चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० सप्टेंबर २०१९

Updated On : Sep 10, 2019 | Category : Current Affairsजगात २०२४ पर्यंत भारत आर्थिक महाशक्ती बनेल - नरेंद्र मोदी :
 • व्लादिवस्तोक : जगात भारताला आर्थिक महाशक्ती बनविण्याच्या संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. व्लादिवस्तोक येथील आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,' भारत, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास... यासोबत पुढे जात आहे. 2024 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पुढे जात आहे.'

 • भारत आणि रशिया सोबत आल्यामुळे विकासाच्या वेगाला  1+1= 11 बनविण्याची संधी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारताच्या काही नेते याठिकाणी येऊन अनेक विषयांवर चर्चा केली. भारत-रशिया संबधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे. त्यामुळे हे संबंध आता केवळ राजकीय संबंध राहिलेले नसून खासगी उद्योगांच्या पक्क्या सहकार्यापर्यंत पोहोचले आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भारत-रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केले.  

 • राष्ट्रपती पुतीन यांचे फार ईस्टच्या प्रती प्रेम आणि व्हिजन हे केवळ या क्षेत्रासाठीच नाही तर भारतासारख्या सहकारी देशांसाठीही मोठी संधी घेऊन आले आहे. व्लादिवस्तोक यूरेशिया आणि पैसिफिकचा संगम आहे. त्यामुळे हा भाग आर्कक्टिक आणि उत्तरी समुद्री मार्गासाठी नव्या संधी निर्माण करीत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हरित कवच २ कोटी ६० लाख हेक्टरने वाढवण्याचे लक्ष्य :
 • नवी दिल्ली : पुढील दहा वर्षांमध्ये २ कोटी ६० लाख हेक्टर इतकी प्रचंड जमीन पुन्हा हरित केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. जगभर नापीक होत असलेल्या जमिनींमागे पाण्याचा अभाव हेही प्रमुख कारण असून त्यावर पर्याय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर जलकृती आराखडा तयार करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

 • हवामानातील बदलामुळे विपरीत परिणाम, जैववैविधतेचा ऱ्हास आणि जमिनींचे नापिकीकरण अशा पर्यावरणविषयक तीन समस्या भेडसावत आहेत. त्यापैकी नापीक जमीन सुपीक करणे, जंगले पुनप्र्रस्तापित करणे, दुष्काळ निवारण अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर दिल्लीतील जागतिक परिषदेत चर्चा केली जात आहे. या संदर्भात ‘दिल्ली ठराव’ संमत केला जाणार आहे. त्यासाठी ७०हून अधिक देशांच्या मंत्र्यांची दोन दिवसांची बैठक होत आहे. ‘संयुक्त राष्ट्रां’च्या (यूएनसीसीडी) अंतर्गत होत असलेल्या या जमीन सुधारविषयक जागतिक परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीच्या उद्घाटन समारंभात मोदी बोलत होते.

 • २०१५-१७ या दोन वर्षांत भारताचे हरित कवच ८ लाख हेक्टरने वाढले असल्याचे मोदी म्हणाले. भारताने जमीन सुधार कार्यक्रमासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. दक्षिणेकडील देशांना साह्य़ करण्याचे धोरण भारताने कायम ठेवलेले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे उपग्रह तंत्रज्ञान देऊन भारत मित्र देशांना सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.

सेरेना विल्यम्सला नमवत कॅनडाची बियान्का आंद्रेस्कू ठरली अमेरिकन ओपनची नवी चॅम्पियन :
 • कॅनडा : कॅनडाच्या एकोणीस वर्षांच्या बियान्का आंद्रेस्कूनं अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरुन नवा इतिहास घडवला आहे. बियान्कानं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचं आव्हान 6-3, 7-5 असं मोडून काढलं. कारकीर्दीतील 24व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे स्वप्न मात्र यंदा भंगलं आहे.

 • पंधरावी मानांकित बियान्का यंदा पहिल्यांदाच अमेरिकन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये दाखल झाली होती. गेली दोन वर्षे तिला पात्रता फेरीतच अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच बियान्काने यंदा पदार्पणात अमेरिकन ओपन जिंकण्याची कामगिरी बजावली. गेल्या 13 वर्षांत अमेरिकन ओपन जिंकणारी ती सर्वात अल्पवयीन टेनिसपटूही ठरली.

 • ग्रँड स्लॅम जिंकणारी बियान्का आजवरची पहिली कॅनेडियन नागरिक ठरली आहे. तर 2000 साली म्हणजे नव्या सहस्रकात जन्मलेली ती पहिली ग्रँड स्लॅम चॅम्पियन ठरली आहे.

पंतप्रधान मोदी व इम्रान खान एकाच दिवशी संयुक्त राष्ट्रांना करणार संबोधित :
 • भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देघेही एकाच दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत संबोधित करणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी या दोन्ही नेत्यांची भाषणे होणार आहेत. यावेळी इम्रान खान हे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. यावेळी आधी मोदींचे भाषण होणार असल्याने त्यानंतर इम्रान खान काय भुमिका मांडतील याकडे सर्व जगाचे लक्ष असेल.

 • लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जागतीक नेत्यांना संबोधित करणार आहेत. २४ ते ३० सप्टेंबर या काळात संयुक्त राष्ट्रांची ही ७४ वी वार्षिक महासभा पार पडणार आहे. यामध्ये भाषण करणाऱ्या जागतीक नेत्यांची प्राथमिक यादीही तयार असून यामध्ये ११२ देशांचे प्रमुख, ४८ सरकारांचे प्रमुख आणि ३० हून अधिक परराष्ट्र मंत्री न्यूयॉर्कमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण असेल त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण असेल. मोदींनी यापूर्वी या सभेत २०१४ मध्ये संबोधित केले होते.

