चालू घडामोडी - १३ फेब्रुवारी २०१८

Date : 13 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
१७७ कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक चंद्राबाबू नायडू सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री, माणिक सरकार सर्वात गरीब :
  • नवी दिल्ली- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू  देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे सध्या असलेल्या संपत्तीची एकुण किंमत 177 कोटी रूपये इतकी आहे.  देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.

  • या रिपोर्टनुसार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी 177 कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्तीमुळे सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रमुख स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे सर्वात कमी संपत्ती त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नावे आहे. माणिक सरकार यांच्या नावे 26 लाख रूपयांची संपत्ती असून सर्वात गरीब मुख्यमंत्री असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

  • चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 134.8 कोटी रूपयांची चल संपत्ती आहे तर 42.68 कोटी रूपयांची अचल संपत्ती आहे. या रिपोर्टमध्ये नायडू यांच्यानंतर अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचं नाव आहे. प्रेमा खांडू यांच्याकडे एकुण 129.57 कोटी रूपयांची संपत्ती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह तिसऱ्या स्थानी असून त्यांच्याकडे 48.31 कोटी रूपयांची संपत्ती आहे. 

  • तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 15.15 कोटी रूपये आणि मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा 14.50 कोटी रूपयांच्या संपत्तीसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. 

पाचवी वन डे : इतिहास रचण्यासाठी भारताला इतिहास बदलावा लागणार :
  • पोर्ट एलिझाबेथ : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पाचवी वन डे उद्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कवर खेळवण्यात येईल. दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गची चौथी वन डे जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 1-3 अशी कमी केली.

  • पावसाचा व्यत्यय आणि डेव्हिड मिलरला दिलेली जीवदानं यामुळे टीम इंडियाला चौथ्या वन डेत हार स्वीकारावी लागली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदवण्याची टीम इंडियाची संधी जोहान्सबर्गमध्ये हुकली. भारताला गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेत वन डे सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे विराट कोहलीची टीम इंडिया पाचव्या वन डेसाठी नव्या जोमाने पोर्ट एलिझाबेथच्या मैदानात उतरेल.

  • पोर्ट एलिझाबेथचं मैदान आणि भारत - भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये आतापर्यंत एकही वन डे सामना जिंकलेला नाही. आतापर्यंत इथे खेळलेल्या सर्वच्या सर्व पाचही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. एवढंच नाही, तर केनियानेही भारतावर या मैदानात मात केली होती. पाचही सामन्यांमध्ये भारताला 200 पेक्षा जास्त धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. आतापर्यंत खेळलेला पाच सामन्यांमध्ये भारताची धावसंख्या 147, 179, 176, 163 आणि 142 अशी आहे.

  • पोर्ट एलिझाबेथची हवा भारताची सर्वात मोठी समस्या - पोर्ट एलिझाबेथमधील वेगवान वारं ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या असेल. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही या खेळपट्टीवर लय सापडण्यास अडचणी येतात. हवामान विभागानेही सामन्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला वेगवान वाऱ्याचा इशारा या सामन्यापूर्वी दिला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घेण्याचं आव्हान कर्णधार विराट कोहलीसमोर असेल.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो येणार भारत दौ-यावर :
  • टोरंटो - भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी अशा आठवड्याभराच्या दौ-यावर भारतात येत आहेत. या दौ-यादरम्यान ते नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, आग्रा, अमृतसर या शहरांना भेट देतील. जस्टीन ट्रुडो हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचे पुत्र. त्यामुळे राजकारणाची आणि लिबरल पक्षाच्या धोरणांची माहिती त्यांना लहानपणापासूनच मिळत होती.

  • त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांची आई मार्गारेट आणि वडील पिएरे विभक्त झाले. त्यानंतर कॅनडाच्या मॅकगील विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते फ्रेंच आणि गणित शिकविण्याचे काम केले होते .

  • बॉक्सर, अॅक्टर पंतप्रधान - बॉक्सिंग करणारे, शाळेत शिकवणारे जस्टीन हे खरंंच आगळावेगळे पंतप्रधान आहेत. जस्टीन  तरुणांच्या चर्चामधे विविध कारणांनी येत आहेत. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल इथपासून त्यांच्या विविध मतांर्पयत माध्यमांसकट सर्वत्र चर्चा होत आहे. टॅटू असणारे ते जगातले पहिलेच पंतप्रधान असावेत.

  • त्यांच्याबाबत सांगण्याजोगी आणखी एक वेगळेपणाची बाब म्हणजे पहिल्या महायुद्धावर आधारित 'द ग्रेट वॉर' या सिनेमातही त्यांनी काम केले आहे. भारत भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते विविध विषयांवर चर्चा करतील अशी अपेक्षा भारत व कँनडाच्या माध्यमांत व्यक्त होत आहे.

