चालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१८

Date : 11 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नोटाबंदी अन् जीएसटी अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या- रघुराम राजन :
  • वॉशिंग्टन- आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका केली आहे. नोटाबंदी अन् जीएसटी हे दोन्ही निर्णय अर्थव्यवस्थेसाठी अडचण ठरले आहे. त्यामुळे विकासदर प्रभावित झाला आहे. तसेच भारतातील निर्णयांमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा हस्तक्षेप हा अर्थव्यवस्थेतल्या अडचणींपैकी मोठी समस्या आहे.

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटाबंदी आणि जीएसटी देशाच्या आर्थिक वृद्धीतील सर्वात मोठी बाधा असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारच्या या दोन निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. सद्य स्थितीत असलेला विकासदर हा देशांतील गरजेच्या तुलनेत पर्याप्त नाही.  कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. 

  • जीएसटी ही करप्रणाली येण्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढतच होता. परंतु खनिज तेलाच्या वाढत्या दरामुळे विकासाला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळीच योग्य पावलं उचलल्यास भारताचा विकासदर येत्या 10 ते 15 वर्षांमध्ये वाढू शकेल. तसेच एनपीए, पायाभूत सुविधा अन् वीज प्रश्न या भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, २८ला मतदान :
  • ऐझॉल- निवडणूक आयोगानं मिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरममध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शशांक यांना हटवण्याची मागणी होत होती.

  • राजधानी ऐझॉलसह अनेक शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी शशांक यांना हटवण्यासाठी निदर्शनंही केली होती. 40 जागा असलेल्या मिझोरम विधानसभेसाठी या महिन्याच्या 28 तारखेला मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी जोर धरत असतानाच निवडणूक आयोगाची समिती मिझोरममध्ये दाखल झाली होती. त्यांच्या अहवालानंतर निवडणूक अधिकाऱ्याला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • तसेच मिझोरमसाठी नवीन मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी मुख्य सचिवांकडे नव्या पॅनलची मागणीही केली आहे. मिझोरमच्या सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्यासाठी त्रिपुरातील शरणार्थी ब्रू समुदायातील लोकांना मिझोरमच्या सीमेमध्ये मतदान करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानं दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत.

  • निवडणूक आयोगानं राज्याचे प्रधान सचिव(गृह)ललनुनमाविया चुआऊंगो यांनाही हटवलं आहे. त्यानंतरच शशांक यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. चुआऊंगो हे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याची शशांक यांनी तक्रार केली होती.

मराठी शाळांकडे वाढतोय पालकांचा कल :
  • मुंबई : मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठीशाळा टिकल्या पाहिजेत यासाठी सुरू झालेल्या मराठीशाळाफेसबुकच्या चळवळीला सर्व स्तरांतून पाठिंबा वाढत आहे. या समूहाचे सदस्य असलेल्यांवरही या चळवळीचा सकारात्मक परिणाम होत असून पालक असलेले सदस्य आपल्या मुलांचा प्रवेश आयसीएसई, सीबीएसईसारख्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून मराठी माध्यमांच्या शाळेत करून घेत आहेत.

  • यामुळे या चळवळीला अधिक बळ मिळत असून मराठी शाळांना भविष्यात खरंच अच्छे दिन येतील, अशी आशा चळवळीचे प्रमुख प्रसाद गोखले यांनी व्यक्त केली.

  • आई नेटवर्क इंजिनीअर आणि वडील मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करीत असतानाही प्रांजलच्या पालकांनी फेसबुक समूहाने प्रेरित होऊन सीबीएसई माध्यमाच्या इंग्रजी शाळेतून मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे. आज ते प्रांजलच्या प्रगतीने खूप समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला काळाची गरज, भौतिक सुविधा, इंग्रजी भाषेची आवश्यकता या साऱ्याचा विचार करून प्रांजलच्या आई-बाबांनी तिला प्ले ग्रुपपासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले होते.

