चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ एप्रिल २०१९

Date : 12 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऐतिहासिक क्षण! कृष्णविवराचा पहिला फोटो नासाकडून प्रसिद्ध :
  • न्यू यॉर्क: नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच कृष्णविवराचा (ब्लॅकहोल) फोटो प्रसिद्ध केला. वैज्ञानिक जगताच्या दृष्टीनं ही मोठी कामगिरी मानली जात आहे. या कृष्णविवरातून गॅस आणि प्लाझ्माच्या नारंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसत आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 4 हजार कोटी किलोमीटर दूर आहे. युरोपियन टेलिस्कोपनं (इवेंट हॉरिझन टेलिस्कोप) कृष्णविवर चित्रीत केला आहे. यासाठी जगभरात सहा टेलिस्कोप लावण्यात आले होते. 

  • कृष्णविवराच्या प्रकल्पावर मोठ्या संख्येनं वैमानिक काम करत होते. यासाठी हवाई, ऍरिझोना, स्पेन, मेक्सिको, चिली आणि दक्षिण ध्रुवावर इवेंट हॉरिझन टेलिस्कोप लावण्यात आले होते. या टेलिस्कोप्सची निर्मिती कृष्णविवराचा फोटो टिपण्यासाठी करण्यात आली होती. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता नासानं कृष्णविवराचे फोटो जारी केले. 

  • कृष्ण विवर म्हणजे काय - कृष्णविवर ही काही तार्‍यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचं गुरुत्वाकर्षण इतके जास्त असतं की, प्रकाशदेखील त्यांपासून सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्‍यांना कृष्णविवर म्हणतात. 

भारताची लोकसंख्या पोहोचली १३६ कोटींवर; वाढीचा दर चीनपेक्षा दुप्पट :
  • भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. २०१० ते २०१९ या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • २०१९ मध्ये भारताची लोकसंख्या १३६ कोटींवर पोहोचली आहे. १९९४ मध्ये ती ९४.२२ कोटी इतकी होती. तत्पूर्वी १९६९ मध्ये ती ५४.१५ कोटी इतकी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० आणि २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येत १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी इतकी होती. या अहवालानुसार, भारतात १९६९ मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के इतका होता. तो १९९४ मध्ये ३.७ टक्के राहिला. मात्र, भारताने जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.

  • १९६९ मध्ये जन्माबरोबरच सरासरी आयुर्मान हे ४७ वर्ष होते. १९९४ मध्ये ६० वर्ष झाले त्यानंतर २०१९ मध्ये ते ६९ वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर ७२ वर्ष आहे. अहवालात २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष इतके आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.

१०२ वर्षीय आजोबांचे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान :
  • अकोला : यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील राळेगाव येथील १०२ वर्षीय आजोबांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अनोखा विक्रम रचला. पुखराज उमीचंद बोथरा (१०२) यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावला. या वयातही ते आपले राष्ट्रीय कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याबद्दल प्रशासनाने त्यांचा गौरव केला.

  • यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव येथील २१४ मतदान केंद्रावर पुखराज उमीचंद बोथरा यांचे मतदान विशेष आकर्षण ठरले. स्वतंत्र भारताच्या १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीत पुखराज बोथरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

  • आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठय़ा हिरिरीने त्यांनी मतदान केले. मतदानासाठीचा त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा होता.

  • त्यामुळे प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुखराज बोथरा यांचे स्वागत केले. बोथरा यांचा आदर्श सर्वानी घ्यायला हवा, असे हिंगे म्हणाले.

पॅरालिम्पिकपटू दीपा मलिकला हिलरी शिष्यवृत्ती :
  • नवी दिल्ली : रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या दीपा मलिकला तिच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल यंदाच्या वर्षीची न्यूझीलंड पंतप्रधानांकडून सर एडमंड हिलरी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

  • ४८ वर्षीय दीपाने २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमधील गोळाफेक (एफ ५३) प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. तिला ही शिष्यवृत्ती भारत आणि न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्नेहसंबंधात सुधारणा व्हावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने देण्यात येणार आहे.

