चालू घडामोडी - ११ जानेवारी २०१९

Date : 11 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वार्षिक उत्पन्न ४० लाखांपर्यंत असणाऱ्यांना जीएसटीमध्ये सूट :
  • नवी दिल्ली : लघु उद्योग आणि लहान व्यापाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 40 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे उद्योग आणि व्यापाऱ्यांना जीएसटीतून सूट देण्यात आली आहे. यापूर्वी 20 लाखांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ही सूट देण्यात आली होती.

  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत नवे निर्णय घेण्यात आला आहेत. जीएसटी परिषदेची ही ३२ वी बैठक होती.

  • लहान व्यावसायिकांना आता कॉम्पोझिशन स्किमचा फायदा घेता येणार आहे. तसेच त्याची मर्यादा वाढवून दीड कोटी करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी लोकांना आता दर तीन महिन्याला कर भरावा लागणार आहे. याचबरोबर सेवा पुरवठादार कंपन्यांनाही या कम्पोझिशन स्कीममध्ये घेण्यास आजच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

  • केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी नोंदणीतूनही सूट मिळणार आहे. दरम्यान, बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजच्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची शक्यता :
  • मुंबई : समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून युतीचा महामार्ग बांधण्याचे प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणण्याचे जोरदार प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केले आहेत. त्याप्रमाणे समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.

  • समृद्धी महामार्गासोबतच शिवसेना-भाजप युतीचा महामार्गही सुसाट वेगाने सुरु करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र शिवसेनेने 'रोडरोमियो'सारखे मागे येऊ नका, असं दटावल्यामुळे सेनेच्या कलाने घेत आणि एकटं लढण्याची तयारी करत भाजपचे सर्व प्रयत्न सुरु आहेत.

  • महामार्गाचं भूमिपूजन नागपूरमध्ये होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी अद्याप संपर्क साधण्यात आला नसला, तरी त्यांनाही निमंत्रण दिले जाण्याचे संकेत मिळत आहेत.

  • समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून आधीच करण्यात आली आहे. सुरुवातीला, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचं विचार करणाऱ्या भाजपकडून, शिवसेनेप्रमुखांच्या नावाबाबतही गांभीर्याने विचार सुरु असल्याची माहिती आहे.

९२व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात :
  • यवतमाळ : मोठ्या वादानंतर आजपासून यवतमाळमध्ये ( शुक्रवार ) 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. वैशाली सुधाकर येडे यांना संमेलनाच्या उद्घाटकाचा मान मिळणार आहे.

  • संत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत दुपारी 4 वाजता हे उद्घाटन पार पडणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचं स्वागताध्यक्ष मदन येरावर यांनी सांगितलं.

  • ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे भाषण उद्घाटनावेळी वाचावे अशी मागणी होत होती. मात्र सहगल यांचे भाषण वाचलं जाणार नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. साहित्यिक, पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, कवी यांनी बहिष्कार टाकल्यानंतर या कार्यक्रमाचं काय हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

  • साहित्य मंडळाने घटनेत बदल करुन पहिल्यांदाच निवडणुका न घेता ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची संमेलनाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती. तसेच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाचं उद्घाटक म्हणून आमंत्रण दिल्यानंतर वाद झाला होता. त्यामुळे आमंत्रण रद्द करण्यात आले होते. आयोजकांच्या या निर्णयाचा विरोध करत अनेक मान्यवर मंडळींनी संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा - ५७ पदकांसह महाराष्ट्र अव्वल :
  • पुणे : पुण्यातल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी बजावली आहे. 57 पदकांची कमाई करत तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने पदकतालिकेत आघाडी घेतली आहे.

  • या स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत 15 सुवर्ण, 19 रौप्य आणि 23 कांस्य अशा 57 पदकांची कमाई केली आहे. दिल्लीच्या मुलामुलींनी 13 सुवर्णपदकांसह एकूण 36 पदकं पटकावली आहेत. हरयाणाने तिसऱ्या दिवसअखेर 12 सुवर्णपदकांसह एकूण 40 पदकं मिळवली आहेत. दिल्ली आणि हरयाणा पदकतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

  • महाराष्ट्राचा नव्या दमाचा पैलवान दिग्विजय भोंडवेला खेलो इंडियात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. खेलो इंडियातल्या 21 वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन कुस्तीत त्यानं 97 किलोचं कांस्यपदक मिळवलं.

  • दिल्लीत नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिग्विजय हा 97 किलोत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. खेलो इंडियात दिग्विजयला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं असलं, तरी त्याची कामगिरी अपेक्षा उंचावणारी आहे.

तत्काळ तिहेरी तलाकसंबंधी अध्यादेशाला सरकारकडून पुन्हा मंजुरी :
  • तत्काळ तिहेरी तलाकशी संबंधीत विधेयकाला संसदेत मंजुरी मिळू न शकल्याने गुरुवारी मोदी सरकारने मोठा निर्णय घेत यासंबंधीच्या अध्यादेशाला पुन्हा मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. कारण, यापूर्वी काढण्यात आलेल्या तत्काळ तिहेरी तलाकला गुन्हा घोषित करण्याच्या अध्यादेशाची मुदत २२ जानेवारी रोजी संपणार होती.

  • संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने तत्काळ तिहेरी तलाकशी संबंधी विधेयक मंजूर करुन घेण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी ते मंजूर होऊ दिले नाही. त्यासाठी त्यांनी सरकारवर घाईगडबडीत सर्वांच्या सहमतीशिवाय हे विधेयक मांडले असल्याचा आरोप केला.

