चालू घडामोडी - १३ एप्रिल २०१८

Date : 13 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बांगलादेशने हटवलं सरकारी नोक-यांमधील आरक्षण :
  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारी नोक-यांमधील आरक्षण हटवणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष गटांसाठी सरकारी नोक-यांमध्ये असलेल्या आरक्षण योजनेविरोधात हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. शेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशमध्ये झालेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आंदोलन होतं.

  • बांगलादेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येऊन आंदोलन केलंय असं आतापर्यंत झालेलं नाही. ढाका येथील रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोकांनी जमा होऊन आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकजण जखमीही झाले होते.

  • बांगलादेश सरकारच्या आरक्षण योजनेनुसार, सार्वजनिक विभागातील ५६ टक्के नोक-या स्वातंत्र्यसैनिकांची मुलं, महिला, पारंपारिक अल्पसंख्यांक, अपंग आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी राखीव होते. हे आरक्षण १० टक्क्यांवर आणण्याची मागणी आंदोलनकर्ते करत होते. यासोबतच नोकरीसाठी अर्ज करणा-याला आरक्षणाची संधी किंवा हक्क फक्त एकदाच देण्यात यावा अशीही त्यांची मागणी होती.

  • ढाका येथे घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी महत्वाचे रस्ते अडवून धरले होते. आंदोलनाचा फटका बसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. आंदोलनात सहभागी एका विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आरक्षण मिळणारे विशेष गट लोकसंख्येच्या फक्त दोन टक्के असून, इतर ९८ टक्के लोकसंख्या ही ४४ टक्के जागांसाठी भांडत असते. ही आरक्षण पद्धत भेदभाव करणारी असून सर्वांना समान संधी मिळायला हवी’.

‘अ‍ॅट्रॉसिटी’तील तरतुदी झाल्या सौम्य :
  • नवी दिल्ली : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयाने यातील तरतुदी सौम्य झाल्या आहेत, असे स्पष्ट मत नोंदवून, त्यामुळे देशाचे नुकसान होईल. म्हणून त्यात दुरुस्तीसाठी पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी केली.

  • न्यायालयाच्या निकालामुळे देशात क्रोध, अस्वस्थता व विसंगतीची भावना निर्माण झाली. संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निकालाचा कोर्टाने पुनर्विचार करून, आधीचे आदेश मागे घ्यावेत, अशी विनंतीही केंद्र सरकारने केली.

  • सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारसह इतर सर्व राज्यांकडून या विषयी आपले मत मागवले होते. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत एफआरआय दाखल करण्यापूर्वीच पोलीस उपाधीक्षकांद्वारे तपासणीचे आदेश दिल्यास हे कायद्याचे उल्लंघन ठरेल, असं मत अॅटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलं.  

  • दरम्यान, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) तक्रारीची सखोल चौकशी केल्याशिवाय यापुढे कोणाहीविरुद्ध गुन्हा नोंदवता येणार नाही. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंदवला तरी सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी संमतीखेरीज आरोपीस अटकही करता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 20 मार्च रोजी दिला होता.

  • दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) हेतू जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचा नाही, असे स्पष्ट करत या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होते. या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यास सरसकट अटक करता कामा नये, असेही न्यायालयानं स्पष्ट केले होते. 

शहीद किरण यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार :
  • औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी लष्कराच्या विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. मूळ गावी फकिराबादवाडी (ता. वैजापूर) येथे शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात युनिट-४ ‘एमएलआय’चे जवान किरण थोरात यांना वीरमरण आले. लष्कराचे नायब सुभेदार संजय पाटील, हवालदार पांडुरंग गोरे हे विशेष विमानाने त्यांचे पार्थिव घेऊन सायंकाळी विमानतळावर दाखल झाले. विमानतळाच्या इमारतीसमोरील चबुतऱ्यावर पार्थिव ठेवण्यात आले.

  • अखेरचा संवाद... माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्या थोरात यांना वीरमरण आल्याचे कळताच फकिराबादवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली. शहीद थोरात यांचे घर शेतवस्तीवर असून तेथे त्यांचे आई वडील, भाऊ, पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा श्लोक व मोठी मुलगी श्रेया राहते.

बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज उद्घाटन :
  • नवी दिल्ली : घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना समर्पित महापरिनिर्वाण स्थळावरील राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे.

  • दिल्लीतील अलीपूर रोड स्थित या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ २०१६ मध्ये झाला होता. कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी वास्तव्यास होते तेथे हे स्मारक उभारण्यात आले आहे.

  • याच ठिकाणी त्यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. २६, अलीपूर रोड येथे त्यावेळी दिल्लीतील सिरोहीच्या महाराजांचे घर होते.

