाठी फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.

  • त्यामुळे या सर्व मोबाईलधारकांच्या सोयीसाठी 1 जानेवारीपासून घरबसल्या मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकतो. यासाठी व्हॉइस गाईडेड प्रणालीच्या माध्यमातून आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.

  • त्यानंतर संबंधित मोबाईलधारकाला वन टाईम पासवर्ड त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. त्यानंतर त्या क्रमांकाच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकेल.

देशातील ५०० इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद :
  • नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत देशातील पाचशे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली असून, यापुढे नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य सरकारांची संमती गरजेची असेल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

  • लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश जावडेकर म्हणाले की, ही महाविद्यालये सरकारने बंद केली नाहीत. विद्यार्थ्यांअभावी ती बंद पडली आहेत. कोणते महाविद्यालय केवळ पैसे कमावण्यासाठी उघडले आहे, हे माहीत असल्याने विद्यार्थी त्यात प्रवेश घ्यायला जात नाहीत.

  • संपुआ सरकारच्या काळात वाटेल तशी महाविद्यालये सुरू झाली. वर्ग व हॉल उभे राहिले, पण शिक्षक व पायाभूत सोयी नव्हत्या. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि नोकºयाही मिळाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होऊन ही महाविद्यालये बंद पडली. त्यामुळे यापुढे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्यांची मंजुरी बंधनकारक आहे.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ, माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास यांची उपस्थिती :
  • अलिबाग : प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते.

  • जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आणि नागरिकांनी हे स्वत:चे कर्तव्य समजून या राष्ट्रीय कार्यास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

  • भारताचे माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास यांच्या विशेष उपस्थितीत, रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-२०१७ संकलन शुभारंभ कार्यक्रम शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाला.

  • त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, अलिबाग तहसीलदार प्रकाश सपकाळ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, राज्य मार्ग परिवहन महामंडळ पेण विभाग नियंत्रक विजय नवनाथ गिते, तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि माजी सैनिक आदी उपस्थित होते.

  • प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास यांचे स्वागत केले.

अनावश्यक कामांना कात्री ,पालिकेने वाचवले कोट्यवधी रुपये :
  • मुंबई : ठेकेदारांची तुंबडी भरण्यासाठी रस्ते व पर्जन्य जलवाहिन्यांच्या विभागात काही अनावश्यक कामे सुरू असल्याची धक्कादायक प्रकरणे उघड झाली आहेत. छोट्या दुरुस्तीवर भागत असताना रस्ते खोदून ठेवण्याचे प्रकार अनेक वेळा होत आहेत.

  • असे काही घोटाळे समोर आल्यानंतर अशा अनावश्यक कामांना कात्री लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पर्जन्य जलवाहिन्या व रस्त्यांची अनावश्यक कामे रद्द केल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपये ठेकेदारांच्या खिशात जाण्यापासून वाचले आहेत.

  • पालिका आयुक्त अजय मेहता यांच्यामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मासिक आढावा बैठक घेण्यात येते. या बैठकीत ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. कुलाबा, फ्लोरा फाउंटन येथे रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र तेथे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता गृहीत धरून पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.

  • प्रत्यक्षात या ठिकाणी पाणी तुंबत नाही. तरीही कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ पी. रामचंदानी मार्ग, फ्लोरा फाउंटन परिसर, मुंबई उच्च न्यायालय परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग या ठिकाणी मोठ्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे समोर आले आहे. ही सर्व कामे आता रद्द करण्यात आली आहेत.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • मानवी हक्क दिन

महत्वाच्या घटना

  • १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.

  • १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

  • १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

  • १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.

  • २००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.

  • २०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • २०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.

जन्म

  • १८७०: इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९५८)

  • १८७८: स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)

  • १८८०: प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)

  • १८९२: मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ मार्च १९३७)

  • १९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.

  • १९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.

मृत्य

  • १८९६: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १८३३)

  • १९२०: डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६८)

  • १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल१८७२)

  • १९५५: प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या विकाराने निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)

  • १९६३: इतिहास पंडित सरदार के. एम. पणीक्कर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९५)

  • १९६४: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)

  • १९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)

  • २००१: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर१९११)

  • २००३: संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन.

  • २००९: लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.