चालू घडामोडी - १२ मार्च २०१९

Updated On : Mar 12, 2019 | Category : Current Affairsऑनलाइन सातबारामधून ओटीपी वगळला :
 • नवी मुंबई : महसूलच्या महाभूलेख संकेतस्थळावर अखेर मोबाइल नंबरची नोंदणी हटवण्यात आली आहे. संकेतस्थळावर अद्यापही निम्म्याहून अधिक तालुक्यातील गावांचे सातबारा उपलब्ध नसतानाही ते मिळवण्यासाठी ओटीपीचा पर्याय ठेवला होता. मात्र, मोबाइल नंबर नोंदवल्यानंतरही ओटीपी मिळत नसल्याने सातबारा, आठ अ मिळवण्यात अडथळा निर्माण झाला होता.

 • नागरिकांच्या तलाठी कार्यालयातल्या फेऱ्या कमी व्हाव्यात व कामात पारदर्शकता यावी या उद्देशाने महसूलच्या महाभूलेख या संकेतस्थळावर आॅनलाइन सातबारा, आठ अ मिळवण्याची सोय उपलब्ध करून दिली. मात्र, योजना सुरू होऊन चार वर्षांहून अधिक वर्षे उलटली तरीही डिजिटल सातबारा मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडथळे येत आहेत.

 • निम्म्याहून अधिक तालुक्यातील गावांचे सातबारा संकेतस्थळावर नोंदवले गेलेले नाहीत. यामुळे सद्यस्थितीला विना स्वाक्षरीच्या आॅनलाइन सातबारावरच नागरिकांना समाधान मानावे लागत आहे. परंतु त्यावरील सूचीमुळे हे सातबारा शासकीय कामासाठी वापरात येत नसल्याने त्यावर तलाठीचा शिक्का घेण्यासाठी पुन्हा तलाठी कार्यालयाची पायरी चढावीच लागत आहे.

 • सातबारा मिळवण्यासाठी संकेतस्थळावर मोबाइल नोंदणी आवश्यक होती. मात्र, मोबाइल नंबर नोंदवल्यानंतरही ओटीपी प्राप्त होत नसल्याने सातबारा मिळण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. काही तालुक्यातील गावांचे सातबारा गट नंबर टाकताच विना प्रक्रिया ते प्राप्त होत. यावरून महसूलच्या महाभूलेख संकेतस्थळातील त्रुटींमुळे नागरिकांची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने उघड केली होती. याची दखल घेत महसूल विभागाने संकेतस्थळातील ओटीपीची प्रक्रिया तत्काळ वगळली. त्यामुळे किमान विना स्वाक्षरीचा सातबारा तरी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना नागरिकांत आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते ४७ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव :
 • नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी ४७ ख्यातनाम, नामवंत व्यक्तींना येथे एका कार्यक्रमात पद्म पुरस्कार प्रदान केले. यात नाट्यकलावंत वामन केंद्रे, गायक शंकर महादेवन आणि मेळघाटात आरोग्य सेवा देणारे डॉ. रवींद्र कोल्हे यांचा समावेश आहे.

 • ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल, माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, अकाली दलाचे नेते सुखदेवसिंह धिंडसा आणि प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर (मरणोत्तर) यांचा पुरस्कार प्रदान झालेल्यांत समावेश आहे. बिहारचे नेते हुकूमदेव नारायण यादव (पद्मभूषण), बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी सिस्को सिस्टीम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेंबर्स (पद्मभूषण) आणि प्रसिद्ध नर्तक प्रभू देवा (पद्मश्री) यांना राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या विशेष समारंभात या पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

 • विश्वनाथन मोहनलाल, धिंडसा आणि नायर (मरणोत्तर) यांना पद्मभूषणने, तर जयशंकर यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. कुलदीप नायर यांच्या पत्नीने पुरस्कार स्वीकारला. इतर मान्यवरांत गायक शंकर महादेवन नारायण (पद्मश्री), लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा (पद्मभूषण), डॉक्टर संदीप गुलेरिया आणि इल्यास अली (दोघेही पद्मश्री) आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया (पद्मश्री) यांचा समावेश होता.

