चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जून २०१९

Date : 10 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
युवराज सिंग आज निवृत्त होणार - मंबईत बोलावली पत्रकार परिषद :
  • भारताच्या 2011 विश्वचषकाचा नायक, सिक्सर किंग युवराज सिंग आज(दि.10) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची शक्यता आहे. युवराजने दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. यामुळे तो निवृत्तीची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • २०१७ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स चषकानंतर युवराजला भारतीय संघात क्वचितच स्थान मिळाले आहे. त्याशिवाय आगामी विश्वचषकासाठीही त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तसंच यंदा आयपीएलमध्ये मुंबई इंडियंस संघाकडून खेळतानाही युवराजला फारशी संधी मिळाली नाही, आणि जेव्हा मिळाली त्यात त्याला आफली पाहिजे तशी छाप पाडता आलेली नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे. युवराज सिंगला जीटी-२० (कॅनडा), आयर्लंडमध्ये युरो टी-२० स्लॅम आणि हॉलंडमध्ये खेळण्याच्या ऑफर आहेत.

  • यापूर्वी ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून ‘‘सध्या युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा विचार करत आहे. मात्र त्यापूर्वी ‘बीसीसीआय’कडून पुढील कारकीर्दीविषयी हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. कॅनडाच्या जीटी ट्वेन्टी-२०, आर्यलडच्या युरो स्लॅम यांसारख्या स्पर्धात तो खेळण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे सांगितले होते. 

  • त्यामुळे जर युवराजने आज निवृत्तीची घोषणा केली तर आश्चर्य वाटायला नको. ३७ वर्षीय युवराजने ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय, ५८ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून २००७च्या ट्वेन्टी-२० आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात युवराजचा मोलाचा वाटा होता.

ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं निधन :
  • बंगळुरु : ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं आज (10 जून) निधन झालं. दीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक दिवस ते आजारी होते.

  • गिरीश कर्नाड यांच्या रुपाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. तुघलक, नागमंडल, हयवदय या नाट्यकृतींचं दिग्दर्शनही गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. गिरीश कर्नाड यांचा पद्म आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान झाला आहे.

  • 81 वर्षीय गिरीश कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, अभिनेते, दिग्दर्शक होते. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्येही त्यांनी ठसा उमटवला होता. कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 1998 मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली.

  • गिरीश कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला होता. टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली आहे. 'उंबरठा' या स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.

शाळेत न जाताच तिनं दहावीत मिळवले ८४ टक्के गुण :

  • शाळा म्हणजे असते कशी हेच ठाऊक नसलेल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुणांची कमाई केली आहे. ‘होम स्कुलिंग ‘विदेशात प्रचलित असलेल्या पण आपल्याकडे धाडशी म्हणवल्या जाणाऱ्या या आगळ्या शैक्षणिक प्रयोगात कोल्हापूरच्या जान्हवी देशपांडे या विद्यार्थिनीने चमकदार आहे.

  • आपल्याकडील प्रचलित शिक्षण पद्धतीत ‘चार भिंती’च्या आत दिले जाणारे शिक्षण मानले जाते. विदेशात शिक्षणाच्या बाबतीत ‘होम स्कुलिंग’ हा प्रकार प्रचलित झाला आहे. घरीच शिक्षण म्हणजेच ‘होम स्कुलिंग’. अभ्यास शाळेत न करता घरी केला जातो, करुन घेतला जातो. पालक शिकवतात आणि पाल्य शिकत राहतो. कोल्हापुरातील देशपांडे दाम्पत्यांनी हा धाडशी प्रयोग केला. त्यांची कन्या जान्हवी उर्फ चिऊ हिच्या बाबतीत. हल्ली शाळा, तेथील जादा तास, शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) अशी दहावीच्या विद्यार्थ्यांची दिवसभर धमछाक करणारी अभ्यास, अध्ययन पद्धती रूढ झाली असताना जान्हवीने चोखाळलेला मार्ग वेगळा आणि तितकाच धाडशी होता. या धैर्याला ८४ टक्के गुणांचे गोड फळ शनिवारी लागले.

  • जान्हवीची आई नीलिमा आणि वडील ऋतुराज हे दोघेही टॉपर. तरीही त्यांनी जान्हवीला शाळेपासून दूर ठेवले. ती बालवाडीत असतानाच शाळेला रामराम ठोकला आणि घरातच धडे गिरवू लागली. आई, बाबा, आजी तिच्या अभ्यास घेत असत. पण हा अभ्यासही घोकंपट्टी करणारा नव्हता, तर अनुभवाचे बोल देणारा होता. म्हणजे, शिवराज्यभिषेक असे ढोबळमानाने पुस्तकी ज्ञान न देता जान्हवीला आईवडील रायगडावर घेऊन जात. तेथे प्रत्यक्ष रायगडाची फिरती करून किल्ले, गड, त्याची रचना, शिवकाळ आदी इतिहासाची खरी ओळख करून दिली जात असे तेच भूगोलाचे.

