चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० मे २०१९

Date : 10 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वचषकापर्यंत केदार जाधव फिट नसल्यास 'या' पाचपैकी एकाला मिळणार संधी :
  • मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 तोंडावर असताना भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  आयपीएल सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू शिलेदार केदार जाधवला क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून केदारला मुकावं लागल आहे.

  • इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल. अशातच आयपीएलदरम्यान केदार जाधवला झालेली दुखापत चिंतेची बाब ठरणार आहे. मात्र जर केदारला दुखापतीमुळे खेळता आल्यास त्याच्या ऐवजी कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळेल याबद्दल तर्कवितर्क केले जात आहेत.

  • केदार जाधवला विश्वचषकाआधी फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. जर केदारने चाचणीचा हा टप्पा पार केल्यास भारतीय क्रिकेट संघातील त्याचं स्थान कायम राहणार आहे. पण केदार हा चाचणीचा टप्पा पार करण्यास अयशस्वी ठरल्यास त्याच्या जागी भारताच्या अन्य पाच खेळाडूंपैकी एकाची वर्णी लागणार आहे.

राजीव गांधींनी नौकेचा गैरवापर केला नाही, दोन माजी नौदलप्रमुखांनी केले स्पष्ट :
  • नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या विराट या युद्धनौकेचा वापर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या खासगी सुट्यांसाठी केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे.

  • व्हाइस अ‍ॅडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, राजीव गांधी यांनी कुटुंबीयांसह विराट नौकेला औपचारिक भेट दिली, तेव्हा त्यांच्यासमवेत एकही विदेशी व्यक्ती वा मित्रपरिवार नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरू हाँगकाँग दौºयावर गेले तेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबीय होते. विराटवरील हेलिकॉप्टर राहुल गांधी यांनी नव्हे तर राजीव, सोनिया गांधी यांच्यासाठी वापरण्यात आले. राजीव गांधी यांनी परिवारासह भेट दिली त्यावेळी विराटचे नेतृत्व विनोद पसरिचा करत होते.

  • राजीव गांधी व परिवाराने विराट युद्धनौकेचा मनोरंजनासाठी टॅक्सीसारखा वापर केला हा मोदींनी केलेला आरोप निव्वळ चुकीचाच नाही तर नौदलाची बदनामीही करणारा आहे अशी टीका व्हाइस अ‍ॅडमिरल (निवृत्त) आय. सी. राव यांनी केली. ते म्हणाले की, संरक्षण व नौदलाच्या शिष्टाचारांनुसार, पंतप्रधानांच्या औपचारिक दौºयावर युद्धनौका किंवा हेलिकॉप्टर वापरण्यात काहीही गैर नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक असते.

'ऑक्सफर्ड'च्या विद्यानगरीत रंगला OMPEG चा तृतीय वर्धापनदिन :
  • यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये २०१६ रोजी स्थापन केली. सदर लेखात जाणून घेऊयात OMPEGच्या तृतीय वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल! 

  • ऑक्सफर्ड या विद्यानगरीमध्ये शनिवारी (२७ एप्रिल) प्रसन्न संध्याकाळी UK मधील महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजक समूहाचा (OMPEG)  तृतीय  वर्धापन सोहळा थाटामाटात साजरा झाला. या सोहळ्यात जवळपास १५० प्रथितशील महाराष्ट्रीयन उद्योजक आणि व्यावसायिक उत्साहाने सामील झाले होते.

  • शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून स्वयंसेवकांची  लगबग आणि ४ नंतर सभासदांचे (नियोजित वेळेवर) आगमन काही निराळेच संकेत देत होते. या सोहोळ्यात सहभागी होणे किती अगत्याचे व अनिवार्य आहे याची जाणीव व जे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांची उणीव प्रकर्षाने भासत होती.  

