चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ सप्टेंबर २०१९

Updated On : Sep 11, 2019 | Category : Current Affairsगोव्याच्या प्रियव्रत पाटीलने रचला इतिहास; सोळाव्या वर्षी 'महापरीक्षा' उत्तीर्ण :
 • पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.

 • तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण असते. "प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

 • "काल श्रीमती अपर्णा आणि श्री देवदत्ता पाटील यांच्या 16 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचं श्री मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतलं. यासोबतच तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळवला", असं ट्वीट चामू कृष्णाशास्त्री यांनी करुन पंतप्रधान मोदींना त्यात टॅग केल होतं. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचं अभिनंदन केलं.

वाहतूक नियमांमधून जनतेला दिलासा; गुजरात सरकारचा मोठा निर्णय :
 • ‘मोटर व्हेइकल अॅक्ट 2019’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर वाहनचालकांची झोप उडाली होती. अतापर्यंत हा कायदा महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये लागू करण्यात आला नव्हता. परंतु गुजरात सरकारने आता नियमांमध्ये थोडा बदल करत हा कायदा लागू केला आहे. गुजरात सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नव्या दंडाच्या रकमेबाबत घोषणा केली. पोलिसांनी विना हेलमेट पकडल्यास नव्या नियमांनुसार आकारल्या जाणाऱ्या 1 हजार रूपयांऐवजी गुजरातमध्ये 500 रूपये आकारण्यात येणार आहे. तर सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास 1 हजार रूपयांऐवजी 500 रूपये दंड भरावा लागणार आहे.

 • याव्यतिरिक्त धोकादायकरित्या वाहन चालवल्यास नव्या नियमांनुसार 5 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पंरतु यासाठी गुजरातमध्ये तीन तारी वाहनांकडून 1 हजार 500, हलक्या वाहनांसाठी 3 हजार रूपये आणि अन्य वाहनांसाठी 5 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.

 • 1 सप्टेंबरपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर अनेक स्तरातून याचा विरोध करण्यात आला होता. तसेच वाहनचालकांमध्ये पसरलेली नाराजी पाहता गुजरात सरकारने दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकच दहशतवादाचा केंद्रबिंदू :
 • जीनिव्हा : जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या व्यासपीठावर मांडण्याचा पाकिस्तानने केलेला प्रयत्न मंगळवारी धुडकावून लावताना, ‘‘पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू असून काश्मीरबाबतच्या त्याच्या प्रचारातील खोटेपणाला जग भुललेले नाही,’’ अशी घणाघाती टीका भारताने केली आहे.

 • भारताच्या परराष्ट्र सचिव विजय ठाकूर सिंग यांनी पाकिस्तानने काश्मीरवरून भारताविरोधात केलेल्या आरोपांचा स्पष्ट शब्दांत समाचार घेताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा ठेवायचा की नाही, हा निर्णय घेण्याचा आम्हाला सार्वभौम अधिकार आहे. आमच्या संसदेने तो निर्णय घेतला आहे. त्यात कोणत्याही अन्य देशाला हस्तक्षेप करण्यास वावच नाही.

 • जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक तऱ्हेने सामाजिक आणि आर्थिक विकास घडावा, यासाठी देशाने लोकशाही मार्गाने हा निर्णय घेतला आहे. काश्मिरी जनतेला सर्वाधिक झळ दहशतवादानेच बसली असून पाकिस्तानच्या चिथावणीने हा दहशतवाद फोफावत असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहे. खरे पाहता संपूर्ण जगानेच संघटितपणे दहशतवादाचा कणा मोडण्याची गरज आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

चंद्रावर पहिलं सॉफ्ट लँडिंग कधी झालं होतं :
 • रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला.

 • १९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या.

अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा अध्यक्षपदावरून पायउतार :
 • बीजिंग : चीनमध्ये ऑनलाइन रिटेल क्षेत्र (किरकोळ विक्री क्षेत्र) गाजवणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा हे अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे चीनच्या उद्योगांपुढे आव्हान असताना त्यांनी अलिबाबा या ई व्यापार कंपनीचा निरोप घेतला आहे.

 • मा हे चीनमधील सर्वात श्रीमंत व सर्वाना परिचित असलेले उद्योजक असून त्यांनी त्यांच्या ५५ व्या वाढदिवशी हे पद सोडले आहे. त्यांनी एक वर्षभरापूर्वीच पद सोडण्याचे संकेत दिले होते. ते आता अलिबाबा भागीदारी मंडळात सदस्य राहतील. हा ३६ सदस्यांचा गट असून त्याला कंपनीचे संचालक ठरवण्याचा अधिकार आहे. जॅक मा हे इंग्रजीचे माजी शिक्षक असून त्यांनी १९९९ मध्ये अलिबाबा कंपनी स्थापन करून चीनच्या निर्यातदारांना अमेरिकी किरकोळ व्यापारक्षेत्राशी सांगड घालून दिली. नंतर या कंपनीने चीनमधील वाढत्या ग्राहक बाजारपेठेतच काम करण्याचे ठरवले, कंपनीने बँकिंग, करमणूक, क्लाउड कॉम्प्युटिंग या क्षेत्रात काम केले.

 • जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत १६.७ दशलक्ष डॉलर्सच्या महसुलात ६६ टक्के वाटा देशी उद्योगांचा आहे. सध्या चीनच्या रिटेल उद्योगावर अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धामुळे अनिश्चिततेचे सावट असून अमेरिकी आयातीची किंमत आता वाढली आहे. ऑनलाइन विक्री २०१९ च्या पहिल्या सहामाहीत १७.८ टक्क्य़ांपर्यंत घसरली असून त्यामुळे चीनच्या आर्थिक वाढीला लगाम लागला आहे. २०१८ मध्ये ऑनलाइन विक्री २३.९ टक्के होती.

