चालू घडामोडी - १२ मार्च २०१८

Date : 12 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शॉपिंगमुळे मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचा राजीनामा :
  • पोर्ट लुई/ मॉरिशस : महिलांसाठी शॉपिंग ही सर्वात आवडीची गोष्ट. पण याच शॉपिंगमुळे मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना आपलं पद गमवावं लागणार आहे. पुढील आठवड्यात त्या आपला राजीनामा सादर करतील.

  • मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपती अमीना गुरीब फकीम यांनी शॉपिंगसाठी एका स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डवरुन शॉपिंग केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सरकारने त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ यांनी दिली.

  • केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका असलेल्या अमिना गुरीब फकीम यांनी 2015 मध्ये मॉरिशसच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. पण सध्या त्यांच्यावर शॉपिंगसाठी स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचा आरोप सुरु आहे.

  • स्थानिक वृत्तपत्राच्या दाव्यानुसार काही दिवसांपूर्वी अमीना गुरीब फकीम इटली आणि दुबईच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी लाखो रुपयाची शॉपिंग केली. त्यांची ही शॉपिंग ड्यूटी फ्री असून, त्याचे पेमेंट करण्यासाठी प्लॅनेट अर्थ इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचा आरोप होत आहे.

  • दरम्यान, अमीना गुरीब फकीम यांनी हा आरोप फेटाळला आहे.

राज्यसभेसाठी भाजपचे राज्यातून तीन नावं जाहीर :
  • नवी दिल्ली : राज्यसभेसाठी भाजपने एकूण 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी महाराष्ट्रातून तीन नावं आहेत. नारायण राणे आणि केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोट्यातून यावेळी प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन राज्यसभेवर जातील.

  • भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असली तरी मात्र काँग्रेसने अजून नाव जाहीर केलेलं नाही. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या दिल्लीत आहे.

  • राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

  • प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील.

  • काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करत आहेत.

भारत-फ्रान्समध्ये १४ महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांच्या भेटीत 14 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये संरक्षण, रेल्वे, ऊर्जा, तसेच स्मार्ट सिटीसारख्या अनेक करारांचा समावेश आहे.

  • यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बोलताना फ्रान्ससोबत भारताच्या असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेखही केला. तसेच, जागतिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी फ्रान्सची भारताला मदत होत असल्यचंही त्यांनी सांगितलं.

  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दोन्ही देशांमधले सांस्कृतिक संबंध इतिहासापासून आहेत. संरक्षण, सुरक्षा, अंतराळ व तंत्रज्ञानात भारत व फ्रान्स यांच्यातील मैत्रीचा प्रदीर्घ वारसा दिसून येतो. सरकार कोणतेही असो, पण दोन्ही देशाचे संबंध नेहमीच वरच्या पातळीवर पोहोचलेले आहेत.”

  • तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांनी फ्रान्स-भारत सर्वोत्कृष्ट भागीदार असल्याचं सांगितलं. संरक्षण, संशोधन तसेच विज्ञान त्यातही तरुणांना उच्च शिक्षण-प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य करतील. शिवाय, सामरिक क्षेत्रात भागीदारीचे नवे युग सुरु करण्याचा आमचा उद्देश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

  • यावेळी उभय देशांमध्ये 14 महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यात शिक्षण, रेल्वे, इंडो-फ्रान्स फोरम, पर्यावरण, अंतराळ, नौदल, आण्विक, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा, मादक पदार्थांच्या तस्करीस प्रतिबंध, स्थलांतर-संपर्क, गोपनीय माहितीची सुरक्षा, सागरविषयक माहितीची देवाणघेवाण आदी महत्त्वपूर्ण करारांचा समावेश आहे.

  • दरम्यान, हिंदी महासागरतील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार झाला आहे. त्यानुसार दोन्ही देश आपल्या नौदल तळाचा परस्परांना वापर करू देणार आहेत. त्याबाबत सहमती झाली आहे.

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री :
  • मुंबई : किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी यांनी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं.

  • मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.

  • उद्या दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

  • दरम्यान उद्या सोमवारी किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सर्व संबंधीत खात्यांच्या मंत्र्यांना आणि सचिवांना उपस्थित राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

  • मुख्यमंत्र्यांसोबत महसूल, कृषी, अर्थ, पणन, जलसंपदा, आदिवासी, ग्रामविकास, ऊर्जा, रोजगार हमी या विभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर मोर्चेकरी शिष्टमंडळाशी समन्वय राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

येवल्यात मुद्रा योजना मार्गदर्शन शिबिर :
  • येवला : कलाकृती वुमन्स फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी विणकर आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुद्रा योजना मार्गदर्शन व नेत्र चिकित्सा शिबीर येथील डॉ.हेडगेवार सभागृहात संपन्न झाले.

  • कार्यक्रमास प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, मुद्रा बँंक योजनेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्य मंदा फड, भाजपाचे विणकर आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर,नगरसेविका शितल शिंदे, सरोजिनी वखारे, डॉ शंकर कोटमे, डॉ श्रध्दा गडे, नाशिकचे युवा नेते गणेश सातभाई उपस्थित होते.प्रास्ताविक कलाकृतीच्या अध्यक्षा गौरी दिवटे यांनी केले.

  • यावेळी बोलतांना मंदा फड यांनी ज्ञान मिळवा कौशल्य जोपासा आणि निश्चित ध्येयापर्यंत पोहोचा, असा सल्ला दिला. जीवनात आपण अशक्य गोष्ट सहज शक्य करू शकता असे प्रतिपादन केले. नेत्र तपासणी शिबीरात अनेक महीलांनी सहभाग घेतला.

