चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ मे २०१९

Date : 11 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंडियाज डिव्हायडर इन चीफ - 'टाइम'च्या कव्हर स्टोरीवरुन वादंग :
  • मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचं मतदान अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला प्रचारसभांमध्ये झोकून दिलं आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मासिक 'टाइम'ने आपल्या नव्या अंकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींना जागा दिली आहे. मात्र मासिकाने मोदींना वादग्रस्त उपाधी दिली आहे.  "India's Divider in Chief" म्हणजे 'भारतात दुफळी निर्माण करणारा नेता' असं 'टाइम'ने मोदींच्या फोटोसह लिहिलं आहे.

  • 'टाइम' मासिकाच्या आशिया आवृत्तीत लोकसभा निवडणूक 2019 आणि मागील पाच वर्षांतील नरेंद्र मोदींच्या कामाकाजावर आधारित आतीश तासीर यांनी प्रमुख लेख लिहिला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मोदी सरकारची आणखी पाच वर्ष सहन करावी लागणार? (Can the World's Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government?) असा या लेखाचा मथळा आहे. मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप या लेखात केला आहे.

  • नेहरु आणि मोदींमध्ये तुलना - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाजावर कठोर टिप्पणी करताना मासिकाने नेहरुंचा समाजवाद आणि भारतातील सध्याची सामाजिक परिस्थितीची तुलना केली आहे. आतीश तासीर यांनी लिहिलेल्या या लेखात म्हटलं आहे की, "नरेंद्र मोदींनी हिंदू आणि मुस्लीमांमधील बंधुभावाची भावना वाढवण्यासाठी कोणतीही इच्छा दाखवली नाही."

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती :
  • मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा अधिकृत आदेश शुक्रवारी संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता असून त्यानंतरच अजोय मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारतील. लोकसभा निवडणूक सुरु असल्याने सध्या आचारसंहित लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्विकारला आहे.
  • सध्या मुख्य सचिवपदी असणारे यु.पी.एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला आहे. यु.पी.एस मदान ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिल्याने अजोय मेहता यांना संधी मिळाली आहे. अन्यथा अजोय मेहता यांना ही संधी मिळाली नसती. कारण अजोय मेहता सप्टेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत.
  • अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या महापालिका आयुक्तपदी लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी सध्या या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांची महापालिका आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्ट राफेल आणि राहुल गांधींचा राखून ठेवलेला निकाल एकाच दिवशी देणार :
  • नवी दिल्ली : राफेल व्यवहाराप्रकरणी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकांवरील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. तसेच आज कोर्टाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या अवमानता याचिकेवरील सुनावणी पूर्ण केली आहे. दोन्ही याचिकांवर सुप्रीम कोर्ट एकाचवेळी फैसला सुनावणार आहे.

  • राफेल पुनर्विचार याचिकांमध्ये कोर्टाने डिसेंबरमध्ये दिलेला फैसला बदलण्याची मागणी केली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने राफेलसाठी फ्रान्ससोबत केलेला करार योग्य होता, असा फैसला सुनावला होता. तर दुसऱ्या बाजूला कोर्टाचा निर्णय चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात अवमानता याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • राहुल गांधी यांनी सभांमध्ये, माध्यमांसमोर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत चुकीचे विधान केले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, सुप्रीम कोर्टानेदेखील 'चौकीदार चोर आहे' असे म्हटले आहे. याबाबात राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफीदेखील मागितली आहे. राहुल यांनी मान्य केले आहे की, पक्षाच्या घोषणेला सुप्रीम कोर्टाचे आदेश म्हणणे चुकीचे होते.

  • राफेलप्रकरणी आज झालेल्या दोन तासांच्या सुनावणीत याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी संपूर्ण व्यवहार हा शंकाजनक असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. "उद्योगपती अनिल अंबानीला फायदा मिळवून देणे हे या व्यवहारामागचे सर्वात मोठे उद्धिष्ट होते", असे विधान भूषण यांनी केले.

