चालू घडामोडी - १० सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 10, 2018 | Category : Current Affairsआरिफ अल्वी झाले पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष :
 • इस्लामाबाद: पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटचे सहकारी व सत्ताधारी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे एक संस्थापक सदस्य डॉ. आरिफ अल्वी यांनी रविवारी पाकिस्तानचे १३ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली.

 • दातांचे डॉक्टर असलेले अल्वी ६९ वर्षांचे असून, ‘ऐवान-ए-सद्र’ या अध्यक्षीय प्रासादात झालेल्या साध्या समारंभात सरन्यायाधीश न्या. सादिक निसार यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान इम्रान खान व लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासह अनेक वरिष्ठ मुलकी व लष्करी अधिकारी उपस्थित होते. डॉ. अल्वी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेले. त्याआधी त्यांचे वडील पं. जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिगत दाताचे डॉक्टर होते.

 • सन १९६९ मध्ये विद्यार्थी चळवळीपासून डॉ. अल्वी यांनी राजकारणात प्रवेश केला. निदर्शने करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी त्यांच्या उजव्या दंडात घुसली. आजही ती गोळी त्यांच्या दंडात आहे. 

२०२२ पर्यंत नवभारताची निर्मिती :
 • सन २०२२ पर्यंत ‘नवभारता’ची निर्मिती करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेल्या या राजकीय ठरावाला मंजुरी देण्यात आली.

 • भाजपच्या दृष्टीने हा नवाभारत गरिबीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त, जातिवादमुक्त असेल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्रष्टे नेतृत्व देशाला लाभलेले आहे. त्यांचा विकासाचा दृष्टिकोन, सरकारची नीती आणि त्याची अंमलबजावणी यातून हा नवभारत साकार होण्याचा संकल्प भाजपने व्यक्त केला आहे.

 • या राजकीय ठरावाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनेत लोकांचा थेट सहभाग राहिलेला आहे.

 • लोक नवनवे प्रयोग करत आहेत. त्यातून विकासाला नवी दिशा मिळाली आहे. पण विरोधक मात्र मोदी रोको आंदोलन चालवत आहेत. विरोधकांचा हा विचार पूर्ण नकारात्मक असून जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्याचे विरोधक निव्वळ स्वप्न बघत आहे. विरोधकांकडे ना नेता, ना नीती, ना रणनीती आहे. विरोधक हताश झालेला आहे.

पाकिस्तानवर कर्ज आम्ही लादले नाही : चीन 
 • इस्लामाबाद : कर्जाच्या खाईत आकंठ बुडालेल्या पाकिस्तानची हालत आणखी वाईट बनली आहे. बिजंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) च्या नादाला लागल्याने कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. मात्र, चीनने हे आरोप फेटाळून लावत आम्ही पाकिस्तानला कर्ज घेण्यास भाग पाडले नव्हते, अशी कोलांटउडी मारली आहे. 

 • चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे पाकिस्तानमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्वभुमीवर चीनकडून असे वक्तव्य आल्याने चीनने पाकिस्तानला आता चांगलेच अडकविले आहे. वांग यांचा हा दौरा खूप महत्वाचा आहे. कारण BRI च्या करारानुसार चीनने पाकिस्तानला 57 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केले होते. तसेच पाकिस्तानात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्याची भेट होत आहे. 

 • हा दौरा भारतासाठीही तेवढाच महत्वाचा आहे. कारण दहशतवादाच्या मुद्द्यावरून नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबविली आहे. यामुळे त्यांचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. 

काहींकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू- नायडू :
 • शिकागो: सध्या काहीजणांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते अमेरिकेतील शिकागोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू काँग्रेसला संबोधित करत होते. हिंदू धर्मातील खऱ्या मूल्यांच्या संरक्षणाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं विश्व हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. 

 • भारताचा सार्वभौम सहनशीलतेवर विश्वास असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी म्हटलं. सर्व गोष्टी एकमेकांशी वाटून घेणं आणि एकमेकांची काळजी घेणं ही हिंदू धर्माची मूळ तत्त्वं असल्याचं ते म्हणाले. सध्या हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'सध्या काही लोकांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी त्यांचे विचार योग्यपणे मांडायला हवेत. त्यामुळे प्रामाणिक दृष्टीकोन जगासमोर येईल,' असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं. 

 • व्यंकय्या नायडू यांच्या आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विश्व हिंदू काँग्रेसला संबोधित केलं. हिंदू कोणालाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत. मात्र हिंदूंना विरोध करणारे काही लोक असू शकतात, असं भागवत यांनी म्हटलं होतं. हिंदू समुदायानं एकजूट होऊन मानवाच्या कल्याणासाठी काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. 

आरोग्य, पर्यावरणीय समस्यांचा अहवाल केंद्राला सादर करणार :
 • मुंबई : १२व्या एशियन काँग्रेस आॅफ ओरल अँड मॅक्सिलोफेसियल रेडिओलॉजी आणि ५व्या इंटरनॅशनल ग्रीन हेल्थ कॉन्फरन्सचा समारोप रविवारी नेहरू विज्ञान केंद्रात पार पडला. या परिषदेत चर्चा झालेल्या आरोग्य व पर्यावरण विषयक समस्यांचा अहवाल केंद्रासमोर सादर करणार असल्याचे तज्ज्ञांनी या वेळी सांगितले.

 • या चार दिवसीय परिषदेत देश-विदेशातील संशोधक, डॉक्टर आणि अभ्यासकांनी जागतिक पातळीवर आरोग्य व पर्यावरण क्षेत्राशी

 • निगडित समस्यांवर चर्चा केली. या चर्चासत्रांत महाविद्यालयीन तरुणाई आणि शाळकरी विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्यात आले. नव्या पिढीतही विविध पद्धतीने याविषयी जनजागृती करण्याचा मानस

 • एशियन अकॅडमी आॅफ ओरल मॅक्सिफेसियल रेडिओलॉजीच्या अध्यक्षा डॉ. सुनाली खन्ना यांनी व्यक्त केला.

 • रविवारी, परिषदेच्या समारोपप्रसंगी, डॉ. सुनाली खन्ना यांनी इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ डेन्टोमॅक्सिलोफेसियल रेडिओलॉजीचे अध्यक्ष डॉ.जी. याँग यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.

 • डॉ. खन्ना यांनी अशा परिषदेचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करून जगभरातून उपस्थिती लावलेल्या संशोधक, अभ्यासकांचे आभार मानले. या वेळी डॉ. योशीनोरी अराइ, डॉ. सुर्ताजो सितम आदी उपस्थित होते.

दिनविशेष :
 • जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

महत्वाच्या घटना

 • १८४६: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.

 • १९३६: प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.

 • १९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

 • १९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

 • १९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

 • १९७५: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.

 • १९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.

 • २००१: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.

 • २००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.

जन्म

 • १८७२: कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)

 • १८८७: स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९६१)

 • १८९२: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.

 • १८९५: कविसम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.

 • १९१२: भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २००२)

 • १९४८: नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)

म्रुत्यु

 • १९००: महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.

 • १९२३: बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)

 • १९६४: व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.

 • १९७५: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.

 • १९८३: नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.

 • २०००: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर१९२१)

टिप्पणी करा (Comment Below)