चालू घडामोडी - ११ एप्रिल २०१८

Updated On : Apr 11, 2018 | Category : Current Affairsपंतप्रधान मोदीच जाणार उपोषणावर :
 • नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा गुरुवारी १२ एप्रिल रोजी एक दिवसाचा ‘निषेध उपोषण’ करणार आहेत.

 • मोदी राजधानी दिल्लीत उपोषण करतील, तर कर्नाटकात निवडणूक प्रचार करीत असलेले शहा हुबळी येथे दिवसभराचा उपवास करतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मोदी १२ तारखेला उपोषण करणार असले, तरी दिवसभराची त्यांची ठरलेली सरकारी कामे नित्याप्रमाणे सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

 • गेल्या शुक्रवारी भाजपाच्या स्थापना दिन कार्यक्रमात संसदेचे अधिवेशन वाया गेल्याचा ठपका काँग्रेसवर ठेवत, मोदी यांनी या विरोधी पक्षाने लोकशाहीतील सर्वात खालची पातळी गाठल्याचा आरोप केला होता. याचा निषेध म्हणून भाजपाचे सर्व खासदार गुरुवारी ११ एप्रिल रोजी एक दिवसाचे उपोषण करतील, असेही मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत जाहीर केले होते.

 • भाजपाच्या वाढत्या ताकदीने पोटदुखी झालेली काँग्रेस देशाचे हित बाजूला ठेवून मुद्दाम फुटपाडू आणि नकारात्मक राजकारण करत असल्याचा आरोप करून, मोदी यांनी भाजपाच्या सर्व खासदारांना व मंत्र्यांना गावोगाव जाऊन सरकारने केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती देण्यासही सांगितले होते. भाजपाच्या या खेळीला नैतिक काटशह देण्यासाठी काँग्रेसने देशात सांप्रदायिक सलोखा टिकून राहावा, यासाठी भाजपाच्या आधीच ९ एप्रिल रोजी देशव्यापी उपोषण आयोजित केले होते.

रेल्वेतील ९० हजार जागांसाठी तीन कोटीहून जास्त उमेदवारांचे अर्ज :
 • रेल्वेत ९० हजार जागांवर भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून, पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडे या रिक्त जागांसाठी तीन कोटींहून जास्त उमेदवारांचे अर्ज आले आहेत. मात्र यामधील २ कोटी ३७ लाख अर्ज पात्र आहेत. याविषयी बोलताना रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी रेल्वेच्या परिक्षेची तयारी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, पेपर लीक होण्याची कोणतीच शक्यता नाही.

 • पेपर लीक होण्यासंबंधी शक्यतेशी संबंधित प्रश्नांवर बोलताना त्यांनी परिक्षा ऑनलाइन घेतली जाणार असून त्यासाठी मोठी प्रश्नपत्रिका तयार करणार असल्याचं सांगितलं. यामुळे भरती परिक्षेतील उमेदवारांना संगणकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. अशा पद्धतीने पेपर लीक होण्याची शक्यताच उरणार नाही असं त्यांचा दावा आहे.

 • रेल्वे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागांसाठी एकच परिक्षा घेतली जावी किंवा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन परिक्षा घेतल्या जाव्यात याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आर्थिक वर्ष संपण्याआधी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असणार आहे.

 • याआधी झालेल्या भरती प्रक्रियेत ९२ लाख उमेदवारांचे अर्ज आले होते. रेल्वेने ९२ लाख उमेदवारांच्या परिक्षेची व्यवस्था केली असताना फक्त ५७ लाख उमेदवारच सामील जाले होते. यामुळे रेल्वेने तयारीसाठी खर्च केलेला बराचसा पैसा वाया गेला होता. यामुळे यावेळी रेल्वेने अर्जासोबत पाचशे रुपयांची फीदेखील ठेवली आहे. उमेदवार परिक्षेसाठी उपस्थित राहिल्यास नंतर त्यांना ते पैसे परत करण्यात येतील.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
 • पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. 2 हजार 633 नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 5 पोलिस स्थानकं आणि पुणे शहरातील 9 पोलिस स्थानकांचा समावेश होईल. मुख्यालयासाठी तात्पुरती जागा भाड्याने घेतली जाणार आहे.

 • औरंगाादमधील वैजापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला सिंचन सुविधा देण्यासाठी श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली.

 • कटघोरा-डोंगरगड रेल्वे मार्ग उभारण्यासाठी छत्तीसगड रेल कार्पोरेशन लिमिटेड आणि साऊथ-ईस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड यांच्यासोबत एसपीव्हीमधील महानिर्मिती कंपनीच्या भागीदारीस मान्यता देण्यात आली.

 • ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेमधून थेट निवडणूक घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम-1958 मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याची विनंती राज्यपालांना करण्यास मान्यता.

 • हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम-1952 मध्ये सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याची विनंती राज्यपालांना करण्यास मान्यता.

‘कृषी संजीवनी’च्या पहिल्या टप्प्यात ७ जिल्हे :
 • मुंबई : नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १,०११ गावांची निवड केली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. प्रकल्पाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. प्रकल्पाबाबत आढावा बैठक झाली.

 • कृषिमंत्री म्हणाले, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यांतील १५५ तालुक्यांतील ५,१४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी ९३२ खारपाण पट्ट्यातील गावे आहेत. त्याचा फायदा १७ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

 • प्रथम टप्प्यात उस्मानाबादमधील ४३, अमरावतीमध्ये २१०, बुलडाणातील ९१, यवतमाळमधील ५४, वर्धा येथील १०, अकोल्यातील ८९, वाशिममधील २९ अशा १३१ गाव समूहातील १,०११ गावांची निवड केली आहे.

 • प्रकल्पासाठी गावांचे सूक्ष्म नियोजन, ग्राम कृषी संजीवनी समिती, खारपान जमिनीचे प्रश्न यावर बैठकीत चर्चा झाली. प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी यांनी सादरीकरण केले.

ओम मिथरवालला कांस्यपदक, भारताच्या पदकांची संख्या २२ :
 • गोल्ड कोस्ट : येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या ओम प्रकाश मिथरवाल यांने 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. अखेरच्या क्षणात ओम मिथरवालची कामगिरी खालवाली त्यामुळं सुवर्णपदकाच्या शर्यतीत असलेला ओमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

 • दुसरीकडे जीतू राय 50 मी. पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीतून बाहेर पडल्यामुळं भारताचं एक पदक हुकलं आहे. ओम प्रकाश मिथरवाल याने पटकावलेल्या कांस्यपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता 22 झाली आहे.  

फेसबुकपाठोपाठ यूट्युब अडचणीत; बालसुरक्षा कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप :
 • केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा चोरी प्रकरणामुळे फेसबुकवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली असताना आता यूट्युबदेखील अडचणीत आले आहे. अमेरिकेतील २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे. १३ वर्ष वयापर्यंतच्या मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करुन बालसुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या संस्थांनी यूट्युबवर केला आहे. 

 • यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षांखालील मुलांची माहिती गुगलकडून गोळा केली जाते. या मुलांचे लोकेशन, डिव्हाईस, फोन नंबर अशी माहिती गोळा करुन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते. याशिवाय ही माहिती गोळा करताना मुलांच्या पालकांची परवानगीदेखील घेतली जात नाही. यामुळे अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे (Coppa) उल्लंघन होत असल्याचे तक्रारदार संस्थांचे म्हणणे आहे. 

 • कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढणाऱ्या संस्था, जागरुक ग्राहक आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका असलेले गट अशा एकण २३ संस्थांनी मिळून यूट्युबविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संस्थांच्या ग्रुपमध्ये कॅम्पेन फॉर कमर्शियल-फ्री चाईल्डहूड (CCFC) आणि सेंटर फॉर डिजिटल डेमोक्रसी या महत्त्वाच्या संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे यूट्युबविरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. 

 • ५ कोटी वापरकर्त्यांची माहिती लिक झाल्याने काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर टीकेची झोड उठली होती. डेटा लिक झाल्याने निर्माण झालेले हे वादळ अद्याप शमलेले नाही. केंब्रिज अॅनॅलिटिका या कंपनीला वापरकर्त्यांचा डेटा दिल्याचा आरोप फेसबुकवर आहे. याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने माफीदेखील मागितली होती. आता फेसबुकपाठोपाठ यूट्युबदेखील अडचणीत सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. 

दिनविशेष :
 • जागतिक पार्किन्सन दिन

महत्वाच्या घटना

 • १९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

 • १९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.

 • १९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.

 • १९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.

 • १९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.

 • १९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

 • १९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

जन्म

 • १७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)

 • १७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)

 • १८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर१८९०)

 • १८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)

 • १९०४: गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९४७)

 • १९०८: सोनी कंपनीचे सहसंस्थापक मसारू इबुका यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७)

 • १९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.

मृत्यू

 • १९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १८४९)

 • १९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२१)

 • २०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)

 • २००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९००)

 • २००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे  निधन. (जन्म: २१ जून १९१२)

 • २०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.(जन्म: ६ जुलै १९३३)

टिप्पणी करा (Comment Below)