चालू घडामोडी - १२ जुलै २०१८

Date : 12 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंग्लंडविरुद्ध पहिला वन डे सामना, कोहली कितव्या नंबरवर खेळणार :
  • लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वन डे सामना आज नॉटिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टी 20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.

  • आता इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिकाही खिशात टाकण्याच्या तयारीने, भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारताने टी ट्वेण्टी मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर आता वन डे मालिकाही जिंकण्याचा भारताचा इरादा राहिल.

  • वन डे रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र इंग्लंडची वन डे कामगिरीही कमालीची आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका इंग्लंडने तब्बल 6-0 अशी जिंकली होती. जोस बटलर, जेसन रॉय, अलेक्स हेल्स, जॉनी बेयरस्ट्रो आणि इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स यांच्यामुळे इंग्लंड संघ मजबूत स्थितीत आहे.

'विक्रमी विदेश दौऱ्यांबद्दल मोदींची गिनीज बुकात नोंद करा' :
  • पणजीविक्रमी विदेश दौऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करा अशी मागणी काँग्रेसने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वाऱ्या करत, 52 देशांना भेटी देऊन विक्रम रचला आहे. त्यामुळे त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

  • गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी गिनीज बुककडे लेखी पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

  • काँग्रेसच्या बंगळूरु येथील हितचिंतक माहिती अधिकार कार्यकर्त्याने आरटीआय अंतर्गत मिळवलेल्या माहितीच्या आधारे आमोणकर यांनी गिनीज बुकच्या लंडन येथील कार्यालयाला लेखी पत्र पाठवून मोदी यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरात लवकर नोंदवावे अशी मागणी केली आहे.

  • आमोणकर यांनी आपल्या पत्रात मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वाऱ्या करून 52 देशांना भेटी दिल्या असून, त्यासाठी 355 कोटी,30 लाख38 हजार 465 रुपये खर्च झाल्याचा उल्लेख केला आहे. मोदींच्या काळात रुपयाचे अवमूल्यन झाले असून मोदींची कामगिरी निराशाजनक असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले.

कलम ४९७ रद्द करु नये, केंद्राची सुप्रीम कोर्टाकडे विनंती :
  • नवी दिल्ली : लग्नसंस्था टिकवून ठेवायची असेल तर कलम 497 रद्द करु नये,’ अशी विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. या कलमात व्यभिचारासाठी महिलेला शिक्षा न करता केवळ संबंधित पुरुषाला शिक्षा करण्याची तरतूद आहे.

  • आयपीसीतील 497  हे कलम महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणारं आहे, त्यामुळे ते रद्द करण्यात यावं, यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • ‘गुन्हेगारी कायदे लिंगाच्या आधारावर भेदभाव करत नाहीत. त्यामुळे या कायद्याचीही समीक्षा व्हायला हवी,’ असं म्हणत कोर्टाने हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवलं. तसंच त्यावर केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं.

  • ‘या कलमामुळे लग्नसंस्था टिकून आहे. हे कलम रद्द करुन व्यभिचार करणाऱ्या महिलांवर केस सुरु झाल्यास लग्नसंस्था मोडकळीस येऊ शकते. त्यामुळे हे कलम रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावावी,’ अशी विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

  • आयपीसीच्या कलम 497 नुसार पतीच्या संमतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलांवर कोणतीही कारवाई होत नाही. तर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होते.

'महावितरण'च्या वीजदरात प्रतियुनिट ८ पैसे दरवाढीचा प्रस्ताव :
  • मुंबई : 'महावितरण'च्या वीजदरात प्रति युनिटमागे केवळ 8 पैशांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. वीजदरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता तूर्तास टळली आहे.

  • 'महावितरण'ने सुमारे 34 हजार 646 कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे. या प्रस्तावात राज्यातील सुमारे 1.20 कोटी ग्राहकांच्या वीजदरात केवळ 8 पैसे एवढी अत्यल्प दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

  • या याचिकेत राज्यात येणाऱ्या नवीन उद्योजकांना प्रतियुनिट एक रुपया सवलत, ऑनलाईन वीजबील भरणाऱ्या वीजबिलांवर 0.5 टक्के सूट प्रस्तावित आहे. याशिवाय 2019-20 वर्षासाठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

  • महावितरण कंपनीची आर्थिक व्यवहार्यता टिकवून ठेवणे, महागाई निर्देशांकाच्या अनुषंगाने विविध खर्चाचा आढावा, महावितरणच्या वीजयंत्रणेच्या संचालन, दुरुस्तीवरील वाढता खर्च आणि ग्राहकसेवेसाठी पायाभूत आराखड्या अंतर्गत करण्यात येत असलेली मोठी कामं, महावितरणच्या नियंत्रणाबाहेर असलेले विविध घटकांमुळे निर्माण होणारे वाढीव खर्च यासारख्या कारणांसाठी प्रस्तावित दरवाढ आवश्यक आहे.

