चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ सप्टेंबर २०१९

Updated On : Sep 12, 2019 | Category : Current Affairsडीआरडीओकडून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी :
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे.

 • डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राचे वजन इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाॅंचरद्वारे लाॅंच केले गेले होते. यानंतर त्याने त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेने व आक्रमकतेने भेदले.

 • या क्षेपणास्राची तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डीआरडोओ’चे अभिनंदन केले आहे. सध्या कलम ३७० हटवण्यात आल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातारण आहे. या पार्श्वभूमीवर ही क्षेपणास्र चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.

 • यापूर्वी भारतीय सैन्याने राजस्थानमधील पोखरण येथे ‘नाग’ या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्रदेखील डीआरडीओनेच विकसीत केले होते. आता तिसऱ्या पिढीतील रणगाडा भेदी नाग क्षेपणास्राच्या निर्मितीचे कार्य या वर्षाअखेर सुरू होणार आहे.

‘संसद स्थगित करण्याचा जॉन्सन यांचा निर्णय बेकायदा’ :
 • लंडन : ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या नियोजित तारखेच्या दोन महिन्यांपूर्वी देशाची संसद स्थगित करण्याचा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा निर्णय बेकायदा असल्याचा निर्णय स्कॉटलंडच्या एका न्यायालयाने बुधवारी दिला. तथापि, संसद स्थगितीचा निर्णय रद्द करण्याचा आदेश त्यांनी दिला नाही.

 • या मुद्दय़ावर ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय घ्यायला हवा, असे एडिनबर्ग येथील स्कॉटलंडच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले. तेथील सुनावणी मंगळवारी सुरू होणार आहे.

 • ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर  पडण्याच्या दोन आठवडे आधीपर्यंत,  म्हणजे १४ ऑक्टोबपर्यंत देशाची संसद पाच आठवडय़ांसाठी स्थगित करण्याच्या, किंवा औपचारिकरीत्या कामकाज थांबवण्याच्या सरकारच्या निर्णयाला ७० लोकप्रतिनिधींच्या एका गटाने आव्हान दिले आहे.

 • पुढील महिन्यात संसदेच्या नव्या सत्रात ब्रेग्झिटविषयीचा आपला अजेंडा नव्याने सुरू करता यावा यासाठी आपण ही कृती केल्याचा जॉन्सन यांचा दावा आहे. मात्र, संसद स्थगितीमुळे त्यांची बंडखोर लोकप्रतिनिधींच्या विरोधाला तोंड देण्यापासून काही दिवसांसाठी सुटका होणार आहे. जॉन्सन हे लोकशाही मार्गाने होणाऱ्या समीक्षेपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द :
 • बीजिंग : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात  व्यापार चर्चा सुरू होणार असून त्याआधीच एक सकारात्मक निर्णय घेऊन अमेरिकेवर प्रभाव पाडण्याचा चीनचा प्रयत्न दिसून येत आहे.

 • अमेरिकेने व्यापार युद्धात दणका दिल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. चीन व अमेरिका यांच्यात गेले एक वर्षभर व्यापार युद्ध सुरू असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. बुधवारी चीनने एकूण १६ प्रवर्गातील अमेरिकी वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तो १७ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. हा निर्णय एक वर्षांसाठी अमलात राहील असे सांगण्यात आले.

 • सागरी उत्पादने व कर्करोगविरोधी औषधांसह काही वस्तूंचा यात समावेश असून आयात शुल्क रद्द केलेल्या वस्तूंच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. चीनने अमेरिकी वस्तूंवरचा आयात शुल्क  रद्द करण्याचा हा पहिलाच निर्णय असून यापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर आयात कर वाढवले होते. अल्फाल्फा पेलेट, माशांचे खाद्य, वैद्यकीय लिनियर प्रवेगक, मोल्ड रिलीज एजंट या वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्यात आला आहे. यात सोयाबीन, डुकराचे मांस यांचा समावेश मात्र केलेला नाही.

एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी :
 • मथुरा, उत्तर प्रदेश : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू ओढवतो, तसेच माणसांवरही त्याचे अनिष्ट  परिणाम होत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

 • कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करण्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी कचरावेचक महिलांसमवेत जमिनीवर बैठक मारून कचऱ्यातून प्लास्टिक बाजूला करण्याचे काम काही काळ केले.  मोदी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाला २०२४ पर्यंत केंद्र सरकार १२६५२ कोटी रुपये मदत देणार आहे. यात ५०० दशलक्ष जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.  ३६ दशलक्ष वासरांचे लसीकरण यात केले जाणार असून त्यामुळे त्यांचे ब्रुसेलोसिस रोगापासून संरक्षण होईल. यात २०२५ पर्यंत रोगनियंत्रण व २०३० पर्यंत रोग निर्मूलन असे दोन भाग आहेत.

 • मोदी यांनी राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा शुभारंभ केला, त्या वेळी त्यांनी शेतक ऱ्यांशी संवाद साधला.

 • प्लास्टिक  कचरा वेगळा करणाऱ्या २५ कचरावेचक महिलांशी मोदी बोलले, त्यांना काही प्रश्न विचारले, या महिलांचा गौरवही करण्यात आला.  २०२२  पर्यंत एकदा वापराच्या प्लास्टिकला हद्दपार करण्याचे सरकारने ठरवले आहे, त्यासाठी प्लास्टिक गोळा करणे व त्याचा फेरवापर करणे गरजेचे आहे असे मोदी यांनी या वेळी सांगितले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.

 • १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.

 • १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.

 • १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.

 • १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.

 • १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.

 • १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.

 • १९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.

 • १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

 • २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.

 • २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.

 • २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

जन्म 

 • १४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.

 • १६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.

 • १७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.

 • १८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)

 • १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)

 • १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)

 • १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)

 • १९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.

 • १९७७: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.

 • १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.

 • १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)

 • १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)

 • १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)

 • १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)

 • १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)

 • १९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.

 • १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.

 • १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)