चालू घडामोडी - ११ जून २०१८

Date : 11 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सिंगापुरात आज बहुप्रतीक्षित ‘किम-ट्रम्प’ भेट :
  • सिंगापूर : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहे. या भेटीसाठी उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. उत्तर कोरियाची अण्वस्त्रसिद्धता या भेटीच्या केंद्रभागी असेल.

  • गेल्या काही महिन्यांपासून अण्वस्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने चालवली आहे. त्यामुळे किम जोंगला संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. तसेच, अमेरिकेने उत्तर कोरियाला कारवाईची धमकीही दिली होती.

  • काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे.

  • किम जोंग उन काही वेळापूर्वीच एअर चायना 747 ने सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी ते बीजिंगमध्ये गेले आणि तिथून ते विमान बदलून सिंगापूरसाठी रवाना झाले. दरम्यान किम जोंग आपल्या ताफ्यासह सिंगापूरला गेले आहेत. त्यांच्या ताफ्यात 20 हून अधिक गाड्या असल्याची माहिती आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार - सूत्र :
  • मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 4 जुलैला नागपुरात सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आणि शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विस्ताराचा मुहूर्त ठरणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

  • पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कृषी व फलोत्पादन खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी परदेशी जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांना सोपवली असून, लवकरच अधिसूचना काढून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

  • भाजप अध्यक्ष अमित शहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. अमित शाहांनी या विस्ताराला हिरवा कंदील दिला, त्यानंतर हालचालींना वेग आला.

  • दरम्यान, रखडलेल्या महामंडळ नियुक्त्या आणि वरिष्ठ आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मार्गही मोकळा झाला आहे.

पाचगणी आणि वेंगुर्ल्याला स्वच्छतेसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार :
  • नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पाचगणी आणि वेंगुर्ला या शहरांनी स्वच्छतेसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकावला आहे. राज्यातील या दोन शहरांनी स्वच्छतेसाठी परिश्रम घेत विशेष कामगिरीच्या जोरावर सीएसई मानांकनामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यामुळे देशपातळीवर या गावांचा नावलौकिक वाढला आहे.

  • देशातील दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहर अव्वल ठरलं आहे. तर पाचगणीने फोर लीव्हज मानांकनासह दुसरा क्रमांक पटकावला आहे. वेंगुर्ल्याला फाईव्ह लीव्हज पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

  • सेंटर फॉर सायन्स या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने नुकतीच 2017-18 सालासाठीची मानांकनं घोषित केली. महाराष्ट्रातील या दोनही शहरांना अव्वल स्थान दिलं आहे. ‘सिटीज् दॅट सेग्रिगेट’ या मोहिमेअंतर्गत देशभरातील घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या 26 शहरांपैकी 28 शहरांचे मूल्यांकन यावेळी केलं गेलंय.

थेट भरतीने केंद्रात नेमणार १० सहसचिव :
  • नवी दिल्ली  - सनदी अधिकाऱ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) करण्याच्या प्रचलित पद्धतीला छेद देत मोदी सरकारने केंद्रातील १० महत्त्वाच्या खात्यांमध्ये सहसचिवांच्या नेमणुका ‘लॅटरल एन्ट्री’ पद्धतीने थेट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना सरकारने संबंधित विषयातील ज्ञान आणि अनुभव हा एकमेव निकष डोळ््यापुढे ठेवत ही पदे खासगी उद्योगांतील व्यक्तींसाठीही खुली केली आहेत.

  • या थेट भरती योजनेच्या नियम व अटींचा तपशील देणारी अधिसूचना कार्मिक विभागाने जारी केली आहे. ज्यांना राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देण्याची इच्छा आहे अशा बुद्धिमान व समर्पित व्यक्तींसाठी या नेमणुकांचे दरवाजे खुले आहेत, असे त्यात म्हटले आहे. प्रशासनात नवे विचार व दृष्टिकोन आणणे, हा यामागचा हेतू आहे.

  • महसूल, वित्तीय सेवा, आर्थिक बाबी, कृषी, रस्ते वाहतूक व महामार्ग, जलवाहतूक, पर्यावरण आणि वने, नवीन आणि अक्षय ऊर्जासाधने, नागरी विमान वाहतूक आणि वाणिज्य या १० विभाग/खात्यांमधील सहसचिवांची पदे या पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

  • निवडलेल्या उमेदवारांची संबंधित खात्यात सहसचिव म्हणून कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाईल. सुरुवातीस हे कंत्राट तीन वर्षांसाठी असेल व ते पाच वर्षांपर्यंत वाढविले जाऊ शकेल. या सहसचिवांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा १,४४,२०० ते २,१८,२०० या ‘पे मॅट्रिक्स’मध्ये पगार मिळेल.

