चालू घडामोडी - ११ फेब्रुवारी २०१८

Date : 11 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॅलेस्टाइन दौऱ्यात ‘ग्रँड कॉलर’ने सन्मान :
  • भारत आणि पॅलेस्टाइनमध्ये परस्पर चांगले राजकीय संबंध राखण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या हस्ते ‘ग्रँड कॉलर ऑफ दि स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ या सन्मानाने शनिवारी गौरविण्यात आले. पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या राजांना, देशाच्या किंवा सरकारांच्या प्रमुखांना तसेच त्यांच्या समकक्ष पद भूषवणाऱ्या परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान मोदींना या सन्मानाने गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत ज्यांनी पॅलेस्टाइनला अधिकृत भेट दिली आहे.

  • यापूर्वी पॅलेस्टाइनकडून सौदी अरेबियाचे राजे सलमान, बहारिनचे राजे हमद, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांसारख्या राष्ट्रप्रमुखांना ‘गॅँड कॉलर’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान UAE ला जातील आणि मंदिराची पायाभरणीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यासोबत चर्चाही करतील. दरम्यान, मोदींनी पॅलेस्टाइनचे दिवंगत राष्ट्रपती यसीर अराफात यांच्या कबरवर पुष्पांजली वाहिली.

  • पॅलेस्टाइनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान मोदींची ही चौथी भेट आहे. यापूर्वी या दोन्ही नेत्यांची भेट यूएनच्या जनरल असेंब्लीत २०१५ मध्ये, पॅरिस क्लायमेट समिट २०१६ मध्ये तर पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांच्या भेटी झाल्या आहेत. भारत मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावू शकतो, असे पॅलेस्टाइनने मानले आहे. पॅलेस्टाइनच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी UAE च्या दौऱ्यावर जातील.(source :loksatta)

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय :
  • जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अँडीला फ्लिकुद्द्वे आणि हेन्रिच क्लासेनच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात वादळी वारे आणि पावसामुळे दुस-यांदा व्यत्यय आला. त्यामुळे काहीकाळ हा सामना थांबविण्यात आला होता. 

  • भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 290 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला सात षटकात एक बाद 43 धावा असताना पावसाचा व्यत्यय आला. या पावसाच्या व्यत्ययानंतर 12 वाजताच्या सुमारास पुन्हा सामना सुरु करताना डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 28 षटकांमध्ये 208 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

  • यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात संथ गतीने झाली. जे पी ड्युमिनी अवघ्या दहा धावांवर बाद झाला. त्यानंतर धडाकेबाज फलंदाज हाशिम आमला सुद्धा लवकर तंबूत परतला. त्याला गोलंदाज कुलदीप यादवने 33 धावांवर झेलबाद केले. एबी डिव्हिलियर्सने शानदार खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

  • एबी डिव्हिलियर्सने दोन षटकार आणि एक चौकार लगावत 18 चेंडूत 26 धावा केल्या. अँडीला फ्लिकुद्द्वे आणि हेन्रिच क्लासेन यांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात अँडीला फ्लिकुद्द्वेने अवघ्या पाच चेंडूत तीन षटकार एक चौकर लगावत नाबाद 23 धावा केल्या, तर हेन्रिच क्लासेनने नाबाद (43), मिलर (39) आणि ड्युमिनीने 10 धावा केल्या. भारताकडून गोलंदाज कुलदीप यादवने दोन बळी टिपले तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी एक बळी घेतला. 

