चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ एप्रिल २०१९

Date : 11 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तुम्ही तुमचे मतदान केंद्र कसे शोधाल :
  • मुंबई : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता आपलं नाव मतदार यादीत नाव असून देखील बऱ्याच वेळेला मतदारांला त्यांचे मतदान केंद्र सापडत नाही आणि पंचाईत होते. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं मतदान केंद्र कुठे आहे हे आताच पाहा.

  • मतदार हेल्पलाइन अॅप’चा वापर करुनसुद्धा मतदान केंद्र शोधू शकता. मतदार electoralsearch.in वर जाऊ शकतात किंवा मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार हेल्पलाईन अॅप वापरू शकतात.

  • 1950 या मतदार हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता.  पण हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याआधी तुम्हाला तुमचा एसटीडी कोड टाकावा लागणार आहे.

  • तसेच तुम्ही मेसेजच्या सहाय्यानेही मतदान केंद्र शोधू शकता. मतदाराने  <ECIPS> space <EPIC No> टाइप करत 1950 या नंबरवर पाठवत तुम्ही मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता.

  • राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) National Voters' Service Portal (NVSP) च्या वेबसाइटवर जाऊन देखील मतदान केंद्र शोधू शकता.

पहिल्या टप्प्यात आज मतदान :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होईल. राज्यात विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.

  • नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात होईल. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडावे म्हणून एकूण ११ हजारांवर सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे.

  • गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन :
  • मुंबई - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहे. देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील या महापर्वाची नोंद घेत गुगलनेही डुडलद्वारे भारतीयांनामतदान करण्याचे आवाहन केलं आहे.  

  • 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

  • नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. देशातील लोकशाहीच्या या महापर्वाची दखल गुगल या जगप्रसिद्ध सर्ज इंजिनने घेतली आहे. गुगलने डुडलद्वारे मतदान करण्याचे आणि मतदान करण्याची प्रकिया समजावून सांगितली आहे.  

  • गुगलकडून नेहमीच जनजागृती आणि जगप्रसिद्ध किंवा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. त्यामध्ये, कलाकार, राजकीय, सामाजिक, क्रीडा, साहित्य क्षेत्रांसह इतरही क्षेत्रातील महान व्यक्ती किंवा कार्याला अभिवादन केलं जात. ऑलिंम्पिक असेल, विश्वचषक स्पर्धा असेल किंवा इतर कुठलाही मोठा उत्सव असेल, गुगलकडून शुभेच्छा देण्यात येतात.

  • भारतीय सण, उत्सव, स्पर्धा, व्यक्ती, स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन आणि ऐतिहासिक आठवणींचा गुगलद्वारे सन्मान करण्यात येतो. त्यामुळेच भारतीय लोकशाहीतील महापर्वातील अध्यायाच्या शुभारंभाची दखल घेत गुगले मतदानारुपी डुडल साकारले आहे. गुगलच्या इंग्रजी अक्षरातील तिसऱ्या क्रमांकाचे O (ओ) हे अक्षर गुगलने मतदानरुपी दर्शवले आहे. त्यामध्ये, डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्याचे दिसत आहे. 

‘टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांची अद्याप सेवा समाप्ती नाही :
  • पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची ३१ मार्चला सेवा समाप्त करण्याच्या निर्णयाची राज्य सरकारकडून अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडूनच शासन निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • शिक्षण हक्क कायद्यानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक केले. त्यासाठी राज्य सरकारने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ३१ मार्चची मुदत दिली.

  • ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना तीनचार संधीही देण्यात आल्या. त्यानंतरही टीईटी उत्तीर्ण न झालेल्या झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे दिला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने अद्याप केलेली नाही.

  • ‘टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्ती अद्याप केलेली नाही. या बाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट असल्याने शासन निर्णयाची कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. न्यायालयाचा निकाल आल्यावर त्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल. त्याशिवाय टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना मुदतवाढ देणे हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील निर्णय आहे,’ असे शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी सांगितले.