पुणे विद्यापीठातील संशोधकांनी शोधली प्लास्टिकचं विघटन करणारी बुरशी :
  • पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विभागातील संशोधकांनी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे संशोधन केले आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. परंतु विद्यापीठातील सांशोधकांनी प्लास्टिकचं विघटन करु शकणारी बुरशी शोधून काढली आहे.

  • खारफुटीच्या झाडांच्या मुळांवर ही बुरशी आढळून येते. एसपरगिलस या गटातील ही बुरशी आहे. मनीषा सांगळे, मोहमद शाहनवाज आणि डॉ अविनाश आडे यांनी हे संशोधन केले आहे. 2014 पासून यावर ते काम करत होते. या बुरशीमुळे पॉलिथीन या प्लास्टिकच्या प्रकारातील रेणू (मोलेक्युल) हे कमकुवत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याचे विघटन करण्याची पद्धत सोपी होते असेही त्यांना आढळले.

  • या संशोधनाची दखल नेचर मॅगझीननेही घेतली आहे. हे संशोधन सिद्ध करणारा रिसर्च पेपर एप्रिल महिन्यातील नेचर मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पण हे संशोधन प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी काही वेळ लागेल असे संशोधक आणि प्राध्यापक अविनाश आडे यांनी सांगितले.

  • संशोधकांनी सांगितले की, "हा या संशोधनाचा पहिला टप्पा आहे. याचा प्रत्यक्ष वापर सुरू होण्यासाठी यावरच आधारित संशोधनाच्या पुढच्या पायऱ्या पार कराव्या लागतील. साधारणपणे 5 वर्षांनंतर याचा प्रत्यक्ष वापर होऊ शकेल. या संशोधनाचं पेटंट घेण्यासाठीही विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत."

ब्रिटन राजघराण्याच्या नव्या राजपुत्रासाठी मुंबईच्या डबेवाल्यांकडून दागिन्यांची खरेदी :
  • मुंबई : मुंबईचे डबेवाले आणि ब्रिटनचं राजघराणं याचं नातं सगळ्यानांच परिचीत आहे. प्रिन्स चार्ल्स नुकतेच पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मर्केल यांना मुलगा झाला आहे. याचा आनंद मुंबईच्या डबेवाल्यांनाही झाला आहे. त्यामुळेच प्रिन्स चार्ल्स यांच्या नातवासाठी डबेवाल्यांनी दागिन्यांची खरेदी केली आहे.

  • मुंबईच्या डबेवाल्यांनी आज घाटकोपरच्या सेजल ज्वेलर्स या दुकानातून दागिने विकत घेतले. या दागिन्यांमध्ये चांदीचे वाळे, पैंजण, कंबरपट्टा, चैन तसंच सोन्याचं हनुमानाचं पेंडटही घेतलं आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या तिसऱ्या पिढीशी ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी ही खरेदी केली आहे.

  • प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीमुळे आम्हाला जगभरात ओळख मिळवून दिली. आम्हाला, आमच्या कामाला प्रसिद्धीच्या झोतात आणणारे प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले आणि राजघराण्याला राजपुत्र मिळाला. याचा आम्हाला आनंद झाला आहे. ज्याप्रमाणे आजोबा आपल्या नातवाला भेट देतात तसंच आमच्या या छोट्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही ही भेट पाठवत असल्याचं डबेवाल्यांनी सांगितलं.

  • डबेवाले हे सर्व दागिने आज ब्रिटीश काऊन्सिलमध्ये जाऊन देणार आहे. त्यांच्यामार्फत दागिने ब्रिटन राजघराणाच्य नव्या राजपुत्राला मिळतील.