 • न्यूयॉर्क दौऱ्यादरम्यान २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिल गेट्स अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या ‘ग्लोबल गोलकिपर अवॉर्ड – २०१९’ या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील उद्देश साध्य करण्यासाठी मोदींनी भारतात केलेल्या प्रभावशाली कामासाठी त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सार्वजनिक स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे त्यांना ही नवी ओळख मिळणार आहे.

प्रवासी वाहनांच्या विक्रीतील घसरण ऐतिहासिक नीचांकावर :
 • भारतीय वाहन उद्योगावरील विघ्न दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. ऑगस्ट महिन्यातील प्रवासी वाहन विक्रीची आकडेवारी समोर आली असून, १९९८ नंतर प्रथमच वाहन विक्रीने नीचांक गाठला आहे. सलग दहा महिन्यांपासून ही घट होत आहे. वाहन उत्पादक क्षेत्रातील ‘सियाम’ने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स) ही माहिती जारी केली आहे.

 • जीएसटी, विक्रीतील घसरण आणि रोजगार कपातीचा सामना करावा लागलेल्या देशातील वाहन उद्योगांवर ग्राहकांकडून होणाऱ्या खरेदीअभावी निर्मिती कमी करण्याची वेळही ओढवली आहे. मात्र, विक्री वाढण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या वाहन उद्योगासमोरील समस्या वाढतच चालली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीचा अहवाल ‘सियाम’ने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स) सोमवारी प्रसिद्ध केला. १९९७-९८ पासून वाहन विक्रीची आकडेवारी संग्रहीत करण्याचे काम सुरू केले होते. तेव्हापासून प्रथमच वाहन विक्री नीचांकी पातळीवर गेली आहे. “प्रवासी वाहनांची विक्री ३१ टक्क्यांनी घटली असून, वर्षाला एक लाख ९६ हजार ५२४ युनिट (गाडी) विक्रीअभावी पडून आहे. तर प्रवासी कारची विक्री ४१.०९ टक्क्यांनी घटली आहे”, असे सियामने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

 • ही आकेडवारी प्रकाशित होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जुलैदरम्यान प्रवासी गटातील वाहनांची निर्मिती १३.१८ टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘सिआम’ने म्हटले होते. चार महिन्यांत केवळ ह्य़ुंदाई मोटर इंडिया, फोक्सवॅगनसारख्या निवडक कंपन्यांच्या वाहन निर्मितीत वाढ नोंदली गेली आहे. तर मारुती सुझुकी, होंडा कार्स इंडिया, फोर्ड, टोयोटा किर्लोस्कर महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स यांना तब्बल ३० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीला सामोरे जावे लागले, असे सियामने नमूद केले होते.

वैमानिकांच्या संपामुळे ब्रिटिश एअरवेजची सर्व उड्डाणे रद्द :
 • लंडन : वैमानिकांच्या संपामुळे ब्रिटिश एअरवेजला पहिल्याच दिवशी सर्वच विमानतळावरील उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली. वेतनाच्या मुद्दय़ावरून वैमानिकात नाराजी असून ते संपाच्या पातळीवर उतरले ही खेदाची बाब आहे, असे ब्रिटिश एअरवेजने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ब्रिटिश एअरलाइन पायलट असोसिएशन या संघटनेशी वेतनाच्या मुद्दय़ावर चर्चेची तयारी असल्याचे ब्रिटिश एअरवेजने सांगितले.

 • संघटनेने कुठलीही माहिती संपाबाबत दिली नसल्याने किती वैमानिक कामावर येणार आहेत हे माहिती नव्हते. त्यामुळे जवळपास १०० टक्के उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली, असे ब्रिटिश एअरवेजचे म्हणणे आहे. या एअरवेजचे एकूण ४ हजार ३०० वैमानिक असून  त्यांच्या वेतनाचा वाद गेले नऊ महिने चालू आहे.

 • वैमानिकांचा संप मंगळवारीही सुरू राहणार असून त्यानंतर पुन्हा २७ सप्टेंबरला संप करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. थंडीच्या दिवसात हा पेच वाढल्यास प्रवाशांची आणखी गैरसोय होणार आहे.  वैमानिकांच्या संघटनेने तीन वर्षांत देण्यात आलेली ११.५ टक्के वेतनवाढ नाकारली असून जुलैत ब्रिटिश एअरवेजने वेतनवाढीचा हा प्रस्ताव मांडला होता.

दिनविशेष :
 • जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

महत्वाच्या घटना 

 • १८४६: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.

 • १८९८: लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.

 • १९३६: प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.

 • १९३९: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

 • १९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

 • १९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

 • १९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

 • १९७५: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.

 • १९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.

 • २००१: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.

 • २००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.

जन्म

 • १८७२: कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)

 • १८८७: स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९६१)

 • १८९२: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.

 • १८९५: कविसम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.

 • १९१२: भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २००२)

 • १९४८: नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)

 • १९८९: भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९००: महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.

 • १९२३: बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)

 • १९४८: बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचे निधन.

 • १९६४: व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.

 • १९७५: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.

 • १९८३: नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.

 • २०००: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२१)

 • २००६: टोंगाचा राजा टॉफाहाऊ टुपोऊ यांचे निधन.

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)