चालू घडामोडी - ११ ऑगस्ट २०१७

Date : 11 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत :
  • मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर असून सकाळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाला ते उपस्थित राहतील. या दीक्षान्त सोहळ्यात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

  • दीक्षान्त समारंभानंतर आयआयटी मुंबई येथे पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करतील.

  • पंतप्रधानांसह दीक्षान्त सोहळ्याला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. आयआयटीच्या वतीने सिम्फनी टेक्नोलॉजी ग्रुपचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश टी. वाधवानी यांना डी लिट प्रदान करण्यात येणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स डिजीटल रुपात तपासा, केंद्राचे आदेश :
  • नवी दिल्ली : वाहनधारक आणि वाहन चालकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यापुढे तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स खिशात बाळगण्याची गरज पडणार नाही. डिजीटल लायसन्ससाठी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

  • तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी असेल. तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना दिला आहे.

  • ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाणार नाही. डिजीलॉकर किंवा एम-परिवहन अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे.

  • वाहतूक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपूर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

अॅपल, फेसबुकला नमवणाऱ्या ट्रायच्या अध्यक्षांना मुदतवाढ :
  • मुंबई : अॅपल आणि फेसबुकवर कारवाईचे पाऊल उचलणारे ट्रायचे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांचा अतिरिक्त कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. आता ते आणखी दोन वर्षे ट्रायचे अध्यक्षपदी राहणार आहेत. शर्मा यांनी इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना ताळ्यावर आणले होते.

  • रामसेवक शर्मा यांचा कार्यकाळ आज, शुक्रवारी संपणार होता. मात्र, त्या आधीच त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नेट न्युट्रीलिटी हा त्यांचा निर्णय होता. यापूर्वी कंपन्या वेगवेगळ्या वेबसाईट, सेवांच्या वापरासाठी वेगवेगळे दर आकारत होत्या. तर फेसबुकसारख्या कंपन्या मोफत इंटरनेट पुरवत होत्या. नेट न्युट्रीलिटी मुळे याचा जोरदार फटका फेसबुकला बसला. 

  • तसेच त्यांनी स्पॅम मेसेज, मेलचा शोध घेण्यासाठी अॅपल या कंपनीलाही नमवले होते. अॅपल कंपनी आपल्या ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी नावाजली जाते. ते अमेरिकेलाही ग्राहकाच्या मोबाईलमधील माहिती कोणत्याही कारणास्तव देत नाहीत. अशा कंपनीलाही भारतीय ग्राहकांच्या मोबाईलमध्ये स्पॅम मेसेज आल्यास त्याचा शोध घेण्यासंदर्भातील अॅक्सेस देण्यास बाध्य केले होते. 

  • केंद्र सरकाने गुरुवारी सायंकाळीच रामसेवक शर्मा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याचे सांगितले. यानुसार ते 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत ट्रायच्या अध्यक्षपदावर राहणार आहेत. ते यापूर्वी युआयडीएआयचेही अध्य़क्ष होते.

मिहान येथे होणार संरक्षण साहित्य निर्मिती क्लस्टर :
  • मुंबई : संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये २० एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे ५० हजार रोजगार उपलब्ध होईल. सह्याद्री येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर १० मधील सुमारे २० एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. सामाजिक भावनेतून या ठिकाणी विविध संरक्षण साहित्य निर्मिती केली जाणार आहे.

  • शिर्डी विमानतळ येथे नाइट लँडिंगची सुविधा तातडीने सुरू होईल यादृष्टीने कामास गती देण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्र्यांनी पुरंदर, बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिक विमानसेवा जोडणी योजनेतील कामांचादेखील या वेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद असल्याचेदेखील या वेळी सांगण्यात आले.

  • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नगर नियोजन विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी २१ पदे तातडीने भरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

३६ महिलांच्या हाती मोदींची सुरक्षा :
  • नवी दिल्ली - दिल्लीत लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी भाषण करतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी ३६ महिलांची स्वॅट टीम असेल. महिलांची पहिली स्वॅट टीम १५ महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर सेवेत दाखल झाली आहे. या टीमला देशी-विदेशी तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. या महिलांच्या हाती अत्याधुनिक शस्त्रे असतील.

