चालू घडामोडी - ११ ऑक्टोबर २०१८

Date : 11 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅलींचा राजीनामा मंजूर :
  • वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच हॅली यांनी दक्षिण कॅरिलोना राज्याचं राज्यपालपदही सोडलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हॅली यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे हॅली यांनी ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली.

  • हॅली यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी मला सांगितलं होतं की, मी विश्रांती घेऊ इच्छिते, असे ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच 2020मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताचंही हॅली यांनी खंडन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही, उलट त्यांच्यासाठीच प्रचार करेन, असंही हॅली यांनी सांगितलं आहे.

  • कोण आहेत निक्की हॅली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सरकारमधील निक्की हॅली या एक वजनदार नेत्या आहेत. निक्की हॅली यांची संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत म्हणून निवड करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या प्रशासनातील कॅबिनेट दर्जा मिळालेल्या निक्की हॅली या पहिल्या महिला आहेत.

पेट्रोल, डिझेल महागलं; जाणून घ्या आजचे दर :
  • आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी फक्त डिझेल महागले होते. मात्र आज पेट्रोल प्रति लिटर ९ पैसे तर डिझेल प्रति लिटर ३० पैशांनी महागले आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८७.९२ रूपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७८.२२ रूपये झाली आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. नवी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर १० पैशांनी वाढून ८२.३६ रूपयांवर पोहचले आहे. तर डिझेल प्रति लिटर २७ पैशांनी वाढून ७४.६२ रूपयांवर पोहचले आहे.

  • मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर ८७ ते ८८ रुपये आहे, मात्र शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर ८० रुपये असल्याने सीमाभागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचे चित्र आहे. गुजरातकडे जाणारा वाहनचालकही महाराष्ट्रात पेट्रोल भरण्यापेक्षा गुजरामध्ये पेट्रोल भरणे अधिक पसंद करत आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील डिजेल दर स्वस्त असल्याने डिजेलवर चालणाऱ्या वाहनांचे चालक मात्र महाराष्ट्रात डिजेल भरत आहेत.

  • महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या चारोटी येथे डिझेलचा दर ७६.४४ रुपये आहे, तर गुजरातमध्ये वापी येथे डिझेलचा दर ७८.०६ प्रतिलिटर आहे. डिझेलचे दर राज्यात कमी असल्याने अवजड वाहेन तसेच डिझेलवर चालणारी वाहने वसई आणि पालघर तालुक्यात इंधन भरताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रात डिझेल गुजरातपेक्षा स्वस्त मिळते म्हणून आम्ही डिझेलसाठी महाराष्ट्रातील पंपावर जातो, असे गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकचालकांनी सांगितले.

मूळ कागदपत्रांशिवाय प्रवेशअर्ज करण्यास मुभा :
  • नवी दिल्ली : शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आपली मूळ कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. तसेच विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश रद्द केल्यास शिक्षण संस्थेने त्यांचे प्रवेशशुल्क एक महिन्यांत परत करणे आवश्यक आहे, असा निर्णय केंद्रीय विद्यापीठ आयोगाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक बुधवारी जारी करण्यात आले. शुल्क परत न केल्यास शिक्षण संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

  • पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांला मूळ कागदपत्रांच्या छायाप्रती जोडून महाविद्यालयात प्रवेशअर्ज सादर करता येईल, अशी माहिती बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करताना गुणपत्रक तसेच अन्य मूळ कागदपत्रे द्यावी लागतील. त्यांचे प्रमाणीकरण झाल्यानंतर मूळ कागदपत्रे विद्यार्थ्यांला परत केली जातील, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

  • दरम्यानच्या काळात, विद्यार्थ्यांने दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला तर महाविद्यालय त्याला मूळ कागदपत्रे परत करेल. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी नवी नियमावली लागू होणार आहे. विद्यार्थी एकाहून अधिक महाविद्यालयांमध्ये प्रवेशअर्ज भरत असतात. पण, मूळ कागदपत्रे प्रवेशअर्जाबरोबर द्यावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालय वा अभ्यासक्रम बदलता येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ आयोगाने शिक्षण संस्थांना काही नियम लागू केले आहेत.

जागतिक कीर्तीचे व्हायोलीन वादक पं. डी. के दातार यांचे निधन :
  • जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित डी. के. दातार यांचे बुधवारी रात्री अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि डॉ. निखिल व डॉ. शेखर ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गायकी अंगाने व्हायोलीन वादन करणारे एक अतिशय वरच्या दर्जाचे कलावंत म्हणून ते प्रसिद्ध होते.

  • भारतीय अभिजात संगीतात सर्वात जुन्या अशा ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होते. त्यांचे वडील केशवराव हे विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे गुरुबंधू. त्यामुळे अगदी लहान वयातच त्यांच्यावर घराणेदार स्वरसंस्कार झाले.

