चालू घडामोडी - १२ एप्रिल २०१८

Date : 12 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुगलचे स्मार्ट स्पीकर्स भारतात दाखल :
  • मनोरंजनासोबत ज्ञान आणि माहितीचा साठा ओतणाऱ्या दोन ‘स्मार्ट स्पीकर्स’चे गुगलने भारतात अनावरण केले. त्यापैकी गुगल होमची किंमत ९,९९९ रुपये आणि गुगल होम मिनीची किंमत ४,४९९ रुपये आहे. या स्पीकर्समुळे भविष्यात जीवनशैली अधिक स्मार्ट होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

  • या स्पीकर्सद्वारे माहिती मिळविता येणार आहे, तसेच घरातील इतर गॅजेट्सवर नियंत्रण करता येणे शक्य असेल. त्यासाठी देण्यात येणाऱ्या अ‍ॅण्ड्रॉइड सहायकावरून त्याला आज्ञा देता येणार आहे.

  • या दोन्ही स्पीकर्सची विक्री ऑनलाइन आणि साडेसातशे दुकानांतून करण्यात येणार आहे. गुगलची स्पर्धा भारतात काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या अ‍ॅमेझॉनच्या स्पीकर्ससोबत होण्याची शक्यता आहे.

  • फ्लिपकार्टवर गुगल होम आणि गुगल होम मिनीसोबत आकर्षक योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात राऊटर मोफत भेट देण्यात येत आहे.

जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, किंमत तब्बल :
  • लंडन : भारतात एखाद्या व्यक्तीने एक लाख किंवा पाच लाखांची नंबर प्लेट खरेदी केली तर ती मोठी बाब समजली जाते. आपल्या कारची नंबर प्लेट स्पेशल आणि हटके असावी यासाठी लोक यापेक्षाही जास्त पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात. पण परदेशात कारच्या व्हीआयपी नंबर प्लेटचा विषय आला तर ही रक्कम एवढी मोठी असते की, आपण त्याचा विचारही करु शकत नाही.

  • युनायटेड किंग्डममध्ये 'F1' हा नंबर अधिकृतरित्या विकण्यासाठी ठेवला असून त्याची किंमत 14 मिलियन पौंड म्हणजेच तब्बल 132 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 'F1' हा नंबर आता स्टेटस बनला आहे. मर्सिडिज-मॅक्लेरेन एसएलआर, कस्टम रेन्ज रोव्हर आणि बुगाटी वेरॉन यांसारख्या कारवर ही नंबर प्लेट लावली जाते.

  • याआधी 2008 मध्ये चार कोटी रुपयांत ह्या नंबर प्लेटची विक्री झाली होती. तर 1904 पासून ह्या नंबर प्लेटचा हक्क अॅक्सेस सिटी काऊन्सिलकडे होता. सध्या F1 नंबरच्या या प्लेटचा हक्क अफझल खान यांच्याकडे आहे. अफझल खान हे कस्टमाईज्ड वाहनं बनवणारी 'खान डिझाईन' या कंपनीचे मालक आहेत.

  • 'फॉर्म्युला वन'चा शॉर्टफॉम 'F1' होतो.  युनायटेड किंग्डमपासून जगभरात असा नंबर असलेली ही प्लेट फारच लोकप्रिय आहे. ही नंबर प्लेट महाग असण्याचं कारण म्हणजे याची केवळ दोन अक्षरं. जर ह्या नंबर प्लेटची विक्री झाली तर ती जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट ठरेल.

मोदींचं दिल्लीत, तर फडणवीसांचं मुंबईत उपोषण :
  • नवी दिल्ली: काँग्रेसच्या इन्स्टंट उपोषणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषण करुन प्रतिउत्तर देणार आहेत.

  • संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपोषण करणार आहेत.

  • मोदी दिल्लीतील आपल्या कार्यालयात, तर अमित शहा कर्नाटकातील हुबळीत उपोषण करतील. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत तर इतर राज्यातील भाजप नेतेही उपोषणाला बसणार आहेत.