मस्कतमधील २०० वर्ष जुन्या शिवमंदिरात मोदींच्या हस्ते अभिषेक :
  • मस्कत (ओमान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओमानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त ओमानची राजधानी मस्कतमध्ये असलेल्या शिव मंदिराचं त्यांनी दर्शन देखील घेतलं.

  • पंतप्रधान मोदींनी ज्या शिव मंदिरात पूजा केली त्या मंदिरात शिवलिंगाशिवाय हनुमानाचीही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे मंदिर 200 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जात आहे. हे मंदिर ओमानच्या सुल्तानच्या महालाशेजारीच आहे. या मंदिराला मोतीश्वर मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. हे शिवमंदीर आखाती देशामध्ये बरंच प्रसिद्ध आहे.

  • दरम्यान, या मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते अभिषेकही करण्यात आला. या मंदिराला भेट देण्यापूर्वी मोदींनी ओमानमधील उद्योजकांचीही भेट घेतली. दोन्ही देशातील व्यापारी संबंधावर यावेळी चर्चा करण्यात आली. चार अरब देशांच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.

अयोध्येतून आजपासून ‘राम राज्य रथयात्रे’स सुरूवात, ६ राज्यातून होणार प्रवास :
  • राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वीच अयोध्यातून आजपासून (मंगळवार) राम राज्य रथयात्रेचा शुभारंभ होणार आहे. ही यात्रा तामिळनाडूतील रामेश्वरम येथे संपणार असून दोन महिन्यात सहा राज्यातून ही यात्रा प्रवास करेल.

  • राम राज्य रथयात्रेत एक रथ असेल. एका टाटा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देण्यात आले आहे. ही यात्रा भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्राशिवाय काँग्रेस शासित कर्नाटकमधून जाणार आहे. कर्नाटकमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे राज्य मिळवण्याचा भाजपाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही यात्रा अंतिम टप्प्यात केरळमधून जाईल. या राज्यात भाजपा आपले पंख पसरवू पाहत आहे. 

  • अधिकृतरित्या ही रथयात्रा महाराष्ट्रातील एका सामाजिक संघटनेद्वारे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ-भाजपाशी वैचारिक साम्य असणारे विश्व हिंदू परिषद आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच सारख्या संघटना सहभागी होत आहेत.

  • अयोध्येत १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी अभियान सुरू केले होते. या यात्रेनंतरच भाजपा देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून पुढे आला. गेल्या काही वर्षांत भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात हा मुद्दा पहिल्या पानावरून शेवटच्या पानांवर ढकलला होता. इतकंच काय तर मागील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हा प्रमुख मुद्दा नव्हता.

रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार :
  • मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां'ची अखेर घोषणा करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कार रखडले होते. यंदाच्या पुरस्कारांसह रखडलेल्या पुरस्कारांचीही घोषणा सोमवारी करण्यात आली.

  • 2014-15 साठी अॅथलेटिक्समध्ये रमेश तावडे, 2015-16 साठी मल्लखंब खेळातील अरुण दातार आणि 2016-17 साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात बिभीषन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षके विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार जाहीर झाला. 2014-15 साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नुकतेच सात महासागर पोहून पार करणारा जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरवण्यात येणार आहे.

  • पुरस्कारांसाठी 776 अर्ज आले होते. यातून ऑनलाईन पद्धतीने 195 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. 17 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियाला राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

नऊवारी नेसून शीतल महाजनांचं १३ हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग :
  • बँकॉक : स्काय डायव्हिंग करणाऱ्या अनेक धाडसी व्यक्तींचे व्हिडीओ आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र नऊवारी साडी नेऊन तब्बल 13 हजार फुटांवरुन एका महिलेने उडी मारली. पुण्याच्या शीतल महाजन यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली.

  • थायलंडमधील स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये 13 हजार फुटांवरुन नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग केलं.

  • शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये आजवर 17 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रमही रचले आहेत.

  • महाराष्ट्राची शान असलेल्या पद्मश्री शीतल महाजन यांना मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे. मराठी संस्कृतीचं जतन व्हावं आणि मराठी बाणा कायम रहावा यासाठी त्यांनी ही अनोखी कामगिरी केली.

  • महाराष्ट्राची संस्कृती असलेला नऊवारी साडीचा पेहराव करुन पहिल्यांदाच त्यांनी विमानातून जम्प केली. जगामध्ये आजवर कोणीच साडी नेसून स्काय डायव्हिंग करण्याचा धाडसी प्रयत्न केला नसल्याचं त्या म्हणाल्या.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

  • १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

  • १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

  • १९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

  • १९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

  • १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

  • २००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

  • २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.

जन्म

  • १७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)

  • १८३५: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८)

  • १८७९: प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९)

  • १८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६)

  • १९१०: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९९)

  • १९११: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर१९८४)

  • १९४५: अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

मृत्यू

  • १८८३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३)

  • १९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३)

  • १९६८: संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.

  • १९७४: इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट१९१२)

  • २००८: हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.

  • २०१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.