चालू घडामोडी - १२ डिसेंबर २०१८

Date : 12 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील सर्व रक्कम काढणे आता करमुक्त; केंद्र सरकारचा निर्णय :
  • नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील (एनपीएस) निवृत्तीच्या वेळी काढण्यात येणारी सर्व रक्कम १०० टक्के करमुक्त करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. देशभरातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. एनपीएसमधील सरकारचे योगदान मूळ वेतनाच्या १० टक्क्यांवरून १४ टक्के करण्यात येत असल्याचेही त्यांनी घोषित केले. सरकारचे १४ टक्के आणि कर्मचाºयाचे १० टक्के असे २४ टक्के योगदान या योजनेत आता असेल.

  • जानेवारी २००४ मध्ये सरकारी कर्मचाºयांसाठी एनपीएस योजना सुरू करण्यात आली होती. नंतर २००९ मध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही ही योजना खुली करण्यात आली. एनपीएसमधील निवृत्ती वेतनासाठी वापरली जाणारी ४० टक्के रक्कम सध्या करमुक्त असून, ६० टक्के रक्कम एनपीएसधारक निवृत्तीच्या वेळी काढू शकतो. त्यातील ४० टक्के रक्कम करमुक्त असून २० टक्के रक्कम करपात्र आहे. नव्या निर्णयानुसार, ही सर्व ६० टक्के रक्कमही आता करमुक्त होईल.

  • वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, नवे बदल कधीपासून अमलात आणायचे याची तारीख अद्याप ठरलेली नाही. ती लवकरच जाहीर केली जाईल. असे बदल सामान्यत: नव्या वित्त वर्षापासून अमलात आणले जातात. कारण त्यासाठी वित्त विधेयकात बदल करणे आवश्यक असते. 

  • २८४0 कोटींचा जादा बोजा - सूत्रांनी सांगितले की, वाढीव सरकारी योगदानाची अंमलबजावणी येत्या जानेवारीपासूनच केली जाण्याची शक्यता आहे. तथापि, कर सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी नव्या वित्त वर्षापासूनच होईल. या बदलामुळे वाढीव योगदानापोटी २०१९-२० या वित्त वर्षात सरकारच्या तिजोरीवर २,८४० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

शक्तीकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर :
  • नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी काल रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. शक्तीकांत दास आरबीआयचे  25 वे गव्हर्नर ठरले आहेत.

  • शक्तीकांत दास यांनी केंद्रीय वित्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नोटाबंदीच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवहार सचिव, भारताचे राजस्व सचिव पदी काम केलं आहे.

  • कोण आहेत शक्तीकांत दास - शक्तीकांत दास 1980च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत. गेल्या निवृत्तीनंतर दास भारताच्या 15 व्या वित्त आयोग आणि शेरपा जी-20 मध्ये सदस्य आहेत. याआधी दास यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये अर्थ विभागात काम केलं आहे. दास यांनी रिझर्व्ह बँकेचं कामकाज जवळून पाहिलं आहे.

कठीण परिस्थितीवर मात करीत रेश्माची उत्तुंग भरारी :
  • अत्यंत हलाखीची परिस्थिती, १५ बाय १०च्या खोलीत आठ जणांचे वास्तव्य, वडील ट्रकचालक तर मोलमजुरी करणाऱ्या आईमुळे घराचा चरितार्थ चालत असतानाही बदलापूरच्या रेश्मा राठोडने खो-खो खेळात उत्तुंग भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले. प्रत्येक क्षणाला तारेवरची कसरत करीत रेश्माने भोपाळ येथे झालेल्या कुमार-कुमारी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत प्रतिष्ठेचा जानकी पुरस्कार पटकावतानाच महाराष्ट्राला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी रेश्मा सज्ज झाली आहे.

  • मला सर्व सोयी-सुविधा मिळाव्या याकरिता आई-वडिलांनी खूप कष्ट सोसले. आता माझ्या खेळामार्फत त्यांना सुख-समृद्धीचे दिवस दाखवायचे आहेत, असा संकल्प भारताची युवा खो-खोपटू रेश्मा राठोडने मनाशी बांधला आहे. बदलापूर येथील शांतीनगर परिसरात एका छोटय़ाशा खोलीत आई-वडील, चार भावंडे, वहिनी व भाची अशा एकूण आठ जणांसह राहणाऱ्या रेश्माने वयाच्या १०व्या वर्षी खो-खो खेळण्यास सुरुवात केली.

