चालू घडामोडी - १० डिसेंबर २०१८

Date : 10 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
४ आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले ‘हे’ आहे देशातील एकमेव राज्य :
  • केरळमधील कुन्नूर येथे नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (रविवार) उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. याबरोबरच ४ आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले केरळ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे. कुन्नूर येथे सुमारे २००० एकर परिसरात हे विमानतळ उभारले असून यासाठी १८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केरळमध्ये कुन्नूर विमानतळाशिवाय तिरुवनंतपुरम, कोच्ची आणि कोझिकोड हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या कार्यरत आहेत.

  • कुन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.ची (केआयएएल) २००० प्रवाशांची क्षमता आहे. या विमानतळावरील रनवेची लांबी ही ३,०५० मीटर असून ती ४००० मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. विमानतळावर एअरोप्लेसचे संचालन सुरु करण्यात आले आहे. अबूधाबीसाठी येथून पहिल्या व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमानाने उड्डाण केले.

  • विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपाने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. शबरीमला वादावरुन भाजपाने तर राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांना निमंत्रण न दिल्यामुळे काँग्रेसने बहिष्कार टाकला होता.

  • तत्कालीन मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या कार्यकाळातच विमानतळाचे ९० टक्के काम झाले होते. याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते, असे मत काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले. सुमारे १ लाख लोक या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.

करण सिंगला सलग दुसरे विजेतेपद :
  • प्राजक्ता, शंकर अर्धमॅरेथॉनचे मानकरी - भारतीय सैन्यदलाच्या करण सिंगने आपला दबदबा कायम राखत यंदादेखील वसई-विरार महापौर मॅरेथॉन शर्यतीत सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली, तर प्राजक्ता गोडबोले आणि शंकर थापा यांनी अर्धमॅरेथॉन शर्यत जिंकण्याची किमया साधली.

  • सकाळच्या गुलाबी थंडीत प्रारंभ झालेल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी निर्धारित वेळेत प्रारंभ झाल्यानंतर प्रमुख धावपटूंनी आघाडी घेण्यास प्रारंभ केला. त्यात सैन्यदलाच्या करणने प्रारंभापासून पहिल्या पाचांमध्ये राहण्याचे धोरण ठेवले.

  • दोन-तृतीयांश अंतर पार केल्यानंतर त्याने एकेका धावपटूला मागे टाकत अव्वल स्थानावर मुसंडी मारली. मात्र अखेरच्या टप्प्यापर्यंत अन्य धावपटूंनीदेखील करणला तोडीसतोड धाव घेत त्याला चांगली लढत दिली. मात्र करणने त्याची अल्पशी आघाडी अखेपर्यंत कायम राखत ४२ किलोमीटरचे अंतर २ तास २२ मिनिटे ४२ सेकंद या वेळेत पूर्ण केले. द्वितीय क्रमांकावर आलेल्या लालजी यादवने २ तास २२ मिनिटे ५८ सेकंद तर तृतीय क्रमांकावरील शामरू जाधवने २ तास २३ मिनिटे ०८ सेकंद वेळ नोंदवली. करणने अनुभवाच्या बळावर पुन्हा एकदा पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेवर छाप पाडली.

  • या स्पर्धेच्या विविध गटांमध्ये धावणाऱ्या हजारो धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारताची अव्वल धावपटू द्युती चंद उपस्थित होती. वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे आठवे पर्व होते. दशकाच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे नाव देशभरात झाले असल्याने अनेक राज्यांसह नेपाळ, भूतान आणि आसपासच्या देशांतील धावपटूदेखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनीदेखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

सातवा वेतन आयोग जानेवारीपासूनच :
  • राज्यातील शासकीय-निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

  • सातव्या वेतन आयोगाचा अभ्यास करून त्याची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल, यासाठी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने ५ डिसेंबरला राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. त्यानुसार राज्यात केंद्राप्रमाणे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची तयारी करण्यात आली आहे. साधारणत २० डिसेंबरच्या आत मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन तसा शासन आदेश काढण्यात येणार आहे, असे समजते.

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. राज्यातही त्याच तारखेपासून आयोग लागू करावा, अशी कर्मचारी व अधिकारी संघटनांची मागणी होती. याच संदर्भात ऑगस्टमध्ये झालेल्या संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मुख्यमंत्री सातवा वेतन आयोग जानेवारीपासूनच देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राप्रमाणेच १ जानेवारी २०१६ पासूनच पूर्वलक्ष्यी प्रभावाने आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील, अशी ग्वाही दिली होती.

  • त्यानंतर विधिमंडळात मुनगुंटीवार यांनीही तशी घोषणा केली होती. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी लेखी उत्तरात १ जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष लाभ देण्यात येतील, असे म्हटले आहे.

३० लाख लोकांचे भवितव्य अनिश्चित :
  • गुवाहाटी : आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’ (एनआरसी) प्रसिद्ध झाल्यावर त्यात समावेश नसलेल्या लोकांची नावे राज्याच्या मतदारयाद्यांमधून वगळली जाऊ शकतील, अशी शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली.