  • ग्राहक वर्गवारीनिहाय वीजवापरातील बदल आणि 2015-16 आणि 2016-17 दरम्यान मुक्त प्रवेश वापरात झालेली वाढ यामुळे महावितरणच्या महसूलावर विपरित परिणाम झाला असून महसुली तूट निर्माण झाली आहे.

गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी धावला एलन मस्क :
  • बँकॉक- थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने 'प्रोटोटाइप सबमरिन'ची मदत देऊ केली आहे. या गुहेत अजूनही 5 मुले अडकलेली आहेत. 'मी आताच तीन नंबरच्या गुहेतून बाहेर आलो आहे' असे ट्वीट एलन मस्कने केले आहे.

  • जर गरज पडली तर मिनीसब तयार आहे रॉकेटच्या सुट्या भागांपासून ते तयार करण्यात आले आहे. वाइल्ड बोअर या फूटबॉल संघावरुनच त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्याची गरज पडली तर वापरता यावे यासाठी मी तेथे येथेच ठेवत आहे असे एलन मस्कने जाहीर केले आहे.

  • इन्स्टाग्रामवरती एलनने पाण्याने भरलेल्या या गुहेतील व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. अजूनही आत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. त्यांच्या मदतीसाठी एलनने मिनिसब देऊ केली आहे.'' एकावेळेस दोन पाणबुड्या व्यक्तींना घेऊन जाऊ शकेल आणि अत्यंत चिंचोळ्या जागेतून ती प्रवास करु शकेल'' असं एलनने स्पष्ट केलं आहे. ''आत बसलेल्या व्यक्तीला पोहणं आलंच पाहिजे असं नाही तसेच ऑक्सीजन कुप्यांचा वापर कसा करायचा हे माहिती नसलं तरी चालतं'' असं एलनने या मिनिसबची माहिती देताना सांगितले.

  • नौदलाने डोंगराच्या कड्याचा भाग १00 ठिकाणी ड्रिल मशिनने खणण्याचे काम सुरू केले आहे. आतमध्ये अडकलेल्या सर्वांना प्राणवायूचा पुरवठा होत राहावा, यासाठी पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुले व प्रशिक्षकांना श्वासोच्छवासात कोणतेही अडथळे आलेले नाहीत.

  • सध्या रशियात वर्ल्ड कप फुटबॉलचे सामने सुरू आहेत. फिफाच्या अध्यक्षांनी आत अडकलेल्या सर्व मुलांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतानाच, सुटकेनंतर त्यांना अंतिम सामना पाहायला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ही मुले आनंदून गेली आहेत. 

६६ वर्षांनंतर प्रथमच पुण्याचे चिल्लाल अमेरिकेत कापणार नखे :
  • न्यूयॉर्क : प्रत्येक घरातल्या मुलाला घरी वा शाळेत किमान एकदा तरी ‘अरे किती नखं वाढवलीस? कापून टाक आधी’ असे लहानपणी सुनावले जातेच. आपल्यापैकी अनेकांनीही कधी तरी असा ओरडा खाल्ला असेलच. पण एक भारतीय आता तब्बल ६६ वर्षांनी आपली नखे कापणार आहे. त्याची नखे कापण्याचा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये होणार आहे.

  • श्रीधर चिल्लाल असे या गृहस्थांचे नाव असून त्यांचे वय आता ८२ वर्षे आहेत. त्यांनी शेवटची नखे कापली १९५२ साली. त्यानंतर त्यांनी नखे कापणेच बंद केले. या वाढलेल्या नखांमुळे त्यांची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे. अर्थात त्यांनी एकाच हाताच्या बोटांची नखे वाढवली आहेत. त्यांच्या पाचही बोटांच्या नखांची एकूण लांबी सुमारे ९१0 सेंटीमीटर इतकी आहे. त्यातील अंगठ्याचे नखच सुमारे १९८ सेंटीमीटरचे आहे.

  • श्रीधर चिल्लाल हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांना रिप्लेज संग्रहालयाने नखे कापण्याची विनंती केली आहे. अर्थात वृद्धापकाळामुळे त्यांना एवढी मोठी नखे बाळगणेही अवघड झाले आहे. ही नखे कापल्यानंतर रिप्लेज संग्रहालयातच ठेवण्यात येणार आहेत. खास नखे कापून घेण्यासाठी श्रीधर चिल्लाल अमेरिकेला गेले आहेत.

