चालू घडामोडी - १० मार्च २०१९

Updated On : Mar 10, 2019 | Category : Current Affairsहाऊ इज द जॉब्स? तिपटीने घसरली रोजगारनिर्मिती :
 • नवी दिल्ली : मागील चार वर्षांत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात केवळ ३,३२,३९४ शुद्ध रोजगारांची निर्मिती झाली आहे. सीआयआयने केलेल्या एक लाखापेक्षा अधिक कंपन्यांच्या सर्व्हेतून हे दिसून आले आहे. ही २०१५-१६ पासूनची ही आकडेवारी आहे.

 • २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या काळात एसएमईमध्ये ११ लाख ५४ हजार २९३ रोजगार निर्माण झाले होते. नव्या रोजगारांतून गमावलेले रोजगार वजा केल्यानंतर शुद्ध रोजगाराचे आकडे येतात. सर्वेक्षणातील ७०,९४१ कंपन्यांत रोजगारांत वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा ही राज्ये २0१५-१६ ते २०१८-१९ या काळात निर्माण झालेल्या रोजगारांत आघाडीवर आहेत.

पाच वर्षात तीन एअर स्ट्राइक केले पण तिसऱ्याची माहिती देणार नाही - राजनाथ सिंह :
 • मागच्या पाच वर्षात तीन वेळा भारतीय सैन्यदलाने सीमा ओलांडली व परदेशी भूमीवर जाऊन यशस्वीरित्या एअर स्ट्राइक केला. मी दोन स्ट्राइकबद्दल बोलेन तिसऱ्याबद्दल काही सांगणार नाही असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी केले. कर्नाटकात एका सभेमध्ये ते बोलत होते.

 • मागच्या पाचवर्षात तीन वेळा आपण सीमा ओलांडली व आपल्या सैन्य दलांनी यशस्वी एअर स्ट्राइक केला. मी तु्म्हाला दोन स्ट्राइकची माहिती देईन. तिसऱ्याबद्दल काही सांगणार नाही असे राजनाथ म्हणाले. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर २०१६ मध्ये भारतीय सैन्याने केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालकोटमधल्या एअर स्ट्राइकचा दाखला त्यांनी दिला.

 • पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केला. त्याआधी उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे लाँच पॅड उद्धवस्त केले. एअर स्ट्राइकच्या तिसऱ्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही असे राजनाथ यांनी सांगताच जमलेल्या गर्दीने टाळयांचा कडकडाट केला.

लोकसभा महासंग्रामाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता :
 • यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कारण, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.  

 • सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.

 •  भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील असे निवडणूक आयोगाकडून एक मार्च रोजी स्पष्ट करण्यात आले. सर्व राजकीय पक्षांबरोबर चर्चा केली आहे. ईव्हीएम मशीनला लोकांनी फुटबॉल बनवल्याची खंत निवडणूक आयोगाने व्यक्त केली. युद्धाची स्थिती असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत होती. पण निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूका ठरलेल्या वेळीच होतील हे स्पष्ट केले. एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.

 • या लोकसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अर्थात नमो VS रागा अशीच लढाई पाहण्यास मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे या निकालांमधून धडा घेत भाजपाने तयारी सुरु केली आहे. 

भारताने नाणेफेक जिंकली, विराट शिलेदार प्रथम फलंदाजी करणार :
 • नवी दिल्ली - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार प्रथम धावपट्टीवर उतरणार आहेत. या सामन्यासह मालिका जिंकण्याचा विराट प्लॅन टीम इंडियाचा असणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आजचा सामना रंगत आहे. 

 • ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यात युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत याला विश्वचषकाच्या दृष्टीने तयार करण्यासाठी अनुभवी महेंद्रसिंग धोनी याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे ऋषभची पहिली परीक्षा रविवारी चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने असेल. येथे तो कशी कामगिरी करतो, यावर विश्वचषकाची त्याची दावेदारी विसंबून असेल.

 • कर्णधार विराट कोहली विश्वचषक संघाच्या सर्वच संभाव्य खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. याच कारणास्तव संघ व्यवस्थापन ऋषभची परीक्षा घेणारआहे. धोनीला विश्रांती दिल्यामुळे ऋषभला फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरावे लागेल. याशिवाय मोहम्मद शमीच्या जागी भुवनेश्वर कुमार याला संधी दिली जाईल. शमीला तिसऱ्या सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली होती.

 • फलंदाजीत विराटशिवाय कुणीही फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरलेला नाही. कोहलीपाठोपाठ धावा काढण्यात केदार जाधवला थोडेफार यश आले. रोहित आणि रायुडू यांच्याकडून अपेक्षापूर्ती मात्र झालेली नाही. सलामीविर शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झम्पा भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. त्याने धोनी आणि कोहलीला वारंवार बाद केले आहे.

‘नरेंद्र मोदी फक्त आमचे नाही तर अख्ख्या देशाचे डॅडी’ :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे डॅडी आहेत असं अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि मंत्री केटी राजेंद्र बालाजी यांनी म्हटलं आहे. पक्षाची बैठक पार पडल्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पत्रकारांनी त्यांना जयललिता यांनी राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करण्याचं टाळलेलं असताना अण्णाद्रमुकने लोकसभेसाठी भाजपशी कशी काय आघाडी केली? असा प्रश्न केला. यावर बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी आमचे डॅडी असल्याचं म्हटलं.

 • ‘अम्माचं (जयललिता) निधन झाल्यापासून मोदीच आहेत ज्यांनी डॅडींप्रमाणे पक्षाचं मार्गदर्शन केलं’, असं बालाजी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘हो नक्कीच…मोदी आमचे डॅडी आहेत. जेव्हापासून आम्ही आमच्या अम्माला गमावलं तेव्हापासून पंतप्रधान मोदींनी डॅडींप्रमाणे आम्हाला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केलं’.

 • ‘मोदी फक्त अण्णाद्रमुकचे डॅडी नाहीत तर देशाचेही डॅडी आहेत. यामुळेच अण्णाद्रमुकने भाजपाशी आघाडी केली आहे’, असं बालाजी यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे, 2014 लोकसभा निवडणुकीत जयललिता यांनी ‘तामिळनाडूची लेडी किंवा गुजरातचे मोदी’ अशी घोषणा दिली होती. नरेंद्र मोदींना टोला लगावला असल्याने ही घोषणा बरीच प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचं उमेदवार घोषित करण्यात आलं होतं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८६२: अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.

 • १८७६: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.

 • १९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.

 • १९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

 • १९८५: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.

 • १९८५: भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ  चॅम्पियन्स हा किताब मिळाला.

 • १९९८: भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

जन्म 

 • १६२८: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी लादेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १६९४)

 • १९१८: गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७).

 • १९४५: केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)

 • १९५७: अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म. (मृत्यू: २ मे २०११)

मृत्यू 

 • १८९७: पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१).

 • १९५९: पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)

 • १९७१: कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)

 • १९८५: सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९११).

टिप्पणी करा (Comment Below)