चालू घडामोडी - १० जानेवारी २०१९

Date : 10 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताएवढय़ा भूभागावर चिनी रडाराचे लक्ष :
  • बीजिंग : चीनने नौदलासाठी नवीन रडार तयार केले असून त्याच्या मदतीने भारताच्या आकाराएवढय़ा प्रदेशाचा वेध सतत घेता येतो किंवा सतत त्या भागावर टेहळणी करणे शक्य आहे, असे वृत्त आहे.

  • चीनचे हे स्वदेशी बनावटीचे रडार चीनच्या नौदलासाठी महत्त्वाचे असून त्याच्या मदतीने चिनी सागरावर लक्ष ठेवता येणार आहे शिवाय शत्रू देशांची जहाजे, विमाने व क्षेपणास्त्रे त्याच्या निरीक्षणाच्या टप्प्यात येतात. चीनच्या ‘ओव्हर द होरायझन’ या रडार कार्यक्रमात सहभागी असलेल्या एका वैज्ञानिकाने ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ या वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे. 

  • चिनी विज्ञान अकादमी व चिनी अभियांत्रिकी अकोदमी या दोन्ही संस्थांसाठी काम करणारे लिउ योंगटान यांनी सांगितले, की चीनच्या रडार तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात आली असून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदल युद्धनौकेसाठी रडार तयार केले आहे, त्याच्या मदतीने भारताएवढय़ा भूभागावर एकाच वेळी लक्ष ठेवता येईल. या रडारचा आकार आटोपशीर आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देशाचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार लिऊ व लष्करी वैज्ञानिक कियान किहू यांना बीजिंग येथे मंगळवारी ग्रेट हॉल ऑफ दी पीपल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

  • कियान यांना चीनच्या आधुनिक शिक्षण अभियांत्रिकीसाठी सैद्धांतिक प्रणाली तयार करण्यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. भूमिगत अण्वस्त्रविरोधी आश्रय सुविधा त्यांनी तयार केली आहे. लिऊ यांनी जहाजाच्या आकाराचे ओटीएच रडार तयार केले असून त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीची टेहळणी क्षमता वाढली आहे. पारंपरिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकावेळी केवळ वीस टक्के सागरी प्रदेशावर लक्ष ठेवता येते. आता ही क्षमता वाढली आहे.

खेळाडूंना दरवर्षी ५ लाख रुपये देणार :
  • मुंबई : देशातील अनेक दिग्गज खेळाडूंनी अडचणींचा सामना करत भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. त्यामुळे देशातून १ हजार अव्वल खेळाडू निवडले जाणार असून त्यांना प्रत्येक वर्षी ५ लाख रुपये देण्यात येतील. पुढील ८ वर्षे ही रक्कम देण्यात येणार आहे. यातील खेळाडू भारतासाठी ऑलिंम्पिक पदक जिंकून आणतील, अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केली.

  • पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत बुधवारी ‘खेलो इंडिया’च्या दुसऱ्या पर्वाला शानदार सुरुवात झाली. यावेळी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज राज्यवर्धनसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

  • राज्यवर्धन म्हणाले, ‘‘खेळाडूंना मेहनत करावी लागेल. हार-जीत पचवावी लागेल, हेच एका खेळाडूचे आयुष्य आहे. शिक्षण हे शाळेच्या वर्गापुरते मर्यादित नसते, खेळाच्या मैदानात जे शिक्षण मिळते ते कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. आपण मजबूत बनलात तर देश मजबूत होईल. आपण खेळाल तर संपूर्ण देश खेळेल.’’

  • उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिववंदना सादर करून शिवकालीन इतिहास उलगडून दाखविण्यात आला.

नासाला सापडला पृथ्वीहून तिप्पट आकाराचा ग्रह :
  • नासाला आपल्या सूर्यमंडळाच्या बाहेर एक नवीन ग्रह सापडला आहे. नासाच्या ट्रांझिटींग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटेलाईट म्हणजेच TESS ने या ग्रहाचा शोध लावला आहे. हा नासाचा नवा टेलिस्कोप असून या नव्या ग्रहाचा शोध अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.

  • या ग्रहाला HD 21749b असे नाव देण्यात आले असून त्याचा आकार पृथ्वाच्या तिप्पट असल्याचे बोलले जात आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ५३ प्रकाशवर्ष दूर असून तो अतिशय थंड असल्याचे बोलले जात आहे. त्याचे तापमान ३०० डीग्री फॅरेनहाईट असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या ग्रहाला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६ दिवस लागत असल्याचे बोलले जात आहे.