महाराष्ट्राच्या राहुलने गाजविले राष्ट्रकुल :
  • गोल्ड कोस्ट : मल्लांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदक पटकावण्याच्या मोहिमेत आज आपले योगदान दिले, तर नेमबाजी व मैदानी स्पर्धेतही भारताच्या पदरात काही पदकांची भर पडली. सुशील कुमारने सहज सुवर्णपदक पटकावले, तर सीमा पूनियाने महिला थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकावताना मैदानी स्पर्धेत भारताचे खाते उघडले. माजी विश्व चॅम्पियन तेजस्विनी सावंतने नेमबाजीमध्ये रौप्यपदक पटकावले.

  • भारताने आज एकूण २ सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. भारताने पदक तालिकेत आॅस्ट्रेलिया व इंग्लंडनंतर तिसरे स्थान कायम राखले आहे. भारताच्या नावावर आता १४ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकांची नोंद आहे. दिवसाची सुरुवात ब्रिस्बेनमध्ये बेलमोंट शूटिंग सेंटरमध्ये सावंतच्या रौप्यपदकाने झाली. तिने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये हे पदक पटकावले. त्यानंतर करारा स्पोर्ट््स अँड लीजर सेंटरमध्ये कुस्तीत भारतीय मल्लांनी छाप सोडताना २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक पटकावले.

  • विद्यमान चॅम्पियन सुशीलने (७४ किलो) मॅटवर अधिक वेळ घालविला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या जोहानेस बोथाविरुद्ध अंतिम लढत त्याने केवळ २० सेकंदामध्ये संपविली. त्याने सहज विजय मिळवताना सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रुकल स्पर्धेत तीन सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय मल्ल ठरला.

  • राहुल आवारे (५७ किलो) यानेही सुवर्णपदक पटकावले. अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, पण या वेळी संधी मिळाल्यानंतर त्याने छाप सोडली. त्याने अंतिम फेरीत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीचा पराभव केला. विद्यमान चॅम्पियन बबिता फोगाटला (५३ किलो) मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, तर किरणने ७६ किलो गटात कांस्यपदकाचा मान मिळवला.

  • सायंकाळच्या सत्रात सीमा पूनिया व नवजित कौर ढिल्लो यांनी महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावताना भारताला मैदानी स्पर्धेत पदकांचे खाते उघडून दिले. बॅडमिंटनमध्ये भारतासाठी अनुकूल निकाल मिळाले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांनी सहज विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

महाराष्ट्राच्या तेजस्विनीची गोल्डकोस्टमध्ये सुवर्णकमाई, अंजुम मुद्गीलला रौप्य - राष्ट्रकुल २०१८ :

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केल्यानंतर, आजही भारताला कुस्तीपटूंकडून पदकाची मोठी आशा आहे. अपेक्षेप्रमाणे भारताच्या कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं आहे.

याव्यतिरीक्त आज भारताना नेमबाजीतूनही काही पदकं मिळण्याची शक्यता आहे. सध्या भारत १४ सुवर्ण आणि ७ रौप्य पदकांसह पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी पदकांची भर पडल्यास भारताचं पदकतालिकेतलं तिसरं स्थान आणखी भक्कम होण्याची शक्यता आहे.

  • २५ मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भनवालाला सुवर्णपदक
  • ५२ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर गौरव सोळंकी
  • ४ * ४०० मी. रिले शर्यतीत भारतीय महिलांचा संघ अंतिम फेरीत दाखल
  • ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्ण तर अंजुन मुद्गीलला रौप्य पदक
  • नेमबाजीत भारताला आणखी एका सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई
  • आयोजन समितीचे भारतीय पथकाच्या प्रमुखांना दोन्ही खेळाडूंनी भारतात परत पाठवण्याचे आदेश
  • नियमांचा भंग केल्याप्रकरणी अॅथलिट के. टी. इरफान, राकेश बाबूवर कारवाई
  • नेमबाजी – ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताची तेजस्विनी सावंत, अंजुम मुद्गील अंतिम फेरीत
  • ९७ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात मौसम खत्री अंतिम फेरीत, कुस्तीत भारताची ३ पदकं निश्चीत
  • ६८ किलो वजनी गटात भारताची दिव्या करन दुसऱ्या फेरीत पराभूत, पदकांच्या शर्यतीमधून माघारी
  • ६५ किलो वजनी गटातही भारताच्या बजरंग पुनियाची अंतिम फेरीत धडक
  • ५७ किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू पुजा धांडा अंतिम फेरीत
दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

  • १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

  • १८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

  • १९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

  • १९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

  • १९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.

  • १९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

जन्म

  • १७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

  • १८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)

  • १९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.

  • १९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.

  • १९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)

  • १९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.

  • १९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.

  • १९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

मृत्यू

  • १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

  • १९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)

  • १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)

  • १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

  • १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

  • २०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.

  • २००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.