चालू घडामोडी - १२ जून २०१८

Date : 12 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पीयूष गोयल यांनी पत्रकाराला दिली एक दिवसाचा रेल्वे मंत्री बनण्याची ऑफर :
  • नवी दिल्ली- रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या खात्याच्या चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराशी पीयूष गोयल यांची भेट झाली. यावेळी त्या पत्रकाराने पीयूष गोयल यांना रेल्वेतील समस्या व त्यावरील उपाययोजनांसंदर्भातील एक पत्र दिलं. त्यावर पीयूष गोयला यांनी पत्रक्काराला एक ऑफर दिली.

  • एक दिवस रेल्वे मंत्री बनण्याची ही ऑफर होती. ते म्हणाले की, नायक सिनेमाप्रमाणे तुम्ही माझ्याजागी रेल्वे मंत्री बना आणि स्वतःचे नियम-कायदे लागू करा. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मस्करीत हे वक्तव्य केलं नाही तर, रेल्वे बोर्डाच्या चेअरमॅनला एक मॉक इव्हेन्ट करायला सांगितला. 

  • दरम्यान, पीयूष गोयल यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्दयावर मतं मांडली. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा सध्या विचार नाही व असा विचार भविष्यातही कदापि असणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली.आधुनिकीकरण व नवे तंत्रज्ञान यासाठी रेल्वे खासगी व विदेशी कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर मदत घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या खासगीकरणाची भीती रेल्वे कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली.

  • मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादनात येणाऱ्या अडचणी चर्चेतून लवकरच दूर होतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. ‘राजधानी’ गाडी सुरू केली तेव्हाही असाच विरोध झाला होता, याचे स्मरण देऊन काही मंडळींना रेल्वेची तांत्रिक प्रगती नकोशी व्हावी हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून :
  • पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीची पुरवणी लेखी परीक्षा १७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी ९ ते १६ जुलै या कालावधीत प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे, असे निवेदन राज्य मंडळाने दिले आहे.

  • दहावी-बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यातच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. पूर्वी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जायची.

  • राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. दहावीची लेखी परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा १७ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे.

  • गुणपत्रिका वाटप २२ जूनला दहावीचा आॅनलाइन निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना २२ जून रोजी दुपारी ३ वाजता मूळ गुणपत्रिका व कलचाचणी अहवालाचे वाटप करण्यात येणार आहे.

भारतीय संघाने जिद्द दाखवली - स्टीफन कॉन्स्टेनटाईन :
  • मुंबई - भारतीय फुटबॉल संघाने इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्यादरम्यान खूप जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.

  • भारताने काल रात्री फायनलमध्ये केनियाचा २-0 असा पराभव केला. त्यानंतर कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘आशिया चषक स्पर्धेत आमच्यासमोर मोठे आव्हान असेल हे आम्हाला माहीत आहे. आम्ही फक्त संख्या वाढवत नाहीत. तेव्हाच्या आणि आताच्या कालावधीदरम्यानच्या योग्य बाबींचा आम्ही अवलंब केला, तर आमच्याजवळ साखळी फेरीतून आशियाई चषकासाठी पात्र ठरण्याची संधी आहे आणि हेच आमचे लक्ष्य आहे.

  • ’आशिया चषक पुढील वर्षी जानेवारीत सुरूहोणार आहे आणि भारताच्या गटात यूएई, बहरीन आणि थायलंड हे संघ आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही आशियाई चषकासाठी तयारी करीत आहोत आणि या स्पर्धेने आम्हाला तयारी करण्याची संधी दिली आहे.

  • जर आम्ही आशियाई चषकात अंतिम १६ संघात स्थान मिळवायचे असल्यास अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा ठेवावी लागेल.’ कॉन्स्टेनटाईन यांनी फायनलमध्ये दोन गोल करणाऱ्या कर्णधार सुनील छेत्री आणि गोलरक्षक गुरप्रीतसिंह संधू यांचीही प्रशंसा केली.

