चालू घडामोडी - ११ सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 11, 2018 | Category : Current Affairsएनपीएला तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार: रघुराम राजन :
 • भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वाढत्या थकीत कर्जाला (एनपीए) तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. संसदीय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तरात त्यांनी यूपीए सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. घोटाळे आणि चौकशींच्या फेऱ्यांमुळे सरकारची निर्णय घेण्याची गती मंदावली होती. त्यामुळे एनपीए वाढत गेला, असे त्यांनी उत्तरादाखल दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 • भाजपाचे ज्येष्ठ खासदार मुरलीमनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. आपल्या उत्तरात राजन म्हणाले की, बँकांकडून मोठ्या कर्जांवर उचित कारवाई करण्यात आली नाही आणि २००६ नंतर विकासाचा वेग कमी झाल्याने बँकांच्या वृद्धीची आकडेवारी ही अवास्तविक झाली.

 • उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी एनपीएच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी राजन यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. एनपीएला योग्यरितीने ओळखण्याचे श्रेय राजन यांना जाते. देशातील एनपीएची समस्या इतकी गंभीर का झाली हे त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

भारतीय अब्जाधीशाकडून मुलीच्या शिक्षणासाठी महल, १२ नोकरांची सोय :
 • लंडन : ब्रिटनमधील एका भारतीय विद्यार्थिनीची मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. याचं कारण शैक्षणिक विक्रम किंवा मोठी कामगिरी नाही तर शाही ऐशोआराम आहे. 'द स्कॉटिश सन'मधील वृत्तानुसार, एका भारतीय अब्जाधीशाची मुलगी स्कॉटलंडच्या सेंड अँड्र्यूज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. मुलीच्या शिक्षणासाठी पालकांनी आलिशान महलासोबत 12 नोकरांची व्यवस्था केली आहे. या 12 जणांच्या स्टाफमध्ये विशेषत: आचारी, बटलर, मोलकरीण, घराची साफसफाई करणारा नोकर, माळी, फूटमॅन, चालक यांचा समावेश आहे.

 • चार वर्षांच्या अभ्यासासाठी महलासोबतच आपल्या कामात निपुण असलेल्या स्टाफच्या नियुक्तीवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. हे कुटुंब अतिशय श्रीमंत आहे, त्यामुळे फक्त अनुभवी आणि कुशल स्टाफच्या नियुक्तीवर भर देण्यात आला आहे. बटलरचं काम विशेषत: मेन्यू पाहण्याचं आणि टीम जेवण कसं बनवतेय यावर देखरेख करण्याचं असेल. तर फुटमॅनचं काम जेवण वाढण्याचं आणि टेबलाची स्वच्छता करण्याच असेल.

 • कुटुंबाने नोकरासाठी दिलेल्या जाहिरातीत 'आनंदी, ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण' व्यक्तीची गरज असल्याचं लिहिलं आहे. एखाद्या भारतीय विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी एवढ्या खर्चिक राहणीमानाचं हे पहिलंच उदाहरण आहे. यासोबतच पर्सनल स्टाफसाठी कामाची जी यादी आहे, त्यात गरजेच्या वेळी दरवाजा उघडणं, दुसऱ्या स्टाफसोबत रुटीन शेड्यूल बनवणं, वॉर्डरोब मॅनेजमेंट आणि पर्सनल शॉपिंगचाही समावेश आहे.

पटेल यांच्या पुतळ्याचे ३१ आॅक्टोबरला अनावरण :
 • नवी दिल्ली : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली.

 • भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना रुपानी म्हणाले की, १८२ मीटर उंचीचा हा पुतळा देशाच्या एकता, अखंडतेचे प्रतीक असणार आहे.

 • भारतीय जनता पार्टीने हा भव्य पुतळा उभारण्यासाठी देशभरातून लोखंड, माती आणि पाणी एकत्र केले होते. नरेंद्र मोदी हे २०१३ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही घोषणा केली होती.

Jio GigaFiber ला टक्कर; BSNL ने लाँच केले ४ नवीन प्लॅन :
 • नवी दिल्ली : रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा जिओ गिगाफायबर (JioGigaFiber) च्या रजिस्ट्रेशनसाठी गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. रिलायन्स जिओची फायबर-टू-द-होम (FTTH)ही सेवा मार्केटमध्ये धूमाकूळ घालण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिओला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यानी सुद्धा कंबर कसली आहे. बीएसएनएल कंपनीने आपल्या ब्रॉडबँड सेवेसाठी चार नवीन प्लॅन मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. यामध्ये कंपनीने 99 रुपये, 199 रुपये, 299 रुपये आणि 399 रुपयांच्या नवीन प्लॅनची घोषणा केली आहे.

 • कंपनीच्या या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना 20 एमबीपीएस स्पीड इतका डेटा मिळणार आहे. मर्यादा संपल्यानंतर हा स्पीड एक एमबीपीएस होईल. तसेच, या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. विशेष, म्हणजे अंदमान आणि निकोबार सोडून देशभरातील ग्राहक या प्लॅनचा फायदा घेऊ शकणार आहेत. 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिदिन 20 एमबीपीएसच्या स्पीडने 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड 1 एमबीपीएस होणार आहे.  

 • बीएसएनएलच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 5 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. याची मर्यादा 30 दिवसांची आहे, म्हणजेच ग्राहकांना 30 दिवसांत एकूण 150 जीबी डेटा मिळू शकतो. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 300 जीबी (10 जीबी प्रतिदिन) आणि 399 रुपयांमध्ये 600 जीबी (20 जीबी प्रतिदिन) डेटा मिळणार आहे. या प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल, तर ग्राहकांनी या ऑफरची घोषणा झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत प्लॅन अॅक्टिव्ह केला पाहिजे.  

आंध्र प्रदेशात पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची घोषणा :
 • देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असताना आंध्र प्रदेशचे मुख्यंमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात केल्याची घोषणा केली. नायडू यांनी सोमवारी दुपारी विधानसभेत ही घोषणा केली. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. केंद्रानेही इंधनाच्या किंमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन नायडू यांनी यावेळी केले.

 • या निर्णयाचा राज्याच्या तिजोरीवर भार पडणार असून राज्याच्या महसुलात घट होऊन १,१२० कोटींचा फटका बसणार आहे. पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट वसूल करण्यामध्ये आंध्र प्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो, महाराष्ट्राचा याबाबतीत पहिला क्रमांक आहे. तर डिझेलवर व्हॅट आकारण्यात आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोलवर 35.77 टक्के आणि डिझेलवर 28.08 टक्के व्हॅट आकारला जातो.

 • दुसरीकडे, आज सलग १७ व्या दिवशी देशात इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल १४ तर डिझेल १५ पैशांनी महागलं आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८८.२६ रुपये प्रतिलिटर झला असून डिझेलचा दर ७७.४७ रुपये प्रतिलिटर झाला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

 • १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

 • १८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

 • १९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

 • १९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

 • १९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.

 • १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.

 • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.

 • १९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.

 • १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

 • १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

 • १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

 • २००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.

 • २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

जन्म

 • १८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.

 • १८६२: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.

 • १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)

 • १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)

 • १८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)

 • १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)

 • १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)

 • १९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)

 • १९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)

मृत्यू

 • १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.

 • १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)

 • १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.

 • १९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.

 • १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)

 • १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)

 • २०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)