चालू घडामोडी - १३ फेब्रुवारी २०१९

Date : 13 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हिरवाई निर्मितीच्या प्रयत्नात भारत-चीनचा मोठा वाटा :
  • वॉशिंग्टन : जास्त लोकसंख्येचे देश हे नेहमी पर्यावरणाची हानी करीत असतात, त्यामुळे जमिनीवरील हिरवाईचे क्षेत्र कमी होते, असा आतापर्यंतचा समज असला तरी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या एका अहवालाने तो खोटा ठरला आहे. चीन व भारत या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांनीच हिरवाई निर्माण करण्याच्या जागतिक उद्दिष्टात मोठे काम केले आहे असे अहवालात म्हटले आहे.

  • जग हे वीस वर्षांपूर्वीपेक्षा जास्त हिरवे आहे, असाही निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधात मुख्य लेखक व बोस्टन विद्यापीठातील प्राध्यापक ची चेन यांनी म्हटले आहे, की जगातील एकतृतीयांश हिरवाई भारत व चीनमध्ये असून, जगातील हिरवाईखालील क्षेत्राचा ९ टक्के भाग या दोन्ही देशांत आहे.  ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शोधनिबंधात २०००-२०१७ या काळात नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भारत व चीन या देशांत जगातील इतर पीक क्षेत्रापेक्षा हिरवाईचे पट्टे अधिक आहेत असे म्हटले आहे.

  • जगात हिरवाईमध्ये जेवढी वाढ झाली आहे त्यातील २५ टक्के वाटा चीनचा असून तेथे भाजीपाला व पिकांचे क्षेत्र ६.६ टक्के आहे.  चीनमधील वनांचे क्षेत्र ४२ टक्के, पीकक्षेत्र ३२ टक्के असून भारतात पीक क्षेत्र ८२ टक्के, तर वन क्षेत्र ४.४ टक्के आहे. चीन अतिशय योजनाबद्धरीत्या वनांचे रक्षण करीत असून प्रदूषण, हवामान बदल या समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन व भारत यांचे अन्न उत्पादन २००० पासून ३५ टक्के वाढले असून, विविध पिके घेण्याची पद्धत तेथे आहे. शिवाय खते व भूजलाचा वापर केला जात आहे.

  • नासाच्या अ‍ॅमेस संशोधन केंद्रातील वैज्ञानिक रमा नेमाणी यांनी सांगितले, की पृथ्वीची हिरवाई ही उबदार व ओलसर हवामान, कार्बन डाय ऑक्साइड यामुळे असल्याचे मानले जात होते, पण नासाच्या टेरा व अ‍ॅक्वा या उपग्रहांनी जी माहिती दिली आहे त्याच्या आधारे ही हिरवाई निर्माण करण्यात मानवी प्रयत्नाचा मोठा भाग आहे.  भारत व चीनमध्ये १९७०-१९८० या काळात हिरवाईची परिस्थिती चिंताजनक होती. त्यानंतर १९९० पासून लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणे हिरवाई वाढवण्याचे प्रयत् न सुरू केले. त्याचे परिणाम उपग्रहाच्या माहितीतून दिसून आले आहेत. असे असले तरी हिरवाई निर्माण करताना भारतात भूजलाचा वापरही केला जात आहे.

पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई :
  • पुण्याच्या सिद्धी शिर्के हिने ६४व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने १४ वर्षांखालील मुलींच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल स्थान पटकावले. सिद्धीचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने रोड सायकलिंगमध्ये ६ किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.

  • भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी सिद्धी शिर्केने ४५.११० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. तामिळनाडूच्या एम. पूजा स्वेताने ४७.६१० सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक प्राप्त केले. तर महाराष्ट्रच्या सुहानी मोरेने ५२.५१७ सेकंदासह कांस्यपदकाची कमाई केली.

  • १४ वर्षांखालील मुलांच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये झारखंडच्या नारायण महतोने (४०.१८५ सेकंद) सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलला (४१.६८० सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. झारखंडच्या अर्णव श्री याने (४१.८३० से.) कांस्यपदक मिळवले.

  • १७ वर्षांखालील मुलींच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये दिल्लीच्या लिकझेस अंगमोने ४३.७१० सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या मानसी कमलाकरला (४३.९६० सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिल्लीच्या नावरम चंद हिने (४४.०७० सेकंद) कांस्यपदक मिळवले. याच प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दीपक मुकणेने ३७.६९२ सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले. पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगने (३७.३४० सेकंद) सुवर्ण तर दिल्लीच्या संजय सरवानन ( ३७.६३० सेकंद) रौप्यपदक मिळवले.

ट्रायचा ग्राहकांना दिलासा, आवडीचे चॅनल निवडण्यासाठी मुदतवाढ :
  • टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने ग्राहकांना दिलासा देत आवडीचे चॅनल निवडण्याची मुदत वाढवली आहे. आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता ट्रायने ३१ मार्च ही नवी डेडलाईन दिली आहे.

  • यापूर्वी ट्रायने ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, केबल सेवा असलेले ६५ टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या केवळ ३५ टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या वाहिन्यांची निवड केली असल्याची माहिती ट्रायने दिली. अनेक जणांना नव्या नियमांनुसार टीव्ही चॅनलचे पॅक कसे निवडावे याबद्दल माहिती नाहीये किंवा संभ्रम आहे.