  • सर्वदूर प्रचलित गैरसमजाला तडा देत सोहळ्याची सुरुवात नियोजित वेळेवर होऊन संपूर्ण कार्यक्रम पूर्वनियोजित क्रमाने पार पडला. कार्यक्रमामध्ये  व्यावसायिक व उद्योजक सभासदांचा  लक्षणीय सहभाग , अनुभव कथन व समालोचन हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू होते.

  • प्रथितशील मार्गदर्शक, उद्योजक अभय हवालदार यांनी उपस्थितांना 'व्यवसायाचा श्रीगणेशा , व्यवसायाकरीत अत्यावश्यक भांडवल   उभारण्याकरिता येणारी आवाहने' याची समपर्क व  विस्तृत माहिती दिली. अनेक उद्योजकांनी 'व्यवसायाकरिता भांडवल कसे मागायचे' हा न्यूनगंड दूर झाला अशी उदबोधक पावती देऊन अभय हवालदार यांचे आभार मानले. 

'भारतात सत्तांतर झाल्यास...', इस्राईलच्या राजदुतांचे मोठे वक्तव्य :
  • नवी दिल्ली - इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. भारतात सत्तांतर झाल्यानंतरही इस्राईल आणि भारताच्या संबंधांनर काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान अद्याप व्हायचे आहे, मात्र सत्तांतरासंदर्भाती इस्राईलच्या राजदुतांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • भारत आणि इस्राईल यांच्यातील राजकीय संबंध समान मूल्य आणि एका विशिष्ट दृष्टीकोनावर अवलंबून आहेत. येणाऱ्या काळात उभय देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील. भारतात एनडीए सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले तरी उभय देशातील संबंधावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असं मल्का यांनी म्हटले. तसेच संबंधांत बदल करण्यासाठी काहीही कारण दिसत नाही. हे दोन्ही देशांतील संबंध असून सत्तेत कोण आहे, याला महत्त्व नसल्याचे मल्का यांनी सांगितले.

  • मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  • भारतातील लोकसभा निवडणुकीवर जगाचे लक्ष लागले आहे. देशातील दोन टप्प्यांतील मतदान बाकी असून मोदी सरकारकडून सत्ता मिळविण्यासाठी पू्र्ण प्रयत्न करण्यात येत आहे. तर विरोधक देखील प्रखर झुंज देत आहे. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यानंतरच देशात कुणाचे सरकार स्थापन होणार हे निश्चित होणार आहे.

अयोध्याप्रकरणी आज सुनावणी :
  • नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात सौहार्दपूर्ण समेट होण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्चला हे प्रकरण मध्यस्थीसाठी समितीकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. निवृत्त न्यायाधीश एफ एम कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, तसेच ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोन सदस्य आहेत. या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सुनावणी घेणार आहे.

इराणकडून होणारी तेल आयात पूर्ण बंद :
  • नवी दिल्ली : अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, ज्या आयातींबाबत इराणशी आधीच करार झाले आहेत, त्यानुसार प्रलंबित असलेल्या खेपांतील तेल मिळवण्यासाठी भारत अमेरिकेशी वाटाघाटी करत करत आहे.

  • भारताचा निर्णय इराणमधून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची सर्व आयात थांबवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्देशांना अनुसरून आहे. इराणशी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणच्या हसन रूहानी राजवटीवर विशेषत: इराणी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या कच्च्या तेलाबाबत आणि इतरही अनेक निर्बंध लादले होते. यानंतर, आपल्या ऊर्जाविषयक गरजांसाठी इराणवर अवलंबून असलेल्या सात देशांना अमेरिकेने गेल्या नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यांची सवलत दिली होती.

  • ‘सिग्निफिकंट रिडक्शन एक्झेम्प्शन’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या सवलतीची मुदत २ मे रोजी संपली. ज्यांच्याबाबत आधीच करार झाले होते, त्यातील काही तेल अद्याप यायचे आहे. त्यामुळे त्या खेपा येऊ देण्याबाबत आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करत आहोत, असे एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिका सरकारशी या संदर्भात चर्चा सुरू असली, तरी अद्याप काही सकारात्मक घडलेले नसल्याचेही तो म्हणाला.