  • याच वयात मोठे बंधू नारायणराव यांनी त्यांच्या हातात व्हायोलीन हे वाद्य दिले आणि त्यानंतर त्यांनी या वाद्याची संगत कधीच सोडली नाही. वाद्य शिकण्यासाठी त्याकाळी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या प्रो. बी. आर. देवधर यांच्या स्कूल ऑफ म्युझिकमध्ये ते दाखल झाले आणि ख्यातनाम व्हायोलीनवादक विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडून त्यांनी तालीम घ्यायला सुरुवात केली.

  • ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार असल्याने हे पाश्चात्य वाद्य गायकी अंगाने वाजवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्यावर प्रभुत्व मिळवले. ख्याल, ठुमरी, भजन यासारख्या गायनकलेतील प्रकारांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आणि भारतातील अनेक दिग्गजांबरोबर अभिजात संगीताच्या मफलीत साथसंगत केली. भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवले. तर संगीत नाटक अकादमीचा आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. भारतातील सगळ्या संगीत महोत्सवांमध्ये पं. दातार यांच्या व्हायोलीन वादनाच्या मफली झाल्या आणि रसिकांनीही त्याला भरभरून दाद दिली.

  • परदेश दौऱ्यांमध्ये जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या वादनाचे चाहते आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या वादनाचे कार्यक्रम गेली अनेक दशके आवर्जून आयोजित करण्यात येत असत. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये पं. दातार अध्यापन करीत असत.

असीम मुनीर पाकिस्तानी ISI चे नवीन बॉस :
  • आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विभागाकडून ही माहिती देण्यात आली. मुनीर याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी बढती दिली होती.

  • ते लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा घेणार आहेत. मुख्तार डिसेंबर २०१६ पासून आयएसआयचे प्रमुख होते. असीम मुनीर कमांडरही होते. पाकिस्तानी लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर असले तरी मुख्य सत्ताकेंद्र हे लष्कर आणि आयएसआयच आहे.

  • पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णयांमध्ये आयएसआयची भूमिका महत्वाची असते. आतापर्यंत भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयएसआयचा हात आहे. काश्मीरसह भारताच्या अन्य भागांमध्ये अस्थितरता कशी निर्माण करता येईल त्यासाठी आयएसआयचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. पाकिस्तानचा मुख्य शत्रू भारत असून भारताला डोळयासमोर ठेऊन आयएसआय धोरण ठरवते.

तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता :
  • ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद भरण्यात आले नव्हते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिला होता.

  • कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भारताच्या महाधिवक्तापदी मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मागील ११ महिन्यांपासून हे पद रिकामे होते. तुषार मेहता हे गुजरातचे आहेत. भाजपाची केंद्रात सत्तेत आल्यानंतर २०१४ मध्ये मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले होते. मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम ६६ अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.

  • दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्याबाबत एका वेबसाइटवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जय शाह यांनी या वेबसाइटच्या पत्रकारांवर मानहानीचा खटला दाखल केला होता. मेहता यांनी केंद्र सरकारची विशेष परवानगी घेऊन जय शाह यांच्याकडून हा खटला लढवला होता.

महागठबंधन ही एक अयशस्वी कल्पना - पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचा घाट घातला असून ही एक अयशस्वी कल्पना आहे. यातील पक्ष हे एकमेकांसोबत नेहमी भांडत असतात. मात्र, जेव्हा त्यांना सरकार स्थापण्याची एखादी संधी दिसते तेव्हा ते एकत्र येतात. याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकमधील सरकार होय.

  • यांचे असेच प्रयत्न आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसाठी देखील सुरु आहेत. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या लोकांची पार्श्वभूमी सर्वांना सांगावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी अॅपवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

  • मोदी म्हणाले, ”आम्ही’ सुख वाटणारे आहोत, तर ‘ते’ समाज वाटणारे आहेत’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काँग्रेसवर टीका केली. आता ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यासाठी हे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तणावाचे वातावरण निर्माण करतील. एकमेकांमध्ये भांडणं लावून देतील.

  • मोदी म्हणाले, अटलजींनी सगळ्यांना विश्वासात घेऊन छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली होती. मात्र, काँग्रेसने तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश राज्यांची विभागणी केली आणि एकच भाषा बोलणाऱ्या लोकांना एकमेकांचे शत्रू बनवून टाकलं.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय बालिका दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.

  • १९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.

  • २००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.

  • २००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.

जन्म 

  • १८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)

  • १९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)

  • १९१६: पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी२०१०)

  • १९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

  • १९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)

  • १९४२: चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म.

  • १९४३: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९९६)

  • १९४६: परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८१८)

  • १९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९)

  • १९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन. (जन्म: २७ जून १९१७)

  • १९९४: कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन.

  • १९९७: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विपुल कांति साहा यांचे निधन.

  • २०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)

  • २००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.