  • सर्वांत कठीण ट्रेनिंग - स्वॅट कमांडोंचे ट्रेनिंग अत्यंत कठीण असते. कोणत्याही स्थितीत दुष्मनाचा खात्मा करण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांना हवेत, पाण्यात आणि जंगलात आॅपरेशन फत्ते करण्यासाठी तयार केले जाते.

  • अंधारातही दुश्मनांना टीपण्याची त्यांच्यात क्षमता असते. दहशतवादी आणि नक्षली आॅपरेशनसाठी ही टीम सज्ज असते. 2008 साली झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर अशा टीमची आवश्यकता भासली. इतर अनेक देशांकडे अशी टीम अगोदरपासूनच आहे.

बेळगावात शाहू महाराजांचा पुतळा उभारणार :
  • बेळगाव : शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या केएलई हॉस्पिटलजवळ राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. शहरातील विविध दलित संघटनांनी बेळगावात शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी महापौर बसप्पा चिक्कलदिनी यांच्याकडे केली होती.

  • पुतळा उभारण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असून एक कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. सभागृहाची मुदत संपण्याआधीच पुतळा उभारणी करून त्याचे अनावरण व्हावे, अशी विनंती दीपक जमखंडी यानी केली.

  • शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांच्या जीवनकार्याची माहिती मराठी व कन्नड भाषेत प्रदर्शित केली जावी. जेणेकरून त्यांचे विचार समाजाला समजतील अशी मागणी नगरसेविका मेघा हळदणकर यांनी केली.

मालदीवकडून भारताला सैनिक, हेलिकॉप्टर मागे घेण्याची सूचना :
  • नवी दिल्ली : मालदीवमध्ये भारताने तैनात केलेली दोन हेलिकॉप्टर आणि साधारण ५० सैनिक मागे घेण्याची सूचना हिंदी महासागरातील या देशाने भारताला केली आहे.

  • भारताने मालदीवमध्ये दोन हेलिकॉप्टर आणि त्यांच्या वैमानिकांसह ५० सैनिक तैनात केले आहेत. अत्यवस्थ रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामी त्यांचा वापर होत होता. मात्र आता त्यासाठी मालदीवने स्वत:च्या सोयीसुविधा विकसित केल्या असून भारताच्या हेलिकॉप्टर आणि सैनिकांची गरज उरलेली नाही.

  • तेव्हा भारताने ही हेलिकॉप्टर आणि सैनिक मागे घ्यावेत, अशी विनंती मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी भारत सरकारला केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या व्हिसाच्या मुदत संपली असून आता त्यांनी भारतात परतावे, असे मालदीवचे म्हणणे आहे.

  • आजवर भारताने मालदीवला लष्करी आणि नागरी मदत केली आहे. मात्र आता मालदीवमधील भारताच्या प्रभावाला चीनने आव्हान देण्यास सुरुवात केली असून तेथे मोठी गुंतवणूक केली आहे. मालदीवचे सध्याचे अध्यक्ष अब्दुल्ला यमीन हे चीनच्या बाजूने झुकलेले आहेत. त्यांच्या विरोधकांनी भारताकडे मदतीची याचना केली होती. त्यामुळे यमीन यांना भारतीय हेलिकॉप्टरपेक्षा सैनिक नकोसे झाले आहेत आणि त्यामागे चीनचाही हात आहे, असे जाणकारांचे मत आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.

  • १९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

  • १९५२: हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.

  • १९६०: चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६१: दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

  • १९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

  • १९८७: युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.

  • १९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.

  • १९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.

  • १९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.

  • २०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

जन्म

  • १८९७: बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)

  • १९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९९५)

  • १९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

  • १९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी २००९)

  • १९४३: पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा जन्म.

  • १९४४: फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांचा जन्म.

  • १९५०: ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म.

  • १९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८९)

  • १९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०५)

  • १९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)

  • २०००:  दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)

  • २००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२३)

  • २०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.