चालू घडामोडी - ११ मार्च २०१९

Updated On : Mar 11, 2019 | Category : Current Affairsलोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात 'या' दिवसांत मतदान होणार :
 • नवी दिल्ली : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवारी 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातले मतदान 

 • 11 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार

 • 18 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान होणार

 • 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान होणार

 • 29 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान होणार

निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

 • पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ)20 राज्यं

 • दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ )13 राज्यं

 • तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ )14 राज्यं

 • चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ)9 राज्यं

 • पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ)7 राज्यं

 • सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ)7 राज्यं

 • सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ )8 राज्यं

 • मतमोजणी : 23 मे 2019

ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे महत्त्वपूर्ण निर्णय :
 • नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (ईव्हीएम) विश्वासार्हता वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल) मशीन्सचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच ईव्हीम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध करणे, मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

 • व्हीव्हीपॅट मशीन्सचा सार्वत्रिक वापर करण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएम हॅक होऊ नये, मशीनसोबत छेडछाड होऊ नये, ईव्हीएम मशीनवर निवडणूक आयोगाचा संपूर्ण ताबा रहावा यासाठी ईव्हीएम मशीन्सवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. आगामी मतदानावेळी ईव्हीएममध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे, सर्व इव्हीएम मशीन्सवर उमेदवारांचे छायाचित्रही पाहायला मिळणार आहे.

 • 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं देशात बहुमताचं सरकार निवडून आलं. त्यानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुका भाजपने सहज जिंकल्या. त्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आरोप होऊ लागले की, भाजपने ईव्हीएम मशीन हॅक केले आहेत. विरोधक सातत्याने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करत आहेत. त्यानंतर ईव्हीएमची विश्वासार्हता वाढावी, ईव्हीएमशी कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावलं उचलली आहेत.

 • दरम्यान, आज (रविवार)निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आजपासून देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवारी 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीची तारीख जाहीर होताच नरेंद्र मोदी म्हणतात :
 • नवी दिल्ली : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवारी 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडे पाठिंबा मागितला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

 • मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "सबका साथ, सबका विकास या मुल्यांतर्गत काम करणाऱ्या एनडीएला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. गेल्या 70 वर्षांपासून देशवासियांचा ज्या गरचा पूर्ण केल्या नव्हत्या, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांपासून कामे करतोय. आता वेळ आली आहे, या देशाला शक्तीशाली, समृद्ध आणि सुरक्षित करण्याची गरज आहे." नरेंद्र मोदींनी ट्वीट करताना फिर एक बार मोदी सरकार (#PhirEkBaarModiSarkar)असा हॅशटॅग वापरला आहे.

 • मोदींनी अजून एक ट्वीट करुन एनडीए सरकारने काय कामं केली, त्याबाबत माहिती दिली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "50 कोटी भारतीयांना चांगले आरोग्य दिले. असंघटित क्षेत्रातील 42 कोटी लोकांना ओल्ड एज पेन्शनची सुविधा दिली. किसान सहाय्यता निधीअंदर्गत 12 कोटी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले."

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरुन माहिती :
 • अहमदाबाद : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या 12 मार्चला प्रवेश करतील. हार्दिक पटेलने स्वत: ट्विटरवरुन या बद्दलची माहिती दिली.

 • सव्वा कोटी भारतीयांसाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं हार्दिकने सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.

 • पंतप्रधान मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. म्हणूनचं हा निर्णय घेण्यात आला. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती.

 • जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.

 • दरम्यान, 2015 मध्ये हार्दिक पटेल जेव्हा पाटीदार आंदोलन करत होता. त्यावेळी लोक त्याच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेलने आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. पण कोणत्या पक्षाच्या वतीने उभारणार हे त्यांनी सांगितले नव्हते.

चंद्राच्या  प्रकाशित बाजूवर पाण्याचे रेणू :
 • नासाच्या ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर (एलआरओ) या अवकाशयानाच्या मदतीने वैज्ञानिकांनी चंद्रावर प्रकाशित भागात पाण्याचे रेणू शोधले आहेत. आगामी चांद्र मोहिमांसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

 • ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर या अवकाशयानावर लावलेल्या लायमन अल्फा मॅपिंग प्रोजेक्ट या उपकरणाने चंद्रावरील पृष्ठभागावरील पाण्याच्या कणांचा थर टिपला असून तेथे दिवसाही पाण्याचे अस्तित्व आहे असा त्याचा अर्थ असल्याचे ‘जिओफिजिकल रीसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

 • गेल्या दशकापर्यंत वैज्ञानिक असे गृहीत धरून चालले होते,की चंद्र हा कोरडा आहे व तेथील पाणी प्रकाश असलेल्या भागात नसून अंधाऱ्या भागातील विवरात विशेष करून तेथील ध्रुवीय  प्रदेशात आहे. मात्र, अलीकडेच नासाच्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे प्रकाश आहे तेथे पाण्याचे थर शोधून काढले आहेत.

 • पाण्याचे हे रेणू तेथील मातीला चिकटलेले दिसून आले. चंद्रावरचा हा भाग जसा तापत जातो तसे हे पाणी वरच्या भागातून  खाली येते. चंद्रावरील जलचक्राचे आकलन त्यातून शक्य झाले असून आगामी मोहिमात मानवासाठी तेथील पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो, असे प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिटय़ूट या संस्थेचे वैज्ञानिक अमंदा हेंड्रिक्स यांनी म्हटले आहे.

 • चंद्रावरील पाणी हे इंधन तयार करण्यासाठी किंवा प्रारणांपासून बचाव करताना औष्णिक व्यवस्थापनासाठीही वापरले जाऊ शकले. पृथ्वीवरून चंद्रावर अनेक घटक पाठवावे लागतात, त्यांची संख्या यामुळ कमी होऊ शकते. त्यामुळे आगामी चांद्र मोहिमा किफायतशीर होतील असे हेंड्रिक्स यांचे म्हणणे आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

 • १८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

 • १९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

 • १९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.

 • १९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

 • २००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

 • २००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

जन्म 

 • १८७३: युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९३३)

 • १९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

 • १९१६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९५)

मृत्यू 

 • १६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. (जन्म: १४ मे १६५७)

 • १९५५: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

 • १९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.

 • १९६५: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

 • २००६: सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १९४१)

टिप्पणी करा (Comment Below)