चालू घडामोडी - १० मार्च २०१८

Date : 10 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुलींसाठी पदव्युत्तर शिक्षण मोफत, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा :
  • बंगळुरु : कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलींना प्राथमिकपासून पदव्युत्तर शिक्षण मोफत देणार असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होईल. यासाठी 95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • यंदाच्या बजेटमध्ये या निर्णयाची घोषणा झाली आहे. सिद्धारामय्या यांच्याकडे अर्थमंत्रालयाचाही भार आहे.

  • बंगळुरु सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. खरंतर याआधीपासूनच कर्नाटकमध्ये माध्यमिक शिक्षण मोफत आहे. पण नव्या निर्णयामुळे मुलींना पदवीआधीचं आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.

  • कर्नाटकात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची घोषणा अतिशय महत्त्वाची आहे. या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास सुविधा तसंच पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे.

  • दरम्यान, उच्च शिक्षण मंत्री बसवराज रायारड्डी म्हणाले की, "राज्य सरकार 16 नवी निवासी पदवी महाविद्यालयं स्थापन करणार आहे, जेणेकरुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता येईल."

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन :
  • मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

  • आज (10 मार्च) सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील राहत्या घरी पतंगराव कदम यांचं पार्थिव आणलं जाईल. त्यानंतर सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल.

  • पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर उद्या (10 मार्च) संध्याकाळी 4 वाजता वांगी (जि. सांगली) येथील सोनहिरा साखर कारखान्याजवळ अंत्यविधी होतील .

  • पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय - पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले.

  • दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली.

३१ मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' आठ कामं उरकून घ्या..अन्यथा :

मुंबई - आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक केलं आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. बँका, मोबाइल नेटवर्किंग कंपन्या तसंच इतर अनेक ठिकाणांहून ग्राहकांना आधार लिंक करण्याचे अलर्टही यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या डेडलाईनमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे.  त्यामुळे 31 मार्चच्या आधी आधार लिंक न करणाऱ्यांना अनेक तोट्यांना सामोरं जावं लागणार आहे. 

  1. पॅनकार्ड - आधारकार्डचा नंबर पॅनकार्डशी लिंक करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आधार-पॅन लिंक केलेलं नाही त्यांच्यासाठी31 मार्चपर्यंत मुदत आहे. आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर आयटी रिटर्न फाइल करता येणार नाही. आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया होणार नाही.
  2. बँक अकाऊंट - आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक करणंही सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं आहे. बँक अकाऊंट नंबर आधारशी लिंक नसेल तर खातेधारकाचं अकाऊंट ब्लॉक केलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील हा तोटा टाळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुमचा बँक अकाऊंट नंबर आधारकार्ड नंबरशी लिंक करा.
  3. मोबाइल नंबर - मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2018 देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ग्राहकांना मोबाइल नंबर आधारशी लिंक करायचा आहे. तसं न केल्यास तुमचा मोबाइल नंबर डीअॅक्टीवेट केला जाईल.
  4. रेशनकार्ड, एलपीजी, पेन्शन सुविधा - एलपीजी, पेन्शन यासारख्या सरकारी सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. त्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च देण्यात आली असून आधार लिंक नसेल तर सरकारी योजनांपासून मुकावं लागणार आहे.  
  5. म्युच्युअल फंड - म्युच्युअल फंडात ज्यांनी पैसे गुंतविले आहेत त्यांनाही आधार लिंक करणं सक्तीचं आहे. तसं न केल्यास तुमचं म्युच्युअल फंडाचं खातं गैर ठरवलं जाणार आहे. ज्याचं आधारकार्ड लिंक नसेल त्यांचं खातं नॉन ऑपरेटेबल होणार आहे.
  6. इन्श्युरन्स पॉलिसी - इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनाही आधारकार्ड नंबर लिंक करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही लिंक केलेलं नाही त्यांना 31 मार्चपर्यंत आधारकार्ड लिंक करणं गरजेचं आहे. तसं न केल्यास इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.
  7. पोस्टाशी संबंधित काम - पोस्टाशी संबंधित गोष्टी म्हणजेच पीपीएफ, केव्हीपी, ठेवी अशा विविध सुविधांसाठी आधारकार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. 31 मार्चपर्यंत आधार लिंक केलं नाही तर खातेधारकाचं खातं ब्लॉक होणार आहे.
'ग्रेटभेट' डोनाल्ड ट्रम्प यांना हुकुमशहा किम जोंग यांचे निमंत्रण :
  • वॉशिंग्टन- नॉर्थ कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना वादग्रस्त अणूकार्यक्रमावर चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.

  • गेल्या वर्षभरामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप तसेच त्यातून तयार झालेली युद्धजन्य स्थिती पाहाता अशी चर्चेची कोणतीही शक्यता दिसत नव्हती. पण अचानक दोन्ही नेत्यांनी हा चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. किम जोंग उन यांचे आमंत्रण स्वीकारल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. तसेच पुढील दोन महिन्यांमध्ये ट्रम्प किम यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची भेट व्हावी यासाठी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांनी प्रयत्न केल्याचे मानले जाते. या भेटीच्या शक्यतेचे वर्णन त्यांनी ऐतिहासिक मैलाचा दगड असे केले आहे. यामुळे कोरियामध्ये शांतता निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. १९९४ आणि २००२ साली उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा झाली होती मात्र त्यातून कोणताही ठोस कार्यक्रम जाहीर झाला नाही.

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळा आज रंगणार :
  • मुंबई  - उद्योगाची कास धरतानाच सामाजिक क्षेत्रालाही हातभार लावत यशाची शिखरे पादक्रांत करणाºया व्यक्तींना ‘लोकमत’तर्फे गौरविण्यात येणार आहे; निमित्त आहे ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’चे. १० मार्च (शनिवार) रोजी सायंकाळी ६ वाजता वरळी येथील फोर सिझनमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाला कॉर्पोरेट क्षेत्रासह राजकीय, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.

  • गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे, पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद, आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांचीही उपस्थिती असेल.

  • सोहळ्यासाठी टायटल स्पॉन्सर मनी टेÑड कॉईन ग्रुप, पॉवर बाय मोहन ग्रुप, को-स्पॉन्सर साई इस्टेट कन्सल्टंट लिमिटेड, को-स्पॉन्सर रिजन्सी ग्रुप, ट्रॉफी पार्टनर ग्रीन लँड फार्म, आऊटडोअर पार्टनर रोनक अ‍ॅडर्व्हटायझिंग, फ्लेक्स पार्टनर विक्रांत अ‍ॅडर्व्हटायझिंग, ब्रेव्हरेज पार्टनर सुला वाईन्स, नॉलेज पार्टनर बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन हे प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८६२: अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.

  • १८७६: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.

  • १९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.

  • १९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.

  • १९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

  • १९७७: युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध लागला.

  • १९८५: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.

  • १९८५: भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ  चॅम्पियन्स हा किताब मिळाला.

  • १९९८: भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

जन्म

  • १६२८: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी लादेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १६९४)

  • १९१८: गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर१९९७)

  • १९२९: कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म.

  • १९४५: केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)

  • १९५७: अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म. (मृत्यू: २ मे २०११)

  • १९७४: ट्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.

मृत्यू

  • १८७२: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे निधन. (जन्म: २२ जून १८०५)

  • १८९७: पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)

  • १९४०: रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.

  • १९५९: पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)

  • १९७१: कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)

  • १९८५: सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९११)

  • १९९९: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.