  • शिवभक्त विद्यामंदिर शाळेकडून खेळणाऱ्या रेश्माने शालेय स्तरावर अनेक पुरस्कारांवर नाव कोरले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल ती म्हणते, ‘‘शाळेत असताना माझ्या वरच्या वर्गातील मुलींना मी मैदानावर खो-खो खेळताना पाहायचे. तेथूनच मला खो-खोविषयी आवड निर्माण झाली. प्रशिक्षक नरेंद्र मेंगळ आणि पंढरीनाथ म्हस्कर यांच्या मार्गदर्शनामुळे माझी शालेय संघात निवड झाली व तेथूनच माझ्या कारकीर्दीने वेग पकडला.’’

  • रेश्माचे वडील सुभाष हे ट्रॅक्टरचालक असून तिची आई घमीबाई मजुरीचे काम करते. मोठा भाऊ लक्ष्मण हा जिल्हास्तरीय कबड्डीपटू म्हणून स्वत:चे नशीब अजमावत आहे. रेश्मा सध्या आदर्श महाविद्यालयात १२वीच्या इयत्तेत शिकत असून अभ्यासाबरोबरच स्वत:च्या सरावाच्या तालमीही योग्यपणे सांभाळत आहे. जानकी पुरस्कार मिळवला असला तरी, आयुष्यात अद्याप बराच मोठा पल्ला गाठण्याची रेश्माची इच्छा आहे. 

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु, राज्यपालांकडे मागितली वेळ :
  • भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप स्पष्ट झाले नाहीत. काँग्रेस आणि भाजपमध्ये अद्यापही याठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

  • सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी काँग्रेसने आज रात्री राज्यपालांना भेटण्याची वेळ मागितली आहे. एक फॅक्स आणि ई-मेलद्वारे काँग्रेसने राज्यपालांकडे भेटण्याची वेळ मागितली आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे सर्व निकाल स्पष्ट केले जातील, त्यानंतर वेळ देण्यात येईल, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

  • दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जल्लोष करण्यास आधीच सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमध्ये सकाळपासूनच काँग्रेस-भाजपमध्ये चढाओढ सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचं अभिनंदन केल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे जवळपास निश्चित झालं आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, राज्यात सर्वत्र जल्लोष सुरु आहे.

  • मध्य प्रदेशमध्ये आता मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा रंगू लागल्या आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव त्याठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.

मोदी-शाह काठावर पास, राहुल गांधी मेरीटमध्ये - सामना :
  • मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला एकाही राज्यात सत्ता स्थापन करण्यास यश आलेलं नाही. त्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडगोळीवर तोंडसुख घेतलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपचे कान टोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी 'मेरिट'मध्ये चमकल्याचा निकाल लागला, असं 'सामना'त म्हटलं आहे.

  • 'मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तिथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, मोदी आणि शाह यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'चं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली' अशा शब्दात 'सामना'तून शरसंधान साधलं आहे.

  • 'जनतेनेच 'भाजपमुक्त'चा संदेश आता दिला आहे. पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले. जनतेच्या धैर्यास साष्टांग दंडवत!' असं म्हणत शिवसेनेने मतदारांचं कौतुक केलं आहे.

  • 'भाजपला एकाही राज्याचं गणित धडपणे सोडवता आलं नाही आणि राहुल गांधी यांचा 'पेपर' कोरा आहे, असं ज्यांना वाटत होतं, त्यांची गणितं कोलमडली आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शहा जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी 'मेरिट' म्हणजेच गुणवत्ता यादीत चमकल्याचा निकाल लागला' अशा भावना सामनातून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

मुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर :
  • मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात येणार आहे.

  • शनिवार, दिनांक १५ डिसेंबर २०१८ला  दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.

  • या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत ‘अस्मिता’ हा रसिकमान्य कार्यक्रम सादर केला जाईल. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ या दोन चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत. याला संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे यांचे असणार आहे. ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.

  • स्मिता पाटील या प्रतिभावंत कलाकारावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तिच्या चित्रपटांना आणि अविस्मरणीय अभिनयाला रसिकांनी मनापासून दाद दिली. तिला पद्मश्रीसहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१७’ हा जेष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना देण्यात आला होता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन.

  • १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

  • १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.

  • २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

  • २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.

जन्म 

  • १८९२: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च१९६५)

  • १९०५: लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)

  • १९०७: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)

  • १९२७: इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९०)

  • १९४०: राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म.

  • १९५०: प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९९१: शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन.

  • १९९२: साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)

  • २०००: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)

  • २००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)

  • २०१२: सतार वादक, भारतरत्‍न पण्डित रवी शंकर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२०)

  • २०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)

  • २०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.