  • आता पुन्हा अध्यादेश काढल्यानंतर यासंबंधीचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येईल. पुन्हा अध्यादेश काढल्यानंतर यावर तीव्र राजकारण सुरु झाले आहे. या अध्यादेशानुसार, तत्काळ तीन तलाकमध्ये एफआयआर तेव्हाच दाखल होऊ शकते जेव्हा पीडित पत्नी किंवा त्यांच्या रक्ताच्या एका नातेवाईकाने यासंबंधी तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तत्काळ तिहेरी तलाक हा अजामिनपात्र गुन्हा असेल. मात्र, आरोपीला मॅजिस्ट्रेट कोर्टातून जामीन मिळवता येऊ शकतो.

डिजीटल इंडिया! ९० दिवसांमध्ये मोदींच्या अॅपवरून विकल्या गेल्या ५ कोटींच्या वस्तू :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरून मागील तीन महिन्यांमध्ये ५ कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमी नमो अगेन म्हणजेच ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेअंतर्गत वेगवगेळ्या वस्तू या अॅपवरून विकल्या जात आहेत. यामध्ये अगदी टी-शर्टपासून पेनपर्यंत अनेक नमो मर्चंडाइजचा समावेश आहे.

  • एकीकडे तीन राज्यांमधील निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागलेला असताना दुसरीकडे ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेला नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद हा भाजपासाठी नक्कीच सकारात्मक आहे. ९० दिवसांमध्ये या अॅपवरून १५ लाख ७५ हजार वस्तू विकल्या गेल्या आहेत. जसजशी निवडणुक जवळ येईल तशी या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकताच

  • नमो अॅपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मागील महिन्यापासून पेटीएम आणि अॅमेझॉनसारख्या माध्यमातूनही ‘नमो’ ब्रॅण्डच्या वस्तू विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

  • भाजपाच्या काही खासदारांनी ‘नमो हुडी चॅलेंज’च्या नावाने नमो ब्रॅण्डचे हुडी घालून फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसारख्या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे नमो ब्रॅण्डच्या वस्तूंचा खप वाढल्याचे बोलले जात आहे. हिमाचल प्रदेशमधून भाजपाचे खासदार असलेल्या अनुराग ठाकूर आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना ‘नमो अगेन’ची टीशर्ट घालून ट्विटवर फोटो पोस्ट केले आहेत. ही नमो टी-शर्ट नमो अॅपवर ४९९ रुपयांना उपलब्ध आहेत. एकूण विक्री झालेल्या वस्तूंपैकी ५० टक्के टी-शर्टस आहेत.

पंतमध्ये जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकाची क्षमता :
  • कारकीर्दीतील सुरुवातीच्या काळातच असंख्य विक्रमांना गवसणी घालणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतवर सध्या क्रिकेटविश्वातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनीयर यांनीदेखील पंतची प्रशंसा करताना येणाऱ्या काळात पंत जगभरातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक बनू शकतो, असे भाकीत वर्तवले आहे. मात्र त्याचवेळी युवा वयातच त्याला डोक्यावर चढवू नका, असेही त्यांनी सांगितले.

  • भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दी लिजेंड्स क्लब’तर्फे मुंबईत आयोजित केलेल्या खास क्रार्यक्रमात इंजिनीयर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक यशाबद्दल म्हणाले की, ‘‘भारताने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणे नेहमीच आव्हानात्मक असते. परंतु कोहली व त्याच्या संघाने हा पराक्रम करून दाखवला आहे, त्यामुळे त्यांचे श्रेय हिरावून घेता येणार नाही. किंबहुना स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसले तरी त्यात भारताची काहीच चूक नसून कदाचित आपल्या गोलंदाजांनी त्यांच्यावरसुद्धा कुरघोडी केली असती.’’

  • ‘‘२१ वर्षीय पंत हा सध्या फारच युवा खेळाडू असून त्याची इतरांशी तुलना करणे अयोग्य ठरेल. आपण त्याला प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, मात्र त्याला अतिप्रोत्साहन दिल्यास त्याच्या कारकीर्दीला उतरती कळा लागेल. आजच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज मिळणे फार कठीण असून पंतकडे आपण विशेष लक्ष पुरवले पाहिजे.

  • त्याशिवाय कोणताही उत्तम यष्टीरक्षक प्रत्येक वेळी उडी मारून चेंडू पकडायला जात नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंत त्याच्याविरुद्ध दिशेने जाणारे चेंडू उडी मारून पकडायचा. त्यामुळे त्याने पायांचा अधिकाधिक वापर करावा. पंतच्या चुका सुधारण्यासाठी मी नक्की मदत करेन,’’ असे इंजिनीयर यांनी सांगितले.  दरम्यान, हार्दिक पंडय़ा व लोकेश राहुल यांच्या एका दूरदर्शन कार्यक्रमातील महिलांसंबंधी वादग्रस्त वक्तव्यावर इंजिनीयर यांनी भाष्य करणे टाळले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७८७: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

  • १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

  • १९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

  • १९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

  • १९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

  • १९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.

  • २०००: छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

  • २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

  • १८१५: कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए. मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८९१)

  • १८५८: हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)

  • १८५९: ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९२५)

  • १८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.

  • १९४४: झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.

  • १९५५: उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

  • १९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: २ जून १८४०)

  • १९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)

  • १९६६: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)

  • १९९७: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

  • २००८: मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३१)

  • २००८: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.