चालू घडामोडी - १० नोव्हेंबर २०१८

Date : 10 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बातम्या सांगणारा अँकर रोबो, चीनच्या वृत्तसंस्थेची निर्मिती :
  • मुंबई : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक क्रांतीकारी बदल घडत आहेत. जुनं मागे टाकून नवं अंगीकारलं जात आहे. या बदलाचं ताजं उदाहरण चीनमध्ये पाहायला मिळत आहे. चीनमधील एका वृत्तसंस्थेने चक्क बातम्या सांगणारा रोबो तयार केला आहेत. तो हुबेहुब माणसासारखा दिसतच नाही तर बोलतोही, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिले की तो रोबो आहे, यावर विश्वास बसणार नाही.

  • चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने बुधवारी आर्टिफिशिअल इंटलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता असणाऱ्या अँकर रोबोचं टीव्हीवर पदार्पण केलं. इंग्लिश भाषेत बातम्या सांगणाऱ्या रोबोचं नाव झँग झाओ आहे. याआधीही झिनुआ वृत्तसंस्थेने अँकर रोबो तयार केला होता. पण त्याचा लूक बरा नसल्यानं त्यांनी पुन्हा नव्याने रोबो बनवला आहे.

  • झिनुआ न्यूज एजन्सी आणि चीनमधील सर्व इंजिन सोगोऊ डॉट कॉम यांनी संयुक्तरित्या या रोबो अँकरची निर्मिती केली आहे. "तो रिपोर्टिंग टीमचा सदस्य झाला असून तो वेबसाईट तसंच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 24 तास कार्यरत असेल. शिवाय बातम्यांची प्रॉडक्शन कॉस्ट करुन कार्यक्षमतेत सुधारणा होईल," असं झिनुआचं म्हणणं आहे.

  • आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, की पुढे तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय वाहिनीवर सर्रास रोबो न्यूज अँकर पाहायला मिळाला तर नवल वाटायला नको.

  • दरम्यान, रोबोमुळे काही गोष्टी सहजसोप्या होतील, असं वाटत असलं तरी  झिनुआच्या या तांत्रिक विकासाबद्दल विरोधी प्रतिक्रियाही मिळत आहेत. काही मिनिटांपेक्षा त्याला जास्त वेळ पाहू शकत नाही, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. तर कामं व्यवस्थित झाली, त्याचा चेहरा माणसांसारखा असला तरी अँकर रोबोमध्ये ह्युमन टच नसेल, असं काहींचं म्हणणं आहे.

५० टक्क्यांहून जास्त भारतीय म्हणताहेत, प्राध्यापक व्हायचंय :
  • लंडन:  भारतीय लोकांमध्ये आजही शिक्षकी पेशाचे आकर्षण कायम आहे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत असताना भारतीय लोकं मात्र शिक्षकच व्हायचंय अशा भूमिकेत आहेत. आजही भारतातीलल 50 टक्क्यांहून अधिक पालक आपल्या मुलांसाठी शिक्षकी पेशालाच पसंती देत असल्याची बाब इंग्लंडच्या वर्कली फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाली आहे.

  • शिक्षकी पेशाकडे जगभरात आकर्षणही कमी होत चाललं आहे. जगामध्ये गेले काही वर्ष प्राध्यापकांचा स्तर घसरतो आहे. याचा अभ्यास करण्यासाठी जगातील 35 देशांमध्ये वर्कली  फाउंडेशनने सर्व्हेक्षण केले आहे. भारतामध्ये तब्बल 54 टक्के लोकांनी शिक्षकी पेशाला पहिली पसंती दिली आहे. ब्रिटन सारख्या देशामध्ये फक्त 23 टक्के लोकांनी प्राध्यापक होण्यास पसंती दिली आहे तर चीनमध्ये 50 टक्के लोकांनी प्राध्यापक होण्यास पसंती दिली आहे.

  • भारतात 16-64 या वयोगटातील विद्यार्थी आणि 5500 प्राध्यापकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. 77 टक्के भारतीयांच्या मते आजही विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांचा आदर करतात. युरोपातील देशांमध्ये मात्र प्राध्यापक होण्यास कमी पसंती दिली जाते.

