चालू घडामोडी - ११ जानेवारी २०१८

Date : 11 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
के. सिवन बनले इस्त्रोचे नवे चेअरमन :
  • नवी दिल्ली -  प्रसिद्ध शास्त्रज्ञ के. सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ए. एस. किरण कुमार यांची जागा घेतील. सिवन यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

  • कार्मिक मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीसंबंधीच्या समितीने आंतरराष्ट्रीय आंतरिक्ष विभागातील सचिव पद आणि अंतराळ आयोगाच्या अध्यक्षपदावरील त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 

  • सिवन हे सध्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये निर्देशक म्हणून काम पाहत आहेत. सिवन हे कुमार यांची जागा घेणार आहेत. कुमार यांची नियुक्ती 12 जानेवारी 2015 रोजी झाली होती. सिवन यांनी 1980 मध्ये मद्रास इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एअरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली होती.

  • त्यानंतर 1982 साली त्यांनी बंगळुरूमधील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनियरिंगमधून पदव्युत्तर पदवी मिळवली होती. पुढे 2006 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून त्यांनी एअरोस्पेर इंजिनियरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली होती. 

  • सिवन यांनी 1982 साली इस्रोमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पीएसएलव्ही प्रकल्पावर काम केलेले आहे. तसेच त्यांनी एंड टू एंड मिशन प्लानिंग, मिशन डिझाइन, मिशन इंटिग्रेशन आणि अॅनॅलिसिस यामध्ये विपूल योगदान दिले आहे. त्यांचे प्रबंध विविध जर्नलमधून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.(source :lokmat)

महाराष्ट्राच्या विवेक भाटियांची आॅस्ट्रेलियात भरारी - १४ बिलियन डॉलर्सच्या विमा कंपनीचे प्रमुख :
  • औरंगाबाद : येथील विवेक भाटिया आॅस्ट्रेलियाच्या १४ बिलियन अमेरिकी डॉलर्सची विमा कंपनी ‘क्यूबीई’मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे ‘बिझनेस आॅपरेशन्स’चे प्रमुख झाले आहेत. त्यांच्या या नियुक्तीने औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

  • भाटिया यांनी २०१७ चा ‘इन्शुरन्स लीडर आॅफ द ईअर’ पुरस्कार पटकावला. आॅस्ट्रेलियाच्या विमा क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते न्यू साउथ वेल्स सरकारच्या ‘इन्शुरन्स व केअर स्कीम’चे मॅनेजर होते. ते पेट रेगन यांची जागा घेतील. त्यांचा ‘आयकेअर’ कंपनीच्या स्थापनेत सिंहाचा वाटा होता.

  • भाटिया यांची तेव्हा ‘चिफ एक्झिक्युटिव्ह आॅफिसर व मॅनेजिंग डायरेक्टर’पदी नियुक्ती करण्यात आली होती. हे माझे भाग्य क्यूबीईचे नेतृत्व करण्यास मिळणे, हे माझे भाग्य आहे. मी येथेच १५ वर्षांपूर्वी विमा क्षेत्रातील वाटचाल सुरू केली होती, असे भाटिया म्हणाले.

  • लोकमत समूहाने आयोजित केलेल्या ‘पहनावा’ स्पर्धेमध्ये त्यांनी यश मिळविले होते.(source :lokmat)

पुनर्विकास प्रकल्पांसाठी म्हाडा उत्तम पर्याय - मुख्य अधिकारी सुमंत भांगे :
  • मुंबई : पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत (पीएमजीपी) मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या तत्काळ व पारदर्शक पुनर्विकासासाठी खासगी विकासकांच्या तुलनेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) हा उत्तम व सक्षम पर्याय असल्याचा दावा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी केला आहे.

  • मुंबईतील ६६ इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात अखिल मुंबई राजीव गांधी निवारा प्रकल्प मध्यवर्ती सहकारी गृहनिर्माण संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत भांगे बोलत होते. वांद्रे पूर्वेकडील म्हाडाच्या गृहनिर्माण भवन मुख्यालयात संघटनेच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळाने भांगेंसोबत चर्चा केली.

  • या वेळी ६६ इमारतींतील रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर मंडळाचे अधिकारी, अभियंते उपस्थित होते. या वेळी भांगे म्हणाले की, येत्या ४ वर्षांत या इमारतींची पुनर्रचना पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. म्हाडाकडे मुंबईमध्ये मोठ्या संख्येने संक्रमण शिबिरे उपलब्ध आहेत. त्यामुळे रहिवाशांना पुनर्विकास प्रकल्प राबविताना तात्पुरत्या निवाºयाची सोय सहज होऊ शकते.

  • इमारतीतील रहिवासी व म्हाडा यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून हा प्रकल्प राबविला गेला पाहिजे. मुंबईत १९८८ ते १९९४ या कालावधीत पंतप्रधान अनुदान प्रकल्पाअंतर्गत बांधलेल्या ६६ इमारती जीर्ण व धोकादायक झाल्या आहेत. त्यांची पुनर्रचना विकास नियंत्रण नियमावली ३३(७) किंवा ३३ (९) अंतर्गत करणे क्रमप्राप्त आहे.