  • तत्पूर्वी,  भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९० धावांचे आव्हान ठेवले होते. ही धावसंख्या उभारताना भारताचे सात गडी बाद झाले. या सामन्यात शिखर धवनने वनडेमधील नववे शतक ठोकले. 100 व्या वनडेमध्ये शतक झळकवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.(source :lokmat)

जाणून घ्या मोदींच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-यातील या आठ विशेष गोष्टी :
  • रामल्ला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याला सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी जॉर्डनमार्गे मोदी पॅलेस्टाइनच्यारामल्ला शहरामध्ये दाखल झाले. मोदी यांचा हा पॅलेस्टाइन दौरा अत्यंत लहान म्हणजे फक्त तीन तासांचा आहे. पण अनेक अंगांनी हा दौरा ऐतिहासिक असेल. पॅलेस्टाइनला भेट देणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. मागच्या वर्षी जुलै महिन्यात मोदी इस्त्रायल दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पॅलेस्टाइनला भेट द्यायचे टाळले होते.

  • त्यावरुन मोदी सरकारच्या हेतूबद्दलही अनेकांनी शंका व्यक्त केली होती. पण आता पॅलेस्टाइनचा दौरा करुन भारतासाठी दोन्ही देश सारखेच असल्याचा संदेश मोदींनी दिला आहे. रामल्ला पॅलेस्टाइनची राजधानी आहे. मोदींनी रामल्लामध्ये दाखल झाल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष यासर अराफत यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी यासर अराफत संग्रहालयालाही भेट दिली. 

  • ०१) पंतप्रधान मोदी तीन तासाच्या आपल्या दौ-यात राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार होतील. 

  • ०२) पॅलेस्टाइनच्या रामल्ला शहरात सुपर स्पेशलिटी रुग्णालय बांधून देण्याची घोषणा मोदी करु शकतात. पॅलेस्टाइन जनता आतापर्यंत ज्या पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे त्या उपलब्ध करुन देण्यावर मोदींचा भर असेल.    

  • ०३) पॅलेस्टाइनला मान्यता देणारा भारत पहिला बिगरअरब देश असून त्यांच्याबरोबर कुटनितीक संबंधही प्रस्थापित केले.              

  • ०४) शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये दाखल झाले. किंग अब्दुल्ला दुसरे यांची भेट घेतल्यानंतर ते आज दुपारी हॅलिकॉप्टरने रामल्लामध्ये पोहोचले. 

  • ०५) किंग अब्दुल्ला दुसरे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. भारत-जॉर्डनमधील संबंध अधिक दृढ होतील असे मोदींनी म्हटले आहे. 

  • ०६) यूएईमध्ये पंतप्रधान मोदी त्या देशाचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांची भेट घेतील. दुबईमध्ये होणा-या वर्ल्ड गर्व्हमेंट समिटमध्येही मोदींचे भाषण होणार आहे.

  • ०७) पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदाच ओमानला भेट देणार आहेत. ओमानचे सुल्तान आणि अन्य प्रमुख नेत्यांची ते भेट घेतील. 

  • ०८) हा ऐतिहासिक दौरा असून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असे टि्वट पंतप्रधान मोदींनी केले आहे.(source :lokmat)

प्रॉमिस डे : दिल्या-घेतल्या वचनांची शपथ मोडू नका :
  • नागपूर : वचन देणे खूप सोपे आहे; कारण ते देताना केवळ शब्दांचे भांडवलच हवे असते. परंतु खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा ते वचन पाळायची वेळ येते. अशा वळणावर शब्दांचे क्षणिक बुडबुडे टिकत नाहीत. दुभंगू पाहणाऱ्या नात्याला प्रत्यक्ष कृतीच एकसंध ठेवू शकते आणि या कृतीसाठी प्रसंगी सारे मृगजळी मोह नाकारावे लागतात. ते नाकारण्याइतके तुमचे मन मोठे असेल तरच आजच्या प्रॉमिस डेला कुणाला वचन द्या अन् ते प्राणपणाने पाळा.

  • तुम्ही दिलेले हे वचन कुणीतरी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, हे विसरू नका. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे... मनातल्या मोरपीसाची शपथ तुला आहे... हे गाणे गुणगुणण्याचा हा दिवस आहे. ‘व्हॅलेंटाईन्स वीक’मधील पाचवा दिवस हा ‘प्रॉमिस डे’म्हणून का साजरा केला जातो माहितेय? कारण, गुलाब, चॉकलेट, टेडी या नश्वर वस्तू आहेत.

