चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जून २०१९

Date : 11 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्र विरुद्ध बंगाल संघर्ष शिगेला :
  • पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील स्थितीची माहिती दिली. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १२ जण ठार झाले आहेत.

  • लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच त्रिपाठी यांनी मोदी व शहा यांची भेट घेतली. आपण राज्यातील स्थितीची माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली, मात्र सविस्तर तपशील आपण सांगू शकत नाही, असे त्रिपाठी यांनी वार्ताहरांना सांगितले.

  • राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता त्रिपाठी म्हणाले की, भेटीच्या वेळी याबाबत चर्चा झाली नाही. राज्यात निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्या पाश्र्वभूमीवर त्रिपाठी यांनी मोदी व शहा यांची भेट घेतली आहे.

वर्षाला १० लाखांचे रोख व्यवहार केल्यास पडणार कराचा बोजा :
  • केंद्र सरकार रोख व्यवहारांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. वर्षांला 10 लाखांची रोख रक्कम काढल्यास त्यावर कर आकारण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देण्याबरोबरच नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • दरम्यान, मोठ्या रकमांच्या व्यवहारासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यावर विचार सुरू आहे. तसेच या माध्यमातून मोठ्या रकमांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे तसेच कर परताव्याचा तपास करणे सोपे होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सध्या 50 हजारांहून अधिकची रक्कम बँकांमध्ये जमा करायची असल्यास पॅनकार्ड बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे 10 लाखांहून अधिक रक्कम रोख स्वरूपात काढण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येणार आहे.

  • यूआयडी ऑथेंटिकेशन आणि ओटीपीमुळे आधार क्रमांकाचा दुरूपयोगही टाळता येणार आहे. मनरेगाचा लाभ घेणाऱ्यांसाठी आधार कार्ड ऑथेंटिकेशनची आवश्यकता आहे. परंतु पाच लाखांची रक्कम काढणाऱ्यांसाठी ही अट नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

  • येत्या पाच जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. परंतु सध्या 10 लाखांपर्यंतच्या रोख रकमेवर कर भरावा लागेल अथवा नाही यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. दरम्यान, मध्यम वर्गीय कुटुंबांवर आणि गरीबांवर कोणताही ताण येऊ नये यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यापूर्वी आंध्र प्रदेशात तत्कालिन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. तसेच 50 हजारांवरील रोख रकमेवर कर लावण्याचेही या बैठकीत सुचवण्यात आले होते. त्यापूर्वी यूपीए सरकारच्या काळातही कॅश ट्रान्सफर टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याला विरोध झाल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला होता.

६ चेंडूंवर ६ षटकार खाणाऱ्या ब्रॉडने युवीला दिल्या ‘अशा’ शुभेच्छा :
  • टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ चेंडूंवर ६ षटकार लगावणारा युवराज सिंग याने सोमवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याने अलविदा म्हंटले. मात्र देशांतर्गत टी २० लीग स्पर्धांमध्ये तो खेळतच राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले. निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, असे युवराजने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

  • यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया आल्या. युवराजने लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात केलेली खेळी लोकांच्या अजूनही लक्षात आहे. पण त्याला ‘सिक्सर किंग’ अशी उपाधी मिळण्यासाठी त्याने केलेली टी २० विश्वचषक स्पर्धेतील खेळी अजूनही त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. पहिल्यावहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत युवराजने हा कारनामा केला होता.

  • इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज मैदानावर आला, तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफ याने त्याला डिवचले, त्यानंतर पुढच्याच षटकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या षटकात ‘त्या’ डिवचण्याचा हिशेब चुकता केला आणि ६ चेंडूंवर ६ षटकार लगावले. ‘त्या’ स्टुअर्ट ब्रॉडनेही युवराजला खास ट्विट करून शुभेच्छा दिल्या.

  • युवराजने त्या सामन्यात १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ती खेळी त्यावेळी विक्रमी ठरली होती. १२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा सनथ जयसूर्या याचा टी २० तील विक्रम होता, त्या विक्रमाशी युवराजने बरोबरी केली होती. त्या सामान्यामुळे भारताला एक विजयी सूर गवसला होता आणि भारताने तो विश्वचषक आपल्या नावे केला होता.

नव्याने द्यायचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश निव्वळ गुणवत्तेवरच द्यावे - सुप्रिम कोर्ट :
  • मुंबई : राज्य सरकारने लागू केलेले आर्थिक दुर्बलांसाठीचे आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांचे राज्य कोट्यातील प्रवेश नव्याने समुपदेशन करून देण्याच्या आधीच्या आदेशात कोणताही फेरबदल करण्यास किंवा त्याविषयी कोणतेही अधिक स्पष्टीकरण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. आर्थिक दुर्बलांचा कोटा वगळल्यानंतर राहिलेले सर्व प्रवेश कोणत्याही प्रवर्गातील कोणाही उमेदवारास न वगळता निव्वळ गुणवत्तेवर दिले जायला हवेत, याचा न्यायालयाने पुनरुच्चार केला. सरकारने रविवारपासून नव्याने समुपदेशनाच्या फेऱ्या सुरू केल्या असून सर्व प्रवेश प्रक्रिया १४ जून या वाढीव मुदतीत पूर्ण करायची आहे.