  • २० इमारतींची लगतच्या पुनर्रचित/ उपकरप्राप्त/भूसंपादित इमारतीसह विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) अंतर्गत सहा समूह पुनर्विकास योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही भांगे यांनी स्पष्ट केले.(source :lokmat)

ब्रिटनच्या मंत्रिमंडळात दोन भारतीयांचा समावेश, महत्त्वाची खातीही मिळाली :
  • लंडन : ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या व मूळ भारतीय वंशाचे असलेल्या दोन खासदारांचा पंतप्रधान तेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक तसेच सुएला फर्नांडिस अशी या दोन खासदारांची नावे आहेत. ते दोघे ३७ वर्षांचे आहेत.

  • ऋषी सुनक व सुएला फर्नांडिंस भारतीय वंशाचे असले तरी दोघांचा जन्म तिथेच झाला आहे. सुएला या मूळ गोव्याच्या रहिवासी आहेत. ऋषी सुनक हे २०१५ साली पार्लमेंटमध्ये निवडून आले होते.

  • कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षामध्ये त्यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. गृहनिर्माण, स्थानिक स्वराज्य संस्था या खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांना पंतप्रधान तेरेसा मे यांनी दिले आहे. ब्रेक्झिेटशी संबंधित खात्याचे मंत्रीपद सुएला फर्नांडिस यांना देण्यात आले आहे. ब्रेक्झिटचा फर्नांडिस यांनी धडाडीने प्रचार

  • केला होता. ऋषी सुनक यांचे आॅक्सफर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण झाले आहे. सुनक हे ब्रेक्झिटचे कट्टर समर्थक आहेत. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यास आपले व्यापारविषयक धोरण तो अधिक प्रभावीपणे राबवू शकेल असे मत ऋषी सुनक व्यक्त केले आहे. 

आजपासून राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताह! संयमित वीज वापराबद्दल मार्गदर्शन केले जाणार :
  • मुंबई : शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार या विभागाने राज्यात गुरूवारी, ११ ते १७ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

  • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्युत निरीक्षक, महावितरण, खासगी वीज निर्मिती कंपन्या यांच्या कार्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जाईल. विद्युत कंत्राटदार संघटना आणि वीज साहित्याचे उत्पादन करणाºया कंपन्यांच्या सहकार्याने विद्युत सुरक्षा सप्ताह राबविला जाईल. या सप्ताहादरम्यान सुरक्षित वीज वापरासोबतच संयमित वीज वापराबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.

  • विद्युत निरीक्षणालयाचा ऊर्जा विभागात समावेश झाल्यामुळे गत दोन वर्षांपासून विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित होत आहे. विजेचा वापर करताना काय खबरदारी द्यावी?, याबाबत सप्ताहात मार्गदर्शन केले जाते. यामुळे वीज अपघाताबाबत बºयापैकी नियंत्रण आणण्यात यश प्राप्त झाले आहे.

  • काही शाळांमध्ये विद्युत सुरक्षादूत म्हणून काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी फावल्या वेळेत अन्य विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व सांगून सुरक्षित वीज वापराबद्दल मार्गदर्शन करु शकतील. या कार्यक्रमाला ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत यांची उपस्थिती असेल.(source :lokmat)

आधारऐवजी आता व्हर्च्युअल आयडी! सुरक्षित पर्याय, प्रत्येक वेळी नवा क्रमांक :
  • नवी दिल्ली : मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी ‘आधार’ क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ सुरू करणार आहे.

  • यामुळे आपला ‘आधार’ क्रमांक न उघड करता ‘व्हर्च्युअल आयडी’ क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. ‘व्हर्च्युअल आयडी’ कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला १६ अंकी आकडा असेल.

  • त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना ‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करून घेता येईल. हा ‘व्हर्च्युअल आयडी’ एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ घ्यावा लागेल.

  • १ जूनपासून नवी सोय ‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय १ मार्च २०१८ पासून सुरू होईल. केवायसी व ‘आधार’ संग्लनतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना १ जून २०१८ पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल.

  • थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.(source :lokmat)

सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ५ मार्चपासून सुरू होणार परीक्षा :
  • नवी दिल्ली - सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर 12वीची परीक्षा ही 12 एप्रिलपर्यंत चालेल. 

  • सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. देशाच्या विविध भागातील विद्यार्थी सीबीएसईचे परीक्षार्थी असल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागलेले असते.

  • आज जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 5 मार्च रोजी सुरू होणार आहे. ही परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालेल. तर 12 वीची परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. 12 वीची परीक्षा 12 एप्रिलपर्यंत चालेल.  

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १७८७: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

  • १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

  • १९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

  • १९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

  • १९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

  • १९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.

  • २०००: छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

  • २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म

  • १८१५: कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए. मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८९१)

  • १८५८: हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)

  • १८५९: ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९२५)

  • १८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.

  • १९४४: झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.

  • १९५५: उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

  • १९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.

मृत्य

  • १९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: २ जून १८४०)

  • १९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी१८७३)

  • १९६६: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)

  • १९९७: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

  • २००८: मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३१)

  • २००८: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.