  • ‘‘भारताच्या दीपाला ही शिष्यवृत्ती जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेर्न यांनी दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होण्याच्या उद्देशाने ती जाहीर केली आहे,’’ असे न्यूझीलंडच्या उच्चायुक्त जोन्ना केम्पकर्स यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

पुणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या ६१ लाखांवर :
  • पुणे : जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येने ६१ लाखांचा टप्पा पार केला असून त्यामुळे पुणे शहर व लगतच्या भागातील वाहनांची संख्या जवळपास ३९ लाख एवढी झाली आहे. तसेच मागील दोन वर्षाच्या तुलनेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१८-१९ मध्ये वाहनांची नोंदणी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. मागील वर्षभरात जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत सुमारे साडे चार लाखांची भर पडली आहे. त्यामध्ये तब्बल ३ लाख केवळ दुचाकी आहेत.

  • मागील काही वर्षांपासून पुणे शहर व लगतच्या परिसरातील उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी वेगाने वाढत गेल्याने लोकवस्तीही वाढली आहे. त्यामुळे या भागातील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत गेली. ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढीचा वेग अधिक आहे. आरटीओच्या पुणे विभागामध्ये पुणे (एमएच १२), पिंपरी चिंचवड (एमएच १४) व बारामती (एमएच ४२) हे तीन जिल्ह्यातील विभाग आहेत. त्याचबरोबर सोलापुर व अकलुज हे दोन विभागही येतात.

  • जिल्ह्याचा विचार केल्यास पुण्यामध्ये शहरासह सासवड, शिरूर, भोर, वेल्हा, हवेली तर पिंपरी चिंचवडमध्ये शहरासह जुन्नर, मावळ, लोणावळा, खेड हा भाग येतो. बारामतीअंतर्गत बारामतीसह इंदापुर व दौंड हे तीन तालुके आहेत.

  • आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एकुण वाहनांची संख्या मार्च २०१८ अखेरीस ३८ लाख ८८ हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये साहजिकच पुणे शहराचा वाटा अधिक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १८ लाख ७५ हजार तर बारामतीमध्ये ४ लाख ६ हजार अशी एकुण ६१ लाख ७० हजार वाहने विभागात नोंदविली गेली आहेत. मागील वर्षभरात पुण्यामध्ये २ लाख ६१, पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ५४ हजार तर बारामतीमध्ये ३१ हजार ५०० वाहनांची नोंदणी झाली.  

स्मृती इराणींच्या संपत्तीत वाढ; ८९ लाख रुपये बँक खात्यात :
  • नवी दिल्ली : अमेठी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या शपथपत्रात 4.71 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्यावेळी निवडणुकीत त्यांची मालमत्ता फक्त 26.98 लाख रुपये इतकी होती. 

  • स्मृती इराणी यांनी आपल्या शपथपत्रात 1.75 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 2.96 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. यात 1.45 कोटी रुपये किमतीची शेतजमीन आणि 1.50 कोटी रुपयांची निवासी इमारत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, यानुसार 31 मार्चपर्यंत स्मृती इराणी यांच्याजवळ 6.24 लाख रोख रक्कम आणि बँक खात्यात 89 लाखहून अधिक रक्कम जमा आहेत. त्यांच्याजवळ राष्ट्रीय बचत योजना आणि पोस्ट खात्यात 18 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे.

  • तर,  13.14 लाख रुपये इतक्या किमतीच्या गाड्या आणि 21 लाख रुपयांचे सोने आहे. याशिवाय, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. तसेच, त्यांच्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. याचबरोबर, 2014 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवताना स्मृती इराणी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून 1994 मध्ये बीकॉम पार्ट-1 चे शिक्षण घेतल्याची माहिती होती. मात्र आता त्यांनी आपण 3 वर्षांचा कोर्स पूर्ण न केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. 

  • दरम्यान, स्मृती इराणी या अमेठी मतदार संघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना  चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी यांनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • १९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

  • १९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

  • १९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.

  • १९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

  • १९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

  • १९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

जन्म 

  • १८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)

  • १९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)

  • १९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)

  • १९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)

  • १९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म.

  • १९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन. (जन्म: २६ जून १७३०)

  • १९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)

  • १९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८२१)

  • १९४५: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १८८२)

  • २००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९६०)

  • २००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.