चालू घडामोडी - १३ ऑगस्ट २०१८

Date : 13 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नासाची ऐतिहासिक झेप; सुर्याच्या अभ्यासासाठी ‘पार्कर’ यानाचे प्रक्षेपण :
  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला यशस्वीरित्या सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’नामक अंतराळयानाचे रविवारी अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या यानाद्वारे सोडण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमांतून सुर्याचा अधिक जवळून अभ्यास करण्यात येणार आहे. 

  • अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील केप केरनेवल या हवाई दलाच्या प्रक्षेपण केंद्रावरुन याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. डेल्टा ४ या जगातील दुसऱ्या सर्वाधिक शक्तीशाली रॉकेटच्या माध्यमातून हे यान अवकाशात सोडण्यात आले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे ३ वाजून ३१ मिनिटांनी याचे प्रक्षेपण करण्यात आले.

  • एका कारच्या आकाराचे हे अंतराळयान सुर्याच्या पृष्ठभागापासून ६.१६ दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार आहे. यापूर्वी सोडण्यात आलेल्या अंतराळयानांपैकी आजवर कोणत्याही यानाने सुर्याच्या इतक्या जवळ जाऊन सुर्याच्या तापमानाचा आणि उष्णतेचा सामना केलेला नाही.

  • सुर्याच्या चहुबाजूने कशा प्रकारे ऊर्जा आणि प्रकाश निर्माण होतो, तसेच सुर्यापासून निघणाऱ्या सौर लहरींचा अभ्यास या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे. पुढील ७ वर्षे हे यान सुर्याचे वातावरण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पावर नासाने १.५ बिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत.

  • या अंतराळयानाला सक्षम अशा हिट शील्डने सुरक्षित करण्यात आले आहे. कारण, सुर्याजवळ जाताना त्याचे तापमान आणि पृथ्वीपेक्षा ५०० पट जास्त रेडिएशन तो रोखू शकेल. अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ युजीन नेवमॅन पार्कर यांच्या नावावरुन या यानाचे नाव ठेवण्यात आले आहे. हे यान जेव्हा सुर्याच्या सर्वाधिक जवळून जाईल तेव्हा तिथले तापमान २५०० डिग्री सेल्सिअस इतके असेल. हे यान सुमारे ७ लाख २४ हजार किमी प्रती तास वेगाने प्रवास करेल. कोणत्याही मानवनिर्मित वस्तूच्या गतीपेक्षा ही गती सर्वाधिक आहे.

चुकीचा संघ घेऊन मैदानात उतरल्याने पराभव - विराट कोहली :
  • लंडन : 36 कसोटी सामन्यांचं नेतृत्त्व केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्यांदाच एका डावाने पराभव स्वीकारावा लागला. लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 159 धावांनी धूळ चारली.

  • चुकीच्या संघासोबत मैदानात उतरल्यामुळे हा पराभव झाला, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 107 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात सात बाद 396 धावांवर डाव घोषित केला. भारताचे दोन्ही फिरकीपटू या सामन्यात समाधानकारक कामगिरी करु शकले नाहीत.

  • कुलदीप यादव 10 षटकंही गोलंदाजी करु शकला नाही, तर अश्विनने 17 षटकांमध्ये 68 धावा दिल्या.

  • पावसानंतरही भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरला. त्यामुळे या संघ निवडीवर टीका झाली होती. पराभवानंतर पाहिलं तर आम्ही चुकीच्या संघासोबत उतरलो होतो. टीम अगोदरच निवडली होती, त्याचा परिणाम भोगावा लागला, असं विराट कोहली सामना संपल्यानंतर म्हणाला.

  • गेल्या पाच सामन्यांमधला हा सर्वात वाईट पराभव आहे. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, ते पाहता पराभव निश्चित होता, असं विराट म्हणाला.

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन :
  • कोलकाता : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन झालं. किडनीच्या आजारामुळे कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांची अखेरचा श्वास घेतला. सोमनाथ चॅटर्जी 89 वर्षांचे होते. सोमनाथ चॅटर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंरतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • दहा वेळा लोकसभेचे खासदार - माकपचे नेते सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील निर्मल चंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते. निर्मल चंद्र चॅटर्जी हे हिंदू महासभेचे संस्थापक होते. सोमनाथ चॅटर्जी यांनी 1968 मध्ये माकपसह राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 2008 पर्यंत या पक्षात कार्यरत होते. 1971 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. यानंतर राजकारणात त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. चॅटर्जी दहा वेळा लोकसभेचे खासदार होते. तर यूपीए-1 च्या सरकारमध्ये ते 2004 पासून 2009 पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष होते.

