चालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१८

Date : 12 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मेरी कोम’ सर्व बॉक्सर्सची प्रेरणास्रोत :
  • नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान केलेल्या चुकांमध्ये सुधारणा केली असून आता गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या स्पर्धेत पदक जिंकत ते अपयश धुवून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मत विश्व महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणारी भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनने (६९) व्यक्त केले.

  • भारतीय महिला बॉक्सिंगची स्टार एम.सी. मेरीकोम येथे सहावे विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी कसून तयारी करीत आहे. ती अन्य ज्युनिअर बॉक्सर्ससाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. मेरीकोम शिबिरामध्ये सरावादरम्यान अन्य बॉक्सर्सला वेळ काढून टीप्स देत त्यांच्या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्नशील असते.

  • लवलिना म्हणाली, ‘मेरीकोम शिबिरादरम्यान नेहमी आमची मदत करण्यासाठी सज्ज असते. तसे प्रशिक्षक आमच्यासोबत असतात, पण जर आम्ही चुकीचा पंच मारला, तर मेरीकोम आम्हाला शिकवते. तिला प्रदीर्घ अनुभव आहे. ती रिंगमध्ये उतरण्यापूर्वी मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर देते. त्याचप्रमाणे रिंगमध्ये तुमचे वर्तन कसे असावे, याबाबत मार्गदर्शन करते. ती सर्वांना प्रेरित करते. तिचा सराव चांगला असून ती निश्चितच सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावेल. मीसुद्धा तिच्याप्रमाणे कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहे. ती सर्व महिला बॉक्सर्सचे प्रेरणास्रोत आहे.’

  • वर्षाच्या सुरुवातीला इंडिया ओपनमध्ये वेल्टरवेट गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या लवलिनाला गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते, पण त्यात ती अपयशी ठरली. याबाबत विचारले असता ती म्हणाली, ‘मी माझ्यातर्फे सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. निकाल २-३ असा राहिला. मी काही चुका केल्या. त्यामुळे माझे पदक हुकले.

  • आता मात्र मी त्या चुका सुधारल्या आहेत. सराव चांगला होत असून मायदेशात खेळताना भारताला पदक मिळवून द्यावेच लागेल.’ आसामच्या या बॉक्सरने आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि प्रेसिडेंट््स कपमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला होता. 

भारतीय सैनिकांचे फ्रान्समध्ये ५७ ठिकाणी पुतळे :
  • पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीच्या स्मृतिप्रीत्यर्थ फ्रान्समधील लॅव्हेन्टी या शहरात नव्याने उभारलेल्या पुतळ्याचे अनावरण रविवारी, सैन्य दिनानिमित्त झाले. १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपल्याच्या स्मरणार्थ हा दिन पाळला जातो.

  • ब्रिटिश सैन्यातून लढताना हौतात्म्य आलेल्या भारतीय सैनिकांना फ्रान्समधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये दफन केलेले आहे. या ठिकाणांजवळ अशी ५७ स्मृतिस्थळे उभारण्याची योजना ‘इंटर फेथ शहिदी कोमेमोरेशन असोसिएशन’ (आयएफएससी) या संस्थेने आखली आहे. त्यापैकी हा सात फुटी कांस्य पुतळा पहिलेच स्मारक आहे. लॅव्हेन्टी येथील दोन मृतावशेष हे ३९ व्या रॉयल गढवाल रायफल्सच्या जवानांचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे गेल्या वर्षी पुन्हा लष्करी इतमामात दफन करण्यात आले होते.

  • फ्रान्सच्या भूमीत चिरनिद्रा घेत असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांचे अशा सर्व ५७ ठिकाणी पुतळे उभारण्याच्या प्रकल्पाला आम्ही लॅव्हेन्टीतून आरंभ केला आहे. 

एका दिवसात २८ हजार लोकांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला दिली भेट :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या भव्य पुतळयाचे लोकार्पण केले होते. जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी लोकांची इथे रांग लागली आहे. लोकांनी रॅकॉर्डब्रेक हजेरी लावली आहे.

  • शनिवारी २८ हजार लोकांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट दिली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर एक नोव्हेंबर पासून सर्वसामान्य लोकांसाठी हा पुतळा खुला करण्यात आला. दररोज येथे हजारो लोक हजेरी लावत 

  • शनिवारी येथे २८, ४०९ पर्यटकांनी आपली उपस्थिती दर्शवली. दिवसभरात यामधून ४८.४४ लाख रूपयांची कमाई झाली आहे. आतापर्यंत पर्यटकांकडून १.२६ कोटी रूपये जमा झाले आहेत. दिवाळीमधील सुट्ट्यांचा फायदा झाला आहे.

  • नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा पुतळा १८२ मीटर उंच आहे. पुतळ्यात असलेली लिफ्ट दिवसभरात ५००० लोकांना घेऊन जाते. मुर्तीमध्ये एकावेळी २०० पर्यटक राहू शकतात.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात :
  • रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. छत्तीसगड विधानसभेच्या 18 जागांसाठी आज मतदान होत आहे. दहा जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत याठिकाणी मतदान होणार आहे. तर इतर आठ जागांसाठी मतदान 8 वाजता सुरूवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.

  • छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये आज 18 जागांसाठी, तर उरलेल्या 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

  • निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी तीन वेळा हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक जवान जखमी झाले, अनेक नागरिकांचाही यामध्ये मृत्यू झाला.

