चालू घडामोडी - १२ सप्टेंबर २०१८

Date : 12 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
किम जोंग यांच्या पत्रानंतर दुसऱ्या शिखर बैठकीची तयारी :
  • वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन व अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जूनमध्ये सिंगापूर येथे झालेल्या पहिल्या बैठकीची फलनिष्पत्ती फार चांगली नसून आता दुसऱ्या भेटीसाठी वाटाघाटी सुरू करण्यात आल्या  आहेत. किम जोंग उन यांनी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांना पत्र पाठवून दुसऱ्या बैठकीसाठी विनंती केली आहे. या प्रस्तावावर विचार करण्यात येत असून या शिखर बैठकीची तयारी सुरू करण्यात आल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

  • अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील चर्चा जूनमधील ऐतिहासिक भेटीनंतर खुंटली असून अध्यक्ष ट्रम्प यांना किम जोंग उन यांचे पत्र मिळाले आहे. हे पत्र सकारात्मक असून आम्ही हे पूर्ण पत्र जाहीर करू शकत नाही असे व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी मंत्री सारा सँडर्स यांनी सोमवारी सांगितले.

  • अध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर दुसऱ्या बैठकीचे नियोजन करणे हा या पत्राचा हेतू  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना उत्तर कोरियाची भेट लांबणीवर टाकण्यास सांगितले होते. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करण्यात कुठलीही प्रगती दाखवलेली नाही असे त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटले होते.

  • सोमवारी सँडर्स यांनी सांगितले की, किम जोंग उन यांचे पत्र हा दोन्ही देशाच्या नेत्यांमधील संबंधात प्रगती होत असल्याचा पुरावा आहे. दोन्ही नेत्यांत शिखर बैठक व्हावी अशी व्हाइट हाऊसची  इच्छा आहे. किम जोंग यांची संवाद चालू ठेवण्याची इच्छा असून अण्वस्त्रे नष्ट करण्याची वचनबद्धताही कायम आहे.

डॉलरचे मूल्य ८० रुपयांवर जाणार, सरकारचा अंदाज :
  • मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आज ७२.६९ रुपये इतके असले तरी ते ८० रुपयांवर जाणार असल्याचे महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने गृहीत धरले आहे. रुपया आणखी घसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत हेलिकॉप्टर खरेदीबाबतचे शुद्धिपत्रक विभागाने काढले आहे.

  • अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय ८ मे २०१८ रोजी शासनाने घेतला होता. तेव्हा डॉलरच्या तुलनेत ७२.६९ रुपये असे मूल्य होते. अमेरिकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल आॅपरेशन या कंपनीकडून १२७ कोटी ११ लाख रुपयांत हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले होते.

  • मात्र, आता रुपया घसरल्याने हेच हेलिकॉप्टर १४५ कोटी २७ लाख रुपयांना खरेदी करावे लागेल. याचा अर्थ रुपया घसरल्याने राज्य सरकारला १८.१६ कोटी रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

  • प्रचलित दरानुसारच बिल शुद्धीपत्रकात प्रचलित परकीय चलन दरानुसारच बिल अदा करावे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता ८० रूपयांप्रमाणे देयक अदा केले जाणार, असा समज असण्याचे काहीच कारण नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

'आधार' हॅक करण्याचा दावा खोटा- UIDAI :
  • नवी दिल्ली : आधार नोंदणी सॉफ्टवेअर हॅक करण्याच्या वृत्तानंतर 'यूआयडीएआय'नं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'यूआयडीएआय'नं म्हटलं की, बायोमॅट्रिक नोंदणीशिवाय कोणत्याही व्यक्तीला आधार कार्ड दिलं जात नाही किंवा आधारकार्ड अपडेट केलं जात नाही.

  • याशिवाय आधारची यंत्रणा कोणीही हॅक करु शकत नाही. आधारचं सॉफ्टवेअर आणि आयडी डेटासोबत कुठल्याही प्रकारे तडजोड करता येत नाही. त्यामुळे आधार यंत्रणा हॅक करण्याचे दावे निरर्थक असल्याचं 'यूआयडीएआय'नं म्हटलं आहे.

  • आधारचं सॉफ्टवेअर हॅक झाल्याचे आरोप 'यूआयडीएआय'नं नाकारले आहेत. तसेच काही लोक जाणूनबुजून नागरिकांमध्ये 'आधार'बाबत संशय निर्माण करत असल्याचा दावा 'यूआयडीएआय'नं केला आहे. आधारकार्डच्या सुरक्षेसंदर्भात सर्व काळजी घेण्यात येत असल्याचं 'यूआयडीएआय'नं स्पष्ट केलं आहे.

