चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९

Updated On : Jan 12, 2019 | Category : Current Affairsसीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मा यांचा राजीनामा :
 • नवी दिल्ली : सीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मांची सीबीआय संचालक पदावरून हकालपट्टी केल्यानंतर एकाच दिवसात आलोक वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. मला अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे असे वर्मा यांनी आपल्या राजीनाम्याच्या अर्जात म्हटले आहे.

 • सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांची मोदी सरकारकडून कालच उचलबांगडी करण्यात आली होती. यासंदर्भात पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांच्या सिलेक्ट कमिटीकडून 2-1 बहुमताने निर्णय घेण्यात आला होता. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करताना हा निर्णय सिलेक्ट कमिटीकडे सोपवला होता. सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी म्हणून न्यायमूर्ती सिकरी या बैठकीला उपस्थित होते. तिघांपैकी केवळ विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांचा बचाव केला होता.

 • सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सीव्हीसीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आलोक वर्मा पुन्हा सीबीआयचे संचालक म्हणून परवा रुजू झाले होते. आलोक वर्मा यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता तो अवघ्या 24 तासांचा ठरला होता. आम्ही जरी आलोक वर्मांच्या बाजूने निर्णय दिला असला तरीही त्यांच्या पदाचे काय करायचे? याचा निर्णय हा सिलेक्ट कमिटीचा म्हणजेच निवड समितीचा असेल असेही कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आलोक वर्मा यांना कोर्टाने दिलेला दिलासा अवघा चोवीस तासांचा ठरला आहे. दोन विरूद्ध एक अशा मतांनी आलोक वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली होती.

 • सीबीआयमध्ये सुरु असलेल्या वादावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, "आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यापूर्वी निवड समितीची सहमती घ्यायला हवी. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटवलं ते घटनाबाह्य आहे." या निर्णयानंतर आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआय प्रमुख कार्यभार स्वीकारला होता. परंतु आलोक वर्मा कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नव्हते. आलोक वर्मा यांचा कार्यकाळ जानेवारी अखेरपर्यंत आहे.

खुल्या वर्गातील उमेदवारांना दिलासा, लोकसेवा परीक्षेसाठी अधिक संधी :
 • नवी दिल्ली : खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. या निर्णयामुळे देशभरातील खुल्या वर्गातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी वयाची अट आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे प्रयत्न, यामध्ये समान संधी मिळणार आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेचाही समावेश असेल.

 • एकदा का हे आरक्षण लागू झालं, खुल्या वर्गातील नोकरी इच्छुकांना ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांप्रमाणेच संधी मिळणार आहे. ओबीसी उमेदवारांची सध्याची वयोमर्यादा 35 वर्षे असून लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 9 संधी मिळतात. मात्र खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट 32 वर्षे असून त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ सहा वेळा संधी मिळतात. तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवरांना वयाची अट 37 वर्षे असून परीक्षा पास होण्यासाठी कोणत्याही आकड्याची मर्यादा नाही.

 • मागास प्रवर्गातील उमेदवारांना जे नियम लागू होतात, तेच खुल्या वर्गातील उमेदवारांना लागू करण्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत. आठ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबीक उत्पन्न असणाऱ्या खुल्या वर्गातील लोकांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. ओबीसी उमेदवारांसाठी ठरवलेल्या क्रिमी लेअरप्रमाणेच हा नियम आहे. सरकार संपूर्ण विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्याची शक्यता आहे.

 • लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मंजूर - सरकारने 124 वी घटनादुरुस्ती करुन लोकसभेत 8 जानेवारी रोजी बहुमताने मंजूर झालं. तर राज्यसभेत 9 जानेवारी रोजी विधेयकाला मंजुरी मिळाली. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रुपांत होईल. या कायद्याअंतर्गत सरकारी नोकरी, सरकारी शिक्षणसंस्थांसह खासगी महाविद्यालयांमध्येही आरक्षण मिळू शकेल

ऐतिहासिक विजयानंतर वनडेसाठी टीम इंडिया सज्ज :
 • सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील वन डे सामन्यांच्या मालिकेला आज सिडनीतून सुरुवात होत आहे. इंग्लंडमधील आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही मालिका महत्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय साजरा करणारी टीम इंडिया आता वन डे विश्वचषकाच्या आव्हानासाठी सज्ज होत आहे.

 • विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेतला सलामीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येत आहे.

 • ऑस्ट्रेलियातील वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजीची मदार ही प्रामुख्यानं कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर राहिल. त्या तिघांनीही 2018 या कॅलेंडर वर्षात धावांचा रतीब घातला आहे. विराटनं गेल्या वर्षी 14 सामन्यांत सहा शतकं आणि तीन अर्धशतकांसह 1202 धावा फटकावल्या आहेत. रोहितनंही 19 सामन्यांत 1030 धावांचा डोलारा उभारताना तीन शतकं आणि पाच अर्धशतकं ठोकली आहेत. शिखर धवननं गेल्या वर्षभरात तीन शतकं आणि दोन अर्धशतकांसह 897 धावांचं योगदान दिलं आहे. त्या तिघांशिवाय अनुभवी महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्यामुळे भारतीय फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.

 • भारतीय संघाची ऑस्ट्रेलियन भूमीवरची आजवरची वन डेतली कामगिरी ही तितकी समाधानकारक नाही. भारतानं ऑस्ट्रेलियातील 48 वन डे सामन्यांत तब्बल 35 वेळा पराभवाची कटू चव चाखली आहे. 1985 सालची वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि 2007 सालच्या तिरंगी मालिकेचा अपवाद वगळता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मोठं यश मिळालेलं नाही.

 • विराट कोहलीची टीम इंडिया त्या साऱ्या अपयशाचं उट्टे काढायला सज्ज झाली आहे. विराटची टीम इंडिया हा आजच्या घडीचा सर्वोत्तम वन डे संघ आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीतील ही तफावत लक्षात घेता या मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भारी असल्याचं चित्र समोर उभं राहातं.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांचा राजीनामा :
 • नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसई) अध्यक्ष अशोक चावला यांनी शुक्रवारी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याआधी काही वेळापूर्वीच केंद्र सरकारला सीबीआयमार्फत एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला भरण्याला परवानगी मिळाली होती. या महत्वपूर्ण घडामोडीनंतर लगेचच चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

 • मात्र, एनएसईकडून शुक्रवारी रात्री चावला यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा करताना कोणतीही विशेष माहिती देण्यात आली नव्हती. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) एनएसईमधील को-लोकेशन सुविधेतील तृटींवर काम करीत आहे. काही दलालांना एक्सचेंद्वारे तीव्र फ्रिक्वेन्सीच्या सुविधेत अस्विकारार्ह सेवा उपलब्ध करुन दिली आहे किंवा नाही याचाही सेबी शोध घेत आहे.

 • माजी वित्त सचिव असलेले चावला हे २८ मार्च २०१६ रोजी एनएसईचे अध्यक्ष बनले. त्यांनी भारतीय नागरविकास विमान सचिवही म्हणूनही काम पाहिले आहे. चावला यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये येस बँकेच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला होता.

 • यापूर्वी सीबीआयने दिल्लीच्या एका कोर्टात सांगितले होते की, केंद्राने पाच लोकांविरोधात खटला भरण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये विद्यमान आणि काही माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहेत. हे लोक काँग्रेस आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील आरोपी आहेत.

माजी बँकर आणि आपच्या नेत्या मीरा सन्याल यांचे निधन :
 • बँकिंग क्षेत्रातील आपली उत्कृष्ट वाटचाल सोडून राजकारणात प्रवेश केलेल्या मीरा सन्याल यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले, त्या ५७ वर्षांच्या होत्या. aत्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.