  • माकपने हकालपट्टी केली - 2008 मध्ये भारत-अमेरिका अणुऊर्जा करार विधेयकाच्या विरोधात माकपने यूपीए-1 सरकारचा पाठिंबा काढला होता. तेव्हा सोमानाथ चॅटर्जी लोकसभा अध्यक्ष गोते. माकपने त्यांना पद सोडण्यास सांगितलं होतं. परंतु त्यांनी नकार दिला. यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.

  • ममता बॅनर्जींकडून पराभव - राजकीय कारकीर्दीत एकमागोमाग एक विजय मिळवणारे सोमनाथ चॅटर्जी आयुष्यातील एक निवडणूक पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून हरले. 1984 मधील लोकसभा निवडणुकीत जादवपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी या दिग्गज नेत्याला पराभूत केलं होतं.

धनगर समाज आज रस्त्यावर उतरणार :
  • मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. अमरावती-नागपूर महामार्ग आणि मनमाडमध्ये धनगर बांधव शेळ्यामेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत.

  • याशिवाय औरंगाबाद, जळगावमध्ये रास्ता रोको तर जालना-औरंगाबाद महामार्गावरील बदनापुरात गोंधळ आंदोलन करण्यात येईल. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही धरणे आंदोलनाचा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची मागणी आंदोलकांची आहे.

  • धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं. मात्र धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर 5 लाख धनगर मिळून औरंगाबादेत एल्गार पुकारतील असा इशारा धनगर समाजाने यापूर्वीच दिला होता.

  • आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र 4 वर्ष झाली तरी फडणवीसांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवल्याचा आरोप आहे.

३५ विद्यापीठांतील ‘दूरस्थ’ शिक्षण रद्द, यूजीसीचा निर्णय :
  • नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ३५ विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांची (डिस्टन्स लर्निंग) मान्यता रद्द केली. यूजीसीच्या या निर्णयाचा देशातील लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो.

  • या विद्यापीठांना स्पष्टीकरण देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.

  • यूजीसीच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोने याबाबत सूचना जारी करीत स्पष्ट केले आहे की, या शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विचार केला जात आहे. कारण, या अभ्यासक्रमांचे संचलन गत पाच वर्षांपासून होत नाही. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणार आहे.

  • कारण, मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ डिस्टन्ट अ‍ॅण्ड ओपन लर्निंग, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा गांधी विद्यापीठातील दूरस्थ अभ्यासक्रम रद्द करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३८ अभ्यासक्रमांपैकी फक्त १७ अभ्यासक्रम कायम ठेवले आहेत."

  • विद्यापीठांना एक संधी मिळणार : ज्या विद्यापीठांच्या दुरस्थ अभ्यासक्रमांची मान्यता रद्द झाली आहे. त्यांना यासाठी एक संधी मिळणार आहे. यूजीसीने अशा विद्यापीठांना महिनाभरात म्हणणे सादर करण्यास सांगितले. स्पष्टीकरण यूजीसीला पटले नाही तर त्या अभ्यासक्रमांची मान्यता काढून घेतली जाईल.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन

महत्वाच्या घटना

  • १६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.

  • १८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने ४३३ Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.

  • १९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.

  • १९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.

  • १९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.

  • १९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

  • २००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.

जन्म

  • १८८८: स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९४६)

  • १८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९१८)

  • १८९८: लेखक प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६९)

  • १८९९: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

  • १९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९८)

  • १९२६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर२०१६)

  • १९३६: चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय-इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म.

  • १९८३: भारताचे वे ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म.

मृत्यू

  • १७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन. (जन्म: ३१ मे १७२५)

  • १८२६: स्टेथोस्कोपचे शोधक रेने लायेनेस्क यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)

  • १९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. (जन्म: १२ मे १८२०)

  • १९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८६०)

  • १९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)

  • १९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)

  • १९७१: बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले यांचे निधन.

  • १९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल१९१०)

  • १९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९००)

  • १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.