 • पुरस्कार मेळघाटवासीयांना समर्पित : डॉ. कोल्हे - गेल्या ३४ वर्षांमध्ये अनेकांनी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय बैरागड उभारणे शक्य नव्हते. अत्यंत कठिण प्रसंगी आमचा हात न सोडणाऱ्या मेळघाटवासियांना पद्मश्री पुरस्कार समर्पित असल्याची भावना डॉ. रविंद्र व स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केली.

 • नाट्यकलाकारांनी आकर्षणात अडकू नये : प्रा. केंद्रे - नाट्यकलाकारांनी छोट्या-मोठ्या पडद्याच्या आकर्षणात अडकू नये. आपले मूळ विसरू नये. कलाप्रांताशी इमान राखावे. आपल्या कारकिर्दीची विभागणी केली तर नाट्यकलाकार कलेच्या सर्व ‘फॉर्म’मध्ये यशस्वी होतो, असा कानमंत्र प्रा. वामन केंद्रे यांनी कलाकारांना दिला.

काळा पैसा परदेशातील बँकांमध्येच :
 • पुणे : परदेशतील काही भारतीयांच्या बेनामी संपत्तीवरून गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रान उठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्ता आल्यानंतर मात्र, संशयित बेनामी संपत्ती गोळा करणाऱ्या खात्यांचा साधा तपासही पूर्ण करता आलेला नाही. संशयित ६२८ खात्यांपैकी साडेआठ हजार कोटी रुपये असलेल्या ४१७ प्रकरणांचा तपास गेल्या पाच वर्षांत झाला आहे.

 • माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सकडे त्याबाबतची माहिती मागितली होती. फ्रान्स सरकारने २०१२ मध्ये स्विस बँकेत खाते असलेल्या ६२८ भारतीयांची जी यादी सरकारकडे दिली होती, त्याचाच उल्लेख करण्यात आला आहे. या खात्यातील ४१७ केसेसची तपासणी झाली असून, त्यातून ८ हजार ४६५ कोटी रुपयांचे काळे धन शोधले असल्याचे सांगण्यात आले.

 • या शिवाय इंटरनॅशनल कन्सोरशियम आॅफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआय) या संस्थेने सातशे भारतीयांची परदेशातील जी माहिती समोर आणली, त्यानुसार भारतीयांचे परदेशी बँकांमधील खात्यात ११ हजार १० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. भारतात आणि भारताबाहेर नक्की किती बेनामी संपत्ती आहे, याचा निश्चित आकडा नसल्याचे उत्तर डायरेक्ट टॅक्सेसने दिले आहे.

 • याबाबत बोलताना वेलणकर म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेव्हा विरोधात असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रामदेवबाबा यांनी परदेशात भारतीयांनी लाखो कोटी रुपयांचा बेनामी पैसा ठेवला असल्याचे आरोप केले होते.

 • हा पैसा भारतात आल्यास विकासकामांना गती मिळेल, तसेच कराचे ओझे देखील कमी होईल, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यादृष्टीने काहीच झाले नाही. उलट पूर्वीच्या सरकारच्या काळात फ्रान्स सरकारने दिलेल्या यादीनुसार खात्यांचा तपासही पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यातील रकमेचा आकडा देखील अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय तपासणी पूर्ण झालेल्या दोषी खातेदारांची नावेदेखील अजून, जाहीर केलेली नाहीत.

भारतात ‘बोईंग’ झेपावणारच, DGCA कडून नवी नियमावली जारी :
 • इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत निर्माण झालेले संभ्रम अखेर दूर झाले आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने ‘बोईंग’ विमानासंदर्भात हवाई वाहतूक कंपन्यांना सुरक्षा सूचना जारी केली असून यात वैमानिकाला उड्डाणाचा किमान एक हजार तासांचा अनुभव तर सह वैमानिकाला उड्डाणाचा किमान 500 तासांचा अनुभव बंधनकारक करण्यात आला आहे.

 • इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. रविवारी झालेल्या अपघातात १५७ जण ठार झाले आहेत.

 • इथिओपियन एअरलाइन्सचे विमान नैरोबीकडे जाण्यासाठी उडाले असताना सहा मिनिटात ते कोसळले होते त्यात सर्व प्रवासी ठार झाले. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. बोईंग ७३७ मॅक्स विमानांचा वापर भारतातही केला जातो. जेट एअरवेज व स्पाइस जेट या कंपन्या ७३७ मॅक्स बोईंग विमानांचा वापर करतात.

 • नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७३७ मॅक्स विमानांचा वापर भारतातही केला जात असून त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर हवाई वाहतूक महासंचालनालयाने बोईंग विमानासंदर्भात सुरक्षा सूचना जारी केली आहे. यात वैमानिकांचा उड्डाणाचा अनुभव ही महत्त्वाची अट ठरणार आहे.

रमजानच्या संपूर्ण महिन्यात निवडणुका स्थगित करणे शक्य नव्हते - निवडणूक आयुक्त :
 • लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकावरुन निर्माण झालेल्या वादावर निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे. रमजानच्या संपूर्ण महिन्यात निवडणुका स्थगित करणे शक्य नव्हते असे स्पष्ट करत मुख्य सणाचे दिवस आणि शुक्रवारी मतदान नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.

 • रमजानदरम्यान निवडणुका होतील. कारण संपूर्ण महिना निवडणूक स्थगित करणे शक्य नव्हते. पण, मुख्य सणाचा दिवस आणि शुक्रवारी मतदान होणार नाही, असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने म्हटले.

 • सात टप्प्यातील लोकसभा निवडणुका ११ एप्रिल ते १९ मेपर्यंत होतील. २३ एप्रिलला मतमोजणी होईल. रमजानचा महिना यावर्षी ६ मे रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम समाजात उपवास केला जातो. आयोगाने सीबीएसईसमवेत विविध राज्यातील शिक्षण मंडळांचे परिक्षेचे वेळापत्रक पाहून निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

 • ते म्हणाले, वेळापत्रक ठरवताना इतर मुद्दे जसे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये येणारे विविध सुट्टया आणि सण, मान्सून पूर्व पाऊस, पीक कापणी लक्षात घेण्यात आली आहे.

 • तृणमूल काँग्रेसचे फरहाद हकीम आणि आम आदमी पक्षाचे अमानातुल्लाह खान समवेत काही नेत्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात होणाऱ्या निवडणुकीवर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर या मुद्याचे वादात रुपांतर झाले होते.

 • तर दुसरीकडे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासह आणखी काही नेत्यांनी रमजानच्या महिन्यात निवडणुका होणे काही गैर नसल्याचे म्हटले होते. जर मुस्लिम उपवासादरम्यान काम करु शकतात. तर उपवासादरम्यान ते मतदानही करु शकतात, प्रचारही करु शकतात, असे ते म्हणाले.

दहशतवादी संघटनांवर कारवाई करा, अमेरिकेने पाकला सुनावले :
 • भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेतली असून दहशतवादाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरुन खडसावले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा देण्याबाबत तसेच पाकिस्तानने तत्काळ दहशतवाद्यांवर कारवाई करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.

 • परराष्ट्र सचिव विजय गोखले हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांची भेट घेतली. दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका भारतातील जनता आणि सरकारसोबत आहे, अशी ग्वाही  पॉम्पिओ यांनी दिली.

 • परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी या भेटीत काय चर्चा झाली याबाबतची माहिती माध्यमांना दिली. “पॉम्पिओ आणि गोखले यांच्यात पुलवामा हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा देण्याबाबत तसेच पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय भारत – अमेरिकेमधील संरक्षण आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य यासंदर्भातही दोघांमध्ये चर्चा झाली”, असे पॅलाडिनो यांनी म्हटले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८९४: कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.

 • १९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.

 • १९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.

 • १९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.

 • १९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

 • १९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

 • १९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.

 • २००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म 

 • १८२४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉफ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)

 • १८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

 • १९११: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म. (जन्म: १२ ऑगस्ट १९७३)

 • १९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)

 • १९३१: साउथवेस्ट एअरलाईन्स चे सहसंस्थापक हर्ब केलेहर यांचा जन्म.

 • १९८४: प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९४२: जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)

 • १९६०: भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८८०)

 • १९९९: प्रसिध्द व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६).

 • २००१: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचे निधन. (जन्म: २५ मे १९२७).

टिप्पणी करा (Comment Below)