  • मात्र प्रगती समाधानकारक असूनही प्रांजलला तिच्यातील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ मिळत नव्हता, याची खंत गीता पाचकळे यांना सतावत होती. पुढे तिला पहिलीलाच ११ विषयांचा अभ्यासही आला. ताण वाढलाच, मात्र आठवड्यातून मराठीची एकाच तासिका शाळेत असल्याने तिचा मराठीशी असणारा लळा कमी होईल, अशी धास्ती प्रांजलच्या आई-बाबांना वाटू लागली. यामुळे घरातील वातावरणही बिघडत होते.

जागतिक क्रमवारीत भारतीय कुस्तीपटू पहिल्या क्रमांकावर :
  • मुंंबई : भारतीय कुस्तीला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ लागले आहेत. यंदाच्या एशियाड क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पदकांयी लयलूट केली. भारतीयांना कुस्तीमध्ये आता अजून एक खूशखबर मिळाली आहे. कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने पहिला क्रमांक पटकावला आहे. बजरंगने यंदा एशियाड गेम आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली आहेत.

  • यंदाचे वर्ष बजरंगसाठी चांगले गेले आहे. या वर्षात त्याने जागतिक स्तरावर तब्बल पाच पदके जिंकली आहेत. बजरंगने युनायटेड वर्ल्ड रेस्टलींगच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) यादीत 96  गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या यादीत बजरंगच्या आसपासदेखील कोणी नाही. क्युबाचा अॅलेजँद्रो एनरिक व्लाडेस टोबियर हा 66 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बजरंग आणि एलजँद्रोमध्ये 30 गुणांचे अंतर आहे. रशियाचा अखमद चाकेइव्ह 62 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

  • याबाबत प्रतिक्रिया देताना बजरंग म्हणाला की, ‘‘प्रत्येक खेळाडूला वाटते की त्याने जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हावे. मला हे स्थान मिळाले आहे, याचा आनंद आहेच, परंतु वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावून हे सर्वोत्तम स्थान मिळाले असते तर मला याहूनही जास्त आनंद झाला असता. मी खूप जास्त मेहनत घेत आहे आणि माझे हे अव्वल स्थान मी पुढील वर्षीही टिकवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.’’

आग्रा शहराचं नाव 'अग्रवाल' करा, भाजप आमदाराची नामांतराची मागणी :
  • लखनौ : उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद आणि फैजाबाद या शहरांनंतर नामांतराचा सपाटाच लागण्याची चिन्हं आहेत. आता आग्रा शहराचं नाव बदलण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. आग्रा शहराला अग्रवाल किंवा अग्रवन हे नाव द्यावं, असं भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी म्हटलं आहे.

  • 'आग्रा' या नावामागे कोणतीही पार्श्वभूमी नाही किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व नाही. पूर्वी या ठिकाणी जंगलं होती आणि अग्रवाल समाज या भागात राहत होता. अग्रवालांचा मोठा वारसा असलेल्या शहराला त्यांचं नाव देण्यात यावं, असं गर्ग यांनी म्हटलं आहे.

  • जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला आग्य्रातील ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आग्य्राला नवी ओळख मिळणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • दुसरीकडे सरदानामधील भाजपचे खासदार संगीत सोम यांनी मुझफ्फरनगरचं नाव बदलून लक्ष्मीनगर करण्याची मागणी केली आहे. शहराचं नाव बदलण्याची स्थानिकांची मागणी असल्याचं सोम यांनी म्हटलं आहे. भाजप भारताचं गतवैभव पुन्हा मिळवून देत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

राममंदिराच्या बांधकामात काँग्रेसचा सर्वात मोठा अडथळा :
  • अयोध्येत राममंदिराच्या बांधकामात काँग्रेस हा सर्वात मोठा अडथळा असल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी केला असून, ‘मते गोळा करण्यासाठी’ देशभरातील धार्मिक ठिकाणांना भेटी देण्याऐवजी राममंदिराच्या मुद्दय़ावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केले.