गोव्यात आंतरराष्ट्रीय योग परिषद, ५० देशांतील प्रतिनिधी येणार :
  • पणजी : गोव्यात 12 आणि 13 नोव्हेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कला अकादमीत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे उदघाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पणजी येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

  • दोन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी 50 देशांतील सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. एकूण 10 सत्रांमध्ये 50 योगगुरु योगासंबंधी मार्गदर्शन करतील. तसेच जागतिक आरोग्य संघटनेसाठी एक विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. योग केवळ योगगुरु आणि काही संस्थापुरताच मर्यादीत राहू नये तर ती जनचळवळ निर्माण व्हावी, हा या परिषदेमागचा उद्देश असल्याचं  नाईक म्हणाले. यापूर्वीच्या तीन परिषदा दिल्लीत झाल्या, चौथी परिषद प्रथमच दिल्लीबाहेर होत आहे. 12 तारखेला सकाळी रन फॉर योगाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • याप्रसंगी बोलताना श्रीपाद नाईक यांनी धारगळ येथील प्रस्तावित अखिल भारतीय आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार संस्थेचा पायाभरणी सोहळयाविषयीही माहिती दिली. 13 तारखेला पेडणे तालुक्यातील धारगळ येथे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते संस्थेचा पायाभरणी सोहळा होणार आहे.

  • याप्रसंगी राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची उपस्थिती असणार आहे.

हरमनप्रीतचे शतक, T20 महिला विश्वचषकात भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा :
  • गयाना:  ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या शानदार शतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने शानदार विजय प्राप्त केला. विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा 34 धावांनी धुव्वा उडवला.

  • भारताने  हरमनप्रीत कौरचे शानदार शतक (103) आणि रॉड्रिग्जच्या 59 धावांच्या खेळीच्या बळावर 194 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने 9 बाद 160 धावा केल्या.  न्यूझीलंडकडून सुझी बिट्सने एकाकी झुंज देताना 67 धावांची खेळी केली.  भारताच्या हेमलतानं 26 धावांत तीन आणि पूनम यादवनं 33 धावांत तीन विकेट्स घेतल्या. राधा यादवनं दोन, तर अरुंधती रेड्डीनं एक विकेट काढली.

  • हरमनप्रीत शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज - हरमनप्रीत ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली. हरमनप्रीत कौरच्या या शतकाला मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सच्या 59 धावांच्या खेळीची जोड लाभली. त्यामुळंच भारतीय महिला संघानं या सामन्यात भारतानं वीस षटकांत पाच बाद 194 धावांची मजल मारली.

  • त्या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली. हरमनप्रीतनं 51 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह 103 धावांची खेळी उभारली. जेमिमानं 59 धावांची खेळी सात चौकारांनी सजवली. महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात अर्धशतक ठोकणारी सर्वात तरुण फलंदाज हा मान आता जेमिमाच्या नावावर झाला.

अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले. ट्रम्प यांनी २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याबाबत तपास सुरू आहे.

  • सेशन्स यांनी या तपासापासून स्वत:ला वेगळे केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्यावर जाहीररीत्या टीका चालविली होती. काळजीवाहू अटर्नी जनरल आणि रिपब्लिकन पक्षाशी निष्ठ असलेले मॅथ्यू जी व्हिटकर हे आता सेशन्स यांची जागा घेतील.

  • रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या चमूचे नेतृत्व रॉबर्ट मुल्लर यांच्याकडे असून व्हिटकर हे त्यांचे विरोधक मानले जातात. सेशन्स यांना पदावरून हटविल्यानंतर ट्रम्प यांनी टिष्ट्वट जारी करीत म्हटले की, न्यायालयीन विभागाचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्या जागी चीफ आॅफ स्टाफ मॅथ्यू जी व्हिटकर यांची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. ते आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करतील. व्हिटकर यांच्या सेवेसाठी मी त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. यानंतर त्यांच्या कायम नियुक्तीची घोषणा केली जाईल.

  • सीएनएनच्या पत्रकाराचा पास निलंबित - सीएनएन वाहिनीचे व्हाईट हाऊसमधील वार्ताहर जिम अकोस्टा यांचा पास व्हाईट हाऊसने निलंबित केल्यामुळे माध्यम जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा लोकशाहीला धोका असल्याची प्रतिक्रिया सीनएनएनने दिली आहे.