  • भरती-ओहोटी असे न म्हणता प्रत्यक्ष समुद्रकिनारी नेवून ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, त्याचे काय परिणाम होतात याचा अनुभवाचा धडा दिला जात असे. संस्कृतचे पाठांतर तेव्हढे करून घेतले. याचवेळी जान्हवी फ्रेंच भाषा शिकली. रवींद्रनाथ टागोर यांच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीत असे शिक्षण दिले जाते हे समजल्यावर तिने टागोर समजून घेतले. त्यांच्या एका बंगाली कवितेचा अनुवाद केला. भाषा विषयांमध्ये एखाद्या कवितेबद्दल किंवा कथेबद्दल ‘स्वमत’ हे आपलं स्वतःच असायला हवे, येथेही आपण शिक्षकांनीच लिहून दिलेले पाठ करून कसे लिहायचे, असा रोखठोक सवाल जान्हवी पालकांना विचारत असे.

वायुसेनेची ताकद वाढणार, २०२० आधी ४० सुखोई विमानांमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडणार :
  • नवी दिल्ली : सुखोई लढाऊ विमानात ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडण्याच्या कामात सरकारने गती आणली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेता येईल, अशादृष्टीने 40 सुखोई लढाऊ विमानांच्या बनावटीत बदल केले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.

  • सरकारने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड यांना या हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन डिसेंबर 2020 च्या निर्धारित वेळेच्या आधीच हे काम पूर्ण होऊ शकेल.

  • २०१६ मध्येच निर्णय मात्र काम धीम्या गतीने - २०१६ मध्ये सरकारने ब्रह्मोस क्षेपणास्त्र 40 सुखोई लढाऊ विमानांमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला होता.  या प्रकल्पाचं काम 2017 च्या अखेरीस सुरु झालं होतं, पण अजूनही त्याचा वेग अतिशय धीमा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट एअरस्ट्राईक आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सैन्य आणि सुरक्षा अधिकारिऱ्यांच्या एका बैठकीत सुखोई विमानात ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. याआधी हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

  • हवाई दलाची ताकद वाढणार - हे काम पूर्ण झाल्यानंतर सुखोईद्वारे समुद्र किंवा जमिननीवर मारा करण्याच्या वायुसेनेच्या क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. सुखाई विमानाची उड्डाण क्षमता आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या ताकदीच्या जोरावर युद्धभूमीत हवाई दलाचं वर्चस्व वाढेल.

भाजपकडून आज पश्चिम बंगालमध्ये १२ तासांच्या बंदची हाक, काळा दिवस पाळणार :
  • बशीरहाट : पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काँग्रेस मधील वाद चिघळला असून आज भाजपकडून 12 तासांच्या पश्चिम बंगाल बंदची हाक देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल मधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह पक्ष कार्यालयात नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते. यानंतर पक्षाचे सरचिटणीस राहुल सिन्हा यांनी 12 तासांच्या पश्चिम बंगाल बंदची हाक दिली आहे.

  • लोकसभा निवडणुकीनंतरही पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबलेला दिसत नाही. येथील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात शनिवारी झालेल्या हिंसाचारात तीन भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारापूर्वी भाजप कार्यालयात नेण्यास पोलिसांनी विरोध केला. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद होऊन परिस्थिती तणावपूर्ण झाली. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती. शेवटी भाजप कार्यकर्त्यांच्या मृतदेहांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये आज काळा दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच घटनेतील पोलिसांच्या भूमिकेविरोधात कोर्टातही जाणार असल्याची माहिती राहुल सिन्हा यांनी दिली आहे.

दिनविशेष :
  • महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन.

महत्वाच्या घटना 

  • १७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

  • १९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

  • १९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

  • १९७७: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

  • १९८२: पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

  • १९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

  • २००३: स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.

जन्म 

  • १९०६: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

  • १९०८: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)

  • १९१६: डंचिन डोनट्स चे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २००२)

  • १९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.

  • १९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.

  • १९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९)

  • १९५५: भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञआंद्रे अ‍ॅम्पिअर यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १७७५)

  • १९०३: इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना यांचे निधन.

  • १९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.

  • १९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन. (जन्म: १५ जून १८७८)

  • १९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८७३)

  • २००१: सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.