चालू घडामोडी - ११ डिसेंबर २०१७

Date : 11 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय पर्यटकांना खुणावतेय वॉशिंग्टन , वॉशिंग्टन डीसी बनले ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ :
  • मुंबई : जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन व्यवसाय बहरत चालला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये पर्यटकांचा कौल आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे झुकत आहे.

  • दिल्ली, मुंबई, हैदराबादमधील पर्यटकांचा वॉशिंग्टन डीसीकडे ओढा वाढावा, म्हणून प्रयत्नशील असल्याचे ‘डेस्टिनेशन डीसी’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इलिआॅट फर्ग्युसन यांनी दिली. मुंबई भेटीवर असताना इलिआॅट यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

  • मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमधील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘वॉशिंग्टन डीसी’ सध्या प्रयत्नशील आहे. वॉशिंग्टनच्या पर्यटन दृष्टीकोनाबाबत बोलताना इलिआॅट फर्ग्युसन म्हणाले की, अमेरिका म्हटल्यावर सुरुवातीला डोळ्यासमोर येते ते म्हणजे न्यूयॉर्क.

  • आता वॉशिंग्टनही त्यापाठोपाठ पर्यटनस्नेही बनले आहे. त्यात एअर इंडियाने दिल्ली ते वॉशिंग्टन अशी थेट विमान सेवा सुरू केल्यानंतर भारतीयांचा ओढा अधिक वाढत आहे. वॉशिंग्टनमधील विविध महोत्सव, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालय, नाइट लाइफ, क्रीडा प्रकार अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद :
  • औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. तामिळनाडूने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर चंदीगडला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले.

  • निकाल (वैयक्तिक : १४ वर्षांखालील मुले) : १. सनी यादव, २. सोहम मेहता (महाराष्ट्र), ३. पृथ्वी यादव (चंदीगड).

  • मुली : १. आयशा पटेल (मध्यप्रदेश), २. पूजा अथियार (तामिळनाडू), ३. अक्षया (तामिळनाडू). १७ वर्षांखालील मुले : १. पृथ्वी सिंग (चंदीगड), २. दीपक मंडल (महाराष्ट्र), ३. नवनीत (तामिळनाडू). मुली : १. अभिषेका सेनॉन (तामिळनाडू), २. मानवी जैन (महाराष्ट्र), ३. प्रतीक्षा (दिल्ली). १९ वर्षांखालील मुले : १. शिवम बन्सल (चंदीगड), २. यशवंत राघव (तामिळनाडू), ३. सूरज चंद (महाराष्ट्र). मुली : १. समिता एस., २. जे.एस. कृतिका (तामिळनाडू), ३. भावना गोयल (महाराष्ट्र).

  • बक्षीस वितरण राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार, इम्तियाज खान, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, पंकज भारसाखळे, चंद्रशेखर घुगे, रणजित भारद्वाज, डॉ. संदीप जगताप, अजय मिश्रा, प्रशिक्षक कल्याण गाडेकर, सुशील शिंदे, सचिन पुरी, लता लोंढे, भाऊराव वीर यांच्या उपस्थितीत झाले.

ट्रम्प यांचा निर्णय मागे घ्यावा, अरब मंत्र्यांची मागणी :
  • कैरो : जेरूसलेम शहराला इस्रायलची राजधानी म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मान्यता अमेरिकेने रद्द करावी, अशी मागणी अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी येथे केली.

  • ट्रम्प यांच्या त्या निर्णयामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकाही बळकावणाºयाच्या बाजूने आली असून, त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे, असे या मंत्र्यांनी म्हटले.

  • ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करणारा ठराव संमत करावा, असे आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला केले, परंतु अमेरिका अशा ठरावावर नकाराधिकार वापरेल, असेही त्यांनी म्हटले.

  • अमेरिकेने जर नकाराधिकार वापरला, तर अरब देश तसाच ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठेवतील, असे पॅलेस्टाइनचे परराष्ट्रमंत्री रियाद अल-मलिकी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या परराष्ट्रमंत्र्यांच्या तातडीने बोलावलेल्या व शनिवारी रात्री सुरू झालेल्या या बैठकीत दोन पानांचा ठराव संमत करण्यात आला. मात्र, ठरावात अमेरिकेवर दंडाची कारवाई करण्याच्या उपायांचा समावेश नाही.