  • बायोमेट्रिक माहिती मिळाल्याशिवाय आधार कार्ड दिलं जात नाही. तसेच आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट करण्यासाठी नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे आधारकार्डाच्या सॉफ्टवेअरमध्ये व्यक्तीच्या परवानगीशिवाय कोणतीही नोंदणी केली जाऊ शकत नसल्याची माहिती 'यूआयडीएआय'नं दिली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचं निधन :
  • लंडन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम नवाज यांचं निधन झालं. 68 वर्षीय कुलसुम नवाज यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. कुलसुम नवाज व्हेंटिलेटवर होत्या.

  • पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांचे पुत्र हुसेन नवाज यांनी कुलसुम यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कुलसुम नवाज यांना घशाचा कॅन्सर होता. त्यांच्यावर जून, 2017 पासून लंडनच्या हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते.

  • उपचारादरम्यानच त्यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं होतं. सोमवार रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती. परंतु आज कुलसुम नवाज यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांचा जन्म 1950 मध्ये झाला होता. 1971 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. कुलसुम नवाज यांची मुलगी मरियम नवाज आणि पती नवाज शरीफ सध्या रावळपिंडीमधील तुरुंगात बंद आहेत.

मोदींचं अंगणवाडीसेविकांना गिफ्ट, मानधनात भरघोस वाढ :
  • नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. ज्या अंगणवाडी सेविकांना सध्या 3 हजार रुपये मानधन मिळतं, त्यांना आता 4 हजार 500 रुपये मिळतील. तर ज्या सेविकांचं मानधन 2250 रुपये आहे, त्यांचं 3500 रुपये होईल. अंगणवाडी सहाय्यकांना 1500 ऐवजी 2200 रुपये मिळतील, अशी घोषण पंतप्रधान मोदींनी केली.

  • नरेंद्र मोदी यांनी आज अंगणवाडी सेविकांशी  ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे संवाद साधला.  यादरम्यान मोदींनी अंगणवाडीसेविकांना ही खुशखबर दिली. महत्त्वाचं म्हणजे वाढीव मानधन पुढच्या महिन्यापासूनच लागू होणार आहे. जवळपास 14 लाखांपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना याचा लाभ होणार आहे.

  • इतकंच नाही तर अंगणवाडीसेविका आणि त्यांच्या सहाय्यकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत मोफत विमा कवचही मिळणार आहे.

  • मोदींनी यावेळी अंगणवाडीसेविकांचं कौतुक केलं. मोदी म्हणाले, देवाकडे हजारो हात असतात. म्हणजे देवाच्या शरिराला हात असतात असं नाही, तर त्यांच्यातर्फे काम करणारे अनेक लोक असतात. तुम्ही-अंगणवाडीसेविका माझे हात आहात.

एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचंही आता प्रमोशन :
  • मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने भेट दिली आहे. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचंही प्रमोशन होणार असून, प्रमोशन प्रक्रियेत 25 टक्के आरक्षणाची घोषणाही करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली.

  • एसटी महामंडळात चालक, वाहक, शिपाई या पदांवर काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं प्रमोशन होणार आहे.

  • एसटी महामंडळात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ वेतनवाढ दिली जायची. मात्र, लिपिक-टंकलेखक या तृतीय श्रेणीतील किंवा इतर वरिष्ठ पदांच्या बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान नव्हते. आता मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग-3 मधील बढती प्रक्रियेत 25% राखीव जागा ठेवण्यात येतील, अशी घोषणा परिवहन मंत्री दिनाकर रावतेंनी केली.

  • एसटी महामंडळात सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी 60 ते 70 हजार कर्मचारी चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध चतुर्थ श्रेणीतील पदांवर कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक कर्मचारी एकाच पदावर रुजू होऊन, 30-35 वर्षे सेवा बजावून त्याच पदावर निवृत्त झाले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.

  • १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.

  • १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.

  • १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.

  • १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

  • २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.

  • २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

जन्म

  • १७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.

  • १८८०: सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा पारनेर अहमदनगर येथे जन्म.

  • १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)

  • १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)

  • १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)

मृत्यू

  • १९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.

  • १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.

  • १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)

  • १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)

  • १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)

  • १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.