चालू घडामोडी - ११ मे २०१८

Date : 11 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक; आठवीच्या पुस्तकात तोडले तारे :
  • राजस्थानमधील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये लोकमान्य टिळक यांचा अपमान केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’ असल्याचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. या प्रकारावर सर्वत्र संताप व्यक्त असून अशा महान व्यक्तींविषयी अशा शब्दाचा वापर कसा काय केला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख आहे. ‘अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. ‘टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात.

  • ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे.  या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला आहे.

  • राजस्थानमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते इंग्रजी रेफरन्स बुकमध्ये अनेक ठिकाणी शब्दांची निवड चुकली आहे. पण टिळकांविषयी अशा शब्दाचा वापर असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना दिले जावे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

देशात सर्वाधीक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्या 'या' व्यक्तीची कामगिरी तुम्हाला माहिती आहे का :
  • गंगटोक- भारतातील घटकराज्याचे सर्वाधीक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा बहुमान पवनकुमार चामलिंग यांनी मिळवला आहे. ते सिक्किम राज्याचे गेली 23 वर्षे 5 महिने इतका प्रदीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत. 16 मे 1975 साली सिक्किमचा भारतात 22वे राज्य म्हणून समावेश झाला. स्वच्छता, गरिबी निर्मूलन, सेंद्रिय शेती, महिला सबलीकरण अशा विविध आघाड्यांवर सिक्किमने चमकदार कामगिरी करुन दाखविली आहे.

  • 29 एप्रिल रोजी त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला. त्या आधी मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहाण्याचा विक्रम ज्योती बसू यांच्या नावावर होता. चामलिंग यांनी सलग पाच निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता.

  • सिक्किम राज्याच्या गेल्या 43 वर्षांमध्ये 23 वर्षे एकट्या चामलिंग यांनीच मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. स्थिर सरकारमुळे त्यांनी राज्यात प्रगती साधत विविध विकासकामांना पूर्णत्त्वास नेले आहे. सिक्किमची लोकसंख्या केवळ 6 लाख इतकी असून लवकरच या राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन होत असून त्याबरोबर 44 किमीचा रेल्वेमार्गही येत आहे. उघड्यावर शौच करण्याची प्रथा बंद करणारे सिक्किम हे पहिले राज्य बनले.

  • 2008 सालीच ही समस्या सिक्किमने मोडित काढली. 2016च्या एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार सिक्किममध्ये 98.2 टक्के घरांमध्ये शौचालये असून सर्व नागरिक बंद शौचालयांचा वापर करतात. त्याचप्रमाणे सिक्किम सरकारने पूर्ण स्वच्छता मोहीम 2003 सालीच सुरु केली होती. शौचालयांची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, लोकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचे धडे देणे, पिण्याच्या पाण्याच्या उत्तम सोयी अशा विविध योजना त्यामध्ये होत्या.

लोकेश चंद्र यांनी पदभार स्वीकारला :
  • नवी मुंबई : सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या पदाची सूत्रे चंद्र यांना सुपूर्द केली.

  • गेल्या आठवड्यात भूषण गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर गुंतवणूक आणि राजशिष्टाचार विभागाचे सचिव लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार चंद्र यांनी गुरुवारी सिडकोच्या मुंबईतील निर्मल कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर उपस्थित होते.

  • दरम्यान, सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर दुपारच्या नंतर लोकेश चंद्र यांनी सीबीडी येथील सिडको भवनमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.

  • लोकेश चंद्र हे १९९३ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे असून त्यांनी एम.टेक व बी.ई. सिव्हिल या पदवी संपादित केल्या आहेत. यापूर्वी त्यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

  • तसेच केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक, गृहमंत्रालयात खासगी सचिव व केंद्रीय पोलाद मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

९२ वर्षीय महाथीर मोहम्मद यांची मलेशियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड :
  • क्वालालंपूर- महाथिर महंमद यांना मलेशियाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे. ९२ वर्षांचे महाथिर पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत. जगातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले  सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ते ओळखले जातील. 