  • परिणामी, ट्रायने ‘व्यापक जनहिताचा विचार करून ज्या ग्राहकांनी आपले चॅनल निवडलेले नाहीत त्यांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या पॅकमध्ये (बेस्ट फीट प्लॅन) समाविष्ट केले जावे किंवा जोपर्यंत ग्राहक आपले चॅनल निवडत नाहीत किंवा त्यांना इतर योग्य पॅकमध्ये समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत सध्या ग्राहकाचा सुरु असलेला पॅकच सुरू ठेवावा, असे आदेश दिले आहेत.

…तर ‘भारतरत्न’ पुरस्कार परत घेऊ : केंद्र सरकार :
  • ‘भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार म्हणजे कोणती पदवी नाहीये, त्याचा वापर नावाच्या सुरूवातीला किंवा शेवटी करता येणार नाही आणि जर याचा कोणी गैरवापर करताना आढळलं तर त्यांच्याकडून ते पुरस्कार आम्ही परतही घेऊ शकतो.’ लोकसभेत मंगळवारी एका लेखी प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ही माहिती दिली आहे.

  • ‘भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री हे राष्ट्रीय पुरस्कार कलम 18(1)अंतर्गत पदवीच्या श्रेणीत येत नाहीत. परिणामी नावाच्या सुरूवातीला किंवा शेवटी याचा वापर करता येणार नाही. या पुरस्कारांचा कोणीही दुरुपयोग करू शकत नाही. जर असं करताना कोणी आढळलं तर ते पुरस्कार आम्ही परतही घेऊ शकतो’ असं अहिर म्हणाले.

  • देशासाठी केलेल्या अतुलनीय कार्यानिमित्त सन्मानपूर्वक हे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. 1955 पासून आतापर्यंत एकूण 38 जणांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर 307 जणांना पद्म विभूषण, 1255 जणांना पद्म भूषण आणि 3,005 जणांना पद्म श्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

आजपासून महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना १० टक्के आरक्षण लागू :
  • उस्मानाबाद : आजपासून महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षणासाठीचा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. यापूर्वी आर्थिकदृष्ट्या मागास घोषित झालेल्या मराठा समाजाला या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. याआधी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर झालं आहे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे, त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळेल.

  • आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षणाचा लाभ शैक्षणिक संस्थामध्येही मिळणार आहे. राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचा शाळा वगळता सर्व खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तर राज्यातील सर्व सीबीएसई आंतरराष्ट्रीय बोर्डातही हे आरक्षण लागू होणार आहे. याशिवाय सर्व उच्च महाविद्यालये, वैद्यकीय शिक्षण, तसेच सर्व विनाअनुदानित महाविद्यालयांत हे आरक्षण लागू  होणार आहे.

  • नोकऱ्यांमध्ये शासकीय आस्थापना, निमशासकीय आस्थापना, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था, अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व मेगाभरती, शिक्षण सेवक भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण लागू होणार आहे.

  • आईवडील आणि अठरा वर्षांखालील कुटुंबातील सदस्यांचं एकत्रित उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणाऱ्या सर्वांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी तहसीलदारांवर सोपवण्यात आली आहे. यापूर्वी आरक्षण घोषित झालेल्या घटकांना, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

वायुप्रदूषणामुळे दरवर्षी सर्वाधिक बळी महाराष्ट्रात; मुंबई देशात सर्वाधिक प्रदूषित शहर :
  • निमली (राजस्थान) : वायुप्रदूषणामुळे देशात सर्वाधिक १ लाख ८ हजार अपमृत्यू महाराष्ट्रात झाले असून, देशाची आर्थिक राजधानी मुंबर्ई देशातील सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पुढे येत आहे. देशात दरवर्षी २४ लाख मृत्यू वायुप्रदूषणामुळे होतात.

  • राष्ट्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवर आधारित ‘भारतातील पर्यावरणाची सद्य:स्थिती-२०१९’ हा अहवाल मंगळवारी विज्ञान आणि पर्यावरण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला. त्यात महाराष्ट्राने लक्षवेधी प्रदूषणाची पातळी गाठल्याचे म्हटले आहे. महाराष्टÑातील वाढत्या प्रदूषणावर ‘राज्यातील शहरांचा श्वास गुदमरतोय’ असे वृत्त ‘लोकमत’ने २२ जानेवारी रोजी दिले आहे. या वृत्तावर पर्यावरणविषयक अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.

  • हा अहवाल लवकरच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. पुणेस्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र केंद्राचे संचालक डॉ. गुलफ्रान बेग यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्लीत जरी धुळीचे प्रमाण जादा असले तरी मुंबईत बांधकामावरच्या धूलिकणांसह, वाहनांतून निघणारा धूर, औद्योगिक प्रदूषणातून उद्भवणारे विषारी रासायनिक कण अधिक आहेत. शिवाय, आर्द्रतेमुळे हे विषारी धूलिकण हवेतच तरंगत राहतात.

  • मुंबईबाबत सर्वांत धोकादायक माहिती अशी की, अत्यंत विषारी असलेल्या नायट्रोजन डायआॅक्साइडचे प्रमाण २००७ ते २०१७ या दहा वर्षांत १० टक्क्यांनी वाढले आहे. यातही डोंबिवली, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहरे दिल्ली आणि हावडा यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहेत. नवी मुंबई, ठाणे या महाराष्ट्रातील शहरांनी कानपूर, कोलकाता आणि मिरत यांच्याबरोबर स्थान मिळविले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

  • १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

  • १९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

  • १९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

  • १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

जन्म 

  • १७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)

  • १८७९: प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९)

  • १८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६)

  • १९११: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)

मृत्यू 

  • १९७४: इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)

  • २०१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.