चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ एप्रिल २०१९

Date : 13 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
किंग ऑफ फेसबुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले 'नंबर वन' नेते :
  • नवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता मिळवली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनविण्यात सोशल मिडीयाचा मोठा वाटा आहे. अनेक वर्षानंतर नरेंद्र मोदींवर विश्वास टाकत लोकांनी प्रचंड बहुमतात मोदी सरकार निवडून दिलं.  सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

  • नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स आहेत.

  • वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या नंबरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला 2.30 कोटी लाईक्स आहेत. हा अहवाल दरवर्षी तयार केला जातो. तर या अहवालानुसार ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फेसबुकवर सर्वाधिक वेळ घालवत असल्याचं सांगण्यात आलंय. 

  • या अहवालानुसार तिसऱ्या नंबरवर क्वीन रानिया यांचा नंबर लागतो. जॉर्डनचे सुलतान अब्दुल्लाह यांच्या पत्नी असलेल्या रानिया यांना 1.69 कोटी लाईक्स आहेत. रानिया यांचे फेसबुकसोबत ट्विटर, इंन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरदेखील अकाऊंट आहेत. एक मार्चपर्यंत फेसबुकने केलेल्या अहवालानुसार फेसबुकच्या या सर्व पेजेसला मिळून 34.50 कोटी लाईक्स आहेत. तर पेजवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर 76.7 कोटी लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आहेत.  

इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून निधी देण्यावर बंदी नाही, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश :
  • नवी दिल्ली : राजकीय पक्षांना निधी पुरविण्यासाठी इलेक्टोरल बाँड आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला निवडणूक आयोगाने बुधवारी सुप्रीम कोर्टात विरोध केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून निधी देण्यावर बंदी आणण्यासाठी नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, इलेक्टोरल बाँडच्या विरोधातील याचिकांवर विस्तृत सुनावणी केली जाईल. तोवर सर्व राजकीय पक्षांनी अशा पद्धतीने मिळालेल्या निधीचे विवरण सीलबंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

  • केंद्र सरकारच्या इलेक्टोरल बाँडवर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. सुप्रीम कोर्ट या इलेक्टोरल बाँडची घटनात्मक वैधता तपासत बाँडच्या माध्यमातून निधी देण्यावर बंदी आणण्यासाठी नकार दिला आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीची माहिती निवडणूक आयोगाला देण्यावरील बंधन दूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राजकीय पक्ष आता सरकारी कंपन्या आणि परदेशी स्रोतांकडून देणगी घेऊ शकणार आहेत. यामुळे कायद्याचे उल्लंघन होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते.

  • मात्र सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून निधी देण्यावर बंदी आणण्यासाठी नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, इलेक्टोरल बाँडच्या विरोधातील याचिकांवर विस्तृत सुनावणी केली जाईल. तोवर सर्व राजकीय पक्षांनी अशा पद्धतीने मिळालेल्या निधीचे विवरण सीलबंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसच्या सात उमेदवारांची नवी यादी जाहीर; ज्योतिरादित्य शिंदे, मनिष तिवारी यांची नावं :
  • नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज सात उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि पंजाबच्या उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत माजी  केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशच्या गुना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांना पंजाबच्या आनंदपूर साहिबमधून मैदानात उतरवण्यात आलं.

  • काँग्रेसच्या या यादीत शाश्वत केदार यांना बिहारच्या बाल्मिकी नगरमधून, रिगजिन स्पालबार यांना जम्मू-काश्मीरच्या लडाखमधून, शैलेंद्र पटेल यांना मध्य प्रदेशच्या विदिशामधून, मोना सुसतानी यांना मध्य प्रदेशच्या राजगडमधून तर केवल सिंह धिल्लों यांना पंजाबच्या संगरुरमधून तिकीट देण्यात आलं आहे.

  • ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या गुना मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना त्याच मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना पश्चिम यूपी काँग्रेसचं प्रभारीपद दिल्यानंतर ते निवडणूक लढवणार नाहीत, अशी अटकळ बांधली जात होती. पण यादी जाहीर झाल्यानंतर सगळ्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.

अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोनच दिवसांची 'इलेक्शन ड्युटी', हायकोर्टाचा निर्णय :
  • मुंबई : राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केवळ दोन दिवसांची 'इलेक्शन ड्युटी' लावली जाणार आहे. म्हणजेच त्यांना केवळ मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशीच इलेक्शन ड्युटी करावी लागणार, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं हायकोर्टात सांगितलं आहे.

  • मात्र त्याआधी या कामासाठी तीन दिवस काही तासांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना हजर राहावं लागेल. याची नोंद घेत अनुदानित शाळा संघटनेच्यावतीनं यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठानं सुनावणी पूर्ण करत या याचिका निकाली काढल्या आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून याचिकाकर्त्यांना इलेक्शन ड्युटीवर तात्काळ रूजू होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र शाळांमध्येही इतर कामं असतात, तसेच या कामाचा निश्‍चित अवधी या नोटीसमध्ये दिलेला नसल्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेपेक्षा अधिक काम करावं लागतं, असा आरोप करत याबाबत संघटनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

  • संबंधित शाळा या अनुदानित असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांना आयोग निवडणुकीच्या कामासाठी बोलावू शकतं, असा खुलासा निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आला होता. मात्र नियमानुसार या कामासाठी निश्‍चित वेळ मर्यादेबाबत काही धोरण आहे का? असा प्रश्‍न हायकोर्टाने उपस्थित केला होता.

पहिल्या टप्प्यात ६९.४३ टक्के मतदान, बंगालमध्ये पडली सर्वाधिक मतं :
  • लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (११ एप्रिल) १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत ९१ जागांसाठी एकूण ६९.४३ टक्के मतं पडली. राज्यांमध्ये सर्वाधिक ८३.७९ टक्के मतदान पश्चिम बंगालच्या दोन जागांवर झाले. तर सर्वाधिक कमी ५३.४७ टक्के मतदान बिहारमधील चार जागांवर झाले. तर केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये ८४.९६ टक्के मतदान झाले. या आकडेवारीत काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

  • हायटेक व्यवस्था केलेली असतानाही २४ तासांनंतरही मतदानाची संपूर्ण आकडेवारी समोर न आल्याने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत सर्व ९ टप्प्यांमध्ये एकूण ६६.४४ टक्के मतदान झाले होते.

  • पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये लक्षद्वीप आणि बंगाल पुढे आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश (७८.१४ टक्के), अरुणाचर प्रदेश (६७.०८), आसाम (७८.२३), बिहार (५३.४७), छत्तीसगड (६५.८०), जम्मू-काश्मीर (५७.३५), महाराष्ट्र (६३.०४), मणिपूर (८२.८२), मेघालय (७१.४१), मिझोराम (६३.०२), नागालँड (८३.१२), ओडिशा (७३.७६), सिक्किम (७८.१९), तेलंगाणा (६२.६९), त्रिपुरा (८३.२६), उत्तराखंड (५९.८९), प. बंगाल (८३.७९), अंदमान-निकोबार (६४.८५) आणि लक्षद्वीप (८४.९६) मतदान झाले.

  • दरम्यान, आंध्र प्रदेशातील दोन मतदारसंघात एकाच वेळी मतदान पार पडले. २०० पेक्षा अधिक केंद्रांवर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मतदान सुरु होते. विधानसभेसाठी आंध्र प्रदेशात ७८.१४ टक्के, ओडिशात ७३.७६, सिक्कीम ७८.१९ आणि अरुणाचल प्रदेशात ६७.०८ टक्के मतं पडली आहेत.

नरेंद्र मोदींचे महाराष्ट्राकडे अधिक लक्ष :
  • मुंबई : उत्तर प्रदेशात यंदा गेल्यावेळी एवढय़ा यशाची अपेक्षा नसल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे.