  • याखेरीज सरकारमधील समकक्ष पदावरील अधिकाºयाला मिळणारे भत्ते व अन्य सुविधाही त्यांना मिळतील. ‘शॉर्टलिस्ट’ केलेल्या उमेदवाराची निवड समितीकडून व्यक्तिगत मुलाखतीनंतर केली जाईल.

देशात प्रणव गोयल, मुंबई विभागात ऋषी अगरवाल प्रथम :
  • आयआयटी आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून, चंदिगड येथील प्रणव गोयल हा देशात पहिला आला, तर मुंबई विभागात ऋषी अगरवाल याने बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के गुण मिळवून प्रवेशपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र जवळपास निम्म्याने कमी झाली आहे.

  • आयआयटी आणि इतर काही राष्ट्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स घेण्यात येते. देशातून पहिल्या आलेल्या प्रणव गोयल याला ३६० पैकी ३३७ गुण आहेत. ऋषी अगरवाल हा राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आठव्या स्थानावर आहे. देशात मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारख ही ३१८ गुण मिळवून प्रथम आली असून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ती सहाव्या स्थानावर आहे.

  • मुंबई विभागात दुसऱ्या स्थानावर अभिनव कुमार (राष्ट्रीय यादीतील क्रमांक १२), सौम्या गोयल तिसऱ्या स्थानावर (राष्ट्रीय यादीतील क्रमांक १३) आहे. मुंबई विभागात मुलींमध्ये मेघना मिसुला हिने प्रथम क्रमांक (राष्ट्रीय यादीतील क्रमांक ८०) पटकावला आहे. देशभरातील २३ आयआयटीमधील ११ हजार २७९ जागांवरील प्रवेश या निकालाच्या माध्यमातून होणार आहेत. देशभरात २० मे रोजी ही परीक्षा झाली होती. यंदा जेईई मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेले साधारण १ लाख ५५ हजार १५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

  • जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत ३५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरवण्याचा निर्णय गेल्या वर्षीपासून घेण्यात आला. त्यानुसार सामाईक प्रवेश यादीत ३६० पैकी १२६ गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरले. यंदा या निकषानुसार परीक्षेला बसलेल्या दीड लाख विद्यार्थ्यांपैकी १८ हजार १३८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा ३५ टक्के गुण मिळवून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून गेल्या वर्षी साधारण ३० हजार विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.

महिला आशिया चषक टी-२० – भारतीय महिलांचं स्वप्न भंगलं, अंतिम फेरीत बांगलादेश ३ गडी राखून विजयी :
  • मलेशियात सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषकात आज बांगलादेशच्या महिला संघाने इतिहासाची नोंद केली. सहा वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघावर बांगलादेशने मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

  • महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशने याच स्पर्धेत भारताला साखळी फेरीतही पराभवाचा धक्का दिला होता. भारतीय महिलांचं गचाळ क्षेत्ररक्षण आजच्या सामन्यात बांगलादेशच्या पथ्यावर पडलं. बांगलादेशकडून रुमाना अहमदने अष्टपैलू खेळ करत सामनावीराचा किताब पटकावला.

  • बांगलादेशने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मात्र भारताच्या पहिल्या फळीतल्या फलंदाज संघाला मजबूत सुरुवात करुन देऊ शकल्या नाहीत. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्यामुळे भारतीय डावात मोठी भागीदारी रचलेली पहायला मिळाली नाही. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आपलं अर्धशतक साजरं केलं. हरमनप्रीतच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावरच भारताने २० षटकांमध्ये ११२ धावांचा पल्ला गाठला.

  • भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना, बांगलादेशी महिलांनीही ठराविक अंतराने विकेट फेकायला सुरुवात केली. मात्र यादरम्यान झालेल्या छोटेखानी भागीदाऱ्यांमुळे बांगलादेशच्या संघाने सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. अखेर भारताने दिलेलं आव्हान ३ गडी राखून पूर्ण करत बांगलादेशने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

  • १९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

  • १९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.

  • १९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

  • १९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर  कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.

  • २००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

जन्म 

  • १८१५: भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८७९)

  • १८९४: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९५२)

  • १८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

  • १९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.

  • १९८२: टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०)

  • १९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)

  • १९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)

  • १९८३: भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९४)

  • १९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)

  • १९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर१८६४)

  • १९९७: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)

  • २०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.