 •  

 • त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे सन्याल यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. देशाने एका तल्लख मेंदू आणि सभ्य आत्म्याच्या व्यक्तीला गमावले आहे, असे भावनिक ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

 • राजकारणात प्रवेश करताना सन्याल यांनी आपले ३० वर्षांचे उज्ज्वल बँकिंग करिअर सोडण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. कोची येथे जन्मलेल्या सन्याल यांनी एबीएन अॅम्रो या परदेशी बँकेच्या आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट फायनान्सच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

 • मीरा सन्याल यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघातून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

एप्रिलमध्ये चांद्रयान-२ चे प्रक्षेपण :
 • भारताची दुसरी चंद्र मोहिम एप्रिल अखेरीस प्रत्यक्षात येऊ शकते. वेगवेगळया कारणांमुळे आतापर्यंत तीन वेळा चांद्रयान-२ मोहिम पुढे ढकलावी लागली आहे. काही चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे आम्ही मार्च-एप्रिलचा विचार करत आहोत. त्यात एप्रिल अखेरीस चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होऊ शकते असे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोचे चेअरमन के.सिवन यांनी शुक्रवारी सांगितले.

 • एप्रिलमध्येही मोहिम प्रत्यक्षात आली नाही तर जूनपर्यंत मोहिम पुढे ढकलावी लागेल. २०१७ आणि २०१८ मध्ये चांद्रयान-२ मोहिम पुढे ढकलावी लागल्यानंतर यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवडयाची तारीख ठरली होती. २०१८ च्या उत्तरार्धात इस्त्रो अन्य उपग्रहांच्या प्रक्षेपणामध्ये व्यस्त असल्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेच्या कामावर परिणाम झाला.

 • ‘चांद्रयान-१’ मोहिमेद्वारे दूरनियंत्रक उपकरणाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे व माहिती गोळा करण्यात आली होती. आता ‘चांद्रयान-२’ मोहिमेत लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून चंद्राचा अभ्यास करण्यात येईल. आधी भारत आणि रशियाची ही संयुक्त मोहिम होती. त्यासाठी रॉसकॉसमॉस ही रशियाची अवकाश संस्था लँडर पुरवणार होती. पण काही कारणांमुळे करार पूर्ण होऊ शकला नाही आणि भारताने स्वबळावर चांद्रयान-२ ची तयारी केली.

‘त्या’ घटस्फोटामुळे बिल गेट्स पुन्हा बनू शकतात जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती :
 • अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी २५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी मॅकेन्झीपासून ते विभक्त होणार आहेत. अमेरिकन वर्तमानपत्र नॅशनल इनक्वायररनुसार हा जगातला सर्वात महागडा घटस्फोट ठरु शकतो तसेच या घटस्फोटाची प्रकिया झाल्यानंतर बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात.

 • ५४ वर्षीय जेस बेझॉस लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात पडले आहेत. लॉरेन माजी न्यूज अँकर आणि हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून ओळख आहे. सांचेझही तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. हॉलिवडू चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या पॅट्रीक व्हाईटसेलबरोबर तिचे लग्न झाले होते. इनक्वायररनुसार पॅट्रीक आणि बेझॉस दोघे मित्र आहेत. बेझॉस यांनी लॉरेन सांचेझला पाठवलेला प्रेमाचा एक संदेशही आपल्याकडे असल्याचा दावा नॅशनल इनक्वायररने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

 • ब्लूबर्गच्या माहितीनुसार जेफ बेझॉस यांच्याकडे एकूण 137 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यात ८० मिलियन शेअर्सचा वाटा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा बेझॉस यांच्याकडे आहे. टीएमझेड या संकेतस्थळानुसार घटस्फोटानंतर बेझॉस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्ती वाटपाची प्रक्रिया खूप कठीण ठरु शकते.

 • या जोडप्याकडे ४ लाख एकर जमीन आहे. बेझॉस यांना चार मुले आहेत. घटस्फोटामुळे त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठा फरक पडू शकतो. श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीमधील त्यांचे स्थान बदलू शकते. बेझॉस आणि मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्तीचे समान वाटप झाले तर मॅकेन्झी यांना ६९ बिलियनची संपत्ती मिळू शकते. ज्यामुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरु शकतात. घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या ९२.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

 •  

दिनविशेष :
 • राष्ट्रीय युवा दिन

महत्वाच्या घटना 

 • १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

 • १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

 • १९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

 • १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

 • १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.

 • २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

जन्म 

 • १५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)

 • १८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)

 • १८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२)

 • १८९९: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)

 • १९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)

मृत्यू 

 • १९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४)

 • १९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १८९६)

 • १९७६: इंग्लिश रहस्यकथालेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)

 • १९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)

टिप्पणी करा (Comment Below)