चालू घडामोडी - ११ जुलै २०१८

Date : 11 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बालभारतीत धड्यासाठी लेखकाला दरवर्षी अवघे २०० रुपये मानधन :
  • सांगली : 'बालभारती'कडून एका पाठासाठी नवोदित लेखकांना दरवर्षी अवघे दोनशे रुपये मिळतात. एका धड्यासाठी लेखकांना तुटपुंजं मानधन मिळत असल्याची बाब समोर आली आहे.

  • अलिकडच्या अभ्यासक्रमात काही नव्या दमाच्या साहित्यिकांना संधी मिळाली असून त्यांचे काही पाठ पुस्तकात घेतले गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील आमणापूरचे संदीप नाझरे हे त्यापैकीच एक. त्यांचा 'पण थोडा उशीर झाला' हा सैनिकाच्या जीवनावरील ह्रदयस्पर्शी पाठ बालभारतीमध्ये प्रकाशित झाला आहे.

  • धड्यासाठी मिळणारे वार्षिक मानधन हे फारच तुटपुंजे असल्याचे समोर आले आहे. नाझरे यांना नुकतंच बालभारती कडून दोनशे रुपयांचा चेक मिळाला.

  • एका बाजूला हा धडा शिकवणाऱ्या शिक्षकाचे दिवसाचे वेतन किमान एक हजार रुपये असताना तो धडा लिहिणाऱ्याला मात्र अवघ्या दोनशे रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. यावर सर्वच लेखक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

थायलंडमधील मुलांच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'मध्ये 'किर्लोस्कर'चं मोठं योगदान :
  • बँकॉक : थायलंडमधील गुहेमध्ये 24 जूनपासून अडकलेले 12 फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या कोचला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. या बचावकार्यात भारत सरकारनेही मोलाचं सहकार्य केलं. यासाठी महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीचे फ्लड पंप्स पाठवण्यात आले.

  • किर्लोस्करचे इंजिनिअर असलेले सांगलीतील मिरजचे प्रसाद कुलकर्णी हेदेखील आपल्या टीमसह थायलंडला बचावकार्यासाठी गेले होते.अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी गुहेतील पाण्याची पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे थायलंड सरकारने भारत सरकारला किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लड पंप्स पाठवण्याची विनंती केली.

  • भारत सरकार आणि केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख आणि मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहचताच या टीमने  कामास सुरुवात केली आणि फ्लड पंप्स सुरु केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली.

  • थायलंडमधील या बचावकार्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह जगभरातील अनेक देशांची मदत घेण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बचावकार्यानंतर आता या अडकलेल्या 12 मुलांसह त्यांच्या कोचला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

  • थायलंडमधील भारतीय दुतावासाने 2 जुलै रोजी या मुलांच्या मदतीसाठी आपले तंत्रज्ञ तयार आहेत, असं थायलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला कळवलं होतं. भारताचे थायलंडमधील राजदूत भगवंतसिंह बिश्नोई यांनी प्रकरणात विशेष लक्ष घालून मदतीची तयारी दर्शवली.

प्रणव मुखर्जींनंतर आता रतन टाटा संघाच्या मंचावर जाणार :
  • मुंबई : पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत एकाच मंचावर दिसतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं आहे. याअगोदर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या मंचावर गेल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता.

  • ‘नाना पालकर स्मृती समितीने 24 ऑगस्टला आयोजित केलेल्या कार्यक्रमात रतन टाटा आणि मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. ही समिती टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर पीडित रुग्णांना मदत करते,’ अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.

  • ‘नाना पालकर स्मृती समिती करत असलेल्या कामाबद्दल रतन टाटा यांना माहिती आहे,’असंही संघाचा पदाधिकारी म्हणाला.

  • ‘रतन टाटा जर या कार्यक्रमाला जाणार असतील तर तो त्यांचा वैयक्तिय विषय आहे,’ असं म्हणत टाटा ट्रस्टच्या प्रवक्त्याने या कार्यक्रमाबद्दल बोलण्यास नकार दिला.

  • ‘आमच्या समितीचे संस्थापक नाना पालकर यांचे शताब्दी वर्ष आहे, तसंच आमच्या संघटनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आम्ही रतन टाटांशी संपर्क केला आहे. पण त्यांनी अजूनही आमचं निमंत्रण स्वीकारलं नाही आणि नकारही दिलेला नाही. यामुळे आम्ही आशावादी आहोत,’ असं नाना पालकर स्मृती समितीच्या एका सचिवाने सांगितलं आहे.