  • सकाळी 11 ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत हे आत्मक्लेष उपोषण करण्यात येणार आहे. दरम्यान याच मुद्द्यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओविसी यांनी मोदींवर टिका केली.

अकोला सर्वात 'हॉट', देशातील उच्चांकी तापमान :
  • मुंबई : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अकोलेकरांना मे महिन्याचा अनुभव येत आहे. महाराष्ट्रातील अकोला हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. अकोल्यात आज तब्बल 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. स्कायमेटने या खासगी हवामान संस्थेने दिली आहे.

  • मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तापमानत घट झाली होती. त्यामुळे अनेक शहरांमध्ये उन्हापासून दिलासा मिळाला होता. परंतु महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात अजूनही तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे.

  • ढगाळ वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कमी झाली होती. मात्र आता पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. सर्वाधिक तापमान असणाऱ्या देशातल्या पहिल्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा समावेश आहे. त्यामुळे उन्हामध्ये घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण :
  • नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पीएसएलव्ही-सी 41 रॉकेटमधून IRNSS-1आय उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं.

  • विशेष म्हणजे IRNSS-1आय हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे. IRNSS-1I या सॅटेलाइटचं वजन 1425 किलोग्राम आहे. तसेच त्या उपग्रहाची लांबी 1.58 मीटर, उंची 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असून, हा उपग्रह बनवण्यासाठी 1420 कोटी रुपयांइतका खर्च आला आहे.

  • या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. 

  • गेल्या काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. GSAT-6A या उपग्रहाचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी संपर्क खंडित झाला. यामुळे शास्त्रज्ञांबरोबरच लष्करालाही मोठा झटका बसला. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं गुरुवारी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 

निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी फेसबुक कटिबद्ध :
  • वॉशिंग्टन : आगामी काळात भारत, मॅक्सिको, पाकिस्तान, ब्राझिल, अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राहिल यासाठी फेसबुक पूर्ण काळजी घेणार आहे, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेससमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे. यावेळी त्यांनी माफीनामाही सादर केला.

  • लाखो लोकांची वैयक्तिक माहिती फेसबुकवरुन केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने चोरुन तिचा काही निवडणुकांच्या कामासाठी वापर केल्याची प्रकरणे उजेडात आल्याने खळबळ माजली. त्यासंदर्भात झुकरबर्ग यांची दोन दिवस साक्ष होईल.

  • झुकरबर्ग यांनी माफीनाम्यात म्हटले की, फेसबुक वापरकर्त्यांच्या माहितीचे संरक्षण तसेच निवडणुकांमध्ये होणारा परकीय हस्तक्षेप या मुद्द्यांवर कंपनीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. या मुद्द्यांसंदर्भात यापुढे कोणालाही तक्रारीला वाव मिळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. याआधीही झुकरबर्गनी फेसबुक वापरकर्त्यांची जाहीर माफी मागितली होती.

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स टुलचा वापर सुरु फ्रान्स, जर्मनीमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या तीन निवडणुकांवेळी मात्र फेसबुक दक्ष राहिले होते. या निवडणुकांवर प्रभाव पाडू शकणारी काही हजार अकाऊंट त्यावेळी बंद केली होती. आता फेसबुकने नवीन आर्टि फिशियल इंटेलिजन्स टुलचा वापर सुरु केला असल्याचे झुकरबर्ग म्हणाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६०६: ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

  • १९३५: प्रभात चा चंद्रसेना  हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • १९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

  • १९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

  • १९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.

  • १९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

  • १९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

  • १९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

  • २००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.

जन्म

  • ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.

  • १४८२: मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १५२८)

  • १८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)

  • १९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)

  • १९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी१९९५)

  • १९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट१९७८)

  • १९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म.

  • १९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.

  • १९५४: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८९)

मृत्यू

  • १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १६६२)

  • १८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन. (जन्म: २६ जून १७३०)

  • १९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)

  • १९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८२१)

  • १९४५: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १८८२)

  • २००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९६०)

  • २००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२१)

  • २००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्‍नाळ यांचे निधन.

  • २००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.