चालू घडामोडी - १० ऑक्टोबर २०१८

Date : 10 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बिल गेट्स यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक :
  • मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. स्वच्छ भारत अभियानाबाबत त्यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानावर बिल गेट्स यांनी ट्विटरद्वारे भाष्य केलं.

  • नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारत सरकारने स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आता स्वच्छ भारत मोहिमेला यशस्वी बनवण्याची वेळ आहे. असं ट्विट गेट्स यांनी केलं आहे.

  • यापूर्वीही अनेकदा बिल गेट्स यांनी नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाचं जाहीरपणे कौतुक केलं होतं. काही दिवसांपूर्वी न्यू-यॉर्कमध्ये एका कार्यक्रमात आपल्या भाषणामध्ये बिल गेट्स यांनी स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख केला आणि स्वच्छतेकडे लक्ष वेधल्याबाबत भारत सरकारचं अभिनंदन करायला हवं असं ते म्हणाले होते.

  • यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये एका ब्लॉगमधूनही गेट्स यांनी मोदींच्या अभियानाचे भरभरुन कौतुक केले होते. गेल्या तीन वर्षात सरकारने स्वच्छता आणि उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रमाण करण्यासाठी उचललेली पावले कौतुकास्पद आहेत असे गेट्स म्हणाले होते.

'पद्मभूषण'ने सन्मानित ८३ वर्षीय वैज्ञानिकाचा संशयास्पद मृत्यू :
  • कानपूर : 'पद्मभूषण'ने सन्मानित 83 वर्षीय वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर कटियार निराश झाले होते, या धक्क्यातूनच त्यांनी विष पिऊन आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांना जवळपास वीस दिवसांपूर्वी रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती खालावली होती, त्यातच काकांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या पुतण्याने सांगितलं. मात्र कटियार यांनी विषप्राशन केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली, तेव्हा कटियार यांच्या भाच्याने खोलीत शोधाशोध करुन सुसाईड नोट सापडल्याचं सांगितलं.

  • गेल्या वर्षी आजारपणातून पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मानसिक स्वास्थ्य गमावलं होतं. त्यामुळे विष पिऊन त्यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

  • डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार हे छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय (सीएसजेएमयू) चे माजी कुलगुरु होते. एंझायमोलॉजी या विषयात त्यांनी नैपुण्य मिळवलं होतं. विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी 2003 मध्ये केंद्र सरकारने 'पद्मश्री' प्रदान करुन त्यांचा सन्मान केला होता. तर 2009 मध्ये त्यांना 'पद्मभूषण'ने गौरवण्यात आलं होतं.

अजित दोभाल देशातील सर्वात शक्तिशाली नोकरशाह बनले :
  • नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोभाल नव्या जबाबदारीसह अधिक शक्तिशाली नोकरशाह बनले आहेत. रणनीती धोरण गटाचं (एसपीजी) नेतृत्त्व कॅबिनेट सचिवाऐवजी आता अजित दोभाल करणार आहेत. बाह्य, अंतर्गत आणि आर्थिक सुरक्षेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) मदतीसाठी 1999 मध्ये याची स्थापना झाली होती.

  • 1999 मध्ये एसपीजीच्या स्थापनेसाठी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं होतं की, कॅबिनेट सचिव याचे अध्यक्ष असतील. पण मोदी सरकारने 11 सप्टेंबर रोजी जारी केलेली अधिसूचना आणि 8 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या गॅझेटनुसार, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे एसपीजीचे अध्यक्ष असतील. रणनीती धोरण गटामध्ये सुरुवातीला 16 सदस्य होते आता त्यात 18 असतील. यामध्ये कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांना दोन नव्या सदस्यांच्या स्वरुपात सामील करण्यात आलं आहे.

  • लष्करप्रमुख, नौदलप्रमुख, वायूसेनाप्रमुख, आरबीआय गव्हर्नर, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव, गृह मंत्रालयाचे सचिव, अर्थ मंत्रालयाचे सचिव, डिफेन्स प्रॉडक्शनचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, अणुऊर्जा खात्याचे सचिव, अंतराळ विभागाचे सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव याशिवाय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, मंत्रिमंडळ सचिवालयाचे सचिव आणि गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख यांचा एसपीजीमध्ये समावेश आहे.

  • एसपीजीच्या पुनर्गठनामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीच्या रचनेत सर्वात वर नेऊन ठेवलं आहे. सरकारने एनएसएच्या नेतृत्त्वात नव्या थिंक टँक 'संरक्षण नियोजन समिती'चीही घोषणा केली आहे, जी भारतीय सैन्य आणि सुरक्षा डावपेच तसंच परदेशांसोबत होणाऱ्या सुरक्षा कराराबाबत रणनीती तयार करेल.