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता? संशोधकांमध्ये संचारला उत्साह :
  • न्यू यॉर्क : पृथ्वीबाहेरील अन्य ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध सतत सुरू असतो. चंद्रावरही जीवसृष्टी होती का, तिथे भविष्यात राहता येणे शक्य आहे का असे प्रश्न पडत असतात. मात्र नासाच्या मार्स रोव्हर क्युरिओसिटी यानाला मंगळावरती काही जैविक अणू सापडले आहेत. कार्बनचा अंश असलेले बिल्डिंग ब्लॉक्सही (वीटसदृश्य ठोकळे) सापडले आहेत. त्यामुळे तेथे कधी काळी जीवसृष्टी असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

  • मंगळाचे वय साडेतीन अब्ज वर्षे असून, त्याची माहिती व संशोधन यासाठी नासाने मार्स सोव्हर क्युरिओसिटी हे यान मंगळावर पाठवले आहे.

  • रोव्हरने दिलेल्या माहितीवर शोधनिबंध तयार करणाऱ्या जेनिफर एजिब्रोड यांनी सांगितले की, मंगळावर सापडलेल्या या गोष्टी म्हणजे तिेथे जीवसृष्टी होती, याचा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे त्याची ठोस माहिती नाही इतकेच आता म्हणता येईल.

  • तिथे सजीव नव्हते असे अभ्यासातून लक्षात आले तरी सजीवांना खाण्यासाठी काहीतरी उपलब्ध होते, असा निष्कर्ष काढता येईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, भूगर्भीय हालचालींमुळे मिथेन निर्माण होऊ शकतो. सापडलेले पदार्थ तिथेच कायमच राहिले असून, तीच उत्साहाची बाब आहे.

ऐतिहासिक भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प -किम जोंग काय म्हणाले :
  • सिंगापूर - सकाळी साडे सहा वाजता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची  भेट झाली.  सिंगापूरमधील हॉटेल कॅपेलामध्ये ही भेट झाली. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली. या ऐतिहासिक भेटीतनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, किम जोंग उन आणि माझ्यात मैत्रीपूर्ण संबंध असतील. आमची भेटीत यशस्वी आणि चांगली  बातचित झाली. सध्या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे. 

  • आपल्या दोन्ही देशांचे संबंध चांगले असतील, अशी सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तर किम जोंग म्हणाले, तुमची भेट होणं इतकं सहज शक्य नव्हतं. मात्र सर्व अडथळे पार करुन ही भेट झाल्याने मला खूपच आनंद झाला आहे.

  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याची भेट घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स व व्हाइट हाउसचे प्रमुख अधिकारी जॉन केली हे आलेत तर किम जोंग उन यांच्याबरोबर मंगळवारी होणाऱ्या बैठकीतील फलनिष्पत्ती चांगलीच असेल, असा आशावाद डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्यक्त केला होता. 

  • त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणाऱ्या सिंगापूरला या बैठकीसाठी तब्बल २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च आला आहे.

  • दोन्ही देशाच्या प्रमुखांनी ऐतिहासिक भेटीपूर्वी पत्रकारांना प्रतिक्रिया दिल्या.  डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मला खूपच आनंद होत आहे. आमच्यात सकस चर्चा होणार आहे. आमची भेट यशस्वी होईल यात शंक नाही. ही भेट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. आमच्या भेटीमुळे दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होतील, यात मला शंका वाटत नाही.

भिडे गुरुजी आजचे ‘बाजीप्रभू’, आम्ही त्यांच्यासोबत - शिवसेना :
  • मुंबई : माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून तुफान स्तुतीसुमनं उधळली आहेत. केवळ वरवरची स्तुती नव्हे, तर शिवसेनेने संभाजी भिडेंची तुलना थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी केली आहे.

  • संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले आहे. भिडे गुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे, असेही शिवसेनेने ‘सामान’मध्ये नमूद केले आहे.

  • सामनात काय म्हटलं आहे - “हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. काही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत.”, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

  • “भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे.

  • ” असे म्हणत, ‘सामना’त पुढे म्हटले आहे की, “कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके–४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच.”

दिनविशेष :
  • जागतिक बालकामगार विरोधी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८९६: जे. टी. हर्न हे प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू ठरले.

  • १८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

  • १९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

  • १९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

  • १९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

  • १९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

  • २००१: कोनेरु हंपी बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारताच्या सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू ठरल्या

जन्म 

  • १८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)

  • १९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२)

  • १९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.

  • १९१७: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.

  • १९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)

  • १९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)

  • १९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

  • २०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर१९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.