  • प्रेमाची भेट म्हणून त्या घरात सजवता येतील; पण मनात सजवायला जीवलगाचे आश्वस्त करणारे वचनच हवे असते. या दिवशी कपल्स एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांसाठी स्वत:मध्ये बदल करण्यास तयार होतात. इतकेच कशाला या दिवशी जोडीदाराला न आवडणाऱ्या सवयीचा अनेक जण त्यागही करतात.

  • त्याग ही गोष्ट कधीही सुखावणारी नसते; परंतु ती आवडत्या व्यक्तीसाठी असेल तर त्यागातही अपार आनंद अनुभवता येऊ शकतो. अर्थात अशा त्यागासाठी जोडीदाराने बळजबरी मात्र करू नये. विचार पटत नसतील तर खुशाल वेगळी वाट धरावी. वचनावरचा विश्वास ढळू देऊ नये; कारण हा विश्वासच नात्यांच्या धमण्यांमध्ये प्राणवायू पेरत असतो. हे पटत असेल तर हा दिवस तुमची प्रतीक्षा करतोय.

सहा महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करणार - विनोद तावडे :
  • मुंबई : आगामी सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. 'माझा कट्टा'वर बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

  • शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील डीएड आणि बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • विनोद तावडे म्हणाले की, "आधीच्या पद्धतीमध्ये प्रत्येक तुकडीला एक शिक्षक अशी संकल्पना होती. पण राईट टू एज्युकेशन ही संकल्पना मोडित निघाली. त्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या संख्येमागे शिक्षक अशी संकल्पना सुरु झाली. त्यात 30 विद्यार्थ्यांमागे एक, तर 60 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक दिले जायचे."

  • "पण यावर शिक्षक आमदार कोर्टात जाऊन, या निर्णयाला स्थगिती आणायचे. त्यामुळे एकीकडे शिक्षक भरती करुन घ्यायची आणि दुसरीकडे कोर्टाकडून स्थगिती मिळायची. त्यामुळे तत्कालिन सरकारने शिक्षक भरतीच बंद करुन टाकली."

  • तावडे पुढे म्हणाले की, "पण आम्ही संख्या मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती कशी योग्य आहे? हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात सिद्ध केलं, आणि त्यानंतर सेंटर भरती केली. कारण, अनेक शिक्षकांचा आग्रह होता की, शिक्षक भरतीवेळी काही संस्थाचालक पाच लाखापासून ते 15 लाखापर्यंतची मागणी करतात. तेव्हा हा भ्रष्टाचार थांबवण्याचं आवाहन शिक्षकांनी केलं होतं."

  • "त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सेंटर शिक्षक भरती करुन घेतली. यात एक ते एक लाख 78 हजार असा प्राधान्यक्रम निश्चित करुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या थांबवल्या. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील शिक्षकांच्या बदल्यांची शेवटची प्रक्रिया पूर्ण झाली की शाळेप्रमाणे शिक्षकभरती पुन्हा सुरु केली जाईल.(source :abpmajha)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

  • १७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

  • १८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

  • १८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.

  • १८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

  • १९११: हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.

  • १९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.

  • १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

  • १९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.

  • १९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.

  • २०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.

जन्म

  • १८००: छायाचित्रणकलेचा पाया घालणारे हेन्‍री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)

  • १८३९: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०२)

  • १८४७: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर१९३१)

  • १९३७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बिल लॉरी यांचा जन्म.

  • १९४२: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च२००३)

मृत्यू

  • १६५०: फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ रेने देकार्त यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५९६)

  • १९४२: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

  • १९६८: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)

  • १९७७: भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन. (जन्म: १३ मे १९०५)

  • १९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ कमाल अमरोही यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.