  • डॉ शंकर कोटमे व डॉ श्रध्दा गडे यांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन चंचल वायडे, संध्या कोकणे, सारीका दिवटे यांनी केले, आभार प्रदर्शन मनोज दिवटे यांनी केल.

  • कार्यक्र म यशस्वीते करीता राजेंद्र नागपुरे, पंकज कट्यारे, राधिका पहीलवान, दर्शना निकम, स्वाती गाडेकर, राहुल भांडगे, मारूती पवार, अनुपमा मढे आदिनी परिश्रम घेतले.कार्यक्र माला महीला बचत गट, युवक, युवतींसह नवउद्योजक उपस्थित होते.

मोदी सरकारचा नवा प्लॅन, ५० कोटी लोकांना होणार फायदा :
  • नई दिल्‍ली - नरेंद्र मोदी सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलणार आहे. त्यांच्या या पावलामुळं 50 कोटीं लोकांना फायदा होऊ शकतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावे सोशल सिक्योरिटी म्हणून महिन्याला 17.5 टक्केंचा निधी जमा करावा लागणार आहे.  त्यामुळं संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच श्रमिक किंवा कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेंशनची सुविधा यामुळं मिळणार आहे.

  • केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने 'लेबर कोड ऑन सोशल सिक्युरीटी 2018' ड्राफ्ट तयार केला आहे. ही सुविधा सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी तयार केली गेली आहे. येणाऱ्या वेळेत, हा मसुदा लोकांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यास मदत करेल  सर्व पक्षांकडून सहमती मिळाल्यानंतर हा मसुदा संसदेत सादर केला जाणार आहे. संसदेत या मसुद्याला मंजूरी मिळाल्यास 50 कोटी जनतेला सोशल सिक्युरीटी पर्यंत पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. 

  • सध्या पीएफ आणि पेन्शनच्या सुविधेचा लाभ केवळ संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळत आहे . असंघटीत कर्मचारी स्वतःच नोंदणी करू शकत नाहीत परंतु नवीन कायद्यानुसार कर्मचारी स्वतःच नोंदणी करू शकतात. मजुरी, ट्रक चालक आणि लहान दुकानदार यांच्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना  पीएफ आणि निवृत्तीवेतनाचा फायदा होईल अशी सरकारला अपेक्षा आहे. हे कामगार स्वतःच नोंदणी करू शकणार आहेत.

  • केंद्र सरकार एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना किती कंट्रीब्‍यूशन करणार हे ठरवणार आहे. जास्तीत जास्त 17.5 टक्के हे कंट्रीब्‍यूशन असू शकते. तर एखाद्या कर्मचाऱ्यांच कंट्रीब्‍यूशन जास्तीत जास्त 12.5 टक्के असणार आहे. यामध्ये चार श्रेणी आहेत.  चौथ्या श्रेणी मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कंट्रीब्‍यूशन शून्य असणार आहे. 

शी जिनपिंग चीनचे तहहयात ‘बादशाह’, निरंकुश सत्तेसाठी बदलली राज्यघटना :
  • बीजिंग - चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि अफाट लष्करी व आर्थिक ताकद असलेल्या देशाने रविवारी शी जिनपिंग यांच्या हाती निरंकुश सत्ता बहाल केली.

  • शी यांना इच्छा असेल तोपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहता यावे यासाठी चीनच्या संसदेने देशाची राज्यघटना जवळजवळ एकमताने बदलली. चीन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस हे सर्वोच्च पद शी यांच्याकडे आहेच व त्यालाही कोणतीही कालमर्यादा नाही. अशा प्रकारे शी हे माओ यांच्या तोडीचे प्रबळ नेते झाले आहेत.

  • सर्वेसर्वा : पक्ष, सरकार आणि सैन्यदले या सर्वांची सत्ता ६४ वर्षांच्या शी यांच्या हाती एकवटली आहे. यापूर्वी माओ व डेंग शियाओ पिंग हे चीनचे सर्वशक्तिमान नेते म्हणून ओळखले गेले. परंतु त्यांच्या सत्तेलाही राज्यघटनेचे कमाल १० वर्षांचे बंधन होते.

  • घटनेत नेमका काय बदल - चीनच्या राज्यघटनेत राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांच्या पदांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सलग दोन कालावधींची कमाल मर्यादा होती. शी यांची सध्या या पदावरील दुसरी ‘टर्म’ सुरु आहे.

  • त्यानंतरही त्यांना पदावर राहता यावे यासाठी राज्यघटनेतील ही कमाल मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव कम्युनिस्ट पक्षाने केला. राष्ट्रीय पीपल्स काँग्रेस या चीनच्या संसदेने तो २,९७३ वि. २ अशा बहुमताने मंजूर केला. तिघांनी मतदानात भाग घेतला नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८९४: कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.

  • १९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.

  • १९३०: महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.

  • १९६८: मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र झाला.

  • १९९१: जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.

  • १९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.

  • १९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

  • १९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

  • १९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.

  • २००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म

  • १८२४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉफ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)

  • १८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

  • १९११: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म. (जन्म: १२ ऑगस्ट १९७३)

  • १९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)

  • १९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.

  • १९३१: साउथवेस्ट एअरलाईन्स चे सहसंस्थापक हर्ब केलेहर यांचा जन्म.

  • १९८४: प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल यांचा जन्म.

मृत्यू

  • १९४२: जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)

  • १९६०: भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८८०)

  • १९९९: प्रसिध्द व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल१९१६)

  • २००१: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचे निधन. (जन्म: २५ मे १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.