मद्यउद्योजक नीलकांत राव जगदाळे यांचे निधन :
  • बेंगळुरू : ‘मेक इन इंडिया’चे वारे वाहण्याआधीच प्रतिकूलतेची आणि आव्हानांची पर्वा न करता ‘अमृत सिंगल माल्ट व्हिस्की’ या देशी बनावटीच्या विदेशी दर्जाच्या मद्याचे उत्पादन करणारे आणि या ‘अमृत’चवीची जगाला सवय लावणारे उद्योजक नीलकांत राव जगदाळे यांचे गुरुवारी बेंगळुरूतील रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

  • भारतीय उद्योजकांनी विविध ग्राहकोपयोगी क्षेत्रांत देशी उत्पादने तयार केली पाहिजेतच, पण त्या उत्पादनांची नावेही भारतीयत्व जपणारीच असली पाहिजेत, असे त्यांनी गेल्या वर्षीच एका कार्यक्रमात सांगितले होते. त्यांचा हा निर्धार या उद्योगात पाऊल टाकल्यापासूनचा आहे.

  • जगदाळे यांचे वडील राधाकृष्ण राव यांनी १९४८ मध्ये या मद्यउद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे अकाली निधन झाले तेव्हा हा उद्योग केवळ रम आणि ब्रॅण्डीचेच उत्पादन करीत होता. त्यांची विक्रीही देशातच सुरू होती. नीलकांत यांनी या उद्योगाचा पाया विस्तारला आणि ‘सिंगल माल्ट व्हिस्की’चे त्या काळातील एकाही देशी मद्य उद्योजकाने न पाहिलेले स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.

  • भारतात तेव्हा व्हिस्कीचे उत्पादन होत असे, पण युरोपात त्याला व्हिस्कीचा दर्जा नव्हता. त्यामुळे ‘सिंगल माल्ट’ची कल्पना त्यांच्या मनात रुजली. २००४मध्ये ‘अमृत’ ब्रॅण्डची व्हिस्की बाजारात आली, पण पहिली तीन वर्षे प्रतिसाद अल्प होता. पण २००९मध्ये माल्ट मॅनिअ‍ॅक्स या जगविख्यात रूचीतज्ज्ञ संस्थेने ‘अमृत  फ्युजन’ या व्हिस्कीला सर्वोत्तम नैसर्गिक कास्क व्हिस्की म्हणून घोषित केले आणि जगाचे लक्ष या व्हिस्कीकडे वळले.

  • २०१०मध्ये व्हिस्कीच्या दर्जातील सर्वोत्तम जाणकार मानले जाणारे पत्रकार जिम मरे यांनी जगातली सर्वोत्तम व्हिस्कीत ‘अमृत फ्युजन’ला तिसरा क्रमांक दिला तेव्हा खरी जगप्रसिद्धी अमृतला लाभली. त्यानंतर कंपनीची मोठी भरभराट झाली. आजही २२ देशांत या व्हिस्कीला वाढती मागणी आहे आणि त्या तुलनेत पुरवठा करणे कठीण होत आहे, अशी उत्साहवर्धक स्थिती आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.

  • १९०७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.

  • १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.

  • १९७९: मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.

  • १९८१: फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.

  • १९९३: संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

  • १९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.

जन्म

  • १८५५: भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९३६)

  • १८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म.

  • १९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९७८)

  • १९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०००)

  • १९१८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी २००२)

  • १९२७: भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.

  • १९३७: आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म.

  • १९४०: प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २०१२)

  • १९८६: बुद्धीबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७७४: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १७१०)

  • १८९९: रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.

  • १९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.

  • १९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

  • २०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९०९)

  • २००१: महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३४).

  • २०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.