  • या प्रवेशांतून आर्थिक दुर्बलांचा कोटा वगळून नव्याने प्रवेश देण्याचा आदेश न्यायालयाने ४ जून रोजी दिला होता. त्या आदेशात फेरबदल करावेत किंवा ते अधिक सुस्पष्ट करावेत यासाठी काही प्रवेशेच्छु उमेदवारांनी एकूण तीन अर्ज केले होते.

  • त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. अजय रस्तोगी यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नमूद केले की, आमचा ४ जूनचा आदेश सुस्पष्ट आहे व ज्याचा खुलासा वा स्पष्टीकरण करावे अशी कोणतीही संदिग्धता त्यात नाही. तिन्ही अर्जांवर ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी युक्तिवाद केला.

  • पहिल्या अर्जाच्या संदर्भात त्यांचे म्हणणे होते की, यंदाच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही न्यायालयाने कोणतेही नवे प्रकरण ऐकू नये, असे ४ जूनच्या आदेशात म्हटले आहे. पण याच आर्थिक दुर्बलांच्या कोट्याला स्वतंत्रपणे आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आदेशाचा चुकीचा अर्थ लावून त्या याचिकेच्या सुनावणीस खीळ बसू शकेल. तरी तसा खुलासा करावा. पण असे करण्याची काही गरज नाही, असे खंडपीठाने म्हटले. आता नव्याने समुपदेशन होत असल्याने उमेदवारांना त्यांनी आधी दिलेले पसंतीचे पर्यायही बदलता येतील, अशी दुरुस्ती मूळ आदेशात करावी, अशी विनंती दुसºया अर्जाद्वारे केली गेली होती. परंतु खंडपीठाने ही विनंतीही अमान्य केली.

मोदी सरकारने एकाच दिवसात बडतर्फ केले ११ भ्रष्ट अधिकारी :
  • नवी दिल्ली : भ्रष्टाचार आणि व्यावसायिक गैरवर्तणूकीचा आरोप असलेल्या ११ प्राप्तिकर अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बडतर्फ केले आहे. प्राप्तिकर विभागातील शक्तिशाली अधिकाऱ्यांवर देशात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचे मानले जात आहे. कारवाई झालेल्या अधिकाऱ्यात प्राप्तिकर विभागातील मुख्य आयुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

  • बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यात १९८५ च्या आयआरएस तुकडीचे अधिकारी अशोक अग्रवाल यांचा समावेश आहे. ते ईडीमध्ये कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल होते. नोएडा येथे अपील आयुक्त असलेले एस. के. श्रीवास्तव (आयआरएस १९८९) यांना आयुक्त दर्जाच्या दोन महिला आयआरएस अधिकाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले आहे. होमी राजवंश (आयआरएस १९८५) यांच्यावर ३.१७ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे.

  • यातील काही मालमत्ता त्यांच्या स्वत:च्या तर काही कुटुंबीयांच्या नावावर आहे. कारवाई झालेले बी. बी. राजेंद्र प्रसाद यांना सीबीआयने लाचेच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांच्याकडून लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली होती. २ मे २0१७ रोजी त्यांना निलंबित करण्यात आले होते. दक्षता आयोगाने त्यांच्याविरुद्ध २.७३ कोटी रुपये जमविल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

  • मुंबईत प्राप्तिकर आयुक्त (सीआयटी) असलेले अजोयकुमार सिंग यांना सीबीआयने २00७ मध्ये अटक केली होती. २00९ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले. इतके होऊनही ते गेल्या दहा वर्षांपासून सेवेत कायम होते. आता त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.

  • बी. आरुलप्पा (सीआयटी) हे वरिष्ठ अधिकारी म्हणून अकार्यक्षम ठरले होते. ते अनेक खटल्यांत अपयशी ठरल्यामुळे सरकारला १६.६८ कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. त्यांनाही सरकारने घरी पाठवले आहे. कारवाई झालेले आलोककुमार मित्रा हे भ्रष्टाचार आणि खंडणीच्या अनेक प्रकरणांत सहभागी होते. त्यांनी दिलेले अनेक चुकीचे निर्णय अपील प्राधिकरणांनी फिरविले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

  • १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.

  • १९०१: न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

  • १९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

  • १९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

  • १९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.

  • १९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

  • १९७२: दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.

  • १९९७: सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

  • १९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर  कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.

  • २००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

जन्म 

  • १८१५: भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८७९)

  • १८९४: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९५२)

  • १८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

  • १९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.

  • १९८२: टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०)

  • १९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)

  • १९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)

  • १९८३: भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९४)

  • १९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)

  • १९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)

  • १९९७: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)

  • २०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.