  • बुधवारी पत्रकार परिषदेत ट्रम्प यांची अकोस्टा यांच्याशी शाब्दिक चकमक झडल्यानंतर व्हाईट हाऊसने अकोस्टा यांचे वर्तन निंदनीय आणि संतापजनक असल्याचे स्पष्ट केले होते. अमेरिकेच्या सीमेकडे आगेकूच करणाºया मध्य अमेरिकींच्या लोंढ्यांबाबत अकोस्टा यांना ट्रम्प यांना सातत्याने प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना शांतपणे बसण्यास सांगितले मात्र अकोस्टा यांनी पुन्हा प्रश्न विचारल्याने ट्रम्प यांनी संतप्त होत ‘‘आता खूप झाले’’ या शब्दांत सुनावले.

एच १ बी व्हिसा रोखण्याच्या प्रमाणात वाढीबाबत चिंता :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेकडून एच १ बी व्हिसा रोखला जाण्याचे प्रमाण नाटय़मयरीत्या वाढले आहे, असे कॉम्पिट इंडिया या अमेरिकी नियोक्ता कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या गटाने म्हटले आहे. त्यात गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे.

  • एच १ बी व्हिसा हा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक व कंपन्यांमध्ये लोकप्रिय असून, तो अस्थलांतरित दर्जाचा व्हिसा असतो. त्यात अमेरिकी कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर घेता येते. विशेष करून जेथे तंत्रकुशलता आवश्यक असेल अशा पदांसाठी कर्मचारी भरताना त्याचा उपयोग केला जातो. तंत्रज्ञान कंपन्या या एच१ बी व्हिसावर अवलंबून आहेत. त्यात भारत व चीन यांच्या कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर प्राधान्य मिळत असून, दरवर्षी हजारो कर्मचारी या व्हिसावर अमेरिकेत जातात.

  • एच १ बी व्हिसा देण्याच्या पद्धतीत काही बदल करण्यात आले असून ते या व्हिसाचे प्रमाण कमी करणारे व उमेदवारांना व्हिसा देण्यास रोखून धरणारे आहेत, असे मत कॉम्पिट अमेरिका या गटाने अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी किर्सजेन निलसन व अमेरिका नागरिकत्व व स्थलांतर विभाग म्हणजे युसीसचे संचालक फ्रान्सिस सिसना यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

  • यातील कायदेशीर बाबींवर पत्रात चिंता व्यक्त केली असून, मूल्यमापन निकषातील बदल हे घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे नियोक्त्यांना धोरण ठरवताना अनिश्चिततेस सामोरे जावे लागत आहे. युसीसने आरोप केला, की ही संस्था किंवा विभाग त्यांच्या मर्यादेपलीकडे जाऊन निर्बंध लादून नियंत्रण करीत आहे.

  • गेल्या अठरा महिन्यांत एच १ बी व्हिसा रोखण्यात नाटय़मय वाढ झाली असून पुरावे मागितले जात आहेत. एच १ बी व्हिसा रद्द करणे व नाकारणे अशा दोन्ही प्रकारच्या नोटिसा जारी करण्यात येत आहेत.  एच १ बी व्हिसाची मर्यादा वार्षिक ६५००० असून त्यातील पहिले वीस हजार व्हिसा हे अमेरिकेत मास्टर्स पदवी किंवा उच्च शिक्षण असलेल्यांना प्रामुख्याने दिले जातात.

दिनविशेष :
  • जागतिक विज्ञान दिन

महत्वाच्या घटना 

  • १६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

  • १६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.

  • १९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

  • १९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.

  • १९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

  • १९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.

  • १९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.

  • २००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.

  • २००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.

जन्म 

  • १८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १८८२)

  • १८४८: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)

  • १८५१: प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १८८२)

  • १९०४: श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९६१)

  • १९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१३)

  • १९२५: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)

  • १९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.

  • १९५२: सुप्रसिद्ध लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन् यांचा जन्म.

  • १९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६५९: विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

  • १९२०: स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर २००४)

  • १९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

  • १९३८: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन. (जन्म: १९ मे १८८१)

  • १९४१: संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८७२)

  • १९८२: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९०६)

  • १९९६: सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन. (१६ मे १९२६)

  • २००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३६)

  • २००९: अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.(जन्म: १५ ऑगस्ट १९५८)

  • २०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.