महिला कार रॅली - दीपा, प्रियांका यांना विजेतेपद :
  • मुंबई : वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (विया) वतीन घेण्यात आलेल्या ‘वुमन्स रॅली टू द व्हॅली’ या वार्षिक महिला कार रॅलीमध्ये दीपा दामोदरन आणि प्रियांका विदेश यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. बुधवारी सबर्बन हॉटेलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तब्बल ८७ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

  • वरळी ते अ‍ॅम्बी व्हॅली, पुणे येथे ७ एप्रिलला पार पडलेल्या या रॅलीत तब्बल ४०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. प्रज्ञा चावरकर आणि पारुल शाह यांच्या संघाने दुसऱ्या क्रमांकासह ५० हजार रुपयांचे बक्षिस मिळवले. विनिशा सिंग सावंत आणि अयोश्मिता बिस्वास यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला. मनीषा गेंद आणि मालू गुप्ता यांच्या संघाने चौथ्या क्रमांकावर मजल मारली तर काला चंद्रकांत सोनी आणि हिमानी शर्मा यांनी पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मल्लिका राय आणि नेहा खंडेलवाल यांनी सहावा क्रमांक पटकावला.

  • यावेळी महिला रॅलीच्या अध्यक्षा स्मिता दांडेकर यांनी सांगितले की, ‘‘आम्ही १९०४मध्ये नवी दिल्ली ते मुंबई अशी पहिली रॅली आयोजित केली होती. सेनादल, नौदल, हवाईदलातील तसेच पोलिसांच्या संघांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. आता आमची पुढील रॅली ८ मार्च २०२० रोजी होणार आहे.’’ या कार्यक्रमाला ‘विया’चे कार्याध्यक्ष नितीन डोसा हेसुद्धा उपस्थित होते.

जाणून घ्या, मतदानासाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणारी ११ कागदपत्रे :
  • राज्यातील सात मतदार संघात आज (गुरुवारी) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर मतदानासाठी ओळखपत्र म्हणून ११ कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. यात पासपोर्ट, वाहन चालक परवाना, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक यांचा समावेश आहे.

  • राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये गुरुवारी मतदान होणार आहे.  पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात सर्वाधिक ३० उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.

  • मतदानाची वेळ - गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी आहे. तर उर्वरित ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल.

मतदानासाठी ओळखपत्र ही कागदपत्रे ग्राह्य धरली जातील :

१. पासपोर्ट

२. आधारकार्ड

३. वाहन चालक परवाना

४. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

५. छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक

६. पॅनकार्ड

७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

८. मनरेगा कार्यपत्रिका

९. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

१०. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

११. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

कीटकनाशक मृत्यू प्रकरणातील कंपनीच्या कार्यालयात भाजप प्रचार साहित्याची निर्मिती :
  • मुंबई : विदर्भातील कीटकनाशक फवारणीत विषबाधा होऊन ४० हून अधिक  शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते, ते कीटकनाशक बनविणाऱ्या कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात भाजपच्या प्रचार साहित्याची निर्मिती केली जात होती, त्याचबरोबर याच कंपनीला देण्यात आलेले देवनार कचराभूमी कंत्राट वादग्रस्त ठरले होते, त्यामुळे या प्रकारणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

  • या प्रकरणात बेकायदा प्रचार साहित्य तयार करण्याच्या संदर्भात संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी

  • दिली.  केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेने या कंपनीला देवनार कचरा भूमीच्या  व्यवस्थापनाचे साडेचार हजार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते, असे सावंत यांचे म्हणणे आहे.  काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या साथीने मंगळवारी युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयावर छापा घालून भाजपच्या प्रचारसाहित्याची निर्मिती केली जात होती, हे उघडकीस आणले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

  • १९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.

  • १९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.

  • १९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.

  • १९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.

  • १९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

  • १९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

जन्म 

  • १७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)

  • १७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)

  • १८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

  • १८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)

  • १८८७: चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७२)

  • १९०४: गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९४७)

  • १९०६: संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म.

  • १९०८: सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७)

  • १९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.

  • १९५१: अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १८४९)

  • १९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२१)

  • २०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)

  • २००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९००)

  • २००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे  निधन. (जन्म: २१ जून १९१२)

  • २०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.(जन्म: ६ जुलै १९३३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.