 • अलिबाबा समूहाच्या मते त्यांचा महसूल जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत ४२ टक्के वाढला असून तो १६.७ दशलक्ष डॉलर्स आहे. त्यात नफा १४५ टक्के वाढला असून तो ३.१ अब्ज डॉलर्स आहे. जगभरात अलिबाबाच्या ई कॉमर्स मंचावरून विकल्या जाणाऱ्या वस्तूंची विक्री गेल्या वर्षी २५ टक्के वाढली ती ८५३ अब्ज डॉलर्सची होती. अमेरिकेच्या अ‍ॅमेझॉनची एकूण विक्री २७७ अब्ज डॉलर्सची होती.

गुगलच्या मक्तेदारीविरोधात अमेरिकेत पन्नास राज्यांचे चौकशीचे आदेश :
 • वॉशिंग्टन : गुगलचे मक्तेदारीचे वर्तन व ऑनलाइन जाहिरात बाजारपेठेवरचा वरचष्मा याची चौकशी करण्याचा आदेश अमेरिकेतील पन्नास राज्यांच्या समूहाने दिला आहे.

 • सोमवारी या चौकशीचे आदेश देताना या राज्यांच्या महाधिवक्त्यांनी असे म्हटले आहे की, गुगल कंपनी ज्या काही पद्धती वापरत आहे त्यांचा विचार करता इंटरनेट ही व्यवस्था बाह्य़ प्रभावांपासून स्वतंत्र राहिलेली नाही, ती मोफत आहे असेही नाही. पन्नास राज्यांच्या महाधिवक्त्यांनी गुगलच्या मक्तेदारीच्या वर्तनाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती कोलंबियाचे महाधिवक्ता कार्ल रॅसिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 • टेक्सासचे महाधिवक्ता केन पॅक्सटन यांनी म्हटले आहे की, गुगलने जाहिरात व इंटरनेटवरील माहिती शोधात मक्तेदारीचे वर्तन चालवले आहे. यूटय़ूबच्या माध्यमातून चित्रफितींवर त्यांची मक्तेदारी आहे. गुगलचा नफा ११७ अब्ज डॉलर्स आहे याचा अर्थ इंटरनेटची सेवा मोफत नाही.

 • गुगलने मात्र सर्व आरोप फेटाळले असून आम्ही लोकांना वेगवेगळ्या मार्गानी सेवा दिली असून हजारो रोजगारांना पाठबळ दिले आहे, अमेरिकेतील अनेक लघुउद्योग हे आमच्यामुळे टिकून आहेत असे गुगलचे म्हणणे आहे. गुगल ही अमेरिकेतील संशोधन व विकासावर खर्च करणारी कंपनी आहे, असे गुगलचे जागतिक कामकाज उपाध्यक्ष केंट वॉकर यांनी सांगितले.

‘ईस्टर संडे’च्या धक्क्यातून सावरत श्रीलंकेची नवी झेप :
 • ‘ईस्टर संडे’ला म्हणजेच २१ एप्रिल रोजी तीनशेहून अधिक निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरलेली श्रीलंका अवघ्या चार महिन्यांत पूर्वपदावर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘युद्धाचा देश’ अशा प्रतिमेच्या पलीकडे जात जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.

 • या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.

 • दोन ते तीन दशके लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम( एलटीटीई) सोबत चाललेला रक्तरंजित संघर्ष मार्च २००९मध्ये संपुष्टात आल्यानंतर गेल्या काही वर्षांत जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र २१ एप्रिल रोजी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेने श्रीलंका पुन्हा हादरून गेला. मात्र या हल्ल्यातून सावरून या देशाने केवळ चार महिन्यांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांना धडा शिकवीत देशातील परिस्थितीही पूर्वपदावर आणली आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक पातळीवर देशाला भक्कम करण्यासाठी तेथील सरकारने एक नवा प्रयोग हाती घेतला आहे.

 • देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे. चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा - नेमबाज मेहुली घोषला दुहेरी विजेतेपद :
 • नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातही बाजी मारत राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

 • अनहद जावंडा आणि पारुल कुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे विजेतेपद मिळवले. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने १० मीटर एअर रायफलमध्ये मध्य प्रदेशच्या श्रेया अगरवाल हिच्यावर मात करत २५२ गुणांनिशी विजेतेपद संपादन केले. श्रेयाला २५१.२ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली राजस्थानची अपूर्वी चंडेला २२९.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

 • कनिष्ठ गटात, मेहूलीने पंजाबच्या खुशी सैनी हिचे आव्हान मोडीत काढत २५२.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. खुशीने २४८.८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशची मानसी कठैत २२७.५ गुणांसह तिसरी आली. अनहद याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. केरळचा थॉमस जॉर्ज तिसरा आला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

 • १८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

 • १९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

 • १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.

 • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.

 • १९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.

 • १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

 • १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

 • १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

 • २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

जन्म

 • १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)

 • १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)

 • १८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)

 • १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)

 • १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)

 • १९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)

 • १९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)

 • १९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.

 • १९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.

 • १९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.

 • १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)

 • १९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)

 • १९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

 • १९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)

 • १९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.

 • १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.

 • १९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.

 • १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)

 • १९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.

 • १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)