मंत्र्यांनो, गावागावात जा; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश :
  • मुंबई : राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असून, मंत्र्यांनी गावागावात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत दिले.

  • मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दुष्काळाचे गंभीर सावट अधिक गडद होत आहे, याबद्दल बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. दुष्काळ निवारणाच्या नियोजनाची जबाबदारी महसूल आणि मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर सोपविली.

  • दुष्काळग्रस्त तालुक्यांसंदर्भात ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार,जळगाव व अहमदनगर सह मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे.

  • त्यानुसार कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागास देण्यात आले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्राच्या निकषानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

युथ आॅलिम्पिक - मिझोरमच्या भारोत्तोलकाने मिळवून दिले पहिले सुवर्ण :
  • ब्यूनस आयर्स : भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात तो अव्वल राहिला. त्याचप्रमाणे १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने अपेक्षित कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण वेध घेतला.

  • आयझोलच्या १५ वर्षीय जेरेमीने २७४ किलो (१२४ व १५०) वजन पेलले. त्याने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक पटकावले होते. तुर्कीच्या तोपटास कानेरने २६३ किलो वजन उचलताना रौप्यपदक पटकावले. कोलंबियाचा विलार एस्टिवन जोस कांस्यपदकाचा मानकरी ठरला. या महिन्यात २६ तारखेला वयाची १६ वर्षे पूर्ण करणार असलेल्या जेरेमीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (युथ) रौप्य आणि कांस्य (ज्युनिअर) पदक पटकावले होते.

  • मिझोरम भारोत्तोलन संघटनेचे अध्यक्ष एन. थांगचुंगनुंगा म्हणाले,‘जेरेमीचे वडील लालनेइतलुंगा माजी बॉक्सर असून, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सात सुवर्णपदके पटकाविली आहेत.’ जेरेमीचीही बॉक्सर होण्याची इच्छा होती, पण प्रशिक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने भारोत्तोलनामध्ये पदार्पण केले. त्याच्या वयाच्या आठव्या वर्षी २०११ मध्ये सैनिक क्रीडा संस्थेने त्याची निवड केली होती.

  • या पदकामुळे भारताची युथ आॅलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी निश्चित झाली आहे. भारताने यापूर्वीच चार पदके पटकाविली आहेत. शाहू तुषार माने आणि मेहुली घोष यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्य तर ज्युडोमध्ये टी तबाबी देवीने ४४ किलो गटात दुसरे स्थान पटकावत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. 

वाहतूक पोलिसांचे चलान टपालाने, राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त घोषणा :
  • मुंबई : नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी राज्यात मार्चपर्यंत आणखी १८ पासपोर्ट सेवा केंद्रे सध्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

  • सध्या राज्यात १६ पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू आहेत. वाहतूक पोलिसांद्वारे पाठविण्यात येणारी ई चलन यापुढे टपालाद्वारे पाठविण्यात येतील, असे राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रकार परिषदेत बोलताना अग्रवाल यांनी सांगितले. सध्या मुंबई, पुणे व ठाणे येथे याबाबत पोलिसांसोबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. या वेळी मुंबईचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, सुमिथा अयोद्धा, के. एस. बरीयार, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

  • टपाल खात्याची ७५ एटीएम केंद्रे सुरू केली आहेत. आवश्यकतेनुसार पोस्टमन भरती करण्यात येतील, असे अग्रवाल यांनी सांगितले. राज्याच्या प्रत्येक मोठ्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याबाबत टपाल खाते सकारात्मक आहे. पासपोर्ट विभागाशी चर्चा करून, आवश्यकतेप्रमाणे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

  • स्पीडपोस्टच्या माध्यमातून ई चलान पाठविण्याचा प्रस्ताव टपाल खात्याने दिला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते सुरू करण्याबाबत महाराष्ट्राला देशपातळीवर तृतीय क्रमांक मिळाला आहे. ७८ हजार खातेदारांच्या माध्यमातून १ कोटी १० हजार रक्कम जमा झाली आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत पेमेंट बँकेची ३ हजार अ‍ॅक्सेस पॉइंट सुरू करण्यात येतील. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील १२ हजार ४८४ अ‍ॅक्सेस पॉइंट सुरू होतील, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला.

दिनविशेष :
  • जागतिक मानसिक आरोग्य दिन / जागतिक लापशी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.

  • १९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.

  • १९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.

  • १९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  • १९७०: फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

  • १९७५: पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.

  • १९९८: आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.

जन्म 

  • १८७१: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)

  • १८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)

  • १९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)

  • १९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)

  • १९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.

  • १९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)

  • १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)

  • १९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.

  • २०००: श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म: १७ एप्रिल १९१६)

  • २००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.