  • महाथिर यांनी २२२ पैकी ११३ जागांवर विजय मिळवला आहे. यापुर्वी त्यांनी २२ वर्षे मलेशियाची सत्ता सांभाळली होती. मात्र २००३ साली त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्यावर त्यांना पायउतार व्हावे लागले होते.

  • मलेशियाचे मावळते पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. १ एमडीबी योजनेतून त्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नजीब यांच्या बँरिसन नँशनल आघाडीला केवळ ७९ जागा मिळाल्या आहेत. ही आघाडी मलेशियात प्रदीर्घकाळ सत्तेत होती. महाथिर यांच्या विजयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सत्तेत येण्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेल्या अन्वर इब्राहिम यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

  • सत्तेत पुन्हा येत असल्याचे स्पष्ट होताच महाथिर यांनी पत्रकार परिषद घेऊन, होय मी जिवंत आहे असे सांगत आपले नव्या सरकारबाबतचे मत मांडले. नजीब यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करु, आपण सूड घेणार नाही मात्र कायद्याचे राज्य स्थापन होण्यासाठी प्रयत्न करु असेही ते म्हणाले. 

स्टेशनवरील मोफत वायफाय वापरत हमालाने 'केपीएससी' क्रॅक केली :
  • एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम जंक्शनवर कुलीचं काम करणाऱ्या के श्रीनाथने राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच केपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची कमाल केली आहे. महत्त्वाचं म्हणजे फावल्या वेळात स्टेशनवरील फ्री वायफाय वापरुन त्याने हे यश मिळवलं आहे.

  • केरळच्या एर्नाकुलम जंक्शनवर के श्रीनाथ हा तरुण कुली म्हणजेच हमालाचं काम करतो. स्टेशनवरील फ्री वायफायच्या माध्यमातून त्याने इंटरनेटवरुन फ्री प्रश्नपत्रिका सोडवून, तसंच तयारीचे व्हिडीओ पाहून केपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला.

  • गुगल आणि वायफायमुळे माझं आयुष्य बदललं आहे. मी इंटरनेटवरुन फ्री प्रश्नपत्रिका डाऊनलोड केल्या आणि तयारीसाठी अनेक व्हिडीओही पाहिले. या साऱ्यासाठी स्टेशनवरील मोफत इंटरनेटचा मला खूप फायदा झाला, असं श्रीनाथने सांगितलं.

  • मोफत इंटरनेट मिळालं की त्याचा कसाही वापर केला जातो. मात्र एर्नाकुलममधील के श्रीनाथचा आदर्श तरुणांनी घेतला, तर त्यामुळे नक्कीच सकारात्मक फरक पडेल.

१२३ विद्यार्थी देणार आयडॉलमधून परीक्षा :
  • मुंबई : उपस्थिती कमी असल्यामुळे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता आयडॉलमधून परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आयडॉलमध्ये प्रवेशप्रक्रिया झाली असून, १२३ विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आहे. आयडॉलमध्ये प्रवेश नोंदवल्यानंतर या विद्यार्थ्यांना आयडॉकडून अभ्यास साहित्य पुरवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

  • कमी हजेरी असल्याने काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करत या विद्यार्थ्यांना कला व वाणिज्य शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या उन्हाळी परीक्षांना बसण्याची परवानगी नाकारली होती. याबाबत काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुंबई विद्यापीठाकडे तक्रारही नोंदवली. कारवाई नियमाप्रमाणे झाल्याने संबंधित महाविद्यालये आपल्या भूमिकेवर ठाम राहिली होती.

  • त्यानंतर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आयडॉलमधून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अ‍ॅकॅडमिक कौन्सिलची मान्यता मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना १० मे रोजी आयडॉलमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

दिनविशेष :
  • राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

महत्वाच्या घटना

  • १८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.

  • १८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

  • १८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.

  • १९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.

  • १९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.

  • १९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.

  • १९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.

जन्म

  • १९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५)

  • १९१८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)

  • १९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.

मृत्यू

  • १८७१: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७९२)

  • १८८९: कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)

  • २००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्म: २७ मे १९१३)

  • २००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.