  • काँग्रेसचे कार्यकर्ते राममंदिर व रामसेतू यांना विरोध करत असून गोहत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे, असाही आरोप राज्याचे ऊर्जामंत्री असलेले शर्मा यांनी केला.

  • भाजप या मुद्दय़ावर कायदा का करत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राममंदिराच्या बांधकामात काँग्रेस हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे शर्मा म्हणाले. देशभरातील मंदिरांना भेटी देण्याचा काँग्रेस अध्यक्षांचा उपक्रम एकतर मते गोळा करण्यासाठी आहे, किंवा त्यांनी अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला पाठिंबा द्यायला हवा. त्यांच्या पक्षाने या मुद्दय़ावर भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  • मंदिराचे बांधकाम होण्यासाठी रा.स्व. संघ आणि त्याच्या परिवारातील संघटना आंदोलनाची भूमिका घेत आहेत याकडे लक्ष वेधले असता, या संघटनांची भूमिका भाजपसारखीच असल्याचे ते म्हणाले. हा मुद्दा घटनेच्या चौकटीत सोडवला जाईल असे भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये भाजपचे संकल्पपत्र, मध्यप्रदेशात काँग्रेसचे घोषणापत्र जारी :
  • रायपूर/भोपाळ : छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकांमुळे दोन्ही राज्यात आता सर्वच पक्षात चढाओढ सुरु झाली आहे. आज छत्तीसगडमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचे आगामी निवडणुकांसाठीचे संकल्पपत्र जारी केले. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेदेखील मध्यप्रदेशमध्ये घोषणापत्र जारी केले.

  • छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज भाजपने त्यांचे घोषणापत्र (संकल्प पत्र) जारी केले. भाजपचे संकल्पपत्र शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून तयार केले आहे. मुख्यमंत्री रमन सिंह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये फिल्मसिटी निर्माण केली जाणार आहे.

  • 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि बर्फी दिली जाईल. पत्रकार कल्याण बोर्डाची निर्मिती केली जाईल. महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 2 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल.

  • मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी आज काँग्रेसने घोषणापत्र जारी केले. काँग्रेसने दावा केला आहे. की सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी वीजेचा दर कमी केला जाईल. तरूण बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता आणि मोबाईल दिला जाईल.

महिला ट्वेन्टी २० विश्वचषक - आज भारत पाकिस्तानशी भिडणार :
  • मुंबई : हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचा महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातील दुसरा सामना आज पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात भारतीय महिलांचं पारडं जड मानलं जात आहे. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेत भारतीय संघ हा बलाढ्य मानला जात नाही. पण भारतानं गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

  • भारतीय महिलांनी शुक्रवारी न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव करून, ट्वेन्टी ट्वेन्टीत आपली वाढलेली ताकद दाखवून दिली. या सामन्यात हरमनप्रीतनं अवघ्या 51 चेंडूंत 103 धावांची, तर जेमिमा रॉड्रिग्सनं 45 चेंडूंत 59 धावांची खेळी उभारली.

  • त्यामुळे भारतीय संघानं न्यूझीलंडला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. मग हेमलता, पूनम यादव आणि राधा यादवनं न्यूझीलंडला 160 धावांत गुंडाळलं. भारतीय महिला संघाचा सध्याचा फॉर्म पाहता हा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

  • सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 52 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

दिनविशेष :
  • राष्ट्रीय शिक्षण दिन

महत्वाच्या घटना 

  • १९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

  • १९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

  • १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

  • १९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.

  • १९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

जन्म 

  • १८२१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)

  • १८५१: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०८ – मुंबई)

  • १८७२: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९३७)

  • १८८६: लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)

  • १८८८: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८२)

  • १८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)

  • १९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)

  • १९११: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९९१)

  • १९२४: कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९९६)

  • १९२६: विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००३)

  • १९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९८४: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९९)

  • १९९४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९०४)

  • १९९७: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.

  • १९९९: शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.

  • २००४: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)

  • २००५: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन.  (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)

  • २००५: नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.