चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१८

Updated On : Jan 12, 2018 | Category : Current Affairs‘इस्रो’चे शतक: ३१ उपग्रहांसह ‘पीएसएलव्ही सी-४०’ अंतराळात झेपावले :
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने शुक्रवारी नवा इतिहास रचला. ‘इस्रो’चे पीएसएलव्ही सी- ४० हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अंतराळात झेपावले. यात तीन भारतीय तर २८ विदेशी उपग्रहांचा समावेश आहे.

 • अवकाशात झेपावलेले ‘इस्रो’चे हे शंभरावे उपग्रह आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

 • भारत के अंतरिक्ष कार्यक्रम में आज दिन बना ऐतिहासिक, @isro ने किया अपने 100वें उपग्रह का प्रक्षेपण

मोदींनी ‘अपॉइंटमेंट’च दिली नाही, आता लोकांसमोर जाऊन बोलणार- यशवंत सिन्हा :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मला अनेक विषयांवर बोलायचे होते. मात्र, वारंवार त्यांच्या भेटीची वेळ मागूनही ते मला एकदाही भेटले नाहीत. त्यामुळेच मी माझे विचार जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सांगितले. ते जबलपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

 • यावेळी त्यांनी म्हटले की, आता वरिष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांना भेटायलाही पक्षाध्यक्षांना वेळ मिळत नाही. त्यामुळं १३ महिने झाले तरी मला भेटीची वेळ मिळू शकली नाही, याचं आश्चर्य वाटत नाही. १३ महिन्यांपूर्वी मी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती. ती अद्यापही मिळू शकली नाही. त्यामुळं आता मी यावर कुणाशीही चर्चा करणार नाही. जे बोलायचे ते जाहीरपणे बोलणार असल्याचे सिन्हा यांनी म्हटले.

 • आताचा भाजप पक्ष अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या काळातील राहिलेला नाही. त्यांच्या काळात पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ताही दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष आडवाणींची भेट घेऊ शकत होता, असे सांगत त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अमित शहा मोदींना लाडू भरवत असतानाच्या एका छायाचित्रावरूनही टिप्पणी केली.

 • या छायाचित्रात व्यासपीठावर राजनाथ सिंह, अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि अन्य नेते दिसत नाहीत. मात्र, अडवाणी छायाचित्रात कुठेच दिसत नाहीत. ते आता ‘महत्त्वाचे’ कार्यकर्ते राहिले नसून ‘सामान्य’ कार्यकर्ते झाले आहेत, असे उपरोधिक वक्तव्य सिन्हा यांनी केले.

श्रीहरीकोटा येथून इस्त्रोची शंभरावी गगनभरारी :
 • बंगळुरू  - अंतराळ विश्वात भारतानं नवा इतिहास रचला आहे.  आज इस्त्रोनं उपग्रह पाठवण्याचं शतक पूर्ण केले आहे.  भारताचा 100 वा उपग्रह इस्त्रो शुक्रवारी सकाळी (12 जानेवारी) श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला आहे. पीएसएलव्ही सी 40 या अग्निबाणाच्या सहाय्यानं कार्टोसॅट 2 मालिकेतील उपग्रह अवकाशात भरारी घेतली.  

 • शुक्रवार सकाळी 9.28 वाजता एकत्र 31 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये 3 भारतीय व 28 परदेशी उपग्रहांचा समावेश आहे. यात कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. 

 • खासगी क्षेत्राच्या सहभागातून बनवलेला पहिला भारतीय उपग्रह आयआरएनएसएस- 1 एच हा प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न चार महिन्यांपूर्वी अयशस्वी ठरला होता. पीएसएलव्ही अग्निबाणानं आजवर 41 वेळा उपग्रहांसह अवकाशात भरारी घेतली होती.  

खासदारांचा पगार दुपटीनं वाढण्याची शक्यता, आज समितीची बैठक :
 • नवी दिल्ली : आपल्या खासदारांची घसघशीत पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पगारवाढीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक आज (शुक्रवार) नवी दिल्लीत होणार आहे. यात खासदारांचा पगार दुप्पट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 • सध्या खासदारांचा पगार ५० हजार असून, मतदारसंघातील दौऱ्यासाठी ४५ हजार आणि संसदेतील विविध बैठकीसाठी २ हजार रुपये देण्यात येतात.

 • मात्र, आता खासदारांचा पगार १ लाखापर्यंत करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं आहे. भाजपचे खासदार बंडारु दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखालील १५ सदस्यीय समिती यासंदर्भात दुसऱ्यांदा बैठक घेणार आहे.

 • दरम्यान, जुलै २०१५ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा निर्णय घेतला होता. मात्र सरकारने अंमलात आणला नव्हता.