जीतू, हीनाला आशियाई पदक, भारताची पदकसंख्या १७ वर :
  • नवी दिल्ली : दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

  • जीतू याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक गटात कांस्यपदकासह शाहजार रिज्वी आणि ओंकार सिंह यांच्यासोबत सांघिक गटात सुवर्णपदकही पटकाविले. दुसरीकडे, महिला गटात हीना हिने १० मीटर गटात कांस्यपदकासह श्री निवेथा परमाथन आणि हरवीन सराओ यांच्यासोबत सांघिक गटात रौप्यपदक पटकाविले.

  • पहिल्या दोन दिवसांत ११ पदके पटकाविणारा भारतीय संघ तिसºया दिवशी १७ पदकांवर पोहोचला.  आता भारताकडे ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्यपदके झाली आहेत.

  • १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रिज्वी हा क्वालिफिकेशनमध्ये ५८३ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. जीतूने क्वालिफाइंगमध्ये ५७७ गुणांसह पाचवे स्थान पटकाविले. रिज्वीसोबत आठ नेमबाजांनी फायनलमध्ये जागा मिळवली आहे.

'ट्रॅजेडी किंग' झाले 95 वर्षांचे, पत्नी सायरा बानू यांनी केलं खास कार्यक्रमाचं नियोजन :
  • मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 95 वा वाढदिवस आहे. दिलीप कुमार यांचा हा वाढदिवस खास करण्यासाठी दिलीप कुमार यांची पत्नी तसंच ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी खास गेट टुगेदरचं आयोजन केलं आहे.

  • घरातील मंडळी आणि जवळची मित्र मंडळी या खास कार्यक्रमात हजर असतील. काही दिवसांपूर्वीचं दिलीप कुमार यांना न्यूमोनिया झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

जेरूसलेमबाबतच्या निर्णयावरुन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका एकाकी :
  • न्यूयॉर्क : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेरुसलेमसंदर्भातील निर्णयावरुन संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिका एकाकी पडल्याचं चित्र आहे. कारण, जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याबाबत सुरक्षा परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. ट्रम्प यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद अरब देशांसह अन्य देशांमध्ये उमटले होते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. तर इराणमध्येही हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.

  • त्यामुळे सर्वांचेच लक्ष संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीकडे होतं. त्यानुसार, सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्येही ट्रम्प यांच्या निर्णयावर सदस्य देशांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी चर्चेने या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा, असे मतही परिषदेने यावेळी नोंदवलं.

  • दरम्यान, युरोपियन महासंघानेही जेरूसलेम ही इस्रायल आणि  पॅलेस्टाईन या दोन्ही देशांची संयुक्‍त राजधानी असल्याचा दावा केला आहे. पण अमेरिकेच्या ‘युनो’तील राजदूत निकी हॅली यांनी मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केलं आहे.

हायकोर्टांमध्ये ६ लाख खटले प्रलंबित, मुंबई पहिल्या क्रमांकावर :
  • नवी दिल्ली : देशातील वेगवेगळ््या उच्च न्यायालयांत जवळपास सहा लाख खटले प्रलंबित असून, मुंबई उच्च न्यायालयात एक लाखापेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. किती खटले प्रलंबित आहेत व ते कसे कमी करता येतील, यावर देखरेख ठेवणा-या संस्थेने ही माहिती दिली.

  • २४ उच्च न्यायालयांत २०१६ अखेर ४०.१५ लाख खटले प्रलंबित असून, त्यात दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या कालावधीचे खटले १९.४५ टक्के आहेत.

  • राष्ट्रीय न्यायालयीन डाटाकडे असलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबरपर्यंत २० उच्च न्यायालयांत १० किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या ५ लाख ९७ हजार ६५० होती. एकूण उच्च न्यायालये २४ असली, तरी काही न्यायालयांकडील माहिती उपलब्ध झाली नाही.

  • मुंबई उच्च न्यायालयात १ लाख २९ हजार ६३ खटले प्रलंबित असून, त्यात ९६,५९६ दिवाणी, १२ हजार ८४६ फौजदारी खटले, तर १९ हजार ६२१ याचिका प्रलंबित आहेत. रिट पिटीशन ही न्यायालयाची याचिका असते व ती खालच्या न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांची पुन्हा समीक्षा करण्यासाठी केली गेलेली असते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.

  • १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.

  • १९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.

  • १९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.

  • १९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.

  • २००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.

  • २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

जन्म

  • १८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९४०)

  • १८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)

  • १८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

  • १९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९९६)

  • १९२२: अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.

  • १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २००६)

  • १९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००२)

  • १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)

  • १९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.

  • १९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.

मृत्य

  • १७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)

  • १९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२)

  • १९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.)

  • २००१: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९०९)

  • २००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)

  • २००२: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९२०)

  • २००४: भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.

  • २०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.

  • २०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.