‘मायव्होट टुडे’शी संबंधित २८ ट्विटर हँडल बंद :
  • नवी दिल्ली : समाजमाध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या बनावट  बातम्या व अफवांमुळे होणाऱ्या हिंसाचारामुळे आता ट्विटरनेही बोट, ट्रोल्स व बनावट खात्यावर कारवाई केली आहे. त्याशिवाय मायव्होट टुडे हे जनमत चाचणीच्या उपयोजनाचा वापर करणारी एकूण २८ ट्विटर हँडल बंद करण्यात आली आहेत.

  • या अ‍ॅपच्या मदतीने कुठल्याही प्रश्नावर लोकांची मते घेतली जात होती. तुमच्या मते खालीलपैकी कुणाला गप्प करणे आवश्यक आहे, असा एक प्रश्न यात देण्यात आला होता त्यात मुख्यमंत्री, विरोधी राजकारणी, पत्रकार असे काही पर्यायही दिले होते.

  • ट्विटरच्या प्रवक्तयाने सांगितले की, धमकावणे व कुणाचा छळ करणे, कुणाला गप्प करणे, कुणाला भीती दाखवून गप्प बसवणे असे प्रकार यापुढे चालणार नाहीत. त्यामुळे एक विशिष्ट खाते आम्ही बंद केले आहे. मायव्होट टुडे हँडलवर आम्ही शोध घेतला असता त्यात बरेच आक्षेपार्ह आढळून आले.

  • मायव्होट टुडेच्या इतर २७ हँडलवरही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या त्यामुळे ती सर्व हँडल्स बंद करण्यात आली आहेत. मायव्होट टुडेवर आधारित एका खात्याने अनेक नियमांचे उल्लंघन केले होते. मायव्होट टुडे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे जनमत चाचणी उपयोजन आहे त्यात ऑनलाईन मतदान घेतले जाते. ते अ‍ॅपशन डिजिटल टेक्नॉलॉजीज प्रा. लि. बंगळुरू व अ‍ॅपशन डिजिटल इनकार्पोरेशन – पालो अस्टो, कॅलिफोर्निया संस्थांनी  तयार केले आहे.

पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्रांत काश्मीर प्रश्न उपस्थित :
  • संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात भारतावर ताशेरे ओढणाऱ्या काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र अहवालाचा संदर्भ दिल्यानंतर भारताने त्याच्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, तो अहवाल मानवी हक्क मंडळाच्या प्रतिनिधींनी विचारात घेण्याच्याही दर्जाचा नाही असे म्हटले आहे.

  • पाकिस्तानने काल पुन्हा काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही आठवडय़ांत पाकिस्तानने तिसऱ्यांदा हा प्रयत्न केला असून त्याला वेळोवेळी भारताने चपराक दिली आहे.

  • पाकिस्तानने काल केलेल्या प्रयत्नाचा समाचार घेताना भारताने म्हटले आहे, की पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा गैरवापर करीत आहे. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत चर्चा करण्याचा प्रयत्न हा गैर आहे. 

  • पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी १४ जूनच्या काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र मानवी हक्क उच्चायुक्तांनी दिलेल्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मानवी हक्क आयुक्त झैद राद अल हुसेन यांनी सादर केलेला अहवाल केंद्रस्थानी घेऊन पाकिस्तानने सुरक्षा मंडळात बालके व सशस्त्र संघर्ष यात त्यातील संदर्भ घुसडण्याचा प्रयत्न केला.

  • त्यावर भारताचे उप स्थायी प्रतिनिधी तन्मय लाल यांनी पाकिस्तानवर चौफेर टीका करताना सांगितले, की जम्मू काश्मीरमधील स्थितीबाबतचा तो कथित अहवाल हा पक्षपाती असून कुठलीही शहानिशा न केलेल्या माहितीवर तो आधारित आहे. या अहवालाची मानवी हक्क मंडळाच्या सदस्यांनी दखल घेण्याच्या दर्जाचाही तो नाही. झैद राद यांचा हा मानवी हक्क अहवाल भारताने आधीच फेटाळला आहे. काश्मीरमधील परिस्थितीची मानवी हक्क मंडळाच्या मार्फत स्वतंत्र, आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची गरज आहे असे त्या अहवालात म्हटले आहे.

दिनविशेष :
  • जागतिक लोकसंख्या दिन

महत्वाच्या घटना 

  • १६५९: अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.

  • १८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.

  • १९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.

  • १९१९: नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.

  • १९७९: अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

  • १९९४: पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

  • २००१: आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.

जन्म 

  • १८८९: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा)

  • १८९१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १९६१)

  • १९२१: दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

  • १९५३: केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.

  • १९५६: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक अमिताव घोष यांचा जन्म.

  • १९६७: भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक झुम्पा लाहिरी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९९४: परमवीर चक्र सन्मानीत बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन.

  • २००३: कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

  • २००९: गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.