  • आतापर्यंत पाच जाहीर सभांमध्ये त्यांची भाषणे झाली असून, आणखी तीन-चार सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसमधील दरी वाढविण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे.

  • प्रचाराच्या काळात मोदी यांची राज्यातील पाचवी सभा अहमदनगरमध्ये झाली. आतापर्यंत वर्धा, गोंदिया, नांदेड, औसा या ठिकाणी मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. १७ एप्रिलला अकलूजमध्ये सभा होणार आहे. मुंबईत २६ एप्रिलला सभा होणार असून, पुणे किंवा बारामतीमध्ये सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आणखी काही मतदारसंघांमध्ये सभा आयोजित करण्याची मागणी होत आहे. उत्तर प्रदेशच्या बरोबरीने महाराष्ट्रात मोदी यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी मोदी यांची सोलापूरमध्ये सभा झाली होती.

  • प्रचाराच्या सभांमध्ये मोदी काँग्रेसवर प्रहार करतात. राहुल गांधी यांच्यावर यथेच्छ टीका करतात. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबरच शरद पवार यांनाही लक्ष्य केले जात आहे. वर्धा आणि गोंदियातील सभांमध्ये मोदी यांनी पवार यांना लक्ष्य केले होते. वध्र्यातील पहिल्याच सभेत राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षांचा उल्लेख केला होता. तर गोंदियातील सभेत तिहारमधील एका कैद्याचा आधार घेत राष्ट्रवादीला इशारा दिला होता. औसा आणि अहमदनगरमध्ये पवार आणि काँग्रेसमध्ये दरी वाढविण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला.

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू उपांत्य फेरीत :
  • सिंगापूर : संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

  • जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या चीनच्या काइ यानयानला पराभूत करण्यासाठी सिंधूला तीन गेमपर्यंत संघर्ष करावा लागला. सिंधूने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेनंतर यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

  • जपानच्या द्वितीय मानांकित नोझोमी ओकुहाराने सहाव्या मानांकित सायनाला २१-८, २१-१३ असे अवघ्या ३६ मिनिटांत सहज पराभूत केले. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यानयानला पहिल्या गेममध्ये ५-५ अशा बरोबरीनंतर पिछाडीवर टाकत पहिला गेम २१-१३ असा जिंकला.दुसऱ्या गेममध्ये मात्र यानयानने सिंधूला मध्यंतराला ११-६ असे पिछाडीवर टाकले. अखेरीस सिंधूला हा गेम १७-२१ असा गमवावा लागला. तिसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने यानयानला अजिबात संधी न देता २१-१४ असा जिंकत सामना खिशात घातला.उपांत्य फेरीत सिंधू आणि ओकुहारात झुंज होणार आहे.

  • पुरुष एकेरीत भारताच्या श्रीकांतला अव्वल मानांकित केंटो मोमोटाशी संघर्षपूर्ण सामन्यानंतर पराभव पत्करावा लागला. मोमोटाविरुद्ध हा  त्याचा नववा पराभव ठरला. या सामन्यातील पहिला गेम मोमोटाने २१-१८ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवत तो गेम २१-१९ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये मात्र मोमोटाने श्रीकांतला अजिबात संधी न देता तो गेम २१-९ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तैवानच्या चाऊ तिएन चेनने समीर वर्माला २१-१०, १५-२१, २१-१५ असे तीन गेममध्ये पराभूत केले. दुहेरीतदेखील भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला थायलंडच्या देचापोल पुआवरणउकरोह आणि सॅपसिरी तेरातंचाइ या जोडीने २१-१४, २१-१६ असे पराभूत केले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

  • १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

  • १८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

  • १९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

  • १९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.

  • १९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

जन्म 

  • १७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

  • १८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर१९७८)

  • १९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.

  • १९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)

  • १९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.

  • १९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

  • १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)

  • १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

  • १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

  • २००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.