  • इतर ग्रहांवर असणाऱ्या जीवसृष्टीबाबत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हा शोध महत्त्वाचे यश मानले जात आहे. या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूर्यासारख्या प्रकाशमान ताऱ्याला प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांपैकी हा सर्वात थंड ग्रह असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या ग्रहाला छोटा म्हटले जात असले तरीही पृथ्वीच्या तुलनेत ही ग्रह खूप मोठा आहे.

'अ‍ॅमेझॉन'चे संस्थापक जेफ बेजोस पत्नीपासून होणार विभक्त :
  • नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस पत्नीपासून विभक्त होणार आहेत. जेफ बेजोस यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

  • 25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेजोस यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आमचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांना याबाबतची कल्पना आहे. आम्ही दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक प्रोजेक्ट्स आणि संयुक्त उपक्रमांमध्ये भागीदार राहण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 

  • जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांना चार मुले आहेत. मॅकेन्झी बेजोस या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या पहिल्या कर्मचारी होत्या. न्यूयॉर्कमध्ये नोकरीच्या मुलाखतीवेळी जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांची पहिल्यांदा भेट झाली होती. याशिवाय, मॅकेन्झी बेजोस या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी द टेस्टिंग ऑफ लूथर अलब्राइट आणि ट्रॅप्‍ससहित अनेक पुस्तके लिहिली आहेत.  

  • जेफ बेजोस यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीची स्थापना 1994 मध्ये केली होती. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जेफ बेजोस यांच्याकडे137 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेजोस यांचे नाव आहे.

अयोध्या प्रकरण - सुप्रीम कोर्टात नव्या घटनापीठासमोर सुनावणी :
  • नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज अयोध्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. पाच न्यायमूर्तींचं नवं घटनापीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. 6 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना नवं घटनापीठ स्थापन करणार असल्याचं सांगितलं होतं. सर्वसामान्य जमीन वादासारखं या प्रकरणाची सुनावणी होणार नाही. याच्याशी संबंधित घटनात्मक पैलूंवर विचार केला जाईल, असं जाणकार सांगतात.

  • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा यांचा समावेश आहे. ज्येष्ठता आणि वयानुसार हे चारही जण भविष्यात सरन्यायाधीश बनण्याच्या रांगेत आहेत. म्हणजेच कोर्टाने सुनावणीसाठी ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली आहे.

  • "सुप्रीम कोर्ट या प्रकरणाकडे सामान्य जमीन वादाच्या दृष्टीने पाहात नाही. हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा असल्याची जाणीव कोर्टाला आहे. हे प्रकरण धर्माशी जोडलेलं आहे. यामध्ये घटनात्मक पैलूंवर विचार केला जाईल," असं जाणकारांचं म्हणणं आहे. या प्रकरणावर कधी आणि कशाप्रकारे सुनावणी करावी, याबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आलोक वर्माकडून ‘त्या’ बदल्या रद्द :
  • नवी दिल्ली : तब्बल ७७ दिवसांच्या खंडानंतर सीबीआय संचालक म्हणून परतलेले आलोक वर्मा यांनी या कालावधीत काही अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द केल्या असून पुन्हा पूर्वीच्याच जागी त्यांच्या फेरनियुक्त्या केल्या आहेत.

  • आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादंगांनंतर केंद्र सरकारने २३ ऑक्टोबरला या दोघांना पदावरून दूर केले होते. त्यांच्याजागी एम. नागेश्वर राव यांची हंगामी संचालक म्हणून नेमणूक केली होती. त्यांनीच या बहुतांश बदल्या केल्या होत्या.

  • अस्थाना यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप असून त्या आरोपांच्या चौकशीसाठी जे अधिकारी नियुक्त होते त्यांच्या बदल्या राव यांनी केल्या होत्या. २४ ऑक्टोबरला सूत्र स्वीकारताच राव यांनी संयुक्त संचालक ए. के. शर्मा, उप पोलीस अधीक्षक ए. के. बस्सी, पोलीस उपमहानिरीक्षक एम. के. सिन्हा यांच्या बदल्या केल्या होत्या. तीन जानेवारीलाही त्यांनी संयुक्त संचालक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या सर्व बदल्या वर्मा यांनी रद्द केल्या आहेत.

  • वर्मा हे सकाळी पावणे अकराच्या सुमारास कार्यायात आले. तेव्हा राव यांनीच त्यांचे स्वागत केले. वर्मा रात्री उशीरापर्यंत कार्यालयात होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.

  • १७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

  • १८१०: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.

  • १८६३: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

  • १८७०: मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.

  • १९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

  • १९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

जन्म 

  • १७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)

  • १८९६: वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)

  • १९००: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

  • १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.

  • १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.

  • १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.

  • १९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.

  • १९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.

  • १९७४: हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७६०: पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.

  • १७७८: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन. (जन्म: २३ मे १७०७)

  • १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.

  • २००२: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.