चालू घडामोडी - १० मे २०१८

Date : 10 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
UPSC प्री पास विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, नितीश कुमार यांचा निर्णय :
  • पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यूपीएससीच्या नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींचं मनोबल वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. बिहार सरकारकडून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील यूपीएससी आणि बीपीएससी (बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन) या परीक्षांची पूर्व परीक्षा पास होणाऱ्या परीक्षार्थींना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे.

  • मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नितीश कुमार यांनी या निर्णय घेतला. यानुसार बीपीएससी क्लिअर करणाऱ्या परीक्षार्थींना 50 हजार रुपये, तर यूपीएससी क्लिअर करणाऱ्या परीक्षार्थींना प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं जाणार आहे.

  • ''अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण व्यवस्था देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना मदत केली जाईल. पूर्व परीक्षा क्लिअर करणाऱ्या परीक्षार्थींना ही मदत केली जाईल, ज्यामुळे कोणतीही चिंता न करता ते मुख्य परीक्षेची तयारी करतील,'' अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली.

  • बिहार सरकारने या योजनेचं नाव 'अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती' योजना असं ठेवलं आहे. याशिवाय बिहार सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये प्रति महिना अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा केली आहे.

४८ वर्षे विरुद्ध ४८ महिने, चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकाची थीम :
  • नवी दिल्ली"48 वर्षे विरुद्ध 48 महिने" हा नारा देत मोदी सरकार आपल्या चौथ्या वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन करणार आहे. येत्या 27 मे रोजी मोदी सरकारला केंद्रात चार वर्षे पूर्ण होत आहेत.

  • निवडणुका आता अवघ्या वर्षभरावर आल्यानं यावेळी आपल्या कामाचा हिशेब देण्यासाठी, काँग्रेसच्या आणि आपल्या सरकारमधल्या कामगिरीचा फरक दाखवण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे.

  • या निमित्तानं सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारनं नेहमीप्रमाणे जंगी कार्यक्रम आखला आहे.

  • 48 वर्षे विरुद्ध 48 महिने अशा थीमवर आपलं सरकार कसं काँग्रेसच्या सरकारपेक्षा दमदार आहे हे सांगण्याचाही प्रयत्न होणार आहे. प्रत्येक गावात वीज पोहचवल्याचं लक्ष्य पूर्ण केल्याचा दावा सरकारनं केला आहे.

  • त्यानंतर आता घराघरात वीज पोहोचवण्याचं आपलं उद्दिष्ट असेल, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आणखी पाच कोटी घरांमधला अंधार दूर केला जाईल, शिवाय दिवसाला 50 किमी रस्ते बनवण्याचं महत्वकांक्षी लक्ष्य जनतेसमोर ठेवलं जाणार आहे.

जपान, चीन, द. कोरियाच्या नेत्यांची टोकियोत भेट, पूर्व आशियाच्या शांततेसाठी नवे पाऊल :
  • टोकियो- चीन, जपान आणि द. कोरिया या पूर्व आशियातील देशांचे नेते जपानची राजधानी टोकियोमध्ये चर्चेसाठी एकत्र आले आहेत. द. कोरिया आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भेटल्यानंतर उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच गेली सहा दशके चालू असलेले शीतयुद्ध संपुष्टात आले. आता जपान, चीन आणि द. कोरियाने चर्चापरिषद घेतल्यामुळे आणखी सकारात्मक बदल होतील असे वाटते.

  • 2015 मध्ये सेऊलमध्ये अशीच परिषद झाली होती.  जपानचे पंतप्रधान शिजो अबे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि चीनचे पंतप्रधान ली केकीयांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चाही करणार आहेत. 2010 नंतर जपानला जाणारे केकीयांग हे पहिले पंतप्रधान आहेत.

  • उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून यांची भेट झाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट होणार आहे. या भेटीच्या नियोजनासाठी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगला गेले आहेत.

  • कोरियम द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अमेरिका बांधील आहे असे मत पोम्पेओ यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याभेटीमुळे उत्तर कोरियाच्या ताब्यात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांची सूटका होईल अशी अमेरिकन सरकारला अपेक्षा आहे.

पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांचा तपशील एअर इंडियाने द्यावा :
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौºयांचा तपशील गोपनीय असल्याने देता येणार नाही हा एअर इंडियाचा दावा केंद्रीय माहिती आयुक्त अमिताव भट्टाचार्य यांनी अमान्य केला. याची एअर इंडियाकडे असलेली माहिती त्या कंपनीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

  • मोदी यांनी २०१६-१७ या वर्षात जिथे जिथे दौरे केले ती ठिकाणे, त्या दौºयांपायी झालेल्या खर्चाची पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आलेली बिले व या दौºयांचा कालावधी यांचा तपशील एअर इंडियाने सादर करावा, असा आदेश देतानाच केंद्रीय माहिती आयुक्तांनी म्हटले आहे की, या विदेश दौºयांचा खर्च हा सरकारी तिजोरीतून केला जातो.

  • त्यामुळे त्याची माहिती सर्वांना कळणे आवश्यक आहे. या प्रकरणी लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकाराखाली केंद्रीय माहिती आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. भट्टाचार्य यांनी आदेशात म्हटले आहे की, या दौºयांची माहिती जगजाहीर असल्याने ती गोपनीय नाही.

वॉलमार्टकडून फ्लिपकार्टच्या खरेदीची अधिकृत घोषणा; १६ अब्ज डॉलर्सचा सौदा :
  • नवी दिल्ली: ई-कॉमर्सच्या दुनियेतील वॉलमार्ट व फ्लिपकार्ट यांच्यातील बहुचर्चित खरेदी व्यवहारावराची बुधवारी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली. त्यानुसार वॉलमार्टने 16 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम मोजून फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. भारतामध्ये असलेल्या संधीचा विचार करता ही बाजारपेठ जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे.

  • भारतातल्या ई-कॉमर्सच्या बाजारपेठेमध्ये आमूलाग्र परीवर्तन घडवणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये भागीदारी मिळण्याची संधी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, अशी भावना वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केली आहे.

  • फ्लिपकार्टसोबतच्या या व्यवहारासाठी वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाऊज मॅकमिलन भारतात आले होते. वॉलमार्ट ही जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर फ्लिपकार्ट ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या दोन कंपन्यांमध्ये तब्बल 15 बिलियन अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार होणार आहे. यामुळे वॉलमार्ट ही कंपनी भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करेल.

  • अॅमेझॉनमध्ये काम करताना सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांना फ्लिपकार्टची कल्पना सुचली. यातूनच पुढे फ्लिपकार्टचा जन्म आणि विस्तार झाला. यानंतर पुढे अॅमेझॉननंदेखील भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले. फ्लिपकार्टनं अॅमेझॉनला चांगली टक्कर दिली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फ्लिपकार्टचं महसुली उत्पन्न घटले होते. 

महेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव :
  • भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव असं संबोधलं जातं. पण गेल्या वर्ष – दोन वर्षात भारतीय क्रिकेटला एक नवीन देव सापडू लागला आहे. तो देव म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी. चाहत्यांनी याचा वारंवार प्रत्यय आणून दिला आहे.

  • याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या सुरु असलेली आयपीएल स्पर्धा. ईडन गार्डन्स मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट राइडर्स या दोन संघांमध्ये गुरुवारी आयपीएलचा सामना रंगला. या सामन्यात कोलकाता टीमचा विजय झाला. पण, चर्चा रंगली ती धोनीच्या पाया पडण्यासाठी आलेल्या चाहत्याची. धोनीबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी तो चाहता धोनीजवळ आला. त्याने चटकन धोनीचे पाय धरले. धोनीनेदेखील आपुलकीने त्याच्या पाठीवर हात फिरवला. त्यानंतर सुरक्षारक्षक आले आणि त्या चाहत्याला लांब घेऊन गेले.

  • अशा पद्धतीने चाहत्याने धोनीच्या पाया पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मोहाली येथे झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात एक चाहता थेट मैदानात शिरला आणि त्याने धोनीचे पाय धरत आदर व्यक्त केला. या चाहत्यालाही पोलिसांनी नंतर दूर केले. तसेच, इंग्लंड विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यात धोनी भारत अ संघातर्फे खेळत होता. त्यावेळी चाहता चक्क पीचपर्यंत पोहोचला आणि तो धोनीच्या पाया पडला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.

  • १९०७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.

  • १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जिअम आणि फ्रान्सवर आक्रमण केले.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.

  • १९७९: मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले..

  • १९९३: संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

  • १९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.

जन्म

  • १८५५: भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९३६)

  • १८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म.

  • १९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९७८)

  • १९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०००)

  • १९१८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी २००२)

  • १९२७: भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.

  • १९३७: आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म.

  • १९८६: बुद्धीबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म.

मृत्यू

  • १९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.

  • १९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

  • २०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९०९)

  • २००१: महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३४)

  • २०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.