चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जून २०१९

Updated On : Jun 12, 2019 | Category : Current Affairsवादग्रस्त एलईडी बेल्सच्या तक्रारीवर आयसीसीचा निर्णय :
 • मुंबई : इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व दहा संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

 • या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर आदळूनही एलईडी बेल्स पडत नसल्याचं जवळपास पाचवेळा आढळून आलं आहे. बेल्स वजनदार असल्याने हा प्रकार होत असल्याचं म्हटलं जात आहे.

 • रविवारी (9 जून) झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात जसप्रीत बुमराच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर बालंबाल बचावला होता. जसप्रीत बुमराने टाकलेला चेंडू स्टम्पवर आदळूनही तो बाद झाला नाही, कारण बेल्स पडल्या नाहीत. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिन्च या दोघांनीही त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती.

 • आयसीसीचं म्हणणं आहे की, मागील चार वर्षात यष्ट्या बदललेल्या नाहीत. विश्वचषक 2015 पासून सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये तसंच प्राथमिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या यष्ट्यांचा वापर होत आहे. याचा अर्थ असा की, या यष्ट्यांचा वापर एक हजारांहून अधिक सामन्यांमध्ये झाला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; बैठकीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता :
 • नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधात नव्या विधेयकाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक मांडले जाणार आहे. 

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने मागच्या कालावधीत तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले होते. मात्र लोकसभेत हे विधेयक पारित करण्यात आलं परंतु राज्यसभेत विधेयक अजूनही प्रलंबित आहे. 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर तिहेरी तलाकचं विधेयक संपुष्टात आलं. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधातील विधेयक नव्याने मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल.

 • 17 जून पासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. 17 व्या लोकसभेचे हे पहिलं अधिवेशन असणार आहे. मागील सरकारच्या काळात राज्यसभेत पुरेसे बहुमत नसल्याने विरोधी पक्षाकडून हे विधेयक रखडविण्यात आले. त्यामुळे यंदा राज्यसभेत तिहेरी तलाक बंदी विधेयकाचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

 • याआधी डिसेंबर २०१७ मध्ये लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं होतं. मात्र हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलं नाही. त्यानंतर सरकारला यासाठी अध्यादेश काढावा लागला होता. अध्यादेश काढल्यानंतर सरकारला सहा महिन्यांच्या कालावधीत विधेयक संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मंजूर करावं लागतं. मात्र सरकारला सहा महिन्यात विधेयक मंजूर न करता न आल्यानं पुन्हा ते लोकसभेत मांडण्यात आलं. या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली मात्र मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत नसल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत रखडलं गेलं. 

नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी :
 • पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. यापूर्वी तीन वेळा न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली होती. 19 मार्च रोजी नीरव मोदीला स्कॉटलंड यार्डमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

 • याचिकेवरील सुनावणीदरम्यान नीरव मोदीच्या वकील क्लेअर मोंटगोमेरी यांनी नीरव मोगी आणि त्याच्या भावामध्ये झालेले ईमेल संभाषण वाचून दाखवले. या इमेलवरून पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचे सिद्ध होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच अबुधाबीच्या ज्या साक्षीदारांनी ईडीच्या इमेलला उत्तर दिले आहे, त्यांनाही आपण पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

 • तसेच नीरव मोदी लंडनमध्ये भांडवल गोळा करण्यासाठी आला असून त्याला जामीन मिळाल्यास त्याने स्वत:ला इलेक्ट्रॉनिक उपकरणाने टॅग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या माध्यमातून त्याला ट्रॅक करता येऊ शकते, असे त्याच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच त्याच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू झाला असून त्याच्या पलायनाचा प्रश्न उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे.

 • अशातच त्याला जामिन मिळाल्यास समस्या निर्माण होऊ शकते. त्याच्या विरोधातील आरोप गंभीर आहेत. अशा परिस्थितीत त्याला जामीन देण्यात येऊ नये, असे भारत सरकारची बाजू मांडणारे क्राउन प्रॉसेक्यूशन सर्विसेसकडून सांगण्यात आले.

ई-सिगारेटवरील बंदीच्या प्रस्तावाला मान्यता :
 • ई-सिगारेट आणि व्हॅप्स यांसारख्या निकोटिनयुक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल संघटनेने (सीडीएससीओ) मंगळवारी ई-सिगारेटला ड्रग्ज म्हणून प्रतिबंधित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.

 • या प्रस्तावाला आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर सीडीएससीओला उत्पादन, विक्री आणि वितरण यावर प्रतिबंध घालता येणे शक्य होणार आहे. मात्र याचा व्हेपर उत्पादने बाजारपेठेला फटका बसणार आहे. यापूर्वी आरोग्य मंत्रालय आणि सीडीएससीओने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.

 • कर्नाटक, केरळ, मिझोराम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने ई-सिगारेटच्या उत्पादनावर आणि वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश अलीकडेच जारी केले आहेत.

SCO परिषदेसाठी मोदींच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी :
 • पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. १३ आणि १४ जूनला किरगिझस्तानात येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीसाठी पंतप्रधान मोदींचे विमान पाकिस्तानातून जाऊ शकते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

 • भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. किरगिझस्तान बीश्केक येथे जाण्यासाठी मोदींच्या विमानाला पाकिस्तानातून जाण्याची परवानगी द्यावी यासाठी भारताने विनंती केली होती.

 • इम्रान खान सरकारने भारत सरकारच्या विनंतीला प्राथमिक मंजुरी दिली आहे. आवश्यक औपचारीक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारला याबद्दल कळवण्यात येईल. शांतता चर्चेच्या प्रस्तावाला भारत सकारात्मक प्रतिसाद देईल अशी पाकिस्तानला अपेक्षा आहे.

विश्वनाथन आनंद पराभूत :
 • अल्टिबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीत भारताच्या विश्वनाथन आनंदला चीनच्या यू यांगयीकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

 • क्लासिकल गेममध्ये आनंदच्या हाती काही लागले नाही. यांगयीचा बचाव भेदण्यात आनंदला यश मिळू शकले नाही. त्यानंतर अर्मागेडॉन गेममध्ये काही काळ आनंद वरचढ ठरत होतो. मात्र यांगयीने बाजी पलटवत आनंदला पराभूत केले. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांगयीपेक्षा १.५ गुणांनी आघाडी घेत ९.५ गुणांवर पोहोचला असून, अर्मेनियाचा लिव्होन अ‍ॅरोनियन ७.५ गुणांसह तृतीय स्थानी आहे.

दिनविशेष :
 • जागतिक बालकामगार निषेध दिन

महत्वाच्या घटना 

 • १८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.

 • १८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

 • १९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

 • १९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.

 • १९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.

 • १९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

 • १९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 • १९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

 • १९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

 • १९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

 • २००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

जन्म 

 • १८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)

 • १९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२)

 • १९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.

 • १९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक यांचा जन्म.

 • १९१७: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.

 • १९५७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.

 • १९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)

 • १९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.

 • १९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)

 • १९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

 • २०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

 • २०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)