  • आसाममध्ये बांगलादेशातून आलेले बेकायदा घुसखोर हुडकून काढण्यासाठी ‘एनआरसी’ तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत जे घुसखोर ठरतील त्यांना देशाबाहेर घालविणे हा अंतिम उद्देश असला तरी पहिला टप्पा म्हणून अशा लोकांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्याची संभाव्य कारवाई पहिल्या टप्प्यात केली जाऊ शकेल, असे या सूत्रांनी सूचित केले.

  • ‘एनआरसी’चे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने व त्यांच्याच देखरेखीखाली सुरू असल्याने अंतिम ‘एनआरसी’ प्रसिद्ध झाल्यावर पुढे काय करायचे हे न्यायालयाच्या निर्देशांशिवाय ठरविले जाऊ शकत नाही, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

  • आसाममध्ये राजकारण तापले विदेशी घुसखोर बाजूला राहून ही प्रक्रिया भारताच्याच दोन राज्यांमधील भांडणाचे कारण ठरली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एनआरसी’ला जोरदार विरोध केला आणि आसाममध्ये राहणाऱ्या बंगाली लोकांना स्वदेशातच निर्वासित करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप केला.

टीम इंडिया ऐतिहासिक विजयपासून फक्त एक विकेट्स दूर :
  • ऍडलेड- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिल्या मालिकेच्या पाचव्या दिवसाच्या उपाहारानंतरच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे. 

  • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला आहे. बुमरानं पंतकरवी पॅनला झेलबाद केलं आहे. त्यानंतर आता शामीनंही स्टार्कचा बळी घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता 93 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाला भारताचा दुसरा डाव 307 धावांवर संपुष्टात आला होता. 

विजय मल्ल्याला भारतात न्याय मिळण्याबाबत साशंकता :
  • भारतातील बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सर्वांच्या नजरा आज ब्रिटनच्या न्यायालयाकडे आहेत. मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण होईल किंवा नाही, हे आज निश्चित होणार आहे. सध्या मी बँकांच्या कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनलो आहे. राजकारणाच्या प्रभावामुळे निष्पक्ष सुनावणीबाबत मला भीती वाटत आहे. राजकीय नेते मला एखाद्या नवीन गुन्ह्यात आरोपी बनवतील, अशी भीतीही मल्ल्याने व्यक्त केली आहे.

  • दरम्यान, विजय मल्ल्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सर्व थकबाकी फेडण्यास तयार असल्याचे सांगितले. मी कर्नाटक उच्च न्यायालयाला आपल्या १४ हजार कोटींच्या संपत्तीची माहिती दिली होती. न्यायालयाच्या निगराणीखाली ही संपत्ती विकली जावी, अशी विनंती मी केली होती. या पैशातून न्यायालय सर्व कर्जदाते आणि कर्मचाऱ्यांची भरपाई करु शकते. माझ्याकडे पुरेसे पैसेही होते, असे मल्ल्याने स्पष्ट केले.

  • एकीकडे सरकारने बँकांना माझा प्रस्ताव स्वीकारु नये अशा सूचना केल्या होत्या. तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाला (इडी) माझी संपत्ती जप्त करण्यास सांगितले होते. मी सरकारी पैशांची चोरी केली आणि देश सोडून पळून गेलो हा आरोप मी फेटाळतो. याउलट किंगफिशर एअरलाइन्स वाचण्यासाठी मी स्वत: ४ हजार कोटी रुपये गुंतवले होते. बँकांनी १०० मूळ रक्कम घ्यावी. जनतेच्या पैशांचे कोणतेही नुकसान होऊ नये. व्याजाबाबत एखाद्या स्वतंत्र न्यायालयाने निर्णय घ्यावा, असेही मल्ल्या म्हणाला.

  • माध्यमांमुळे मी कर्जबुडव्यांचा पोस्टरबॉय बनलो आहे. राजकारणाने प्रेरित या प्रकरणात निष्पक्ष सुनावणीबाबत मला भीती वाटते. राजकीय नेते मला आणखी एखाद्या नव्या प्रकरणात अडकवतील, असे मल्ल्याने सांगितले.

दिनविशेष :
  • मानवी हक्क दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.

  • १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

  • १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

  • १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.

  • २००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.

  • २०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • २०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.

जन्म 

  • १८७०: इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९५८)

  • १८७८: स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)

  • १८८०: प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)

  • १८९२: मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ मार्च १९३७)

  • १९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.

  • १९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९६: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर१८३३)

  • १९२०: डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६८)

  • १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)

  • १९५५: प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या विकाराने निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)

  • १९६३: इतिहास पंडित सरदार के. एम. पणीक्कर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९५)

  • १९६४: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)

  • १९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)

  • २००१: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९११)

  • २००३: संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन.

  • २००९: लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.