  • या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास सव्वा लाख जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

  • नक्षलग्रस्त भागातील आठ जिल्ह्यात मुख्यमंत्री रमन सिंह यांच्यासह 190 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं :
  • नवी दिल्ली: मोदी सरकारनं गेल्या वर्षभरात जवळपास 25 गावं आणि शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय नामांतराचे अनेक प्रस्ताव अद्यापही सरकारकडे प्रलंबित आहेत. यामध्ये पहिला क्रमांक पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव बदलून ते प्रयागराज करण्यात आलं. तर फैजाबादचं नामांतर अयोध्या असं करण्यात आलं. 

  • पश्चिम बंगालचं नामांतर बांग्ला करण्यासह अनेक ठिकाणच्या नामांतराचे प्रस्ताव मोदी सरकारकडे प्रलंबित आहेत. एखाद्या शहराच्या किंवा गावाच्या नामांतरांची प्रक्रिया खूप मोठी असते. नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विविध विभागांकडे पाठवला जातो. गेल्या वर्षभरात असे 25 प्रस्ताव सरकारनं मंजूर केल्याची माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. 

  • कोणकोणत्या ठिकाणांची नावं बदलली - अलाहाबादचं नामांतर प्रयागराज आणि फैजाबादचं नाव बदलून ते अयोध्या करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं दिला होता. याशिवाय आंध्र प्रदेशतील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामुंदरीचं नामांतर राजामहेंद्रवरम असं करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. याशिवाय ओदिशाच्या भद्रक जिल्ह्यातील आऊटर व्हीलरचं नाव बदलून ते ए. पी. जे. अब्दुल कलाम आयलँड करण्यासही सरकारनं हिरवा कंदिल दिला आहे. तर केरळच्या मलुप्परा जिल्ह्यातील एरिक्कोडला एरिकोड, हरयाणाच्या जींद जिल्ह्यातील पिंडारीला पांडू देण्याचा प्रस्तावदेखील सरकारनं मंजूर केला आहे. 

  • या ठिकाणांची नावंही लवकरच बदलणार - लांडगेवाडी (सांगली, महाराष्ट्र)-  नरसिंहगांव, गढी सांपला (रोहतक, हरयाणा)- सर छोटू राम नगर, खाटू कलां गांव (नागौर, राजस्थान)- बड़ी खाटू, महगवां छक्का (पन्ना, मध्य प्रदेश)- महगवां सरकार, महगवां तिलिया (मध्य प्रदेश)- महगवां घाट, शुक्रताल खादर (मुजफ्फरपूर, उ. प्रदेश)- सुखतीर्थ खादर, शुक्रताल बांगर (उ. प्रदेश)- सुखतीर्थ बांगर 

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन :
  • बंगळुरु : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांचं कर्करोगाने निधन झालं. कर्नाटकच्या बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी आज वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली.

  • अनंत कुमार यांच्यावर सुरुवातीला लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर 20 ऑक्टोबरला त्यांना बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बंगळुरुतील नॅशनल कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार आहे.

  • अनंत कुमार यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने मागील आठवड्यात शुक्रवारीच दिली होती. परंतु त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांना काही दिवस आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पंरतु आज त्यांची प्राणज्योत मालवली.

  • दरम्यान अनंत कुमार यांच्या निधनामुळे आज कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवट जाहीर करण्यात आला आहे. तर आज एक दिवसाची सुट्टी घोषित केली आहे.

भारतीय महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा विजय, पाकिस्तानला चारली धूळ :
  • गयाना : महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव करत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. विजयासाठी 134 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने 7 विकेट्स आणि 6 चेंडू राखत विजय मिळवला. मिताली राजने शानदार 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • त्याआधी, या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला वीस षटकांत सात बाद 133  धावांवर रोखलं. पाकिस्तानच्या बिस्मा मारुफ आणि निदा डारनं या सामन्यात झुंजार अर्धशतकं झळकावली. त्या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारीही रचली. पण भारताच्या हेमलतानं त्या दोघींना माघारी धाडून पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. पूनम यादवनं दोन आणि अरुंधती रेड्डीनं एक विकेट काढून आपली कामगिरी चोख बजावली.

  • नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवत पहिल्या 3 फलंदाजांना अवघ्या 30 धावांमध्ये माघारी धाडलं. मात्र बिसमाहने 4 चौकारांच्या मदतीने 54 धावांची तर निदा डारने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 52 धावा करत संघाची धावसंख्या 133 वर पोहोचवली.

दिनविशेष :
  • जागतिक न्यूमोनिया दिन

महत्वाच्या घटना 

  • १९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

  • १९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

  • १९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

  • १९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

  • १९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.

  • १९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९०: टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.

  • १९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.

  • १९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.

  • २०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • २०००: भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

  • २००३: शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

जन्म 

  • १८१७: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १८९२ – आक्रा, इस्त्राएल)

  • १८६६: चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष सन यट-सेन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९२५)

  • १८८०: सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा पारनेर, जि.अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

  • १८८९: रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९८१)

  • १८९६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८७)

  • १९०४: समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू  श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल १९८९)

  • १९४०: हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९९२ – मुंबई)

मृत्यू 

  • १९४६: बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर१८६१)

  • १९५९: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

  • १९५९: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८६)

  • १९९७: वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे पुणे येथे निधन.

  • २००५: रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी१९२४)

  • २००७: भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१९)

  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९४६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.