१५ वर्षीय मुलीचा भन्नाट शोध, पावसाच्या थेंबापासून वीजनिर्मित्ती :
  • अजरवैजान - जगातील प्रत्येक देश डीजिटल बनण्याचे स्वप्न बाळगून आहे. पण, या डीजिटल दुनियेत वीजेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे अधिकच्या वीज उत्पादनासाठी प्रत्येक देशाकडून जोराचे प्रयत्न आणि अभ्यास करण्यात येत आहे. आता, अजरवैजान येथील रेगान जामालोवा या 15 वर्षीय युवतीने वीज उत्पादनाचा नवीन शोध लावला आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या रेगानने पावसाच्या पाण्यापासून वीजनिर्मित्तीचे तंत्र विकसीत केले आहे.

  • पावसाच्या थेंबापासून वीज निर्मित्तीचे डिव्हाईस रेगानने बनवले आहे. या तंत्रज्ञानाला तिने रेनर्जी असे नाव दिले आहे. या तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आलेल्या वीजेला बॅटरीमध्ये साठवून ठेवता येते. त्यानंतर घरगुती कामांसाठी या वीजेचा वापर करता येईल. सध्या हे एक प्रोटोटाईप असून त्यामध्ये 7 लिटर पाणी साठवता येत आहे.

  • जर हवेपासून वीजनिर्मित्ती होऊ शकते, तर पाण्यापासून का नाही ? असा प्रश्न 15 वर्षीय रेगानला पडला. याबाबत तिने आपल्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या संशोधनात रेगानला तिच्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

  • रेनवॉटर कलेक्टर, वॉटर टँक, इलेक्ट्रिक जनरेटर आणि बॅटरी या सर्व साधनांचे मिळून रेवाने 9 मिटर लांबीचे डिव्हाईस बनवले आहे. या संशोधनामुळे अजरवैजान सरकारने रेवानला 20 हजार डॉलर रुपयांचे अनुदान दिले. या डिव्हाईसद्वारे घरातील 3 बल्ब सहज प्रकाशित होतील, एवढी वीज निर्माण होते.

आधार-बँक खाते जोडले; अनुदान वळवल्यानं सरकारचे ९० हजार कोटी वाचले :
  • हैदराबाद : आधार कार्डच्या मदतीनं थेट बँकांमध्ये अनुदान जमा केल्यानं सरकारचे 90 हजार कोटी रुपये वाचले आहेत. आधारच्या वापरामुळे आतापर्यंत 90 हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) चेयरमन जे. सत्यनारायण यांनी दिली. 'डिजिटल ओळख' यावर आधारित एका आंतरराष्ट्रीय संमेलनात सत्यनारायण बोलत होते.

  • देशातील जवळपास 3 कोटी लोक दररोज आधारचा वापर करतात. शिधावाटप, निवृत्ती वेतन, रोजगार, शिष्यवृत्ती अशा विविध कारणांसाठी आधारचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, असं सत्यनारायण म्हणाले. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसकडून या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • कालपासून या संमेलनाला सुरुवात झाली. 'पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न पुरवठा, ग्रामीण विकास आणि अन्य विभागांमध्ये आधारचा वापर वाढला आहे. त्यामुळे सरकारचे 90 हजार कोटी वाचले आहेत,' अशा माहिती त्यांनी यावेळी दिली. 'शासनाकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे अदृश्य शासनाची संकल्पना आकार घेत आहे,' असंही त्यांनी म्हटले. 

  • आपल्याला काही क्षेत्रांमध्ये आणखी सुधारणा करायला हव्यात, असं सत्यनारायण म्हणाले. 'अत्याधुनिक बायोमेट्रिक तंत्रज्ञान, आधार ईको तंत्र, नामांकन प्रक्रिया, अपडेशन यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारची होणारी फसवणूक उजेडात येऊ शकेल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येऊ शकतो,' असं त्यांनी म्हटलं. 

दिनविशेष 

महत्वाच्या घटना 

  • १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

  • १७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.

  • १९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

  • १९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.

  • १९७९: किरिबाती देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.

  • १९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.

  • १९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • १९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.

  • १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.

  • २००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १८७०: भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)

  • १९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८)

  • १९१०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९८३)

  • १९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)

  • १९२६: मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)

मृत्यू 

  • १८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.

  • १९१३: व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)

  • १९४५: जर्मनीचे नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. (जन्म: २० एप्रिल १८८९)

  • २००१: प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)

  • २००३: मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ – आष्टी, उस्मानाबाद)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.