Amazon चंद्रावर जाण्याच्या तयारीत; पाठवणार मून लँडर :
  • अॅमेझॉन चंद्रावर आपले यान पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांनी ही घोषणा केली. ‘ब्लू ओरिजिन स्पेस प्रोग्राम’ अंतर्गत त्यांनी मून लँडर लॉन्च केले. हे मून लॅन्डर चार रोव्हर्स, नव्या पद्धतीने डिझाईन केलेले रॉकेट आणि सूपअप रॉकेटला वाहून नेण्यास सक्षम असल्याची माहिती बेझॉस यांनी दिली.

  • गेल्या तीन वर्षांपासून नासाच्या वैज्ञानिकांसह आपण या मून लँडरवर काम करत असल्याचे बेझॉस म्हणाले. परंतु हे मून लँडर अवकाशात कधी झेपावेल याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सत्तेवर येताच ‘मिशन मून’ लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने 2024 पर्यंत चंद्रावर पाऊल ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले होेते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अॅमेझॉनने ‘ब्लू ओरिजिन स्पेस प्रोग्राम’वर नासाबरोबर काम करण्यास सुरूवात केली होती.

  • सध्या चीन, जपान, अमेरिकेसहित अनेक देश चंद्रावरील रहस्य जाणून घेण्यासाठी या अभियानावर काम करत आहेत. 1966 साली सोव्हिएत महासंघाने चंद्रावर ‘लूना 9’ उतरवले होते. त्यानंतर अमेरिकेनेही आपली महत्त्वाकांक्षी अपोलो ही मोहीम राबवली होती. या अभियानाअंतर्गत नासाने सूक्ष्म संशोधन केले होते. तसेत या अभियानाचे अमेरिकेने थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते.

राज्यात प्रथमच खो-खो प्रीमियर लीग नाशिकला :
  • राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट आणि कबड्डीच्या धर्तीवर प्रो खो-खो स्पर्धा आयोजनाच्या हालचाली सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील गुणवत्ता पुढे आणण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने १५ ते १८ मे या कालावधीत विद्युत प्रकाशझोतात ‘नाशिक जिल्हा खो-खो प्रीमियर लिग’ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील कोणत्याही जिल्हा संघटनेतर्फे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन होत आहे.

  • साखळी पध्दतीने होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघातील १२ खेळाडूंमध्ये चार मुलींचा समावेश राहील. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेची वेळ सायंकाळी साडेसहा ते साडेआठ अशी राहणार आहे. मुले-मुली यांचे एकत्रित संघ हे या स्पर्धेचे वैशिष्टय़े आहे.

  • शुक्रवारी छत्रपती शिवाजी स्टेडियममधील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा संघांच्या नामफलकांचे प्रायोजकांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. कर्णधारांच्या नावावरून संघांची नावे ठरविण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी प्रचलित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले असून त्याची माहिती जिल्हा संघटनेचे सचिव मंदार देशमुख यांनी दिली.

  • स्पर्धेसाठी मैदान २५ बाय १५ असे राहणार आहे. मैदानावर संरक्षणासाठी तीनऐवजी चार खेळाडू उतरतील. पहिल्या किंवा शेवटच्या ३० सेकंदात खेळाडू बाद केल्यास एक जादा गुण, पहिल्या सव्वा मिनिटात आक्रमण करणाऱ्या संघाकडून एकही गडी बाद न झाल्यास एक गुण वजा, आक्रमणात सात मिनिटात सूर न मारता गडी बाद केल्यास एक जादा गुण असे काही त्यातील नियम आहेत. संरक्षक आणि आक्रमक अशा दोन्ही बाजूंना न्याय देणारे हे नियम आहेत.

दिनविशेष :
  • राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

महत्वाच्या घटना

  • १५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

  • १८११: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४)

  • १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

  • १८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.

  • १८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

  • १८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.

  • १९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.

  • १९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.

  • १९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.

  • १९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.

  • १९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

जन्म 

  • १९०४: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९८९)

  • १९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा   जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी१९५५)

  • १९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट२००१)

  • १९१८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)

  • १९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.

  • १९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७१: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७९२)

  • १८८९: कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)

  • २००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्म: २७ मे १९१३)

  • २००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.