गुरुत्वीय लहरी संशोधनात भारताची प्रशंसनीय कामगिरी :
 • लायगो प्रकल्पांतर्गत गुरूत्वीय लहरींच्या संशोधनात भारताची भूमिका प्रशंसनीय होती यात शंकाच नाही, असे मत लायगो प्रकल्पातील प्रमुख वैज्ञानिक व नोबेल विजेते कीप थॉर्न यांनी व्यक्त केले आहे.

 • त्यांनी सांगितले की, या प्रकल्पात तीन प्रमुख भाग होते; त्यातील डिटेक्टर उभारणीच्या कामात भारताचा फारसा सहभाग नव्हता. पण प्रायोगिक पातळीवर गुरूत्वीय लहरींचा आकार व इतर घटक लायगो प्रयोगातून मिळालेल्या माहितीतून शोधून काढण्यात भारताचा मोठा वाटा होता. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरीतून या गुरूत्वीय लहरी निर्माण झाल्या त्या लायगो प्रकल्पात टिपण्यात आल्या. माहितीचे विश्लेषण हा यात तिसरा महत्त्वाचा भाग होता.

 • त्यात जर्मनीचे बेर्नार्ड शुत्झ यांचे मूलभूत काम होते पण त्यांनीच नंतर आयुकाचे संजीव धुरंधर यांना माहितीचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण दिले होते. धुरंधर यांनी सत्यप्रकाश यांच्या बरोबर काम केले, लायगो इंडियाचे बाला अय्यर यांनी गुरूत्वीय लहरींचा आकार मोजण्यात मोठी कामगिरी केली, त्यामुळे भारताची भूमिका यात मोठीच होती यात शंका नाही.

 • अनेक मोठय़ा विज्ञान प्रकल्पांना झाला तसा विरोध लायगो प्रकल्पास अमेरिकेतही झाला होता. खगोलशास्त्रज्ञांच्याच एका गटाने ३०० दशलक्ष डॉलर्स या प्रयोगासाठी खर्च करण्यास विरोध दर्शवला होता पण तरीही आम्ही हा प्रकल्प पुढे नेला. अमेरिकी काँग्रेसने १९९२ मध्ये निधी दिला व नंतर उपकरणांमध्ये जशी प्रगती होत गेली तसे यश समोर दिसत गेले. पहिल्या टप्प्यातील उपकरणातून गुरूत्वीय लहरींचा शोध लागणे अवघड होते. 

 • ४५ वर्षांपूर्वी रेनर वेस यांनी गुरूत्वीय लहरी शोधक यंत्राची कल्पना मांडली होती. , यावर मी पन्नास वर्षांपूर्वी काम सुरू केले. यात शोधक यंत्राची रचना ठरवण्यात चार वर्षे गेली. हा प्रयोग यशस्वी होईल याबाबत मला शंका नव्हत्या.

अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या आरोपीला २३ फेब्रुवारीला देणार मृत्युदंड :
 • वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

 • रघुनंदन यांदामुरी असे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकाचे नाव आहे. त्याने 61 वर्षीय भारतीय महिलेचे आणि तिच्या दहा महिन्यांच्या नातीचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयात खटला चालून 2014 साली त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता 23 फेब्रुवारीला विषारी इंजेक्शन देऊन त्याला मृत्युदंड देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

 • पेनसिल्व्हेनियाच्या गव्हर्नरनी 2015 साली कायद्यातून मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिलेला असल्याने रघुनंदन याला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी रद्द होऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.टाइम्स हेराल्ड या स्थानिक वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार यांदमुरी याला मृत्युदंड देण्यासाठी 23 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आलेली असली तरी गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी मृत्युदंडाची शिक्षा रद्द केलेली असल्याने त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेमध्ये बदल होऊ शकतो.  

 • मूळचा आंध्र प्रदेशमधील असलेला यांदमुरी हा एच-1बी व्हिसा घेऊन अमेरिकेत आला  होता. त्याने इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवी घेतलेली होती. मात्र खुनाच्या गुन्ह्यात अडकल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात झाली होती. मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने या शिक्षेविरोधात दाद मागितली होती. मात्र त्याने केलेले अपील गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात फेटाळून लावण्यात आले होते.

दिनविशेष

जागतिक दिवस

 • जागतिक युवा दिन.

महत्वाच्या घटना

 • १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

 • १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

 • १९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

 • १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

 • १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.

 • २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

 • २००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.

जन्म

 • १५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)

 • १८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)

 • १८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२)

 • १८९३: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९४६)

 • १८९९: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)

 • १९०२: महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९६९)

 • १९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)

 • १९१७: महर्षी महेश योगी यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)

 • १९१८: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)

मृत्यू

 • १९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४)

 • १९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १८९६)

 • १९७६: इंग्लिश रहस्यकथालेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)

 • १९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)

 • १९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचे निधन.

 • २००५: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन. (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)

टिप्पणी करा (Comment Below)